श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठ्ठाविसावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठ्ठाविसावा कर्मविपाक - मातंग कथा !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक सिद्ध्योग्यांना म्हणाला, "मला आता पुढची कथा ऐकण्याची तीव्र इच्छा झाली आहे. ती कथा मला सांगा." त्यावर सिद्धयोगी म्हणाले,"मला कोणत्या पूर्वकर्मामुळे हीन दशा प्राप्त झाली ?" असे मातंगाने विचारले असता श्रीगुरू त्याला म्हणाले. "पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मामुळे इहजन्मी त्याचे भोग भोगावे लागतात. दोष किंवा पापकर्मे अनेक प्रकारची असतात व प्रत्येक पापकर्माचे फळ भोगावे लागते. त्याविषयी मी तुला सविस्तर सांगतो ऐक. ब्राम्हण किंवा अन्य कोणीही अनाचाराने वागला तर त्याला हीनजातीत किंवा कृमिकीट, पशुपक्षी इत्यादी योनींत जन्म घ्यावा लागतो. आपल्या आईवडिलांचा किंवा कुलस्त्रीचा त्याग केल्यास त्या पापकर्माबद्दल मनुष्याला हीन कुळात जन्म घ्यावा लागतो. जो आपल्या कुलदेवतेऐवजी अन्य देवतेची पूजा करतो, सदैव असत्य बोलतो, जीवहिंसा करतो, आपल्या कन्येची विक्री करतो, खोटी साक्ष देतो, त्याला चांडाळ योनी प्राप्त होते. घोड्यांची विक्री करणारा, परस्त्रीशी संग करणारा, रानाला आग लावणारा, तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्धादी कर्मे न करणारा, आपल्या घरातील कपिला धेनूचे दूध देवब्राम्हणांना ने देता स्वतःच सेवन करणारा नीच गतीला जातो. आपल्या आई-वडिलांची सेवा न करणारा, त्यांचा सांभाळ न करणारा, आपली एक पत्नी असताना तिचा त्याग करून दुसरी स्त्री करणारा सात जन्म कृमिकीटक होतो. सत्पात्री ब्राम्हणाची निंदा करणारा, त्याच्या उपजीविकेचा अपहार करणारा, तळी-विहिरी नष्ट करणारा, शिवमंदिरातील पूजा नष्ट करणारा, ब्राम्हणांची घरेदारे मोडणारा, हीन कुळात जन्मास येतो. आपला स्वामी, गुरु, शत्रू, मित्र यांच्या स्त्रीशी जो व्यभिचार करतो तो पतितगृही जन्म घेतो. दारी आलेल्या अतिथीला जो अन्न देत नाही, राजाने दुसऱ्याला दिलेले भूदान जो हिरावून घेतो, वैश्र्वदेवाच्या वेळी दारी आलेल्या अतिथीचे स्वागत न करता त्याला कठोर शब्दांनी बोलून अपमानित करतो, त्याला कोंबड्याचा जन्म मिळतो. जो गंगातीर्थाची निंदा करतो, रणांगणातून पळून जातो, पर्वकाळी किंवा एकादशीला जो स्त्रीसंग करतो, जो अपात्र व्यक्तीला वेदविद्या शिकवितो, तो चांडाळयोनीत जन्म घेतो, उन्हाळ्यात एखाद्या पुण्यवंत माणसाने पाणपोई घातली असता त्यात जो विघ्न निर्माण करतो त्याला हीनयोनी प्राप्त होते. रोग्याची नाडीपरीक्षा न करता जो औषधोपचार करतो, दुसऱ्याचे अहित करण्यासाठी जो जारणमारणादींचा मंत्रजप करतो, तो महापापी होय. जो आपल्या गुरुंची व हरीहारांची निंदा करतो व अन्यदेवतांची पूजा करतो तो महापातकी होय. त्याला हीन कुळात जन्म मिळतो. जो वर्णधर्माचे पालन करीत नाही, अपात्र माणसाला मंत्र शिकवितो तो पापवंशात जन्म घेतो.

जो आपल्या गुरुंची निंदा करण्यात आनंद मानतो, जो विद्वान ब्राम्हणाचा द्वेष करतो, तो पुढच्या जन्मी ब्रम्हराक्षस होतो. जो आपल्या गुरुंची पूजा करतो व त्याचवेळी दुसऱ्या देवाची व दुसऱ्या गुरुंची निंदा करतो त्याला अपस्मार रोग होतो व त्याला दारिद्र्यदुःख भोगावे लागते. जो आपल्या आई-वडिलांचा त्याग करून वेगळा राहतो, तो महारोगी होतो. जो दुसऱ्याचे उणेदुणे चारचौघात बोलून दाखवितो तो हृदयरोगी होतो. जो आपल्या स्त्रीचा गर्भपात करतो तो निपुत्रिक होतो. त्याला पुत्र झालाच तर तो जगात नाही. जो वेदशास्त्र-पुराणांचे श्रवण-पठण करीत नाही, तो बहिरा, अंध होऊन जन्मास येतो. जो पापी माणसाशी मैत्री करतो त्याला गाढवाचा जन्म मिळतो. पापी माणसाकडून औषध घेतो तो हरीण होतो. ब्रम्हहत्या करणारा क्षयरोगी होतो. मद्यपान करणाऱ्याचे दात काळे होतात. सुवर्णचोरी करणाऱ्याला नखे कुजण्याचा रोग होतो. गुरुस्त्रॆकदे जो वाईट नजरेने पाहतो, तो कुष्ठरोगी होऊन जन्मास येतो. दुसऱ्याच्या सेवकाला फूस लावून पळवितो त्याला सदैव तुरुंगवास भोगावा लागतो. जो परस्त्रीची चोरी करतो तो जन्मतःच मंदबुद्धीचा होतो. शेवटी तो नरकात जातो. सापांना ठार मारणारा सर्प योनीत जन्मास येतो. अशी अनेक पापकर्मे आहेत व त्यांची फळे भोगावी लागतात.

आता चौर्यकर्माबद्दल सांगतो. सुवर्णचोरी करणाऱ्यास परमा रोग होतो. पुस्तकाची चोरी करणारा अंध होतो. वस्त्रचोरी करणारा दमेकरी होतो. सार्वजनिक संपत्तीचा अपहार करणाऱ्याला गंडमाळ रोग होतो. दमेकऱ्याची चोरी करणाऱ्यास तुरुंगवास भोगावा लागतो असे ब्रम्हांड-पुराणात सांगितले आहे. परद्रव्याची किंवा दुसऱ्याला मिळालेल्या वस्तूची चोरी करणारा निपुत्रिक होतो. अन्नचोरी करणाऱ्यास पानथरी रोग होतो. धान्यादींची चोरी करणाऱ्याच्या शरीराला जन्मतःच दुर्गंध येतो. परस्त्री, परवस्तू किंवा ब्राम्हणांचे द्रव्य चोरणाऱ्याला ब्रम्हराक्षसाचा जन्म मिळतो. पाने, फुले, फळे चोरणाऱ्यास खरुज रोग होतो. कास्य, ताम्र, लोह, कापूस, मीठ यांची करणाऱ्याला श्वेतकुष्ठ रोग होतो. देवद्रव्याचा अपहार करणारा, देवकार्याचा नाश करणारा, अभक्ष्यभक्षण करणारा पंडुरोगी होतो. दुसऱ्याचे भूमिगत धन चोरणाऱ्याला सदैव शोक करावा लागतो. धेनु-धनाची चोरी करणाऱ्याला उंटाचा जन्म मिळतो. दुसऱ्याच्या घरातील भांडी कुंडी चोरणारा मनुष्य कावळा होतो. मधाची चोरी करणारा घर होतो.

श्रीगुरू त्या पतिताला म्हणाले, "या सर्व चौर्यकर्माबद्दल ते ते जन्म घ्यावे लागतात. आता व्यभिचारासंबंधी महाभारताच्या शांतीपर्वात श्रीव्यासांनी काय सांगितले आहे ते सांगतो, ऐक. परस्त्रीला आलिंगन दिल्यास शंभर जन्म श्वान योनीत जन्म घ्यावा लागतो. त्यानंतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो. परस्त्रीची योनी पाहणारा जन्मांध होतो. भावाच्या पत्नीशी संग करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळतो. त्यानंतर त्याला सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो व शेवटी तो नरकात जातो. मित्राची पत्नी मामीसमान असते. तिच्याशी संग करणारा श्वानयोनीत जन्मास येतो. परस्त्रीचे मुखावलोकन करू नये. ते वाईट बुद्धीने करणारा नेत्ररोगी होतो. हीनजातीच्या स्त्रीशी व्यभिचार करणारा श्वानयोनीत जन्म घेतो."

श्रीगुरुंचे हे निरुपण शांतचित्ताने ऐकत असलेल्या त्रिविक्रमभारतींनी विचारले, "स्वामी, आपण सांगितलेले पापकर्म एखाद्याच्या हातून एकदाच घडले तर ते पाप कशाने नष्ट होते ? " त्यावर श्रीगुरू म्हणाले, "केलेल्या पापकर्माचा पश्चाताप झाला तर त्या कर्माचे पाप लागत नाही. मोठ्या पापकर्माची मनाला बोचणी लागल्यास त्याला प्रायश्चित्त आहे. त्यासाठी ब्रम्हदंड द्यावा. सालंकृत गोदान करावे. ते शक्य नसेल तर यथाशक्ती द्रव्यदान करावे. केवळ अजाणतेपणे पाप घडल्यास प्रायश्चित्ताने शुद्धी होते. अशावेळी गुरुसेवा केल्यास गुरु निवारण करील.

दोनशे प्राणायाम व पुण्यतीर्थात दहावेळा स्नान केल्यास पापाचा नाश होतो. त्याचप्रमाणे तीन गुंजा सुवर्णदान करावे. दोन योजनेपर्यंत नदीतीराने तीर्थयात्रा करावी. पती आणि पत्नी यांपैकी कोणी एकाने पाप केले असेल, तर दोघांनी प्रायश्चित्त घ्यावे. त्याचप्रमाणे गायत्रीचा दहा हजार जप करावा. बारा सत्पात्री ब्राम्हणांना भोजन द्यावे. एक हजार तिलाहुती द्याव्यात. याला गायत्रीकृच्छ असे म्हणतात. त्याचप्रमाणे प्राजापत्यकृच्छ्र, अतिकृच्छ्र, पर्णकृच्छ्र करावे, त्यामुळे केवळ अज्ञानाने झालेली पापे नष्ट होतात. समुद्रसेतुबंधी स्नान केल्यास भृणहत्या व कृताघ्नी पातकांचा नाश होतो. विधीपूर्वक एक कोटी गायत्रीमंत्राचा जप केल्याने ब्रम्हहत्या पातकाचा नाश होता. एक लक्ष गायत्री जप केल्याने गुरुपत्नीशी केलेल्या पातकाचा नाश होतो. अशाप्रकारे श्रीगुरुंनी त्रिविक्रमभारतीला पापमुक्तीसाठी करावयाची स्नान, दान, जप-तप, उपोषण, तीर्थयात्रा, पण त्या मातंगाला पुन्हा आपल्या जातीत जावे असे वाटेना. श्रीगुरुंनी त्याला स्वतःच्या घरी जाण्यास सांगितले. तो जाण्यास तयार नव्हता. इतक्यात तय मातंगाची बायकामुले तेथे आली. त्याची पत्नी म्हणाली, "माझ्या पतीला अपस्माराची व्याधी झाली आहे. बराच वेळ झाला नाही तरी हे घरी परत आले नाहीत, म्हणून ह्यांना शोधीत आम्ही येथे आलो आहोत." ती त्याच्याजवळ जाऊ लागली तेव्हा तो मातंग म्हणाला, "मला स्पर्श करू नकोस. मी ब्राम्हण आहे." लोकांनी तिला घडलेली हकीगत सांगितली तेव्हा ती शोक करीत श्रीगुरुंना म्हणाली, "स्वामी, हे काय हो झाले ? आता मी काय करू ? मी आपणास शरण आले आहे. कृपा करा, माझ्या पत्नीची व माझी ताटातूट करू नका." मग श्रीगुरू त्या मातंगाला म्हणाले, "आता तू आपल्या घरी जा. तुझ्यामुळे दुःख झाले तर तुला सद्गती प्राप्त होणार नाही. ज्याला संसारात रस नाही त्याने बायकामुलांच्या भानगडीत पडू नये. पण एकदा संसारात पडल्यावर बायकामुलांचा त्याग केला तर मोठा दोष निर्माण होतो. तू सूर्य-चंद्राला साक्षी ठेवून स्त्रीचा स्वीकार केला आहेस. आता तिचा त्याग केलास तर तू महापापी ठरशील. तुला सद्गती मिळणार नाही," श्रीगुरुंनी असे सांगितले असता तो मातंग म्हणाला, "स्वामी, मला आता ज्ञानप्राप्ती झाली आहे. मग मी पुन्हा ज्ञातिहीन कशाला होऊ ?" तो असे म्हणाला असता श्रीगुरुंनी विचार केला, याच्या शरीरावर विभूती आहे. त्याचाच हा परिणाम आहे. ती धुतली गेली म्हणजे याच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होईल." श्रीगुरुंनी एका लोभी, संसारासक्त ब्राम्हणाला बोलावून सांगितले. "तू या मातंगावर स्वहस्ते पाणी ओत म्हणजे याच्या ठिकाणी संसाराची आसक्ती निर्माण होईल."

त्या ब्राम्हणाने नदीवरून घागर भरून आणली व त्या मातंगाच्या अंगावर ओतली. त्यामुळे श्रीगुरुंनी त्या मातंगावर प्रक्षेपण केलेले अभिमंत्रित भस्म धुऊन गेले. त्याचक्षणी त्या मातंगाचे जातिस्मरण नाहीसे झाले. तो धावतच आपल्या बायाकामुलांजवळ गेला आणि विचारू लागला, "मी येथे कसा आलो ? तुम्ही येथे कशासाठी आला आहात ? मला काही समजत नाही." मग तो आपल्या बायकामुलांसह घरी परत गेला. हा सगळा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. श्रीगुरूंची लीला अगाध आहे त्यांना पुन्हा एकदा कळले. त्यावेल इतेथे असलेले त्रिविक्रमभारती श्रीगुरुंना म्हणाले, "स्वामी, भस्माच्या प्रभावाने त्या मातंगाला पूर्वजन्माचे स्मरण झाले व ते भस्म धुतले गेले असता त्याची स्मृती नाहीशी झाली. हा भस्माचा प्रभाव मोठा अद्भुत आहे. मला त्याविषयी सविस्तर सांगा." त्रिविक्रमभारतींनी अशी विनंती केली असता श्रीगुरुंनी भस्ममाहात्म्य सांगण्याचे मान्य केले.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'कर्मविपाक - मातंग कथा' नावाचा अध्याय अठ्ठाविसावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments