श्री गुरुचरित्र कथासार अध्याय त्रेचाळीसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय त्रेचाळीसावा विमर्षण राजाची कथा - विणकरास मल्लिकार्जुन दर्शन !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
"मला आता पुढे काय झाले ते कृपा करून सांगा. पुढचे श्रीगुरुचरित्र ऐकण्यास मी आतुर झालो आहे." असे नामधारक म्हणाला असता सिद्धयोगी पुढची कथा सांगू लागले. श्रीगुरुंचे अनेक शिष्यभक्त होते. त्यांना एक विणकर (कोष्टी) श्रीगुरूंचा परमभक्त होता. तो आपले नेहमीचे काम संपले की संध्याकाळी श्रीगुरुंच्या मठात येत असे व श्रीगुरूंची सेवा म्हणून मठाच्या आवारातील केर काढून श्रीगुरुंना लांबूनच नमस्कार करीत असे. हा त्याचा क्रम कित्येक दिवस चालू होता. एकदा शिवरात्री पर्व जवळ आले असता त्या विणकराचे आई-वडील व इतर लोकांनी श्रीशैल्य यात्रेला जाण्याचे ठरविले. "तू पण आमच्याबरोबर यात्रेला चल. शिवरात्रीला श्रीमल्लिकार्जुनाचे दर्शन घेतले असता मोठे पुण्य मिळते." असे सांगून सर्वांनी त्या विणकराला खूप आग्रह केला. त्यावर तो म्हणाला, "मी येणार नाही. तुम्ही सर्व मूर्ख, अज्ञानी आहात. माझा श्रीशैल्यपर्वत येथेच आहे. श्रीगुरूंचा मठ हाच श्रीशैल्य पर्वत व श्रीगुरू हेच मल्लिकार्जुन. श्रीगुरुंचे चरण सोडून मी कोठेही येणार नाही." सगळे लोक त्याला हसले व यात्रेला निघून गेले. तो एकटाच श्रीगुरूंची सेवा करण्यासाठी मागे राहिला नेहमीप्रमाणे तो मठाची झाडलोट करण्यासाठी आला. श्रीगुरुंनी त्याला विचारले, "अरे, तुझे सगळे लोक श्रीशैल्य यात्रेला निघाले. मग तू का नाही गेलास ?" तो विणकर म्हणाला, "स्वामी, तुमच्या चरणांशी माझी तीर्थयात्रा आहे. सर्व तीर्थे तुमच्या चरणाशी असताना लोक मुर्खासारखे तीर्थयात्रेला जातात व पाषाणाचे दर्शन घेतात, याला काय म्हणावे ?"
पुढे माघ वद्य चतुर्दशीला शिवरात्र आली. दोन प्रहरी श्रीगुरू संगमावर होते. त्या विणकराने शिवरात्रीचा उपवास केला होता. त्याने संगमात स्नान करून श्रीगुरुंच्या चरणांचे दर्शन घेतले. श्रीगुरू त्याला म्हणाले, "अरे, तू एकटाच कसा मागे राहिलास ? तू श्रीशैल्य पाहिला आहेस का ? ती यात्रा कधी पाहिली आहेस का ?" त्यावर तो विणकर म्हणाला, "स्वामी, तुमचे चरणदर्शन हीच माझी यात्रा ! तुमच्या चरणदर्शनाने सर्व यात्रा केल्याचे पुण्य मला मिळते." त्याचा भक्तिभाव पाहून श्रीगुरू म्हणाले, "चल, मी तुला यात्रा दाखवितो. आंत माझ्या पादुकांना घट्ट धरून ठेव व डोळे झाकून घे." त्या विणकराने तसे केले असता श्रीगुरुंनी एका क्षणात श्रीशैल्य पर्वतावर नेले व डोळे उघडण्यास सांगितले. त्या विणकराने डोळे उघडून सभोवती पाहिले, तो खरोखरच आपण श्रीशैल्यपर्वतावर आलो आहोत असे त्याला दिसले. श्रीगुरू म्हणाले, "अरे, असे काय बघत बसला आहेस ? लवकर जा व दर्शन घे . क्षौरही कर." मग तो विणकर देवदर्शन करून स्नान करण्यासाठी गेला. तो तेथे त्याला आई-वडील व त्याच्या गावातले लोक यात्रेला आलेले दिसले. त्यांनी त्याला विचारले, "आमच्याबरोबर चाल म्हटले तर आला नाहीस, मग असा लपत-छुपत का आलास ? " त्यावर तो विणकर म्हणाला, "छे, मी तुमच्या मागोमाग नाही आलो. श्रीगुरू आणि मी आजच दुपारी निघालो. श्रीगुरुंनी मला एका क्षणात येथे आणले. मी आत्ताच आलो आहे." पण त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. हा खोटे बोलतो आहे असेच सर्वांना वाटले. मग तो विणकर स्नान करून व पूजासाहित्य घेऊन मंदिरात गेला. त्यावेळी त्याला शिवलिंगावर साक्षात श्रीगुरू बसलेले दिसले. लोक शिवलिंगाची म्हणून पूजा करीत होते, ती पूजा श्रीगुरुंचीच होत होती. तो विणकर त्यांना म्हणाला, "स्वामी, तुम्ही साक्षात शंकर आहात. मल्लिकार्जुन आहात. तुम्ही जवळ असताना हे लोक इतक्या दूर कशासाठी येतात ? मी तुम्हाला शिवलिंगाच्या स्थानी पाहिले. मग येण्याची गरज काय ?" त्यावर श्रीगुरू म्हणाले, "परमेश्वर सर्वत्र आहे ही गोष्ट खरीच. तथापि स्थानमाहात्म्यही असतेच. यासंबंधी एक कथा तुला सांगतो. ही कथा स्कंद पुराणात आलेली आहे. माघ वद्य चतुर्दशीला म्हणजे शिवरात्रीला श्रीपर्वताचे माहात्म्य फार मोठे आहे. ती कथा ऐक. श्रीगुरुंनी सांगितलेली कथा सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले,
विमर्षण राजाची कथा-खूप वर्षापूर्वी किरात देशात विमर्षण नावाचा एक राजा होता. तों अत्यंत पराक्रमी, शूर होता. तो सदैव शिकार, हिंसा, मद्यमांस सेवन करीत असे. तो अत्यंत निर्दयी होता. अधर्माचरण करण्यात त्याला काहीही वावगे वाटत नसे. चारही वर्णातील स्त्रियांचा उपभोग घेत असे. असे असले तरी तो मोठा शिवभक्त होता. तो भगवान सदाशिवाची नित्यनेमाने पूजाअर्चा करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव होते कुमुव्द्ती. ती मोठी चतुर व गुणवती होती. एकदा तिने आपल्या पतीला एकांतात विचारले, "नाथ, तुम्ही भगवान सदाशिवाची नित्य पूजा-अर्चा करता, सदाशिवापुढे भक्तिभावाने नृत्य-गायन करता, शिवकथा ऐकता, मग असे असतानाही तुमच्या हातातून रोज पापकर्मे होतात, अनेकांची हत्या होते हे कसे काय ? असे का बरे होते ?"
राजा विमर्षण म्हणाला, "तू विचारलेस म्हणून सांगतो. मला पूर्वजन्मातील बरेच काही आठवते, ते ऐक. मागील जन्मी मी पंपानगरीत कुत्रा म्हणून जन्मास आलो. एकदा माघ महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी एका शिवमंदिरासमोर येउन उभा राहिलो. मंदिरात शिवशंकराची पूजा-अर्चा चालू होती. मी ती लक्षपूर्वक पाहत होतो. त्यावेळी एका सेवकाने मला काठीने मारले. तेव्हा मी उजव्या बाजूने पळून शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली व पुन्हा होतो तेथे येउन उभा राहिलो. त्यावेळी त्या सेवकाने अत्यंत रागाने मला काठी मारली. वर्मी घाव लागल्याने मी तेथेच प्राण सोडले.तेवढ्या पुण्यकर्माने मला या जन्मी राजदेह प्राप्त झाला. आता मी दुराचारी का आहे ? कारण कुत्र्याचे काही गुणदोष माझ्यात शिल्लक आहेत. मी सध्या जे वागतो ते चांगले नाही हे मला कळते, तरीही पूर्वसंस्कारामुळे माझ्या हातून वाईट कर्म घडते." राणी कुमुद्वतीने विचारले, "तुम्हाला पूर्वजन्माचे ज्ञान आहे, तर आता मला सांगा, गतजन्मी मी कोण होते ?" राजा म्हणाला, "तू गतजन्मी कबुतरी होतीस. तू मांसाचा तुकडा तोंडात धरून जात असता एका ससाण्याने तुझा पाठलाग केला. तू शिवमंदिराला तीन प्रदक्षिणा घालून शिखरावर बसलीस.तू खूप दमलीस. तेवढ्यात ससाण्याने तुझ्यावर हल्ला केला. तू शिवमंदिरासमोर मारून पडलीस. त्या पुण्याने तू या जन्मी राहिलीस." राणी म्हणाली, "तुम्ही त्रिकालज्ञानी आहात. मोठे पुण्यपुरुष आहात. आता यानंतर आपल्या दोघांना कोणकोणते जन्म मिळतील ते सांगा."
राजा म्हणाला, "हे चंद्रमुखी, मी पुढील जन्मी सिंधुदेशाचा राजा होईन. तू जया नावाची राजकन्या होशील. त्या जन्मीही तुझा माझ्याशी विवाह होईल. तिसऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन. तू कलिंग देशात जन्म घेशील व माझ्याशी विवाह करशील.चौथ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा होईन व तू मगध देशात जन्म घेशील त्याही वेळी तुझा माझ्याशीच विवाह होईल. पाचव्या जन्मी मी अवंतीचा राजा होईन. तू दाशार्ह राजाची कन्या होशील व मला वरशील.
सहाव्या जन्मी मी आनार्त देशाचा राजा होईन व तू ययातीराजाची कन्या होशील व तुझा माझ्याशी विवाह होईल. सातव्या जन्मी मी पांड्यराजा होईन व तू पद्मराज कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील व माझीच पत्नी होशील. त्या जन्मात मी मोठी कीर्ती मिळवीन. शिवप्रसादाने मी शत्रूंना शिक्षा करीन. धर्माची वाढ करीन. सतत शिवभजनात गढून जाईन. मग त्या जन्मी मी पुत्राला राज्य देऊन तपश्चर्येला वनात जाईन. अगस्तीऋषींना शरण जाईन व शिवदीक्षा घेईन. मग तुझ्या समवेत कैलासपदाला जाईन."
ही कथा सांगून श्रीगुरू विणकराला म्हणाले, "आता तुला स्थान-माहात्म्य कसे असते हे लक्षात आले असेल. त्या कुत्र्याला शिवरात्रीच्या दिवशी अजाणतेपणे उपवास घडला. त्याने शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली व त्याला शिवदर्शन घडले. त्यामुळेच त्याची पशु इत्यादी योनींतून मुक्तता झाली, सात जन्म राजवैभव प्राप्त झाले व शेवटी मोक्षप्राप्ती झाली. त्या कबुतरीने कळसाला प्रदक्षिणा घातली व तेवढ्या पुण्याने तिलाही सात जन्म राजवैभव प्राप्त झाले व शेवटी मुक्तीही मिळाली. यावरून विशिष्ट तिथी, दिनविशेष, तीर्थक्षेत्र, देवस्थान यांचे माहात्म्य किती अलौकिक असते हे तुझ्या लक्षात आले असेल. म्हणूनच केवळ सामान्य लोकच नव्हे, तर मोठे ऋषीमुनी, तपस्वी तीर्थयात्रा करतात. देवदर्शन घेतात. गाणगापुरातील लोक इतक्या दूर अंतरावर तीर्थयात्रेसाठी आले हे अगदी योग्यच. गाणगापुरात संगमात कल्लेश्वराचे मंदिर आहे. तो कल्लेश्वर म्हणजे श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनच आहे. या भावनेने त्याची नित्य पूजा-अर्चा कर."
श्रीगुरू विणकराला घेऊन क्षणार्धात गाणगापुरात संगमावर आले. ते संगमावर थांबले व विणकरास मठात पाठविले. गावातले लोक श्रीगुरुंना शोधत होते. त्यावेळी विणकर मठात आला. लोकांनी त्याला विचारले, "तू होतास कुठे ? आणि हे क्षौर का केलेस ?" तेव्हा विणकराने सर्व काही प्रांजळपणे सांगितले व श्रीगुरू संगमावर आहेत असे सांगितले. काही लोकांचा विणकराच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता, पण काही लोकांना श्रीगुरुंच्या अलौकिक सामर्थ्याची कल्पना असल्याने त्यांनी विणकराचे बोलणे खरे मानून त्यांच्या श्रीगुरुंवरील श्रद्धेबद्दल कौतुक केले. मग सर्वांनी संगमावर जाऊन, श्रीगुरुंचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली. काही दिवसांनी श्रीशैल्याबद्दल गेलेले लोक परत आले. त्यांनी श्रीगुरू व विणकर श्रीशैल्ययात्रेला आले होते असे सांगताच सर्वांना पुन्हा एकदा श्रीगुरुंच्या अलौकिक सामर्थ्याची खात्री पटली.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'विमर्षण राजाची कथा - विणकरास मल्लिकार्जुन दर्शन ' नावाचा अध्याय त्रेचाळीसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment