येहळेगावचे संतश्रेष्ठ श्री तुकामाई



येहळेगावचे संतश्रेष्ठ श्री तुकामाई  : 

येहळेगाव येथे वसे एक संत ।
तुकाराम नामें जया लोक गात ।।
जयाचे गुरु चिन्मयानंद झाले ।
गुरु - शिष्य हे नाथपंथी भुकेले ।।

आज ज्येष्ठ शु. अष्टमी , शनिवार , दिनांक ३०.५.२०२० . आज संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज ( श्री ब्रह्मानंद महाराज , श्री तुकामाई ) , येहळेगाव तुकाराम , ता. कळमनुरी , जि. हिंगोली यांची पुण्यतिथी आहे. श्री तुकामाईंच्या श्रीचरणीं माझे कोटी कोटी प्रणाम. 

श्री तुकामाईंचे महासमाधीग्रहण  : 

श्रीतुकामाईंच्या अगदी निकट सहवासातील आणि अंतरंगातील त्यांचे तीन महान सत्शिष्य म्हणजे  -- श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ,.श्री रामजीबापू 
( समाधीमठ येहळेगाव तु. ) , श्री उद्धवबापू 
( श्री उपेंद्रस्वामी )  . यापैकी श्री बापूद्वय हे येहळेगावलाच श्री तुकामाईंच्या निरंतर सेवेत होते. या तिन्हीही सत्शिष्यांच्या श्री तुकामाईंनी अनेक कठीणतम कसोट्या घेतल्यानंतरच त्यांना अनुग्रहित करुन त्यांना ब्रहमज्ञानाचे अधिकारी केले. 

श्री उद्धवबापू एक  तपापासून ( बारा वर्षे ) श्रीतुकामाईंच्या सेवेत येहळेगाव मठात होते. त्यांच्या अपरंपार सेवेमुळे श्री तुकामाईंनी असा विचार केला की  -- 

आतां कांही देण्यासी ।
उरलेच नाही मजपासी ।
पहाती कालावधीसी । म्हणती देवू आपले पद ।।
 ( श्री तुकाराम महाराज चरित्र - पोथी ). 

श्री उद्धवबापूंच्या सेवेमुळे त्यांचे सद्गुरु श्री तुकामाई संतोष  पावले. एक दिवस श्री तुकामाई  श्री उद्धवबापूंना आपल्या जवळ बोलावून घेवून म्हणाले , " बापू , आम्ही आता परलोकी जाणार " , आणि त्यांना आपल्या जवळची छाटी व पादुका देऊन सांगितले की , " तू आतां श्रीचिन्मयानंद महाराजांचा उत्सव करीत जा. " तसेच त्यांना  पुढील व्यवस्थाही आखून दिली. यानंतर ज्येष्ठ शु. पंचमी शके १८०९ रोजी श्रीतुकामाईंनी संन्यासदीक्षा ग्रहण करुन " ब्रह्मानंद " हे नांव धिरण केले. संन्यासदीक्षेनंतर ते तीनच दिलस राहिले. त्यानंतर शके १८०९ , ज्येष्ठमास , शुक्लपक्ष , परम पवित्र अशा अष्टमी तिथीला सद्गुरु श्री चिन्मयानंद स्वामींच्या पादुकेसमोर पद्मासन घालून श्री तुकामाईंनी येहळेगांवी संजीवन समाधी घेतली. 

श्री चंद्रभान विठोबा बंगळेलिखित श्रीगुरु परमहंस तुकाराम महाराज ( येहळेगाव ) चरित्र या ओवीबद्ध पोथीत या प्रसंगाचे खालीलप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे  -- 

एकेदिवशी श्रीतुकामाईंनी आपले शिष्योत्तमद्वय श्री रामजीबापू आणि श्री उद्धवबापू यांना आपल्या उजव्या व डाव्या हाताला बसवून घेऊन कवटाळले व त्यांना म्हणाले , " आता मी पंढरपूरला जातो. तुम्ही दरवर्षी सद्गुरु श्री चिन्मयानंद महाराजांचा पुण्यतिथी उत्सव भिक्षा मागून साजरा करीत जा. " श्री रामजीबापूंना स्मशानात रहाण्याची ( सध्याचे त्यांचे तळ्याकाठी असलेले समाधीमंदिर , येहळेगाव )आज्ञा करुन त्यांना शुभाशिर्वाद दिले. नंतर ते उद्धवबापूंना म्हणाले , " नंतर डावीकडे पाहिले  वळून । बाप्या तू माझा वंश चतुरानन । हे छाटी - पादुका घेऊन । याचा सांभाळ करी ।। 

श्री तुकामाईंचे हे निरवानिरवीचे शब्द ऐकून दोघांनाही महादुःख झाले व ते धाय मोकलून रडू लागले. श्री तुकामाईंनाच त्यांची समजूत घालून त्यांना शांत केले. तेंव्हापासून श्री तुकामाई कोठेही बाहेरगावी न जाता मठातच वास्तव्यास राहिले. 

मठातील एका मोठ्या पिंपळवृक्षाखाली श्रीतुकामाई विश्रांती घेत असत. आपल्या समाधीग्रहणापूर्वी हीच जागा आपल्या समाधीस्थळासाठी श्री तुकामाईंनी निर्देशित केली होती व त्यांच्या आज्ञेनुसार श्री रामजीबापू व श्री उद्धवबापू यांनी येथे अगोदरच बांधकाम करुन घेतले. 

यानंतर श्रीतुकामाई हे श्रीरामजीबापू , श्रीउद्धवबापू व तानूबाई या तिघांसह उमरखेडला श्रीचिन्मयानंद महाराजांच्या समाधी दर्शनासाठी गेले. तेथे रात्री चार प्रहर " गुरुमहाराज गुरु , जयजय परब्रह्म सद्गुरु " या गुरुनामाचा गजर केला. नंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण येहळेगावला परत आले. तेथे आल्यावर श्री तुकामाईंनी श्रीरामजीबापूंना आज्ञापित करुन मठात स्वयंपाक करायला लावला आणि ग्रामप्रदक्षिणा करवून घेऊन  नगरभोजन दिले. भजनाचा जागर करण्यात आला. 

नंतर ज्येष्ठ शु. अष्टमी , शके १८०९ , सोमवार रोजी सकाळी श्रीतुकामाई श्रीरामजीबापू व श्रीउद्धवबापू या दोघांचे हात धरुन समाधीस्थळीं उतरते जाहले. तेथे पद्मासन घालून बसले आणि उर्ध्वदृष्टी लावून नामस्मरण सुरु केले व  श्रीराम नामोच्चार करून वैकुंठगमन केले. 

श्रीरामजीबापू , श्रीउद्धवबापू , तानूबाई , विठाबाई व इतर भक्तमंडळींनी आपला शोक आवरुन ब्राह्मणांद्वारे गुरुदेहाची विधीयुक्त पूजा केली व भोवती मीठ टाकून समाधीमुखीं एक शिळा ठेवली. श्रीतुकामाईंनी समाधी घेतल्यामुळे लोक फार हळहळ करु लागले. सर्वांना पोरके झाल्यासारखे वाटू लागले. दर्शनाला अलोट गर्दी जमा झाली होती. श्री उद्धवबापूंनी गुरुआज्ञेनुसार येहळेगांवी श्री तुकामाईंची समाधी बांधून सर्व उत्सव -महोत्सव सुरु केले. असंख्य भक्तांच्या सहयोगातून समाधी मंदिराचे बांधकाम सुरु केले. श्री तुकामाईंनी आपल्या हयातीतच श्रीचिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे तत्कालीन मठाधिपती श्री सच्चिदानंद महाराज यांचेकडे स्वतः जाऊन आपल्या येहळेगाव येथील मठाची मठासह इतर सर्व स्थावर - जंगम मालमत्ता गुरुगृही उमरखेड संस्थानला अर्पण केली होती. श्रीतुकामाईंनी जरी समाधी घेतली असली तरी भक्तांना त्यांची प्रत्यक्षाप्रमाणेच अनुभुती येऊ लागली. 

श्री उद्धवबापू मात्र फारच दुःखी झाले. त्यांच्यात अत्यंत विरक्ति बाणली. काही दिवसानंतर त्यांनी हिंगोलीस येवून तेथे श्रीतुकामाईंचा पादुकामठ स्थापन केला. अशी पाच वर्षे लोटल्यानंतर त्यांनी हंस संन्यासदीक्षा घेतली. दीक्षेनंतर त्यांचे नाव उपेंद्रस्वामी असे ठेवण्यात आले. 

उपेंद्रस्वामींनी सर्वत्र भ्रमण करुन सर्वांना श्रीतुकामाईंचा उपासनामार्ग दाखविला व असंख्य भक्तांचा उद्धार केला. डोईफोडे यांची भगीनी तान्हुबाई हिची समंधबाधा श्री तुकामाईकृपेने दूर झाली. करखेलीचे देशलेखक नारायण यांच्या दुर्धर आजारामुळे अस्थिपंजर झालेल्या कन्येस श्री उपेंद्रस्वामींनी , " जय तुकाराम महाराज " असे म्हणून श्रीतुकामाईंचा तीर्थ - प्रसाद दिला. एका महिन्यातच ती मुलगी नीरोगी व सुदृढ झाले. श्रीगुरु तुकामाईंच्या कृपाशीर्वादामुळे सर्वजण पावन होऊन जातात आणि संकटमुक्त होतात.
🍁।। जय श्रीराम.....।। 
 30 मे 2020 रोजी ज्येष्ठ शुद्ध अष्टमी आहे. ज्येष्ठ शुद्ध अष्टमीला परमहंस श्री तुकामाई महाराज (श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज व श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज यांचे गुरु) यांनी देह ठेवलेला आहे.  दरवर्षी येहळेगाव येथे  खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी रंगपंचमीला म्हणजे श्री तुकामाई महाराज यांच्या जन्मतिथिला व ज्येष्ठ शुद्ध अष्टमीला म्हणजे श्री तुकामाई महाराज यांच्या पुण्यतिथीला वावरहिरे येथून वारी जात असते. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव साजरा केला जाऊ शकत नाही. तेव्हा प्राचार्य सु.ग. चव्हाण, नांदेड यांनी कळवले आहे की दरवर्षी येहळेगाव येथे आलेल्या भक्तमंडळींना पुरी भाजी व शिरा हा प्रसाद दिला जातो. या वर्षी आपण सर्व एकत्र येऊ शकत नाही. तेव्हा प्रत्येकाने आपल्या घरी शिरा, पुरी व भाजी चा नैवेद्य श्री तुकामाई महाराज यांना अर्पण करावा व उत्सव घरगुती स्वरूपात साजरा करावा. या निरोपा सोबतच श्री तुकामाई महाराज यांचा फोटो पाठवत आहोत. श्री ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज यांनी श्री स्वानंद सुधाकर या ग्रंथामध्ये श्री तुकामाई महाराज यांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. या ग्रंथातील दोन समास आपल्या वाचनासाठी पाठवत आहोत. तरी कृपया पुरी, भाजी व शिरा याचा नैवेद्य श्री तुकामाई महाराज यांना अर्पण करून व परमहंस श्री तुकामाई महाराज वर्णनाचे दोन समास वाचून आपण हा उत्सव घरगुती स्वरूपात साजरा करूया. जय जय रघुवीर समर्थ!🍁🙏🏻
*दिनविशेष*

*आज जेष्ठ शुद्ध अष्टमी. श्रीमहाराजांचे गुरू श्री तुकामाई यांची पुण्यतिथी.* 

----------------------
*श्री तुकामाई* 
------------------------

श्री तुकारामचैतन्य ऊर्फ तुकामाई हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील येहळे या गावाचे रहिवासी. 
त्यांचे वडील काशिनाथपंत व आई पार्वतीबाई हे श्री दत्तात्रयाचे उपासक होते. 
त्यांना पंधरा वर्षे होऊनही मूलबाळ नव्हते. त्यांचे पूजाअर्चा, जपजाप्य, अखंड व्रताचरण चालू असे. त्यांना यथावकाश मार्च 1813 मध्ये मुलगा झाला. तो अजानबाहू होता आणि त्याचे डोळे तेजस्वी होते. त्याचे नाव ‘तुकाराम’ असे ठेवण्यात आले.

 त्यांच्या येहळे या गावापासून जवळ उमरखडे या गावात चिन्मयानंद नावाचे थोर पुरुष राहत होते. 
एकदा ते पंढरपूरहून परतीच्या मार्गावर येहळे या गावात मुक्कामाला राहिले. त्यांना ते पहाटे नदीवर स्नानाला गेलेले असताना नदीकाठावर एक युवक ध्यानस्थ बसलेला दिसला. दोघांची दृष्टादृष्ट होताच चिन्मयानंदांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून, त्याला आशीर्वाद दिला. ‘आता तू ‘तुकारामचैतन्य’ झालास. तुला इतरांना अनुग्रह देता येईल’ असे सांगितले.

श्री तुकामाय हे नाथपंथीय होते. ते लोकांना संतसेवा करावी, सतत नामस्मरण करावे, परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याला अनन्यभावाने शरण जावे असे सांगत असत.

 त्यांचे गुरुबंधू रावसाहेब शेवाळकर कळमनुरीला राहत होते, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी शेवाळकरांना ‘आज देवाला आमरसाचा नैवेद्य कर’ असे सांगितले. दिवस आंब्याचे असूनही रावसाहेबांच्या झाडाला एकही आंबा लागला नव्हता. त्यांना आमरसाचा नैवेद्य कसा करावा अशी काळजी वाटू लागली. योगायोग असा, की ते निघून गेल्यावर एक बाई त्यांच्या दर्शनाला आली आणि तिने संत तुकामाईंपुढे आंबा ठेवला. लगेच, त्यांनी त्या बाईंना जेवढे आंबे असतील तेवढे रावसाहेबांना देण्यास सांगितले. तिनेही प्रेमाने गाडीभर आंबे पाठवले आणि संपूर्ण गावाला त्या दिवशी आमरसाचे जेवण मिळाले!

अनेक जण त्यांच्याकडे शिष्यत्व स्वीकारण्यास येत असत, मात्र ते त्यांची कठोर परीक्षा घेत. त्या परीक्षेत उतरलेले त्यांचे शिष्य शिरोमणी म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज होत. ते एका रामनवमीला गुरुशिष्य स्नानाला गेले असताना, त्यांनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला, लगेच त्यांची समाधी लागली. त्यांची समाधी उतरल्यावर, संत तुकामाईंनी त्यांना ‘ब्रम्हचैतन्य’ या नावाने संबोधले आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा मंत्र दिला. त्यांनी ‘त्या मंत्राच्या साहाय्याने भक्तांना मार्गदर्शन करा व परमार्थाची आवड लोकांमध्ये निर्माण करा, लोकसेवा करा’ असा उपदेश केला. त्यानुसार ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आचरण ठेवले. देशपरदेशातील हजारो भाविकांनी गोंदवलेकर महाराजांचा तो नामजप चालवला आहे. 
*तुकामाईंनी त्यांचा देह जून 1887 मध्ये येहेळगाव येथे ठेवला. त्यांची समाधी तेथे आहे.*
--------येहळेगावचे संतश्रेष्ठ श्री तुकामाई  

श्री तुकामाईंच्या महानिर्वाणानंतरची व्यवस्था व समाधीमंदिर  : 

श्रीतुकामाईंनी आपल्या येहळेगाव मठाची संपूर्ण मालमत्ता स्वतः श्रीगुरुगृही जाऊन श्रीचिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे तत्कालीन मठाधिपती श्री सच्चिदानंद महाराज यांचेकडे गुरुचरणीं अर्पण केलेली असल्यामुळे श्री चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडच्या मठाधिपतींच्या आधीनच दोन्हीही मठांचे संपूर्ण व्यवस्थापन , उत्सव - महोत्सव , दैनंदिन कार्यक्रम इ. पार पाडले जातात. विद्यमान मठाधिपती प.पू. श्री माधवानंद महाराजांनी उमरखेड - येहळेगाव मठांसह संस्थानच्या अधिनस्त असलेल्या सर्वच मठ - मंदिरांचे नवीन बांधकाम व जिर्णोद्धार करून कायापालट केला आहे व भक्तांसाठी निःशुल्क भोजनप्रसाद व निवासाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. मठातील नित्य - नैमित्तिक पूजन - अर्चन , निवास , भोजन प्रसादाशिवाय वार्षिक उत्सव - महोत्सव , शेतीवाडी इ. पहाण्यासाठी सेवाधारी मंडळी असून येथील प्रमुख हे दिवाणजी असते. दर महिन्याला एकादशी व दर सोमवारला नियमाने वार्या करणारे हजारोंनी भक्त आहेत. इतर वार्षिक उत्सवांसह श्री तुकामाईंची जयंती  - फाल्गुन व. पंचमी व पुण्यतिथी उत्सव - ज्येष्ठ शु. अष्टमी - कार्यक्रमासाठी बहुसंख्येने भक्तजण उपस्थित असतात. येहळेगाव येथील १५ ते २०  नांगरे कुटुंबियांच्या घरची पहिली भाकरी किंवा पोळी ही  भाजी , ठेसा , चटणी किंवा तूप - साखरेसह नैवेद्यासाठी सकाळी  मठात येते. तसेच गाय किंवा म्हैस विल्यास पहिले देध ( खरवस ) मठास अर्पण करतात. तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी आपल्या शेतातील उत्पादित झालेल्या शेतमालाचा काही भाग नियमाने दरवर्षी श्रीतुकामाईंचरणीं मठात अर्पण करतात. मठात भगवंताचे नामस्मरण , भजन - कीर्तन , पूजन - अर्चन , विवेकसिंधु , ज्ञानेश्वरी , भागवत व दासबोध पठण आणि विपुल प्रमाणात अन्नदान अखंडपणे सुरु असते. आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे हजारों भक्त धन्य होवून जातात. 

येहळेगाव येथे वास्तव्य ज्यांचे ।
प्रख्यात शिष्य गुरु चिन्मयांचे ।।
विदेही स्थितीने जगीं वर्तताहे ।
तुकाराम साधु जीवन्मुक्त आहे ।।

असे येहळेग्राम भूमी पवित्र । परब्रह्म आनंद जन्में सुपात्र ।।
गुरुराज साक्षात् त्याला नमावें ।
तुकाराम स्वामी नमूं नम्रभावें ।।

गुरू चिन्मयांचा असे प्रिय भक्त ।
तुकाई जगीं तो असे सर्वज्ञात ।।
शुकेंद्रारुपी त्या तुकेंद्रा नमावें ।
तुकाराम साधु नमूं नम्रभावें ।। 

कृपेचाच सिंधू दीनांची तुकाई ।
दूजाभाव काही नसे त्यांजठायीं ।।
सदा प्रेमभक्तीत त्याच्या रमावे ।
तुकाराम साधु नमूं नम्रभावें ।। 

श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक येहळेगावनिवासी श्रीसमर्थ सद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. 

जो कुछ है सो तूही है .
श्री तुकामाई समर्थ जयजय तुकामाई समर्थ .
ओम् चैतन्य नवनाथाय नमः 
श्रीनाथ जयनाथ जयजय नाथ .
श्रीराम जयराम जयजय राम .
जय झय रघुवीर समर्थ. 
श्रीराम समर्थ. 
     ।। जय तुकामाय ।। 
...................................
जय तुकामाई.-------------------------------------
*तुकामाई येहळेगाव ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे गुरू यांची पुण्यतिथी ज्येष्ट शु. अष्टमी ३० मे २०२०*

*आज आपल्या सद्गुरूंचे गुरू श्री तुकाराम चैतन्य (संतश्रेष्ठ तुकामाई) यांची पुण्यतिथी!* 

*प्रत्यक्ष सद्गुरूंचे सद्गुरू! काय असेल त्यांचे प्रेम. ते महाराजांना बाळ किंवा राजा म्हणत प्रेमाने. महाराज प्रथम भेटीस गेले तेव्हा “चोर येणार; लुटून नेणार” असे म्हणत तुकामाई बसले होते. काय विलक्षण दिव्यदृष्टी होती त्यांची! असा सत्शिष्य मिळाल्यावर खरोखर सत्पुरुषांना गगनात मावेनासा आनंद होत असला पाहिजे. गुरूंच्या जवळची विद्या घेण्यास पात्र असणे आणि ती विद्या घेऊन हजारो लोकांना परमार्थाच्या मार्गाला लावणे याहून वेगळी गुरुदक्षिणा ती काय? त्यांच्याबद्दल महाराज सांगत - त्यांच्या* *चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय असे ते कळत नसे. अत्यंत अमानित्वाने वागल्यामुळे त्यांच्या हयातीत अनेकांना त्यांची योग्यता कळली नाही; परंतु असे गुरू लाभल्यानेच आपल्याला अशा जगद्वंद्य गुरूंचा लाभ झाला; तेव्हा तुकामाईचे ऋण फेडणे आपल्याला अशक्यच. त्यांच्या ऋणात राहूनच महाराजांना आवडत्या अशा नामात राहण्याची बुद्धी व्हावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना!*

*त्यांची थोरवी या एका ओळीत व्यक्त होते-* *“श्रीमत्तुकारामनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलघ्नकीर्तिं”*- *लोकांचे पाप नष्ट करणारे तुकाराम चैतन्य- त्यांना वंदन असो! श्रीराम!*
श्री तुकामाईंचे संक्षिप्त चरित्र 

आज दिनांक १२.३.२०२३ , रविवार , फाल्गुन कृ. ५ , रंगपंचमी . श्रीतुकामाई ( श्रीमत् परमहंस श्री तुकाराम महाराज / श्री ब्रह्मानंद महाराज , येहळेगाव तुकाराम , ता. कळमनुरी, जि. हिंगोली ) यांची जयंती आहे. त्यांच्या श्रीचरणीं माझे कोटी कोटी प्रणाम .

शके सतराशें चौतीस । 
वद्यपक्ष फाल्गुन मास ।
रंगपंचमी सोमवार दिवस । सूर्योदयी जन्मले ।। १.४२ ।। 

श्रीतुकामाई फाल्गुन व. पंचमी ( रंगपंचमी ) , सोमवार , शके १७३४ रोजी माता पार्वतीबाई व पिता श्री काशीनाथपंत यांच्या पोटी आपल्या आजोळी --सुकळी वीर , ता.कळमनुरी, जि.हिंगोली -- येथे अवतरित झाले. त्यांनी विलक्षण लीला व असंख्य चमत्कार करुन निपुत्रिकांना संतानप्राप्ती , गरजूंना नोकरी, उद्योग , व्यवसाय प्राप्ती , निर्धनांना धनप्राप्ती , मरणोन्मुख जर्जर व्याधीग्रस्तांना आरोग्यप्राप्ती , मृतांना जीवनदान , मुमुक्षुंना मोक्षप्राप्ती आपल्या कृपाशीर्वादामुळे प्राप्त करुन दिली व असंख्य भक्तांचा उद्धार केला. आजही याची प्रचीती श्रद्धावान सद्भक्तांना येत आहे व यापुढेही यावश्चंद्र दिवाकरो येत रहाणार. 

या थोर महात्म्याने ज्येष्ठ शुद्ध अष्टमी , शके १८०९ रोजी सोमवारी येहळेगाव येथे महासमाधी घेतली. येथे त्यांचा समाधीमठ व मंदिर असून पुण्यतिथी उत्सवासह इतर उत्सव - महोत्सव दरवर्षी मोठ्या थाटाने व उत्साहाने साजरे केले जातात. 

येहळेगाव येथे वास्तव्य ज्यांचे । प्रख्यात शिष्य गुरू चिन्मयांचे ।।
विदेही स्थितीने जगी वर्तताहे । तुकाराम साधु जिवन्मुक्त आहे ।।

या युगाचे महान नामावतारी प्रातःस्मरणीय श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आपले सद्गुरु श्रीतुकामाई यांच्याविषयी खालीलप्रमाणे धारणा आहे -----

त्याकाळच्या मोठमोठ्यांना श्रीतुकामाईंची योग्यता कळली नाही. त्यांच्यासारखा दयाळू जगांमध्ये कोण आहे ? त्यांना मनापासून शरण जावे. मला जे पाहिजे होते ते सर्व एके ठिकाणी --- श्रीतुकामाईंच्या ठिकाणी --- मला मिळाले. मला निर्गुणाचा साक्षात्कार , सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते, ते त्यांच्यापाशी मिळाले. माझे सर्व कार्य , गोंदवल्याचा हा सर्व व्याप हे त्यांच्याच कृपेचे फळ आहे. श्रीतुकामाईंसारखे संत मिळणे फार कठीण आहे . त्यातल्या त्यात त्यांच्यासारखा गुरु मिळणे तर फार फार पुण्याईची गोष्ट आहे. ते प्रत्यक्ष परमात्मस्वरुपच होते यांत शंका नाही. त्यांच्या आज्ञेने मी वागतो. 

संकलन :- डॉ. डी.डी.देशमुख कामठेकर , पुणे .

धन्यवाद .
संतश्रेष्ठ श्रीतुकामाईंचे श्रीचरणीं माझे कोटि कोटि प्रणाम. 

जो कुछ है सो तूही है ।सब कुछ श्री तुकामाई । 

।। श्रीतुकामाई समर्थ जय जय तुकामाई समर्थ ।।

Comments