श्री दत्तात्रेय पंच पदी*



*श्री दत्तात्रेय पंचपदी*

*श्री. प.प.टेंब्येस्वामी महाराजांनी करुणात्रिपदी रचली व आणखी दोन पदे रचून एकूण पाच पदे तयार होतात,*
*म्हणून अशा पाच पदांना पंच पदी असे म्हणतात.*

*पंच पदी पद पहिले*

उद्धरिं गुरुराया। अनसूयातनया दत्तात्रेया।।धृ।।
जो अनसूयेच्या भावाला भुलुनियां सुत झाला।
दत्तात्रेय अशा नामाला मिरवी,वंद्य सुराला।
तो तूं मुनिवर्या, निज पायां, स्मरतां वारिसि माया। उद्धरिं गुरु।।धृ।।
जो माहूरपुरीशयन करी, सह्याद्रीचे शिखरी निवसे,
गंगेचे स्नान करी, भिक्षा कोल्हापुरीं।
स्मरतां दर्शन दे, वारि भयां, तो तू आगमगेया। उद्धरिं गुरु।।१।।
तो तूं वांझेसी, सुत देसी, सौभाग्या वाढविसी।
मरतां प्रेतासी जीवविसी, सद्वरदाना देसी।
यास्वत वासुदेव तव पाया, धरी त्या तारीं सदया। उद्धरिं गुरु।।२।।

*पंच पदी पद दुसरे (करुणात्रिपदी पहिले पद)*

शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां।। शांत हो।।धृ।।
तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता।
तूं आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तूंचि त्राता ।।चाल।।
भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपातां,
तुजवांचुनि न दुजी वार्ता।। तूं आर्तां आश्रय दत्ता ।।१।।
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां।। शांत हो।।धृ।।
अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था ।
तरि आम्हीं गाऊनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा ।।चाल।।
तू तथापि दंडिसि देवा, कोणाचा मग करुं धावा ।
सोडविता दुसरा तेव्हां, कोण दत्ता आम्हां त्राता ।।२।।
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां।। शांत हो।।धृ।।
तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी।।
पुनरपिही चुकत तथापि, आंम्हावरी नच संतापी ।।चाल।।
गच्छतः स्खलनं क्वापि ।। असें मानुनि नच हो कोपी ।
निजकृपालेशा ओपी ।। आम्हांवरि तू भगवंता ।।३।।
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां।। शांत हो।।धृ।।
तव पदरीं असतां त्राता, आडमार्गी पाउल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता ।।चाल।।
निज बिरुदा आणुनि चित्ता ।। तू पतीतपावन दत्ता ।।
वळे आतां आम्हांवरता ।। करुनाघन तू गुरुनाथा ।।४।।
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां।। शांत हो।।धृ।।
सहकुटुंब, सहपरिवार, दास आम्हीं हें घरदार ।।
तव पदीं अर्पु असार, संसाराहित हा भार ।।चाल।।
परिहारिसी करुणा सिंधो ।। तूं दीनानाथ सुबंधो ।।
आम्हां अघलेश न बाधो ।। वासुदेवप्रार्थित दत्ता ।। ।।५।।
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां।। शांत हो।।धृ।

*पंच पदी पद तिसरे (करुणात्रिपदी दुसरे पद)*

श्रीगुरुदत्ता जय भगवंता । तें मन निष्ठुर न करी आतां ।।धृ।।
चोरें व्दिजासी मारितां मन जें, कळवळलें तें कळवळो आतां ।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता । तें मन निष्ठुर न करी आतां ।।१।।
पोटशुळानें व्दिज तडफडतां, कळवळलें तें कळवळो आतां ।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता । तें मन निष्ठुर न करी आतां ।।२।।
व्दिजसुत मरतां वळलें तें मन, हो कीं उदासिन न वळे आतां ।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता । तें मन निष्ठुर न करी आतां ।।३।।
सतिपति मरतां काकुळति येतां, वळले तें मन न वळे कीं आतां ।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता । तें मन निष्ठुर न करी आतां ।।४।।
श्रीगुरुदत्ता त्याजिं निष्ठुरता, कोमलचित्ता वळवीं आतां ।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता । तें मन निष्ठुर न करी आतां ।।५।।

*पंच पदी पद चौथे (करुणात्रिपदी तिसरे पद)*

जय करुणाघन निजजनजीवन, अनसूयानंदन पाहि जनार्दन ।।धृ।।
निज अपराधें उपराठी दृष्टी, होउनि पोटीं भय धरुं पावन ।।१।।
तू करुणाकर कधीं आम्हांवर, रुससी न किंकरवरद कृपाघन ।।२।।
वारी अपराध तूं मायबाप, तव मनीं कोपलेश न वामन ।।३।।
बालकापराधा गणे जरि माता, तरी कोण त्राता देईल जीवन ।।४।।
प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव, पदीं देवो ठाव देव अत्रिनन्दन ।।५।।

*पंचपदी पद पाचवे*

आठवी चित्ता तूं गुरुदत्ता। जो भवसागर पतितां त्राता ।।धृ।।
आहे जयाचे कोमल ह्रदय। सद्यचि हा भाव हरि वरदाता ।।१।।
पाप पदोपदी होई जरी तरी। स्मरता तारी भविकपाता ।।२।।
संकट येतां जो निज अंतरी। चिंती तया शिरी कर धरी त्राता ।।३।।
जो निज जीवींचे हितगुज साचे। ध्यान योगियाचे तोहा धाता ।।४।।
सज्जन जीवन अनसूयानंदन। वासुदेव ध्यान हा यतिभर्ता।।५।।

अपराध क्षमा आता केला पाहीजे।।
 गुरु हां केला पाहीजे।। 
अबद्ध सुबध्दु गुण वर्णीयले तुझे ।।धृ | |         

 न कळेची टाळ वीणा वाजला कैसा।।
 गुरु हा वाजला कैसा। 
अस्ताव्यस्त पडे नाद झाला भलतैसा ।।१|| 

नाही ताल ज्ञान नाहीं कंठ सुस्वर।
 गुरु हा कंठ सुस्वर। 
झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ।। २ || 

निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे ।
गुण हे वेडे वाकुडे | 
गुणदोष न लावावा सेवकाकडे।। ३ | |  

अपराध क्षमा आता केला पाहीजे।।
 गुरु हां केला पाहीजे।। अबद्ध सुबध्दु गुण वर्णीयले तुझे ।।

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त | |

Comments