श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चाळीसावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चाळीसावा नरहरीचा कुष्ठरोग गेला - शिवभक्त शबरकथा !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, श्रीगुरू गाणगापुरात असताना एक मोठी अद्भुत घटना घडली. वाळलेल्या लाकडाचा वृक्ष झाला. ती कथा मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक." एकदा नरहरी नावाचा एक ब्राम्हण गाणगापुरास श्रीगुरुंकडे आला. त्याच्या सगळ्या शरीराला कुष्ठरोग झाला होता. तो श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाला, "स्वामी, तुम्ही भक्तवत्सल परमपुरुष आहात. तुमची कीर्ती ऐकून मी तुम्हाला शरण आलो आहे. माझा उद्धार करा. स्वामी, मी मनुष्य म्हणून जन्मास आलो पण दगडासारखे जीवन जगतो आहे. मला भयंकर असा कुष्ठरोग झाला आहे. सगळ्या लोकांनी मला वाळीत टाकले आहे. मी यजुर्वेदाचे अध्य्ययन केले आहे; परंतु भोजनासाठी मला ब्राम्हण म्हणून कोणीही बोलावीत नाहीत. सगळ्या नातलगांनी मला हाकलून लावले आहे. सकाळच्या वेळी कोणीही माझे तोंडसुद्धा पाहत नाही. त्यामुळे मला आता जगण्याचा कंटाळा आला आहे. गतजन्मी मी अनेक पातके केली असणार त्यामुळेच मला हा कर्मभोग भोगावा लागतो आहे. मी आजपर्यंत अनेक व्रते, तीर्थे केली, सर्व देवदेवतांची पूजा केली; पण माझा रोग काही बरा झाला नाही.आता आपल्या चरणांशी आलो आहे. तुम्ही जर माझ्यावर कृपा केली नाहीत तर मी प्राणत्याग करीन." असे बोलून त्याने श्रीगुरुंचे स्तवन केले. त्याचे ते दुःखपूर्ण बोलणे ऐकून श्रीगुरुंना त्याची दया आली. श्रीगुरू त्याला म्हणाले, "तुझ्या पूर्वजन्मातील पापांमुळे तुला हा रोग झाला आहे. मी तुला आता एक उपाय सांगतो. विश्वासाने त्याचे आचरण कर म्हणजे तुझे पाप नाहीसे होईल व तू रोगमुक्त होशील." मग श्रीगुरुंनी त्याला औदुंबराचे एक वाळलेले लाकूड दिले व सांगितले, "हे लाकूड घेऊन तू भीमा-अमरजा संगमावर रोज जा. भीमा नदीच्या पूर्वतीरावर हे लाव. संगमात रोज स्नान कर व या लाकडाला रोज तीन वेळा पाणी घाल. अश्वत्थाची पूजा करीत जा. ज्या दिवशी या लाकडाला पालवी फुटेल. तय दिवशी तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल. तुझे शरीर शुद्ध होईल." असे सांगून श्रीगुरुंनी नरहरीला निरोप दिला.

श्रीगुरुंच्या या बोलण्याने नरहरीला आनंद झाला. त्यांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून तो ते औदुंबराचे लाकुस घेऊन संगमावर गेला. त्याने ते लाकूड संगमेश्वराच्या समोर रोवले. मग त्याने श्रीगुरुंनी सांगितल्याप्रमाणे संगमात स्नान केले, अश्वत्थाची पूजा केली ब कलशांनी पाणी आणून त्या लाकडाला स्नान घातले. हे सगळे तो पूर्णश्रद्धेने त्रिकाल करीत होता. तो काहीही खात-पीत नव्हता. रोजच्या रोज तो त्या लाकडाला पाणी घालत असे. तेथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हे समजले तेव्हा ते नरहरीची थट्टा करू लागले, "अरे, तू वेडा आहेस की काय ? अरे वेड्या, वाळक्या लाकडाला कधीतरी पालवी फुटेल का ? असे कधी झाले नाही, कोणी पहिले नाही. तुझे पाप नाहीसे होत नाही म्हणून श्रीगुरुंनी तुला हा व्यर्थ उद्योग सांगितला आहे. श्रीगुरुंनी तुझी गंमत केली हे तुला कसे समजले नाही ?" त्यावर नरहरी म्हणाला, "श्रीगुरुंच्या वचनावर माझी दृढश्रद्धा आहे. ते बोलतात तसेच घडते. त्यामुळे या लाकडाला पालवी फुटेपर्यंत मी ही सेवा करीत राहणार आहे."

असे सात दिवस लोटले. श्रीगुरुंच्या शिष्यांनी त्यांना नरहरीची सगळी हकीगत सांगितली. लोक नरहरीला काय म्हणाले, नरहरीने त्यांना काय उत्तर दिले हे सर्व त्यांनी श्रीगुरुंना सांगितले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, "अरे, जसा भाव तसे फळ. भक्तीने, श्रद्धेने निर्धारपूर्वक केलेले कार्य कधीच फुकट जात नाही. श्रद्धेत प्रचंड सामर्थ्य असते. श्रद्धेच्या बळावर अलौकिक कार्य घडू शकते. या विषयी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो, ही कथा स्कंदमहापुराणात आली आहे. नैमिषारण्यात यज्ञसत्र सुरु होते. त्यावेळी सूत सर्व ऋषींना अनेक कथा सांगून ज्ञानदानाचे कार्य करीत असत. एके दिवशी 'गुरुभक्ती' या विषयावर सूत बोलत होते, सूत म्हणाले, "दुर्धर असा संसारसागर तरुण जाण्यास गुरुभक्ती हाच एक सुलभ उपाय आहे. आपली गुरुवचनावर दृढ श्रद्धा हवी. दृढ श्रद्धेने गुरुभक्ती केली असता अप्राप्य, असाध्य असे काहीच नसते. गुरूला सामान्य मनुष्य समजू नये. गुरु साक्षात परब्रम्ह परमेश्वर असतात, म्हणून त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागावे. जे आपल्या गुरूची सेवा करतात त्यांच्यावर शंकर प्रसन्न होतात. कारण गुरु हे शिवस्वरूप असतात. मंत्र, तीर्थ, द्विज, देव, ज्योतिषी, औषध व गुरु यांच्यावर ज्याची जशी श्रद्धा असते तसे फळ त्याला मिळते. याची साक्ष पटविण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो. ती श्रवण करा म्हणजे अश्रद्धा दूर होईल.

पूर्वी पांचाल देशात सिंहकेतू नावाचा एक राजा होता. त्याच्या पुत्राचे नाव धनंजय आपल्या एका शबर (भिल्ल) सेवकाला बरोबर घेऊन वनात शिकारीला गेला. श्वापदांच्या मागे धावताना तो खूप दमला, म्हणून तो विश्रांतीसाठी थांबला. त्याला खूप तहान लागली होती. त्याने त्या शबर सेवकाला पाणी आणण्यासाठी पाठविले. तो शबर पाणी शोधण्यासाठी वनात फिरत असता त्याला एक जीर्ण मोडके-तोडके मंदिर दिसले. तो त्या मंदिराजवळ गेला. त्या मंदिराच्या चबुतऱ्यावर त्याला एक शिवलिंग दिसले. ते शिवलिंग अत्यंत साधे व सूक्ष्म होते. ते शिवलिंग म्हणजे परमभाग्य असे त्या शबराला वाटले. पूर्वकर्माने प्रेरित झालेल्या त्या शबराने तो शिवलिंग उचलले व राजपुत्राला दाखविले 'युवराज' हे पाहा शिवलिंग. किती सुंदर आहे ! मला येथेच मिळाले." असे तो शबर म्हणाला असता राजपुत्र हसून म्हणाला, "अरे, हे भग्न झालेले शिवलिंग घेऊन तू काय करणार आहेस ? " त्यावर शबर म्हणाला, "मी याची आदरपूर्वक पूजा करीन. आपण मला पूजाविधी सांगा. मला मंत्र- तंत्र काही येत नाही, तरीसुद्धा मी याची भक्तिभावाने पूजा केली तर भगवान शंकर प्रसन्न होतील."

शबराचा तो भोळा भाव पाहून राजपुत्राला हसू आले. मग तो म्हणाला, "ठीक आहे. शुद्ध आसनावर या शिवलिंगाची स्थापना कर व संकल्पपूर्वक शुद्ध जलाने अभिषेक कर. गंध, अक्षता, वनपत्रे, फुले, धूप-दीप इत्यादींनी पूजा कर. रोज स्मशानातून चिताभस्म आणून या शिवलिंगाला लेपन कर. घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून पत्नीसह भक्षण कर. त्या शबराने घरी परत आल्यावर ते शिवलिंग आपल्या पत्नीला दाखविले. तो तिला म्हणाला,

"भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न आहेत म्हणूनच हे शिवलिंग मला सापडले. आता गुरुउपदेशानुसार याची आपण पूजा करूया." त्याच्या पत्नीने मोठ्या आनंदाने ते मान्य केले. मग एका शुभमुहूर्तावर त्या शबराने शिवलिंगाची स्थापना केली व राजपुत्राने सांगितल्याप्रमाणे दररोज त्या शिवलिंगाची पूजा सुरु केली. तो दररोज स्मशानात जाऊन चिताभस्म आणीत असे. पण एके दिवशी त्याला स्मशानात चिताभस्म मिळाले नाही. त्याने आजूबाजूच्या गावात शोधाशोध केलील पण चिताभस्म मिळाले नाही. शेवटी तो निराशेने पत्नीला म्हणाला, "प्रिये, चिताभस्म मिळत नाही. आता काय करू ? आज माझ्या शिवपूजनात विघ्न निर्माण झाले. पूजेशिवाय मी क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकणार नाही." चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार ? गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच पूजन झाले पाहिजे. नाहीतर ते व्यर्थच ठरणार." आपल्या पतीची ही व्याकुळता पाहून शबरपत्नी म्हणाली, "घाबरू नका, चिंता करू नका. मी उपाय सांगते. आपले हे घर जुनाट झाले आहे.मी स्वतःला या घरात कोंडून घेते. मग तुम्ही घराला आग लावा. मग आपल्याला चिताभस्म मिळेल."

शबर म्हणाला, "तू हे काय बोलतेस ? मानवी शरीर धर्मार्थकाममोक्षसाठी श्रेष्ठ साधन आहे. मग तुझ्या या सुखोचित शरीराचा त्याग का बरे करतेस ? मी तुझा घात कसा करू ? मला स्त्रीहत्येचे पाप लागेल. शंकरही प्रसन्न होणार नाहीत." शबरपत्नी म्हणाली, "दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या प्राणांचा त्याग करणे यातच जीवनाची सफलता आहे. मग भगवान सदशिवासाठी प्राणत्याग करावा लागला तर त्यात वाईट ते काय ? शिवाय या देहाचा कधीतरी नाश होणारच. तो सत्कार्यासाठी उपयोगी पडला तर त्यात मला आनंदच आहे, माझे प्राण गेले तरी चालतील, पण शिवपूजनात खंड पडू देऊ नका."

आपल्या पत्नीचे हे विचार ऐकून शबराने शेवटी तिला संमती दिली. मग शबरपत्नी स्नानादी करून शिवस्मरण करीत बसली. शबराने घराला आग लावली. त्याला चिताभस्म मिळाले. त्याने चिताभस्माने शिवपूजा पूर्ण केली. पूजा संपल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी त्याने नित्याप्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारली. हाक मारताच त्याची पत्नी पुढे आली व जळलेले घर होते तसे झाले. हे पाहून शबर आश्चर्यचकित झाला. आपली जळून गेलेली पत्नी परत कशी आली ? आपण स्वप्न तर पाहत नाही ना ? असे त्याला वाटले. त्याने आपल्या पत्नीला विचारले,"तू तर जळून भस्म झाली होतीस, मग येथे कशी आलीस ? आणि घर होते तसे कसे झाले ?" शबरपत्नी म्हणाली, "घराला आग लागल्यानंतर मला काहीच आठवत नाही, मी झोपेत होते. तुम्ही हाक मारलीत तेव्हा प्रसादासाठी येथे आले. आपले घर तर मुळीच जळालेले नाही ."

अशाप्रकारे दोघांचा संवाद चालू असताना भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले, शबराने पत्नीसह त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला, तेव्हा भगवान शंकर म्हणाले, "धन्य आहे तुमची भक्ती ! तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला राजपद मिळेल इहलोकातील सर्व सुखे, ऐश्वर्ये तुम्हाला प्राप्त होतील. शेवटी तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल."

ही कथा सांगून श्रीगुरू म्हणाले, "सर्व पुण्यकर्मात श्रद्धा पाहिजे. शबराला केवळ श्रद्धेमुळेच उत्तम गती प्राप्त झाली म्हणून श्रद्धा महत्वाची. श्रद्धा नसेल तर बक्की सर्व खटाटोप व्यर्थ आहे, जसा भाव तसे फळ. भक्तीने, श्रद्धेने केलेले कार्य कधीच फुकट जात नाही."

मग एके दिवशी श्रीगुरू नरहरीला पाहण्यासाठी संगमावर गेले. नरहरीचे औदुंबराच्या लाकडाला पाणी घालणे चालूच होते. नरहरीची भक्ती पाहून श्रीगुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ त्या लाकडावर शिंपडले. त्याचक्षणी त्या लाकडाला पालवी फुटली आणि नरहरीचा रोग नाहीसा झाला. त्याचे शरीर तेजस्वी झाले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला. तो त्यांची 'इंदुकोटीतेज०' इत्यादी श्लोकांनी स्तुती करू लागला.

श्रीगुरुंनी नरहरीला आपल्या मठात नेले. त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला म्हणून मोठे अन्नदान केले. नरहरीला श्रीगुरुंनी आशीर्वाद दिला, "तुला कन्या, पुत्र, धन-गोधन सर्व काही लाभेल. तुझी वंशवृद्धी होईल. आजपासून तू 'योगेश्वर' म्हणून ओळखला जाशील. आमच्या सर्व शिष्यांत तू थोर ठरशील. आता तू कसलीही चिंता करू नकोस. आता तू तुझ्या बायकामुलांना घेऊन ये. सर्वजन आमच्या येथेच राहा. तुला तीन पुत्र होतील. त्यातील एक योगी नावाने प्रसिद्ध होईल. तोही आमची सेवा करील." असा आशीर्वाद देऊन श्रीगुरुंनी नरहरीला (योगेश्वराला) 'विद्या सरस्वती' मंत्र दिला. श्रीगुरुंच्या आदेशानुसार नरहरी आपल्या बायकामुलांसह गाणगापुरात श्रीगुरुंच्या सेवेत आनंदाने राहू लागला.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'नरहरीचा कुष्ठरोग गेला - शिवभक्त शबरकथा' नावाचा अध्याय चाळीसावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments