श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सतरावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सतरावा मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, तू खरोखर श्रेष्ठ गुरुभक्त आहेस हे पाहून माझ्या मनाला विशेष आंनंद होत आहे. पाऊस सुरु होण्या-अगोदर त्याची पूर्वसूचना देणारा वारा वाहू लागतो. त्याप्रमाणे श्रीगुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा ही तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे. हे श्रीगुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो. ते तू एकाग्रचित्ताने श्रवण कर. कृष्णावेणी नद्यांच्या तीरावरील भिल्लवडी क्षेत्राच्या पश्चिमतीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे. तेथील औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरू नृसिंहसरस्वती एक चातुर्मास (चार महिने) गुप्तपणे राहत होते. भुवनेश्वरीच्या जवळ श्रीगुरुंचे होते, त्यामुळे ते स्थान (औदुंबर) सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध पावले. त्या औदुंबरक्षेत्री श्रीगुरू गुप्तपणे का राहिले ? ते तर साक्षात परमात्मा परमेश्वर, मग त्यांना भिक्षा मागण्याची व जप-तप करण्याची आवश्यकता का होती ?" नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, साक्षात सदाशिव शंकर व श्रीदत्तात्रेयसुद्धा भिक्षा मागत असत. भिक्षा मागणे हे केवळ निमित्त. भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असत. जे रंजले गांजलेले भक्त असता त्यांच्यावर ते अनुग्रह करीत असत. श्रीगुरुंच्या वास्तव्याने अनेक गुप्ततीर्थक्षेत्रे प्रकट झाली. भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठीच श्रीगुरू भिक्षेच्या निमित्ताने ते फिरत असत. पण अनेक लोक नानाप्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार येऊ लागले, म्हणूनच ते गुप्तपणे राहू लागले. पण कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा सुगंध लपून राहत नाही. तो दरवळतोच. त्याप्रमाणे श्रीगुरू भिल्लवडीक्षेत्री गुप्तपणे राहत असले तरी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. सूर्य लपविला तरी त्याचे तेज लपून राहत नाही हे खरे. श्रीगुरुंचे माहात्म्य कसे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो. ती ऐक.

करवीरक्षेत्रात वेदशास्त्रपारंगत असा एक ऋग्वेदी ब्राम्हण राहत होता. विद्वान लोकांच्यात त्याला मोठा मन होता. त्याला एक मुलगा झाला पण दुर्दैवाने तो उपजत अगदी मतीमंद होता. कितीही शिकविले तरी त्याला काहीच येत नसे. काही समजत नसे.तो लहान असतानाच त्याचे आई-वडील देवाघरी गेले. त्याच्या नात्यातील लोकांनी त्याचे पालन पोषण केले. बघता बघता तो सात वर्षांचा झाला. कुळाचारानुसार सातव्या वर्षी तयची मुंज झाली. मौन्जिबंधानंतर त्याला अध्ययनासाठी गुरूकडे पाठविले, पण तो मतिमंद असल्यामुळे गुरुंनी शिकविलेले त्याला काहीच समजत नव्हते. त्याला संध्या येत नव्हती.

गायत्री मंत्र येत नव्हता.मग वेदाध्ययन कुठले ? ब्राम्हणाला विद्या नाही तर पोट कसे भरणार ? विद्वान ब्राम्हणाचा मठ्ठ मुलगा अशी त्याची सर्व लोक थट्टा करीत असत. लोक त्याला म्हणत, "अरे मूर्खा ! तुझे वडील केवढे विद्वान होते ! तू मात्र अगदी दगडधोंडा आहेस. तू तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास.अरे, ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशू होय. विद्वानांची सर्वत्र पूजा होते. तुझ्यासारख्या दगडाची नाही. तुझा जन्म अगदी फुकट आहे. तू आणि सूकर यात काही फरकच नाही. आचारहीन अशा तुला या जन्मात कदापि सुख मिळणार नाही. मृत्यूनंतर तुला नरकातच जावे लागेल. असले लाजिरवाणे जिणे जगण्यापेक्षा तू मारत का नाहीस ?" लोकांनी केलेली निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. तो लोकांना म्हणाला, "मी गतजन्मी विद्यादान केले नाही म्हणून मला या जन्मात विद्याभ्यास जमत नाही. त्याला मी तरी काय करणार ? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा." त्यावर लोक हसून म्हणाले, "आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल.या जन्मी तू भीक मागून जग."

लोकांनी केलेली हि निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला, त्याने गाव सोडले. तो रानावनातून फिरत चालला. 'मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपण प्राण द्यावा. मरून जावे.' असे त्याने ठरविले. आत्महत्येचा विचार करीत फिरत फिरत कृष्णानदीच्या काठावरील भिलवडी गावी आला. तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर होते. तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले. त्याने अन्नपाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर धरणे धरून बसला. देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करीत देवीला आपले दुःख सांगू लागला, "हे जगन्माते, सर्व जगाने माझी हेटाळणी केली, माझी उपेक्षा केली; पण तू तरी माझ्यावर कृपा कर. मला दूर लोटू नकोस." तीन दिवस लोटले तरी पण देवीची आपल्यावर कृपा होत नाही, ती प्रसन्न होत नाही, हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो देवीला म्हणाला, "माते, आता मी काय करू ? कोठे जाऊ ? माझी हाक तुला का ऐकू येत नाही ? माझ्यावर तुझी कृपा होत नाही, म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायांवर वाहतो." असे म्हणून त्याने खरोखरच आपली जीभ कापली व देवीला अर्पण केली. तरीसुद्धा देवी प्रसन्न झाली नाही. तेव्हा तो देवीला कळवळून म्हणाला, "आंत माझ्यावर कृपा नाही केलीस तर उद्या मी सकाळी माझी मन कापून माझे मस्तक तुला अर्पण करीन."

त्यावर भुवनेश्वरी देवी प्रसन्न झाली. त्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली. ती त्याला म्हणाली, "बाळा, तू इतके दुःख कशाला करतोस ? माझ्यावर रागावू नकोस. नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहेत. ते साक्षात श्रीदत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंहसरस्वती आहेत . तू त्यांच्याकडे जा . तुझे काम होईल ."

सकाळी मुलगा जागा झाला. त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले. तो नदीच्या पलीकडे गेला. तेथे औदुंबर वृक्षाखाली श्रीनृसिंहसरस्वती तपस्वी रुपात बसले होते. त्यानं पाहताच त्या मुलाला आनंद झाला. त्याने धावतच जाऊन त्यांचे पाय धरले. त्याला जीभ नसल्याने बोलता येत नव्हते, पण तो मनातल्या मनात श्रीगुरुंचे स्तवन करीत होता. श्रीगुरुंनी त्याचा मनोभाव ओळखला. ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेऊन आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य ! श्रीगुरूंचा स्पर्श होताच त्या मुलाला जीभ परत मिळाली. त्याचक्षणी त्याला वेदशास्त्रपुराणादी सर्व विद्या प्राप्त झाल्या. श्रीगुरु म्हणाले, माझी अगदी मनापासून जो भक्ती करील त्याला सर्व विद्या, सर्व सुखे प्राप्त होतील."

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती' नावाचा अध्याय सतरावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments