श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अडतिसावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अडतिसावा भक्ताची लाज राखली !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारकाने सिध्दमुनींना विनंती केली, "हे योगिराज, श्रीगुरुचरित्र ऐकण्यासाठी मी अतिशय आतुर झालो आहे. पुढे काय झाले ते मला सांगा." सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, तुझी जिज्ञासा पाहून मला अतिशय आनंद होत आहे. तुझ्यामुळेच मला परमलाभ झाला आहे. मला एक कथा आठवली आहे, ती मी तुला सांगतो. नामधारका, श्रीगुरू नृसिंहसरस्वतींना त्यांचे अनेक भक्त द्रव्य आणून देत असत; परंतु श्रीगुरू ते स्वतःसाठी स्वीकारीत नसत. ते त्या भक्तांना त्या द्रव्यातून अन्नदान करण्यास सांगत असत. त्यामुळे गाणगापुरात रोजच्या रोज समाराधना होत असे. त्यात कधीही खंड पडत नसे.

एके दिवशी काश्यप गोत्रातील भास्कर नावाचा एक गरीब ब्राम्हण श्रीगुरुंच्या दर्शनासाठी मठात आला. आपल्या हस्ते स्वयंपाक करून श्रीगुरुंना भोजन देण्याचा त्याचा संकल्प होता. तीन लोकांना पुरेल एवढा शिधा त्याने आणला होता; परतू नित्य चालू असलेल्या समाराधनेमुळे त्याला श्रीगुरुंना भोजन देण्याची संधीच मिळत नव्हती. तीन महिनेपर्यंत तो ब्राम्हण इतर भक्तांनी केलेल्या समाराधनेत भोजन करीत असे. तीन लोकांना पुरेल एवढ्या शिध्याने हा समाराधना घालणारा आहे हे इतर भक्तांना समजले, तेव्हा ते त्या भास्कर ब्राम्हणाची थट्टा करू लागले. प्रत्येकाच्या वाट्याला एक एक शीत तरी येईल का ? असे त्या ब्राम्हणाला विचारात. त्यामुळे तो ब्राम्हण दुःखी होत असे; पण तो कोणाला काय बोलणार ? लोकांनी केलेली थट्टा मुकाट्याने सहन करीत असे.

श्रीगुरुंना हे समजताच ते त्या भास्कर ब्राम्हणाला म्हणाले, "तू आज समाराधना कर. आज मी तुझ्याकडेच भोजन करणार आहे." श्रीगुरुंनी असे सांगताच त्या भास्कर ब्राम्हणाला अतिशय आनंद झाला. त्याने डाळ, तांदूळ, कणीक इत्यादी जो काही शिधा आणला होता त्यातून सोवळ्याने स्वयंपाक केला. ही गोष्ट इतरांना समजली तेव्हा ते आपापसात म्हणाले, "आज श्रीगुरुंनी भास्कराला समाराधना करण्यास सांगितले आहे म्हणजे आज आपणास मठात भोजन मिळणार नाही. गोडधोड काही मिळणार नाही. तेव्हा आज आपल्या घरीच भोजन करावे लागणार." श्रीगुरुंना हे अंतर्ज्ञानाने समजले. त्यांनी सर्वांना बोलावून सांगितले, "आज भास्कर समाराधना घालणार आहे, तेव्हा सर्वांनी येथेच भोजनाला यावे. घरी कोणीही भोजन करू नये. सर्वांनी स्नान करून यावे." श्रीगुरुंनी असे सांगताच त्या ब्राम्हणांनी विचार केला, 'मठात असलेल्या सामग्रीनेच श्रीगुरू भास्करांकडून स्वयंपाक करवून घेणार असतील' असा विचार करून सर्वजन स्नानासाठी नदीवर गेले.

इकडे भास्कराने तीन लोकांना पुरेल इतका स्वयंपाक केला. मग श्रीगुरू भास्कराला म्हणाले, "तू सर्व ब्राम्हणांना बोलावणे पाठव. चार हजार पत्रावळ्या मांडा." भास्करने विचार केला, मी तर स्वयंपाक केला आहे, तीन माणसांना पुरेल एवढा ! आणि श्रीगुरुंनी सर्वांना भोजनास सांगितले आहे ! चार हजार पत्रावळी मांडल्या आहेत ! या सर्वांना अन्न कसे काय पुरणार ? पण मग श्रीगुरू महात्मा आहेत. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. श्रीगुरू समर्थ आहेत. त्यांची लीला आपल्याला कशी कळणार ? " श्रीगुरुंच्या आज्ञेनुसार भास्कर त्या ब्राम्हणांना बोलाविण्यासाठी नदीवर गेला; पण ते सगळे टंगळमंगळ करू लागले. श्रीगुरुंना हे समजताच त्यांनी दुसऱ्या शिष्यांना नदीवर पाठविले व सर्वांना भोजनास येण्यास सांगितले. मग सर्वजण भोजनासाठी आले.

स्वयंपाक तयार होता. सर्वांनी श्रीगुरूंची पूजा केली. चार हजार पत्रावळी मांडून झाल्या होत्या. मग श्रीगुरुंनी आपले वस्त्र त्या अन्नावर झाकले. त्यावर कमंडलूतील तीर्थ शिंपडले. मग श्रीगुरू त्या भास्कर ब्राम्हणाला म्हणाले, "अन्नावरील वस्त्र न काढता अन्न दुसऱ्या पात्रांत काढून घ्यावे व वाढावे." श्रीगुरुंच्यासह सर्वजण भोजनास बसले. वाढणे सुरु झाले; पण आश्चर्य असे की, अन्न कितीही वाढले तरी ते पहिले होते तेवढे शिल्लक ! हजारो ब्राम्हण पोटभर जेवले, पण अन्न काही संपेना. मग गाणगापुरातील सर्व स्त्री-पुरुष, मुले यांना भोजनासाठी बोलाविले. सगळे पोटभर जेवले. मग गानागापुराच्या शेजारच्या गावातील लोकांना भोजनासाठी बोलाविले. तेही पोटभर जेवले. त्या दिवशी गाणगापुरातील व परिसरातील एकही मनुष्य उपाशी राहिला नाही. मग श्रीगुरुंनी भास्कराला भोजन करण्यास सांगितले. भास्कर जेवला तरी सुरुवातीला तयार केले होते तेवढे अन्न शिल्लक ! शेवटी ते अन्न जलचरांना अर्पण केले. त्या दिवशी भास्कराने केवळ तीन लोकांना पुरेल एवढा शिधा आणला होता. तेवढ्या शिध्याच्या तयार अन्नात चार हजार लोक जेवले. केवढा हा चमत्कार ! ही सगळी श्रीगुरूंची कृपा ! या प्रसंगाने श्रीगुरूंची कीर्ती सर्वत्र झाली. गाणगापुरातील हे संन्यासी साधे संन्यासी नाहीत, ते साक्षात त्रैमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार आहेत याची लोकांना खात्री पटली. सर्वांनी श्रीगुरूंचा जयजयकार केला. नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी श्रीगुरुंचे शिष्यत्व पत्करले. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी श्रीगुरुंनी असे कितीही चमत्कार केले. एका प्रेताला सजीव केले. शुष्ककाष्ठास पालवी फुटली. त्रिविक्रम-भारतीला विश्वरूप दाखविले. वांझ म्हैस दुभती केली. कुष्ठरोग झालेल्या ब्राम्हणाचा रोग नाहीसा केला. पतितामुखी वेद वदविले, एका विणकरी भक्ताला श्रीशैलपर्वत दाखवून त्याला काशीयात्रा घडविली. श्रीगुरुंच्या लीला अपार आहेत. अनेक देवदेवतांची आराधना केली असता उशिराने कामना पूर्ण होतात, परंतु श्रीगुरू नृसिंहसरस्वतींच्या केवळ दर्शनाने सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतात. म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, "लोक हो ! तुम्ही श्रीगुरूंची सेवा करा."

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'भक्ताची लाज राखली' नावाचा अध्याय अडतिसावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments