श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पंचविसावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पंचविसावा गर्विष्ठ ब्राम्हणांचा जयपत्राविषयी हट्ट !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

सिद्ध्योग्यांचा जयजयकार करीत नामधारक म्हणाला, "योगीराज, तुम्ही खरोखर संसारसागर तारक आहात. मला याची खात्री पटली आहे. तुम्ही मला परमार्थ सांगून माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. श्रीगुरू नृसिंहसरस्वती हे त्रैमूर्ती अवतार आहेत. जे लोक अज्ञानी असतात, त्यांना ते सामान्य मनुष्य वाटतात. पण ज्ञानी लोकांना 'प्रत्यक्ष' म्हणजे साक्षात परमेश्वर वाटतात. श्रीगुरूंनी त्रिविक्रमभारतीला आपले खरे परमेश्वरी रूप दाखविले व त्याचे अज्ञान दूर केले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा."

नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोगी म्हणाले, "वत्सा, नामधारका, त्या श्रीगुरुंची लीला खरोखर अगम्य आहे. त्यांच्या सर्व लीला मी सांगू लागलो तर पुष्कळ वेळ लागेल. कथाही खूप मोठी होईल; पण थोडेफार तुला सांगतो, ऐक. 'विदुरा' नगरात एक यवन राजा होता. तो अत्यंत क्रूर व कमालीचा ब्राम्हणद्वेष्टा होता. तो नित्य पशुहत्या करीत असे व आपल्या सभेत ब्राम्हणांना बोलावून त्यांना वेद म्हणावयास सांगत असे. तो मोठ्यामोठ्या विद्वान, ज्ञानी ब्राम्हणांना आपल्याकडे बोलावून सांगत असे. 'तुम्ही माझ्या येथे सर्व वेद म्हणा, मी तुम्हाला भरपूर पैसे देईन. जो कोणी मला वेदार्थ सांगेल त्याची मी विशेष पूजा करीन." त्यांत जे मोठे ज्ञानी असत ते सांगत, "आम्ही मतिहीन म्हणजे अज्ञानी आहोत. आम्हाला वेदातले काहीही समजत नाही." असे सांगून ते तेथून काढता पाय घ्यायचे. परंतु जे मूर्ख, अज्ञानी असत ते पैशाच्या लोभाने त्या यवनाकडे जाऊन वेद्पठण करीत असत. त्यावेळी यज्ञकांडाचा अर्थ ऐकताना तो द्रुष्ट यवन राजा कुत्सितपणे हसून म्हणायचा, "तुम्ही ब्राम्हण यज्ञ करता तेव्हा पशुहत्या करता, ती तुम्हाला चालते, मग आम्ही पशुहत्या केल इतर काय बिघडते ?" असे बोलून तो ब्राम्हणांची यथेच्छ निंदा-नालस्ती करायचा व जो विद्वान असेल त्याला भरपूर धन देत असे. ही बातमी ऐकून ठिकठिकाणचे अनेक ब्राम्हण केवळ धनाच्या लोभाने त्या यवनाकडे येउन त्याला वेद म्हणून दाखवीत असत. या कलियुगात असे जे मतिहीन, मदोन्मत्त, द्रव्य्लोभी असतील ते यमलोकाला जाण्याच्या योग्यतेचे असतील यात तीळमात्र शंका नाही.

एकदा काय झाले, द्रव्य्लोभी असे दोन ब्राम्हण त्या विदुरानगरात आले. ते त्या यवन राजाला भेटले व आपली कीर्ती आपणच सांगू लागले. ते म्हणाले, "आम्ही तीव वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे. सगळे वेद आम्हाला तोंडपाठ आहेत. वेदांविषयी आमच्याबरोबर वादविवाद कण्यास चारी राष्ट्रांत कोणीही नाही. तुमच्या नगरात असे कोणी असतील तर त्यांना आमच्याशी वेद्चर्चा करण्यासाठी बोलवावे." राजाने ते आव्हान स्वीकारले. त्याने आपल्या नगरातील विद्वान ब्राम्हणांना बोलावून घेतले. राजा त्यांना म्हणाला, "तुम्ही या दोन ब्राम्हणांशी वेद्विषयक चर्चा करा. तुमच्यापैकी जो जिंकेल त्याला मी भरपूर धन देईन." त्यावर ते विद्वान ब्राम्हण म्हणाले, "हे दोन्ही ब्राम्हण प्रकांडपंडित आहेत. या दोघांना जिंकू शकेल असा आमच्यात कोणीही नाही. हे आमच्यापेक्षा थोर आहेत." राजाने ते मान्य करून त्या दोन ब्राम्हणांना वस्त्रालंकार देऊन मोठा सन्मान केला. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. राजाने केलेल्या सन्मानाने त्या दोघांना अधिकच गर्व झाला. ते राजाला म्हणाले, "आमच्याशी वादविवाद करण्यास कोणीही मिळत नाही, मग आमचे मोठेपण सिद्ध कसे होणार ? आता आम्ही अन्यत्र जातो. आमच्याशी वादविवाद करण्यास कोणी भेटला तर तर त्याच्याशी चर्चा करू. कोणी मिळाला नाही तर जायपत्र घेऊन पुढे जाऊ."

राजाने ते मान्य केले. मग राजाचे संमतिपत्र घेऊन ते दोघे ब्राम्हण गावोगाव फिरू लागले. त्यांच्याबरोबर वाद घालण्यास कोणीच तयार नसल्याने प्रत्येकाकडून जयपत्र घेऊन ते फिरत फिरत दक्षिणेकडे भीमातीरी असलेल्या कुमसी गावी आले. त्याच गावात महाज्ञानी त्रिविक्रमभारती पंडित राहत होता. त्याला तीन वेद येत होते व तो अनेक शास्त्रांत पारंगत होता. त्या गर्विष्ठ ब्राम्हणांना गावातील लोकांकडून त्रिविक्रभरतीची माहिती समजली. मग ते त्रिविक्रमभारतीकडे गेले आणि त्याला म्हणाले, "तू स्वतःला मोठा 'त्रिवेदी' समजतोस, तर मग आमच्याशी चर्चा करण्यास तयार हो. नाहीतर जयपत्र लिहून दे." त्या ब्राम्हणांचे हे उन्मत्त बोलणे ऐकून त्रिविक्रमभारती म्हणाला, "अहो, तीन कसले, एकसुद्धा वेद येत नाही. मला वेदातले काहीही काळात नाही. जर मला वेदशास्त्र येत असते तर मी येथे अरण्यात कशाला राहिलो असतो ? मला जर वेद येत असते तर सर्व राजांनी मला वंदन केले असते. तुमच्याप्रमाणे सुखापभोग मला मिळाले असते. माल काहीच येत नाही म्हणून तर संन्यासवेष धारण करून मी वनात राहतो. मी एक सामान्य भिक्षुक आहे. तुमच्याशी बरोबरी मी कशी करणार ? "त्रिविक्रमभारतीचे हे बोलणे ऐकताच ते दोन ब्राम्हण भयंकर संतापले. ते म्हणाले, "आमच्याशी वादविवाद करण्यास या जगात कोणीही नाही. आम्ही सगळी राज्ये फिरत आलो पण आमच्याशी बरोबरी करू शकेल असा कोणीही नाही. आता आम्हाला जायपत्र लिहून दे, नाहीतर आमच्याशी वादविवाद कर." त्रिविक्रमभारतीने त्यांना अनेक प्रकारे समजाविले; पण ते काही ऐकण्यास तयारच होईनात.

त्रिविक्रमभारतीने विचार केला, या ब्राम्हणांना भलताच गर्व झाला आहे. हे अनेकांचा अपमान करीत आहेत. आता यांना चांगलीच शिक्षा होईल." त्रिविक्रमभारती त्या ब्राम्हणांना म्हणाला, "आपण गाणगापुरास जाऊया. तेथे आमचे गुरु आहेत. त्यांच्या समक्ष तुम्हाला जयपत्र दिले जाईल." त्या दोघांनी मान्य केले. ते मेण्यात बसून गाणगापुराकडे निघाले. त्रिविक्रमभारतीसारख्या परमज्ञानी पुरुषाला पायी चालत येण्यास लावले. यामुळे ते अल्पायुषी झाले. गाणगापुरास आल्यावर त्रिविक्रमभारतीने श्रीगुरुंच्या पाया पडून त्यांना सर्व हकीगत सांगितली. श्रीगुरुंच्या सर्व काही लक्षात आले. मग ते मंदस्मित करीत त्या दोघा ब्राम्हणांना म्हणाले, "तुम्ही दोघे कशासाठी आला आहात ? आम्ही संन्यासी, आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मिळणार ? समजा, तुम्ही आमचा पराभव केला तर तुम्हाला कसलाही रस नाही. आम्ही बोलूनचालून संन्यासी. आम्हाला हार-जीत सारखीच. तुम्ही आम्हाला जिंकलेत तरी तुमचा काय फायदा ?" असे बोलून श्रीगुरुंनी त्यांना परावृत्त करण्याचा केला; पण पालथ्या घड्यावर पाणी ! विनाशकाले विपरीत बुद्धी हेच खरे !"

ते ब्राम्हण म्हणाले, "जयपत्रे मिळविणे ही आमची प्रतिष्ठा आहे, तेव्हा आमच्याशी चर्चा करा नाहीतर दोघेही जयपत्रे लिहून द्या." मग श्रीगुरू त्यांना म्हणाले, "ब्राह्मणांनो ! इतका गर्व योग्य नाही.गर्व सर्व विनाशाचे मूळ आहे. या गर्वामुळेच बाणासुर, रावण, कौरव लयाला गेले. वेद अनंत आहेत. ब्रम्हादिकांनाही थांगपत्ता लागला नाही. वेद अनादिअनंत आहेत. त्याविषयी आपण कसली चर्चा करणार ? तेव्हा गर्व सोडा. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता, मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहित आहे ?" श्रीगुरुंनी त्यांना परोपरीने समजविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ते ब्राम्हण अत्यंत अत्यंत गर्वाने म्हणाले, "आम्ही तीन वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे."

ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले, "नामधारका, त्या गर्विष्ठ ब्राम्हणांना श्रीगुरुंनी काय उत्तर दिले, ती मोठी अपूर्व कथा तुला सांगतो, ती एकाग्रचित्ताने ऐक."

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'गर्विष्ठ ब्राम्हणांचा जयपत्राविषयी हट्ट' नावाचा अध्याय पंचविसावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments