एकादशी माहात्म्य*

*श्रीगुरुदेवदत्त*

सोमवार दि.४ मे २०२०
वैशाख शुक्ल एकादशी...
मोहिनी एकादशी..

||श्रीगोपालकृष्णायनमः||

धर्मराज युधिष्ठिर व भगवान् श्रीकृष्ण यांचे संवाद रूपाने या एकादशीचे माहात्म्य निवेदन करतात. 
युधिष्ठिर म्हणतात," भगवन्, वैशाख शुक्ल एकादशीचे नाव काय व कर्त्याला कोणते श्रेय मिळते हे सर्व मला सांगा."
भगवान् म्हणतात,
"राजा, पूर्वी श्रीरामचंद्रांनी संसारातील अनेक दुःखे उपभोगिली व नंतर असाच प्रश्न गुरु वसिष्ठ यांना केला होता. त्यावेळी त्यांनी श्रीरामांनां पूर्वी घडलेला एक इतिहास सांगितला.
वसिष्ठ म्हणतात,"रामा, सरस्वती नदीचे तीरावर भद्रावती नामक नगरी होती. तिथे द्युतिमान नावाचा राजा राज्य करीत असे. त्याचे राज्यात धनपाल नावाचा व्यापारी रहात असे. व्यापारात खूप द्रव्य संपादन करून त्याचा विनियोग समाजाचे सुखाकरिता तो करत असे. तो महान विष्णुभक्त असून त्याला पाच मुलगे होते. सर्वात धाकटा धृष्टबुद्धि हा अत्यंत दुर्वर्तनी निघाला.सर्व दुष्ट व्यसने त्याला जडली होती.पित्याचे पुष्कळ द्रव्य त्याने व्यसनापायी नासले. वारंवार उपदेश करूनही तो ऐकत नाही असे पाहून वडिलांनी त्याला घरातून घालवून दिले.
जवळ असलेले दागिने विकून त्याने आपली व्यसने चालवली. जवळचे द्रव्य संपल्यावर चोऱ्या करून वेश्यांची घरे भरायला सुरुवात केली. एकदा तो चोरी करताना राजदूतांना सापडला. परंतु प्रतिष्ठित घराण्यातला मुलगा म्हणून ताकीद देऊन त्याला सोडले. 
तरीही पुन्हा पुन्हा तो तेच करु लागलं. तेव्हा राजाने त्याला नगरीतून हाकलून दिले.
मग तो अरण्ये,जंगले यांतून भटकू लागला. 
क्षुधा,तृषा इत्यादी दु:खांनी पीडित झालेला तो योगायोगाने कौंडिण्य ऋषींच्या आश्रमासन्निध आला. ऋषी नुकतेच वैशाख स्नान आटोपून,वस्त्र झटकीत असता जलबिंदू त्याचा शरीरावर पडले. लगेच उपरति होऊन तो ऋषींनी शरण गेला व या दुःखातून मला सोडवा अशी प्रार्थना केली. ऋषींनी त्याचे सर्व वृत्त्त ऐकून त्याला मोहिनी एकादशीचे व्रत करण्याविषयी उपदेश केला. त्याने अत्यंत श्रद्धेने हे व्रत आचरण केल्यामुळे सर्व दुष्ट मोहापासून मुक्त होऊन भगवत् कृपेने वैकुंठपुराला प्राप्त झाला.
वशिष्ठ म्हणतात," रामा, सकल मोहापासून मुक्त करणारे व म्हणूनच सर्व दुःखांचा परिहार करणारे असे हे व्रत होय. इतर यज्ञ,पुजादिक साधने पुष्कळ असली तरी दुःखदायक मोहांचा निरास करण्याचे सामर्थ्य या व्रता मध्येच आहे. माहात्म्य श्रवणाने ही पापप्रवृत्तीचा निरस होऊन आत्मकल्याण साधून जाते."

||मोहिनी एकादशी माहात्म्यं संपूर्णम्||

*संदर्भ: एकादशी माहात्म्य*

Comments