श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पस्तिसावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पस्तिसावा कचदेवयानी कथा - सोमवारव्रत - सीमंतिनी आख्यान !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक सिद्ध्योग्यांच्या पाया पडून म्हणाला, "स्वामी, श्रीगुरुंनी त्या ब्राम्हण पतिपत्नीला रुद्रध्यायाचे माहात्म्य सविस्तर सांगितले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा. श्रीगुरुचरित्र ऐकण्यास माझे मन आतुर झाले आहे." नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, त्यानंतर एक अपूर्व घटना घडली. ज्या स्त्रीचा मृत पती श्रीगुरुंच्या कृपेने जिवंत झाला ती पतिव्रता हात जोडून श्रीगुरुंना म्हणाली, "स्वामी, आता आमची गती काय ? आमचा उद्धार कसा काय होईल ? आम्हाला काहीतरी उपदेश करा. मला एखादा मंत्र द्या, त्यामुळे तुमच्या चरणांचे स्मरण निरंतर राहील." त्यावर श्रीगुरू म्हणाले, "स्त्रियांना मंत्र देण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पतीची मनोभावे सेवा करावी हेच त्यांचे कर्तव्य आणि हीच त्यांची परमेश्वर उपासना. स्त्रियांना कधीही मंत्र देऊ नये. त्यांना मंत्रोपदेश दिला तर मोठी संकटे येतात. पूर्वी दैत्यगुरु शुक्राचार्यांना याचा अनुभव आला होता. त्यावर ती स्त्री हात जोडून म्हणाली, "स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही असे का म्हणता, ते का ? शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला ते मला सविस्तर सांगा." त्या स्त्रीने अशी विनंती केली असता श्रीगुरू म्हणाले, "त्या विषयीची एक कथाच मी सांगतो, ती ऐक." पूर्वी देवदैत्यांची सतत युद्धे होत असत. दैत्य सैन्य युद्धात पडले की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्राने त्यांना पुन्हा जिवंत करीत असत, मग पुन्हा युद्ध सुरु होत असे. देवांचा सेनापती इंद्र आपल्या वज्रप्रहाराने दैत्यसेनेला ठार मारत असे. शुक्राचार्य लगेच संजीवनी मंत्राने दैत्यांना जिवंत करीत असे. मग दैत्य देवसेनेवर हल्ला करीत असत. असे सतत घडत होते. दैत्यांचा पराभव करणे देवांना कठीण होऊन बसले होते. मग इंद्राने कैलासलोकास जाऊन शुक्रचार्याविषयी तक्रार केली,"तू ताबडतोब जा व त्या शुक्राचार्याला पकडून येथे आण." शंकरांनी अशी आज्ञा करताच नंदी धावतच शुक्राचार्यांकडे गेला. त्यावेळी शुक्राचार्य ध्यान करीत बसले होते. नंदीने त्यांना आपल्या तोंडात धरले व शंकराच्याकडे आणले. शंकरांनी तत्काळ शुक्राचार्यांना उचलून व आपल्या तोंडात टाकून गिळले. हे समजताच भयभीत झालेले दैत्य आकांत करू लागले. कित्येक दिवस शुक्राचार्य मूत्रातून बाहेर पडले व निघून गेले. शंकराच्या ते लक्षातच आले नाही. पूर्वी त्यांचे नाव 'शुक्र' होते. शंकराच्या पोटात त्यांचा उद्भव झाला म्हणून त्यांना 'भार्गव' असे नाव पडले. शुक्राचार्य दैत्यांकडे गेला व मंत्राचा प्रयोग करू लागला. इंद्रापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. आता यावर काय उपाय करायचा ? असा विचार करीत तो देवगुरु बृहस्पती यांना भेटला.

तो बृह्स्पतींना म्हणाला, "गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुनःपुन्हा जिवंत करतो. त्यामुळे आम्हाला दैत्यांचा नाश करता येत नाही. त्या शुक्रचार्यासारखे मंत्रसामर्थ्य आपल्याकडे नाही. देवांची शक्ती गेली तर ती पुन्हा प्राप्त होत नाही. असेच सतत चालू राहिले, तर देवांचा संपूर्ण नाश होईल व अवघ्या त्रैलोक्यावर दैत्यांचे राज्य येईल. तुम्ही सर्व देवांना पूज्य, वंदनीय आहात. तुम्ही जर आमच्यावर कृपा केली तर शुक्राचे तुमच्यापुढे काहीही चालणार नाही. तो तुमची बरोबरी करू शकणार नाही." इंद्राने अशी प्रार्थना केली असता देवगुरु बृहस्पती इंद्राला म्हणाले, "देवेंद्रा, यावर एकाच उपाय आहे. शुक्राचा तो संजीवनी मंत्र षट्कर्णी केला असता शुक्राचे काहीएक सामर्थ्य राहणार नाही. आता आपल्यापैकी एखाद्याला विद्यार्थी असा ब्राम्हण करून शुक्राकडे पाठवावे. तो आत्मसंरक्षणासाठी संजीवनी मंत्र शिकेल." त्यावर इंद्र म्हणाला, "तुमचा पुत्र कच आहे. त्यालाच विद्याभ्यासाच्या निमित्ताने शुक्राकडे पाठवावे. तो शुक्राची मनोभावे सेवा करील व मोठ्या युक्तीने त्याच्याकडून संजीवनी मंत्र मिळवील. असे झाले तर फारच छान होईल."

इंद्राची ही योजना बृह्स्पतींना एकदम पसंत पडली. त्यांनी कचाला बोलावून सांगितले, "तू विद्यार्थी म्हणून शुक्राकडे जा. त्याच्यापुढे देवांची खूप निंदा कर. मी देवांना कंटाळून आपणास शरण आलो आहे. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करा." असे बोलून त्यांची मनोभावे सेवा कर, त्यांना प्रसन्न करून घे व त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवून लगेच परत ये." कचाने ते मान्य केले. मग तो बृह्स्पतींना व इंद्रादी देवांना वंदन करून शुक्राचार्याकडे गेला व हात जोडून नम्रपणे त्यांच्यापुढे उभा राहिला. शुक्राचार्यांनी त्याची नीट विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला, "मी ब्राम्हणपुत्र आहे. मी आपली कीर्ती ऐकून विद्याध्ययनासाठी आपणास शरण आलो आहे, माझा कृपया स्वीकार करावा. आपली मनोभावे सेवा करीन. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा." त्यावेळी शुक्राचार्यांची एकुलती एक लाडकी कन्या देवयानी तेथेच होती. ती आपल्या वडिलांना म्हणाली, "बाबा, हा ब्राम्हणकुमार चांगला विद्यार्थी दिसतो आहे. याचा तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा व त्याला विद्या शिकवावी." देवयानी कचाकडे निरखून पाहत होती. तरुण, अत्यंत रूपवान असलेला कच, दुसराच मदन आहे असे देवयानीला वाटले. 'हाच आपला पती व्हावा' असे तिला मनोमन वाटत होते.

शुक्राचार्यांनी कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारले. कच शुक्राचार्याच्या आश्रमात राहून विद्याध्ययन करू लागला. दैत्यांना मात्र 'हा कच देवांच्याकडून संजीवनी विद्या मिळवण्यासाठीच आला आहे. आता याला जर संजीवनी विद्या मिळाली तर आपल्यावर मोठे संकट येईल.' या विचाराने सगळे दैत्य मोठ्या काळजीत पडले. काहीही करून संधी मिळताच याला ठार मारावयाचे असे त्यांनी ठरविले. तशी संधी चालून आली. एके दिवशी कच काही दैत्यांच्या बरोबर समिधा आणण्यासाठी वनात गेला. तेथे दैत्यांनी त्याला ठार मारले व स्वतःच समिधा घेऊन परत आले.

कच कुठे दिसेना म्हणून देवयानी अस्वस्थ, बैचेन झाली. कच परत आल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असे ती शुक्राचार्यांना म्हणाली, "कचाला दैत्यांनी ठार मारले आहे हे शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले. त्यांनी देवयानीच्या हट्टास्तव संजीवनी मंत्राचा जप करून त्याला जिवंत केले. मग कच आश्रमात परत आला. असेच काही दिवस गेले. एके दिवशी कच वनात गेला. टपून बसलेल्या दैत्यांनी त्याला ठार मारले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले व ते दही दिशांना फेकून दिले. संध्याकाळ झाली. सूर्यास्त झाला. कच कुठे दिसत नव्हता. त्यामुळे शोकाकुल झालेली देवयानी पित्याला म्हणाली, "कच माझा प्राणसखा आहे. काहीही करून त्याला परत आणा. नाहीतर मी विष प्राशन करून प्राणटायग करीन." आपल्या कन्येच्या हट्टास्तव शुक्राचार्यांनी पुन्हा संजीवनी मंत्राचा जप करून कचाला जिवंत केले. कच घरी परत आला. त्याला पाहताच देवयानीला आनंद झाला. असेच आणखी काही दिवस गेले. दैत्य मोठ्या काळजीत पडले. 'काही केल्या हा कच मारत नाही. याला ठार मारले असता गुरु कन्येवरील प्रेमामुळे याला पुनःपुन्हा जिवंत करतात.' मग दैत्यांनी एक भयंकर कृत्य केले. त्यांनी कचाला बाहेर नेउन ठार मारले. शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय होती म्हणून दैत्यांनी कचाच्या हाडांचेही चूर्ण करून, ते जाळून त्याचे भस्म तयार केले व ते मद्यात चांगले मिसळून ते शुक्राचार्यांना प्यायला दिले. आता काही झाले तरी कच जिवंत होणार नाही. या विचाराने सगळे दैत्य आनंदित झाले. कच दिसेना म्हणून देवयानी रडू लागली. त्याला परत आणा असा पित्याला आग्रह करू लागली. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले. दैत्यांच्याच कारस्थानामुळे कच आता आपल्या पोटात आहे. आता त्याला जिवंत करणे शक्य नाही. कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत करणे शक्य नाही. कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत केले तर तो आपले पोट फाडून येणार , म्हणजे आपणास मरण येणार ! "

त्यांनी देवयानीला परिस्थितीची जाणीव करून दिली व कच आता जिवंत होणार नाही से सांगितले. त्यावर देवयानी म्हणाली, "तुम्ही मरण पावलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करता, मग तुम्हाला स्वतःच्या मृत्यूची भीती का वाटते ? " शुक्राचार्य म्हणाले, "संजीवनी मंत्र फक्त मलाच येतो. तो मी इतरांना सांगितला तर त्याचा प्रभाव नाहीसा होईल. अशा परिस्थितीत मी काय करणार ? "देवयानी म्हणाली, "तो मंत्र मला द्या. कचाला जिवंत करताना जर तुम्हाला मृत्यू आला तर मी त्या मंत्राने तुम्हाला जिवंत करीन."

शुक्राचार्य म्हणाले. "स्त्रियांना मंत्र देऊ नये अशी शास्त्राची आज्ञा आहे. पतिसेवा हाच स्त्रियांसाठी मंत्र आहे. त्यांनी मंत्रजप करू नये. त्यांनी मंत्रजप केला तर मोठा अनर्थ घडतो, त्या मंत्राचे सामर्थ्य कमी होते, म्हणून मी तुला संजीवनी मंत्र देऊ शकत नाही." हे ऐकताच देवयानीला राग आला. ती म्हणाली, "असे असेल तर तुमचा मंत्र तुमच्याशी घेऊन बसा ! मी कचाशिवाय एक क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. आता मी प्राणत्याग करते." क्रोधाने बोलून ते एकेकी बेशुद्ध पडली. शुक्राचार्यांची देवयानीवर अतिमाया. ते द्रवले. त्यांनी तिला सावध केले, समजाविले व तिला संजीवनी मंत्र सांगितला. शुक्राचार्य देवयानीला मंत्र सांगत असता त्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो लक्षपूर्वक ऐकला. पूर्ण लक्षात ठेवला. तो शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने मंत्र जपून शुक्राचार्यांना जिवंत केले. कचाने तो मंत्र तीनवेळा म्हणून लक्षात ठेवला. ज्या कार्यासाठी तो आला होता ते त्याचे कार्य झाले होते. मग तो शुक्राचार्याच्या पाया पडून म्हणाला, "गुरुदेव, तुमच्या कृपेने मला सर्व विद्या प्राप्त झाल्या; पण येथील दैत्य माझा द्वेष करतात व मला ठार मारतात म्हणून मी येथे राहणे योग्य नाही. मी आता परत जातो." शुक्राचार्यांनीही मोठ्या आनंदाने त्याला निरोप दिला. कच जाऊ लागला तेव्हा देवयानी टायचा हात पकडून म्हणाली," माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझा पत्नी म्हणून स्वीकार कर." कच म्हणाला, "देवयानी, तू गुरुकन्या आहेस म्हणजे तू माझी बहीण ठरतेस. शिवाय तू संजीवनी मंत्र पित्याकडून घेऊन मला पुनर्जन्म दिला आहेस, म्हणजे एकार्थाने तू माझी माता ठरतेस म्हणून तू हा अयोग्य विचार मनात काढून टाक. मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. माझा हात सोड. मला जाऊ दे." कचाचे हे शब्द ऐकताच देवयानी अतोशय संतापली. तुच मोठाच अपेक्षाभंग झाला होता. त्या रागाच्या भारत तिने कचाला शाप दिला, "तुला मिळालेली संजीवनी विद्या ती तत्काळ विसरशील. तू माझी घोर निराशा केलीस. तुला मिळालेली विद्या व्यर्थ जाईल."

त्यावर कच म्हणाला, "तू मला व्यर्थ शाप दिलास. मीही तुला सांगतो, कोणीही ब्राम्हण तुला वरणार नाही. तुझा विवाह ब्राम्हणेतर पुरुषाशी होईल. तुझ्या पित्याने तुला संजीवनी मंत्र दिला खरा; पण तो षट्कर्णी झाल्यामुळे यापुढे तो निष्फळ ठरेल" असा देवयानीला प्रतिशाप देऊन कच स्वर्गलोकाला गेला. इंद्रासह सर्व देवांना मोठा आनंद झाला. ही कथा सांगून श्रीगुरू त्या स्त्रीला म्हणाले, "पतिसेवा हाच स्त्रियांच्यासाठी महामंत्र आहे. स्त्रियांना मंत्र देऊ नये. त्यांनी व्रतोपवास करावा. त्यांनी पतिसेवा करावी." त्यावर ती स्त्री म्हणाली, "स्वामी, तुमचे वचन प्रमाण ! तुम्ही सांगाल तसे आम्ही करू. जो गुरूच्या आज्ञेनुसार वागत नाही तो नरकात जातो. आता मी कोणते व्रत करू ते मला सांगा." अशी तिने विनंती केली असता भक्तवत्सल श्रीगुरुंनी तिला एक व्रत सांगितले. श्रीगुरू म्हणाले," तुला जे व्रत मी सांगणार आहे ते व्रत पूर्वी सूतांनी ऋषींना सांगितले होते. ते व्रत म्हणजे सोमवार व्रत. हे शिवउपासनेचे व्रत स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी, सर्वांनी करावे. भगवान शंकराच्या आराधनेने हे सोमवार व्रत केले असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्रांनी भगवान शंकराची यथासांग पूजा करावी. नक्तभोजन उपवास करावा. विधवा स्त्रीनेही हे व्रत करावे. या विषयी स्कंदपुराणातील एक कथा सांगतो. ही कथा श्रवण केली असता असाध्य ते साध्य होते."

सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले,"नामधारका, श्रीगुरुंनी त्या ब्राम्हण पतिपत्नीला एक प्राचीन कथा सांगितली. तीच सीमंतिनीची कथा मी तुला सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक." एकदा नैमिषारण्यात सर्व ऋषींनी पुराणकार सूतांना विचारले, "सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत कोणते ? " तेव्हा सूत म्हणाले, "भगवान सदाशिवाचे सोमवार व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे. भगवान शिवाची भक्ती स्वर्ग व मोक्ष देणारी आहे. जर प्रदोषादी गुणांनी युक्त अशा सोमवारी शिवपूजन केले तर त्याचे माहात्म्य अधिक आहे. जे केवळ सोमवारी शिवपूजा करतात तय्णन इहपरलोकी दुर्लभ असे काहीच नाही. सोमवारी उपवासपूर्वक पवित्र अंतःकरणाने भगवान सदाशिवाची पूजा करावी. ब्रम्हचारी, गृहस्थ, कन्या अथवा विधवा अशा कोणीही भगवान शिवाची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या विषयी एक कथा सांगतो. ती श्रवण केली असता मोक्षप्राप्ती होते. त्याच्या मनात शिवभक्तीची इच्छा निर्माण होते. ही कथा स्कंदपुराणात आली आहे, ती अशी -

पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक थोर, गुणवान, धर्मशील राजा होता. तो महापराक्रमी व न्यायप्रिय होता. तो भगवान विष्णूंचा व शिवाचा परमभक्त होता. त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी झाली. ती मुलगी जन्मास येताच एका विद्वान ज्योतिषाने तिचे भविष्य वर्तविले. तो ज्योतिषी म्हणाला, "राजा, आपली कन्या 'सीमंतिनी' नावाने प्रसिद्ध होईल. ही पार्वतीप्रमाणे मंगल, दमयंतीप्रमाणे सुंदर,सरस्वतीप्रमाणे सर्वकालानिपुण व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल. ही आपल्या पतीसह दहाहजार वर्षे सुख भोगेल. हिला आठ पुत्र होतील." पण याचवेळी दुसऱ्या एका ज्योतिषाने भविष्य सांगितले, "हिला चौदाव्या वर्षी वैधव्य येईल." हे अशुभ भविष्य ऐकून राजाला अतयंत दुःख झाले. सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. तिला आपल्या मैत्रिणींकडून आपल्या भावी वैधव्याची वार्ता समजली. तेव्हा दुःखी झालेल्या तिने याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी हिला विचारले, "सौभाग्य टिकण्यासाठी कोणते बरे व्रत करावे ?" तेव्हा मैत्रेयी म्हणाली, "तू शिवपार्वतीला शरण जा. त्यामुळे कितीही संकट आले तरी त्यातून तू मुक्त होशील. महाभयंकर संकट आले तरी शिवपूजा सोडू नकोस. तय्च्या प्रभावाने तू संकटमुक्त होशील. तू सोमवारव्रत सुरु कर. त्या दिवशी उपवासपूर्वक शिवपूजन करावे. गौरीहराची शांतचित्ताने पूजा करावी.अभिषेक करावा. असे केल्याने सौभाग्य अखंड राहते. सदाशिवाला नमस्कार केला तर चारी पुरुषार्थ सिद्धीला जातात. त्याच्या नामाचा जप केला तर सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते. तू हे व्रत कर. तुझे कल्याण होईल." सीमंतिनीने मैत्रेयीच्या आदेशानुसार सोमवारचे व्रत सुरु केले.

काही दिवसांनी निषध देशाचा राजा इंद्रसेन याच्या चंद्रागद नावाच्या पुत्राशी सीमंतिनीचा मोठ्या थाटात विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस चंद्रागद सीमंतिनीच्या माहेरीच राहिला. एके दिवशी जलक्रीडा करण्यासाठी तो यमुनेवर गेला, परंतु अकस्मात नाव उलटून चंद्रागद नदीत बुडाला. या दुर्घटनेमुळे सर्व लोक दुःखसागरात बुडाले. चित्रवर्मा तर दुःखाने वेडाच झाला. सीमंतिनीवर तर तो वज्रघातच होता. पतिनिधनामुळे दुःखाकुल झालेल्या सीमंतिनीने अग्निप्रवेश करून पत्तेकडे जाण्याचे ठरविलेल परंतु वडिलांनी तिची समजूत घालून अग्निप्रवेश करण्यापासून परावृत्त केले. सीमंतिनी आता वैधव्य जीवन जगू लागली. मैत्रेयीने सांगितलेले सोमवारव्रत तिने अत्यंत श्रद्धेने, निष्ठेने वैधाव्यातही चालू ठेवले. अशाप्रकारे केवळ चौदाव्या वर्षी दारूण दुःख प्राप्त झालेली सीमंतिनी भगवान सदाशिवाचे सतत स्मरण करू लागली. इकडे पुत्रशोकाने वेड्या झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या शत्रूने बळकाविले व इंद्रसेनाला पत्नीसह कारागृहात कोंडले.

चंद्रगद यमुनेच्या डोहात बुडाला, तो खाली खाली गेला. तेथे त्याला नागकन्या जलक्रीडा करीत असलेल्या दिसल्या. चंद्रागदाला पाहून आश्चर्यचकित झालेल्या नागकन्यांनी त्याला पातळलोकात तक्षक नागाकडे नेले. तक्षकाने त्याची मोठ्या प्रेमाने विचारपूस केली, तेव्हा चित्रांगद म्हणाला, "पृथ्वीवर निषध नावाचा प्रसिद्ध देश आहे त्या देशात पुण्यश्लोक नलराजा होऊन गेला. त्याचा पुत्र इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आहे. माझे नाव चंद्रागद. मी माझ्या विवाहानंतर पत्नीच्या माहेरी काही दिवस राहिलो होतो. एके दिवशी यमुनेत मी जलक्रीडा करीत असता पाण्यात बुडालो. नागस्त्रियांनी मला येथे आणले आहे. आपण अतयंत प्रेमाने माझी विचारपूस केल्यामुळे मी धन्य झालो आहे."

तक्षक म्हणाला, "राजपुत्रां, तू घाबरू नकोस. धैर्य कर. मला सांग, तू कोणत्या देवाची आराधना करतोस ? "चंद्रागद म्हणाला, "विश्वात्मा उमापती भगवान शिवाची मी सदैव पूजा करतो." चंद्रागदाचे हे शब्द ऐकताच तक्षक आनंदित झाला. तो म्हणाला, "राजपुत्रा, तुझे कल्याण असो ! मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू इतक्या लहानपणी शिवतत्व जाणतोस याबद्दल मला फार आनंद झाला आहे. आता तू येथेच राहा. येथे मृत्यूची भीती नाही. रोग नाही. कसलीही पीडा नाही. येथे तू सुखाने राहा व सर्व सुखांचा उपभोग घे." चंद्रागद हात जोडून म्हणाला, "नागराज, माझा विवाह झालेला आहे. माझ्या आई-वडिलांना मी एकटाच आहे. माझ्या मृत्यूमुळे ते शोकाकुल झाले असतील, त्यामुळे मी येथे सुखोपभोगात राहणे योग्य नाही. मनुष्यलोकांत पोहोचवा."

नागराज म्हणाला, "राजपुत्रा, तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यापुढे प्रकट होईन." असे सांगून त्याने चंद्रागदाला एक दिव्य घोडा दिला. त्याशिवाय अनेक रत्नालंकार व दिव्य वस्त्रे भेट म्हणून दिली. चंद्रागद त्या घोड्यावर स्वार होऊन यमुनेच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर दोन नागकुमारही होते. चंद्रागद यमुनेच्या काठावर आला, त्यावेळी सीमंतिनी आपल्या मैत्रिणीसह तेथे आली होती. चंद्रागदाला पाहून ती गोंधळलीच. ती विचार करू लागली, "हा कोण बरे असावा ? इच्छारुपी राक्षस तर नसेल ? तिला तो आपल्या पातीसारखा वाटला, पण छे ! पती तर पाण्यात बुडून पुष्कळ दिवस झाले ! तो कसा बरे येईल ? पण राहून त्याला पाहताना तिला संकोच न वाटता एकप्रकारची खात्री वाटू लागली. याचवेळी सीमंतिनीला पाहून चंद्रागद विचारू लागला, "तिला मी पूर्वी कधीतरी पहिले असावे." मग घोड्यावरून उतरून तो तिच्याजवळ जाऊन विचारपूस करू लागला. तेव्हा सीमंतिनीची सखी म्हणाली, "हिचे नाव सीमंतिनी. ही निषधाधिपती इंद्रसेनाची सून, चंद्रागदाची पत्नी व महाराज चित्रवर्म्याची मुलगी आहे. दुर्दैवाने हिचा पती या नदीत बुडाला. वैधव्यदुःखाने ही फार खचली आहे. याला तीन वर्षे झाली. आज सोमवार आहे म्हणून ही येथे स्नान करण्यासाठी आली आहे. हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूच्या तुरुंगात पडले आहेत. असे असतानासुद्धा ही राजकन्या प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने शिवपार्वतीची पूजा करते."

मग सीमंतिनीने चंद्रागदाला विचारले, "आपण माझी माहिती विचारलीत, पण आपण कोण ते कळले नाही. आपण कोणी गंधर्व किंवा देव आहात, की कोणी मायावी सिद्ध, साधू, किन्नर आहात ? आपण मला आप्तजनासारखे वाटता. आपण कोण आहात ? " असे तिने विचारले व पतीच्या आठवणीने ती शोकाकुल झाली. चंद्रागदालाही अतिशय दु:ख झाले. आपल्या दुःखावर आवर घालून तो म्हणाला, "मी तुझ्या पतीला पहिले आहे. माझे नाव 'सिद्ध' असे आहे. तुझ्या व्रताच्या प्रभावाने तुझा पती नक्की परत येईल. तो माझा मित्र आहे. तीन दिवसांनी तो तुला भेटेल. तू चिंता व दुःख करू नकोस." चंद्रागदाच्या या बोलण्याने सीमंतिनी अधिकच शोक करू लागली. तिला मनोमन वाटत होते, हाच आपला पती असावा. पण तिने पुन्हा विचार केला. छे हे शक्य नाही. पाण्यात बुडालेला आपला पती परत कसा येणार ? खोटी आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही; पण मैत्रेयीने सांगितल्याप्रमाणे मी सोमवार व्रत तर करीतच आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले तर काहीही अद्भुत होऊ शकते." असा ती विचार करीत होती. त्याचवेळी चंद्रागद घोड्यावर बसून आपल्या राज्यात गेला. नदीत बुडालेला चंद्रागद घोड्यावर बसून परत आला आहे व त्याला तक्षकाचे सामर्थ्य लाभले आहे हे समजताच भयभीत झालेल्या शत्रूने चंद्रागदाला त्याचे राज्य सन्मानपूर्वक परत दिले. त्याच्या मातापित्यांची सुटका केली. आपला पुत्र परत आला आहे हे समजताच इंद्रसेनाच्या डोळ्यांवाटे आनंदाश्रू वाहू लागले. सर्व नागरिक, मंत्री, पुरोहित चंद्रागदाला सामोरे गेले. इंद्रसेनाने चंद्रागदाला पोटाशी धरले. चंद्रागदाने मातापित्यांना व इतर सर्वांना वंदन केले. मग त्याने राजसभेत बसून आपली पाहिल्यापासूनची सर्व हकीगत सविस्तर सांगितली.ती ऐकून इंद्रसेनाला अतिशय आनंद झाला. आपल्या सुनेने सौभाग्यप्राप्तीसाठी सोमवारव्रत करून भगवान शंकराची आराधना केली त्याचेच हे फळ आहे, याबद्दल इंद्रसेनाची खात्री पटली. टायने लगेच ही शुभवार्ता आपल्या दूताकरवी चित्रवर्म्याला कळविली.ही अमृतवार्ता ऐकून राजा चित्रवर्मा आनंदाने अगदी वेडां झाला. त्याने सीमंतिनीला वैधव्यचिन्हे टाकावयास लावली. मग त्याने आपल्या राज्यात मोठा आनंदोत्सव केला. प्रत्येकजण सीमंतिनीच्या सदाचाराची प्रशंसा करू लागला. मग चित्रवर्म्याने इंद्रसेनाकडे आपला दूत पाठवून, त्याला पुत्रासह वऱ्हाड घेऊन आपल्या नगरास येण्याची विनंती केली. इंद्रसेन आपल्या वऱ्हाडासह चित्रवर्म्याकडे आला. मग सीमंतिनी व चंद्रागद यांचा पुन्हा विवाह झाला.

चंद्रागदाने तक्षकाकडून आणलेले मानवदुर्लभ अलंकार सीमंतिनीला दिले. कल्पवृक्षांच्या पुष्पमालांनी सीमंतिनी अधिकच सुंदर दिसू लागली. त्यावेळी तिच्या आनंदाला काही सीमाच राहिली नाही. मग शुभमुहूर्तावर इंद्रसेन, चंद्रागद व सीमंतिनी आपली नगरात परत आले. त्याने चंद्रागदाला राजसिंहासनावर बसविले व राज्याभिषेक केला. त्याने सीमंतिनीसह दहा हजार वर्षे सर्व सुखांचा उपभोग घेत राज्य केले. त्याला आठ पुत्र व एक कन्या झाली. सीमंतिनी भगवान महेश्वराची आराधना करीत आपल्या पतीसह सुखाने राहू लागली. तिने सोमवारच्या प्रभावाने आपले गेलेले सौभाग्य परत मिळविले.

श्रीगुरू ही कथा सांगून त्या पतिपत्नीला म्हणाले, "सोमवार व्रताचा प्रभाव हा असा अद्भुत आहे. तुम्ही हेच व्रत करा." श्रीगुरूंची आज्ञा प्रमाण मानून त्या पतिपत्नींनी सोमवारव्रत केले. पुढे त्यांना पाच पुत्र झाले. ती दोघे दरवर्षी संगमस्थानी श्रीगुरुंच्या दर्शनासाठी येऊ लागली.

सरस्वती गंगाधर म्हणतात, "त्रैमूर्ती नृसिंहसरस्वती माझे वंशपरंपरागत स्वामी आहेत. म्हणून लोक हो ! तुम्हीसुद्धा निःसंदेह श्रीगुरूचरणांची सेवा करा. श्रीगुरु आपल्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होतात, हे त्रिवार सत्य. साखरेच्या गोडीला दुसरी कोणती उपमा द्यावयाची ? हातावरील कंकण पहावयास आरसा कशाला ? लोक हो ! तुम्ही शीगुरुंची सेवा करा. तुमच्या सर्व कामना त्वरित पूर्ण होतील. श्रीगुरूचरित्र प्रत्यक्ष कामधेनू आहे. त्याचे श्रवण-पठण केले असता सर्व काही साध्य होते. अंती मोक्षही प्राप्त होतो.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'कचदेवयानी कथा - सोमवारव्रत - सीमंतिनी आख्यान' नावाचा अध्याय पस्तिसावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments