श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकतिसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकतिसावा पतिव्रतेचा आचारधर्म !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, पतीच्या अकाली निधनामुळे शोकाकुल झालेल्या त्या स्त्रीचे सांत्वन करताना त्या ब्रम्हचारी तपस्व्याने स्त्रियांचा जो आचारधर्म सांगितला तो मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. तो ब्रम्हचारी त्या स्त्रीला म्हणाला, पती जिवंत असताना किंवा त्याचे निधन झाले असता स्त्रीने काय करावे व काय करू नये ते मी सविस्तर सांगतो. तुला जे पसंत असेल ते तू कर. याविषयी स्कंदपुराणातील काशी खंडात एक कथा आहे ती मी तुला सांगतो.
"एकदा नारदमुनी फिरत फिरत विंध्यपर्वताकडे गेले. नारदांना पाहताच विंध्याने त्यांचे उत्तम स्वागत केले. नारदांच्या तेजाने त्याचा आंतरिक अंधार दूर झाला. विंध्याने नारदांचे यथोचित पूजन केले. तो म्हणाला, "मुनिवर्य, आज आपल्या आगमनाने मी धन्य झालो आहे. माझे पूर्वपुण्य आज फळाला आले." विंध्याचे हे बोलणे ऐकून नारदमुनी जरा संचित झाले. त्यांनी मोठ्यांदा सुस्कारा सोडला. विंध्याने विचारले, "देवर्षे, आपण कसली चिंता करता आहात ?" नारदांनी विचार केला. 'आता याला जर डिवचलेच पाहिजे.' नारदमुनी म्हणाले, "अरे विंध्या, तू खूप उंच आहेस हे खरे; पण सर्व पर्वतात मेरुपर्वत आधी उंच आहे. तू त्याच्याइतका उंच नाहीस त्यामुळे मेरुपर्वत तुझा अपमान करतो आहे. त्यामुळे मी सचिंत झालो आहे. तुला हे सांगण्यासाठीच मी आज आलो होतो." असे सांगून नारदमुनी आकाश-मार्गाने निघून गेले. नारदमुनी निघून गेले आणि विंध्यपर्वत अत्यंत उद्विग्न झाला. क्रुद्ध झाला. अहंकाराने तो ग्रासला. मेरुपर्वताचा तो द्वेष करू लागला.'सूर्य मेरूपर्वताला सर्वश्रेष्ठ समजून रोज त्याला प्रदक्षिणा घालतो काय ? पाहतोच आता.' असा विचार करून तो उंच उंच वाढू लागला,की जणू आपल्या शिखरांनी आकाशाचा अंत करावयास निघाला. सूर्याचा मार्ग थांबला. त्यामुळे पूर्वेला व उत्तरेला राहणारे लोक सूर्याच्या किरणांनी भाजून निघाले. दक्षिण व पश्चिम दिशेला सगळा अंधार. लोकांना सूर्य दिसेना, त्यामुळे सर्व यज्ञयाग बंद पडले. पंचयज्ञकर्मांचा लोप झाला, त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला. सर्व देव भयभीत झाले. आता काय करावे ? हे संकट कोण दूर करणार ? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. मग इंद्रादी सर्व देव ब्रम्हदेवाकडे गेले.
ब्रम्हदेव त्यांना म्हणाले, "देवांनो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडे का आला आहात हे मला माहित आहे. विंध्यपर्वत मेरुपर्वताशी स्पर्धा करीत आहे, त्यामुळे त्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे. पृथ्वीवरील यज्ञयाग बंद पडले आहेत. हे संकट दूर करण्यासाठी मी तुम्हाल एक उपाय सांगतो. अगस्त्य हे थोर तपस्वी आहेत. ते सध्या काशीक्षेत्री तपश्चर्या करीत आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्याकडे जा. ते तुमचे संकट निवारण करतील." ब्रम्हदेवांनी असे सांगितले असता सर्व देवांना आनंद झाला. मग ते देवगुरु बृहस्पती यांना बरोबर घेऊन काशीक्षेत्री अगस्त्य ऋषींच्याकडे गेले. अगस्त्यांचा तो शांत पवित्र आश्रम पाहून सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले. अगस्त्यांनी सर्व देवांचे उत्तम स्वागत केले. त्यावेळी सर्व देवांनी अगस्त्यांची व खास करून त्यांची पत्नी लोपामुद्रा हिची खूप प्रशंसा केली. देव म्हणाले, "मुनिवर्य, आपण सर्व ऋषीमुनींमध्ये श्रेष्ठ आहात. आपण त्रैलोक्यज्ञानी आहात. आपली प्रिय पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा आपल्याप्रमाणेच पुज्य आहे. आपण साक्षात 'प्रणव' आहात व लोपामुद्रा श्रुती आहे. आपण मूर्तिमंत ताप आहात व ती क्षमा आहे." बृहस्पती म्हणाले, "पूर्वीच्या काळी अनेक पतिव्रता होऊन गेल्या; पण त्यातील कोणीही लोपामुद्रेसारखी झाली नाही.
अरुंधती, सावित्री, अनुसूया, शांडिल्यपत्नी, लक्ष्मी, पार्वती, स्वयंभुव मनूची पत्नी शतरूपा, मेनका, ध्रुवमाता सुनीता, सूर्यपत्नी संज्ञा अशा अनेक पतिव्रता होत्या; पण त्या सर्वांपेक्षा आपली पत्नी लोपामुद्रा अधिक श्रेष्ठ आहे." असे सांगून बृहस्पतींनी सर्व देवांना पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला. बृहस्पती म्हणाले, "पतिव्रतेने पतीच्या अगोदर भोजन करू नये. पती उभा असेल तर आपण उभे राहावे. पतीची कधीही अवज्ञा करू नये. पतीची अखंड सेवा करावी. पतिव्रतेने घरी आलेल्या अतिथीची सेवा करावी. मात्र दानधर्म करू नये. आपल्या पतीला मनोमन परमेश्वर मानावे. पती निजल्यानंतरच आपण निजावे. आपली वस्त्रे दूर ठेवावीत. पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नयेत. पतीला नावाने हाक मारू नये. पती जागा होण्या-अगोदर आपण उठावे. सडासंमार्जन करावे. आपल्या पतीची नित्य पूजा करावी.पती घरी असताना साजशृंगार करावा; पण पती परगावी असताना साजशृंगार करू नये. पती रागावला तरी आपण कठोर बोलू नये. उलट उत्तर देऊ नये. पती बाहेरून घरी परत आला असता पतिव्रतेने हातातील काम बाजूला ठेवून त्याला सामोरे जावे. त्याला काय हवे, नको ते विचारावे. पतीला विचारल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये. जावे लागले तर परपुरुषाचे मुखावलोकन करू नये. तसे केल्यास त्या स्त्रीला घुबडाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. पतिव्रतेने पतीचे उच्छिष्ट प्रसाद म्हणून सेवन करावे.पती घरी नसेल तर अतिथीधेनुप्रसाद घ्यावा. अतिथीला अन्न देऊन व गोपूजन करून मग आपण भोजन करावे. व्रते, उपवास इत्यादी गोष्टी पतीला विचारून कराव्यात. लग्न, यात्रा, उपवास इत्यादींविषयी हट्ट नये. पती संतुष्ट असतना आपण खिन्न बसू नये. पती खिन्न असेल तर आपण संतुष्ट राहू नये.
पतिव्रतेने रजस्वला अवस्थेत असताना मौन पाळावे. बोलू नये. वेदमंत्र ऐकू नये. असे चार दिवस आचरण केल्यानंतर सुस्नान करून पतीचे मुखावलोकन करावे. अशावेळी पती घरी नसेल तर त्याचे ध्यान करावे व सूर्यदर्शन घेऊन घरात जावे. पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पतिव्रतेने कपाळी हळदकुंकू लावावे.
केसात सिंदूर घालावा. डोळ्यांत काजळ घालावे. वेणी घालवी. सौभाग्यलंकार धारण करावेत. पतिव्रतेने दुराचारी स्त्रियांशी संभाषण टाळावे. आपल्या पतीची व घरातील इतर लोकांची कधीही निंदा करू नये. सासूसासरे, दीन, नणंदा इत्यादींशी प्रेमाने वागावे. त्यांचा त्याग करून वेगळा संसार थाटू नये. तसे केल्यास श्र्वानयोनीत जन्म घ्यावा लागेल. नग्नपणे स्नान करू नये. उखळमुसळावर बसू नये. उंबरठ्यावर बसू नये. घरात वडीलधाऱ्या माणसांच्या समोर बसू नये. पतीला आवडणार नाही असे कोणतेही कार्य करू नये. पतीशी वादविवाद घालू नये. पतीला परमेश्वर मानावे. पतीच्या आवडीनुसार वस्त्रालंकार घ्यावेत. दुसऱ्या गह्राची श्रीमंती पाहून आपल्या घराची निंदा करू नये. दुसऱ्याच्या वैभवाची अभिलाषा बाळगून नये. परपुरुषाची स्वप्नातसुद्धा वासना धरू नये. आपल्या पतींची सर्वतोपरी सेवा करावी. कारण पतिव्रतेसाठी पती हाच देव, गुरु, धर्म, तीर्थ असतो. तोच तिचे सर्वस्व असतो. अशी पतिव्रता ज्या घरी असते ते घर शिवमंदिरासमान असते. पतिव्रतेच्या अशा आदर्श आचरणामुळे तिच्या माहेरच्या बेचाळीस पिढ्या उद्धरून जातात. अशी पतिव्रता पुरुषाला शतजन्मातील पुण्याईनेच लाभते. अशा पतीव्रतेमुळे चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. अशी पतिव्रता ज्या घरी नाही तेथे पुण्यकर्मे घडत नाहीत. यज्ञयागादी कर्मे होत नाहीत. पतिव्रता नसलेले घर साक्षात अरण्य होय. अशी पतिव्रता ज्याला लाभते त्याच्या हातून सर्वपरकारची पुण्यकर्मे घडतात. पतिव्रता स्त्री नसलेला पुरुष देव-पितृ-कर्मे करण्यास पात्र ठरत नाही.पतिव्रतेचे दर्शन म्हणजे गंगास्नान. ते ज्याला लाभते त्याची सप्तजन्मातील पापे नष्ट होतात. तो पावन होतो. बृहस्पतींनी सांगितलेला हा आचारधर्म जे श्रवण करतात त्यांना उत्तमगती प्राप्त होते असे स्वतः सरस्वती गंगाधर सांगतात.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'पतिव्रतेचा आचारधर्म' नावाचा अध्याय एकतिसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment