*श्री गुरुचरित्र पारायण असे करावे*

🌹 *श्री गुरुचरित्र* 🌹




ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे

*सप्ताह पद्धती*

१ ला दिवस :- १ ते ९ अध्याय
२ रा दिवस :- १० ते २१ अध्याय
३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय
४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय
५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय
६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय
७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय

*श्री गुरुचरित्र पारायण असे करावे*

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला आहे. ईसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला.
श्री गुरूंच्या चरीत्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र -वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरु चरित्र कार म्हणतात.
"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्मा ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते , असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे अहेत.

*अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम*

वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.
वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे.
वाचनासाठी ठरविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये.
श्रीदत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना आवाहन करावे.
सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व सोवळ्या नेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घालु नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)
रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव अहे.
वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

Comments