मौन म्हणजे काय ?
*🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹
*🏵 मौन म्हणजे काय ? "मौनं सर्वार्थ साधनम्" या उक्तीचा नेमका भावार्थ काय ?*
*सामान्य भाषेत मौन म्हणजे न बोलणे इतकाच अर्थ सीमित झालेला आहे. पण इतका तोकडा अर्थ घेतला तरी सूध्दा त्या मौनाचे मोठमोठे फायदे आहेत. कारण ज्यावेळी तोंडातून शब्दांचा उच्चार होतो, त्यावेळी मेंदूमधील स्मृती, प्रत्यभिज्ञा, अनुभव इत्यादी विविध दालने कार्यरत होऊन शरीरातील बरीच उर्जा खर्च होत राहते. शिवाय दुसऱ्याशी बोलल्यामुळे ऐकणाराच्या मनावर होणाऱ्या परिणामातून फायदे- तोटे होतात ते निराळेच. म्हणून निदान वाचिक मौन पाळले तरी बरेच फायदे दिसून येतात. पण वाचिक मौन पाळताना काही लोक पाटीवर किंवा कागदावर लिहून दाखवितात, किंवा हाताने, चेहऱ्याच्या खुणा करून मनातील आशय व्यक्त करतात. हा प्रकार म्हणजे मौनधारणेचा भंगच होय. म्हणून शास्त्रानुसार मौन पाळायचे झाल्यास तोंडाने न बोलणे हे जितके आवश्यक व महत्वाचे आहे, तितकेच कोणत्याही व्यावहारिक गोष्टीचा विचार न करणे, हे ही अत्यावश्यक व अतिमहत्वाचे आहे.*
*परमार्थ सिध्दीसाठी व्यावहारिक गोष्टी नुसत्या वरवर टाळून चालत नाहीत, तर त्यांचा मनात पुसटसाही विचार येऊ नये हा मौनाचा खरा अर्थ आहे. मौन काळात साधना, चिंतन, मनन या गोष्टी भरपूर प्रमाणात व्हाव्यात अशीही अपेक्षा आहे. काही लोक अष्टमी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या अशापैकी एखाद्या दिवशी मासिक मौन पाळतात. काहीजण पाक्षिक, तर काहीजण साप्ताहिक मौन पाळतात. विशेषतः मौनादिवशी उपवास घडल्यास ते मौन अधिक प्रभावी ठरते. काहीजण दिवसातील एखादा तास मौन पाळतात. काही प्रगत साधक चातुर्मास अथवा एक किंवा बारा वर्षांचे मौन पाळतात.*
*मौन ही साधना प्राचीन तपश्चर्येचे छोटे रूप आहे. मौन धारण करणाऱ्या साधकाच्या अंगी एकप्रकारची दैवी शक्ती बाणते. त्याची इच्छाशक्ती व मनोबल अत्यंत प्रभावशाली बनल्यामुळे त्यांच्या ठायी काही सिध्दींचा वास दिसून येतो. प्रगतीनुसार अल्प, लघु, क्षुद्र अथवा महासिध्दींचा लाभ त्यांना होत रहातो. ज्यावेळी व्यावहारिक समस्या उभी ठाकते, त्यावेळी उपवास करून मौन धारण केल्यास मनाचा "आतील आवाज" एकू येतो व योग्य त्या दिशेने पाऊल उचलणे, योग्य निर्णय घेणे सहज शक्य होते.*
*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.
Comments
Post a Comment