श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बाविसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बाविसावा वांझ म्हैस दुभती झाली !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक शिष्य सिद्ध्योग्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, "अहो, योगेश्वर मुनिवर्य तुमचा जयजयकार असो. तुम्ही खरोखर भवसागरतारक आहात. अज्ञानरुपी अंधार दूर करणारे तुम्ही दिव्य ज्योती आहात. तुमचे चरणस्पर्श होताच मला ज्ञानप्राप्ती झाली. माझे मन परमार्थाकडे वळले आहे. कामधेनूसमान श्रीगुरुचरित्र तुमच्या मुखातून मला ऐकावयास मिळत आहे. हे माझे केवढे भाग्य ! तुम्ही मला श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगत आहात, पण माझे मन तृप्त होत नाही. आणखी ऐकण्याची मला तीव्र इच्छा आहे. श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरास आले असे तुम्ही सांगितले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा." नामधारकाची ही इच्छा ऐकून सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते नामधारकाचे कौतुक करीत म्हणाले, "नामधारका, तू खरोखर धन्य आहे. या जगात तू पूज्य होशील. तू मला जो प्रश्न विचारलास त्यामुळे माझ्या मनाला परमसंतोष झाला आहे. तुला श्रीगुरुचरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरास आल्यानंतर भीमा-अमरजा संगमावर गुप्तपणे राहू लागले. त्या संगमावर अश्वत्थवृक्ष आहे. ते स्थान वरदभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. तो संगम प्रयागसमान असून तेथे अष्टतीर्थे आहेत. त्या तीर्थाचे माहात्म्य अपार आहे. त्याविषयी मी तुला नंतर सांगेन. तीर्थमहिमा प्रकट व्हावा व भक्तजनांचा उद्धार व्हावा यासाठी श्रीगुरुंनी तेथे वास्तव्य केले. सूर्याची किरणे झाकून राहत नाहीत त्याप्रमाणे श्रीगुरू तेथे गुप्तपणे राहत होते, तरी यांची ख्याती सर्वत्र झालीच.
श्रीगुरू मध्यान्हकाळी भिक्षेच्या निमित्ताने गाणगापुरात जात असत. ते गाव अग्रहार होते. त्या गावात वेदज्ञ ब्राम्हणांची शंभर घरे होती. राजाकडून त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या. त्यामुळे सगळे ब्राम्हण तसे सुखासमाधानात होते. त्या गाणगापुरात एक दरिद्री ब्राम्हण होता. त्याच्या पत्नीचे नाव पतिव्रता असे होते. ती नावाप्रमाणेच मोठी पतिपारायण, साध्वी होती. तो ब्राम्हण चार घरी भिक्षा मागन आपले व आपल्या पत्नीचे पोट भरत असे. त्या ब्राम्हणाच्या घरी एक म्हैस होती, पण ती भाकड होती. ती दुध देत नसत. त्यामुळे तिला वेसन घातली होती. गावातील लोक दगडमाती आणण्यासाठी तिला भाड्याने नेत असत. त्यापासून त्या ब्राम्हणाला चार पैसे मिळत असत. श्रीगुरू भिक्षा मागण्यासाठी गाणगापुरात जात असत. एकेदिवशी मध्यान्हकाळी श्रीगुरू त्या दरिद्री ब्राम्हणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. तो ब्राम्हण भिक्षेसाठी गावात गेला होता. तो ब्राम्हण दरिद्री आहे, पोटासाठी भिक्षा मागतो हे श्रीगुरुंना माहित नसेल काय ?
तो ब्राम्हण दरिद्री असला तरी सात्विकवृत्तीचा होता. सज्जन होता. आहे त्यात समाधान मानणारा होता. सज्जन होता. परमेश्वराला असलेच भक्त आवडतात. कृष्णशिष्टाईसाठी कौरवांकडे गेलेला श्रीकृष्ण दुर्योधनाकडे राहावयास गेला नाही, तो गेला होता विदुराकडे. परमेश्वर भक्तीचा भुकेलेला असतो. श्रीमंतीचा नाही. म्हणूनच श्रीगुरू त्या दरिद्री ब्राम्हणाच्या घरी गेले. 'माते, भिक्षा वाढ' असे म्हणाले. श्रीगुरू दारात आलेले पाहून त्या ब्राम्हणाची स्त्री गडबडून गेली. अतिशय दुःखी झाली. कारण श्रीगुरुंना भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरी काहीच नव्हते. ती श्रीगुरुंना वंदन करून म्हणाली, "माझे पती भिक्षा आणावयास गावात गेले आहे. आपणास देण्यासाठी घरात काहीच नाही. आपण थोडावेळ थांबावे."
त्या स्त्रीची अगतिकता पाहून श्रीगुरू तिला म्हणाले, "तुझ्या घरात काही नाही असे कसे म्हणतेस ? तुझ्या घरी म्हैस आहे. ती भरपूर दुध देणारी आहे, तेव्हा मला भिक्षा म्हणून दुध दिलेस तरी चालेल. 'काही नाही' असे म्हणू नकोस." तेव्हा ती म्हणाली, "महाराज, म्हैस असून नसल्यासारखीच. ती भाकड आहे. ती दुध देत नाही म्हणून आम्ही तिला रेडा म्हणून ठेवली आहे. ती कधी व्यालेलीच नाही म्हणून तर तिला वेसन घालून माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो. मग आपल्याला दूध कुठले देऊ ?" तेव्हा श्रीगुरू जर रागानेच म्हणाले, "तू खोटे बोलतेस. तुझी म्हैस दूध देते. जा, जा, तिचे दूध काढून आण." श्रीगुरुंच्या शब्दावर विश्वास ठेवून ती भांडी घेऊन दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली. तिचे आचळ पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली, तो काय आश्चर्य आश्चर्य ! त्या म्हशीने भांडी भरभरून दूध दिले. श्रीगुरू सामान्य संन्यासी नाहीत, ते अवतारी महात्मा आहेत याची तिला खात्री पटली. तिने दूध गरम करून श्रीगुरुंना दिले. श्रीगुरु ते प्राशन करून संतुष्ट झाले. त्यांनी तिला आशीर्वाद दिला, "तुझ्या घरी अखंड लक्ष्मी राहील. तुझी मुले-नातवंडे सुखात सुखात, आनंदात राहतील. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही." असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू संगमाकडे परत गेले.
आज त्या ब्राम्हण स्त्रीच्या घरात आनंद ओसंडून वाहत होता. काही वेळाने तो ब्राम्हण भिक्षा मागून घरी परत आला. त्याला सगळी हकीगत समजली. तो म्हणाला, "आपले दारीद्र्य गेले. श्रीदत्तगुरुंनीच आपल्यावर कृपा केली आहे. आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया." ती दोघे संगमावर गेली. त्यांनी श्रीगुरूनृसिंहसरस्वतींचे दर्शन घेऊन त्यांची यथासांग षोडशोपचारे पूजा केली. त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. श्रीगुरुंच्या कृपाआशीर्वादाने ते कुटुंब ऐश्वर्यसंपन्न झाले. त्यांना धन, धान्य, पुत्रपौत्र सर्वकाही भरभरून मिळाले.
ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरूदत्तात्रेयांची ज्याच्यावर कृपा होते त्याला दुःख, दैन्य, दारिद्र्य कधीही भोगावे लागत नाही. त्याला आठप्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतात." यासाठीच सरस्वती गंगाधर श्रीगुरुचरित्र विस्ताराने सांगतात. ते श्रवण करणाऱ्यास कधीही दैन्य, दारिद्र्य भोगावे लागणार नाही.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'वांझ म्हैस दुभती झाली' नावाचा अध्याय बाविसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment