नृसिंह अवतार

🌹 *नृसिंह अवतार* 🌹


नृसिंह अवतार हा विष्णूच्या दहा अवतारांपैकी चौथा अवतार आहे .
खालील ग्रंथांत याचे वर्णन आहे : श्रीमद्भागवत, महाभारत, हरिवंश, लिंगपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, ब्रम्हाण्डपुराण, वायुपुराण व देवीभागवत. भागवत पुराणात (७·८·२०–२२)
विष्णूच्या या अवताराची कथा आली आहे, ती अशी :
हिरण्यकशिपू नावाच्या दैत्याने उग्र तपश्चर्या करून ब्रह्मदेवास प्रसन्न करून घेतले. ‘विष्णूशिवाय तुला कोणीही मारू शकणार नाही. घरात-बाहेर, दिवसा-रात्री किंवा शस्त्राने तुला मृत्यू येणार नाही’, असा त्याने वर मिळविला. त्याचा मुलगा प्रह्लाद हा विष्णुभक्त होता. त्यामुळे त्याचा हिरण्यकशिपूने पुष्कळ छळ केला. दगडी खांबातदेखील विष्णू असतो, असे प्रह्लादाने सांगताच हिरण्यकशिपूने खांबास लाथ मारली. त्याबरोबर मानवी देह व सिंहमुख असलेला विष्णू त्यातून प्रगटला आणि त्याने हिरण्यकशिपूचा वध केला.
हा अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी झाला, म्हणून तो दिवस नृसिंहजयंती म्हणून मानतात. या दिवशीनृसिंहव्रत नावाचे एक काम्य व्रतही करण्यास सांगितले आहे.
 तैत्तिरीय आरण्यकात (१०·१) नृसिंहगायत्रीमंत्र सांगितला आहे. अथर्ववेदाशी संबंधित नृसिंहपूर्वतापनीय व नृसिंहोत्तरतापनीय अशी दोन उपनिषदे व नरसिंहपुराण या नावाचे एक उपपुराण या ग्रंथांत वेदान्त व नृसिंहाची उपासना सांगितली आहे.विष्णूच्या या रौद्र रूपाचे वर्णन अनेक कवींनीही केले आहे. नृसिंहाची शिल्पेही अनेक ठिकाणी आढळून येतात. लक्ष्मी-नृसिंह या नावाने या अवतारातील विष्णूचे शांत रूपही काही ठिकाणी दिसून येते. नीरानरसिंगपूर येथे नृसिंहाची द्विभुज व वीरासनात बसलेली मूर्ती आहे. काही शिल्पांमध्ये योगासनातील नृसिंहमूर्तीही आढळतात.

*नरसिंह मंत्र*

ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं नमाम्यहम् ॥


Comments