भगवान नृसिंह
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🌹*
*🔸भगवान नृसिंह 🔸*
*-------------------------------------------
*--------------------------------------------*
*दशावतारापैकी श्रीनृसिंह हा विष्णुचा चौथा अवतार असून तो अयोनिसंभव आहे. हा ना पशू ना मनुष्य असे विचित्र रूप धारण करणारा असल्यामुळे आजमितीलाही या अवताराविषयी जनमानसात विलक्षण कुतूहल आहे. श्रीनृसिंहावतार हा परमेश्वराचे सर्व साक्षित्व सिध्द करत असून तो स्थिर, चर, काष्ठ, पाषाणात भरून उरला आहे. दुष्ट आणि विष्णुद्वेष्ट्या हिरण्यकशिपू नामक उन्मत्त असुराचा विनाश हे या अवताराचे मुख्य प्रयोजन.*
*उन्मत्त झालेल्या हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी आणि भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी 'नरसिंह रूप धारण करून अवतार घेतला. स्तंभातून प्रकट होऊन, ब्रम्हदेवाकडून प्राप्त करून घेतलेल्या वरामुळे स्वतःला 'आवध्य' समजणाऱ्या त्या दैत्याचा संध्यासमयी वध केला, एवढीच माहिती सर्वसामान्यांना असते; पण ही माहिती उपास्य देवतेची व तिच्या उपासनेसंबंधीची ओळख करून देण्यास तितकीशी पुरेशी नाही.*
*चतुर्थ अवतार : भगवान विष्णू यांनी भक्तरक्षणासाठी व दुष्ट दैत्य निर्दालनासाठी आत्तापर्यंत धारण केलेल्या अवतारांपैकी हा चौथा अवतार आहे. तो अर्ध मानव व अर्ध प्राणी असा संमिश्र अवतार आहे. नृसिंह या शब्दावरूनच ते स्पष्ट होते. 'नृ' म्हणजे'नर' अथवा 'पुरुष' किंवा 'मनुष्य'. 'सिंह' हा चतुष्पाद प्राणी अबालवृध्दांनाही माहीत आहे. ह्या अवतारात भगवंताचे धड (खांद्यापासून खालचे सर्व शरीर) हे मानवी होते, तर मानेपासून वरचा भाग म्हणजे मस्तक, हे आयाळयुक्त सिंहाचे होते. हातांच्या बोटांना सिंह नखांसारखी तीक्ष्ण नखे होती. अग्निपुराणात श्रीनृसिंहाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे...,*
*सिंहस्थ कृत्वा वदनं मुरारी ।*
*सदा करालं च सुरक्तनेत्रम्।।*
*अर्धं वपुर्षे मनुजस्य कृत्वा ।*
*यथौ सभा दैत्यपतेः पुरस्तात् ।।*
*भगवान विष्णुंचा हा अवतार अयोनिसंभव आहे. लाक्षणिक अशाही माता-पिता इत्यादी बंधनांपासून तो मुक्त आहे. दुष्ट, देवद्वेष्ट्या, विष्णुद्वेष्ट्या स्वतःलाच त्रैलोक्याधिपती म्हणविणाऱ्या व स्वतःला मृत्युभयापासून मुक्त समजणाऱ्या असुराधिपती हिरण्यकशिपूचा विनाश हेच या नृसिंह अवताराचे प्रयोजन. या अवतारातील स्वरूप आणि प्रकट नाट्य अत्यंत अद्भुत व विलक्षण असेच आहे. तसेच, या प्रकटीकरणानंतरचे भगवंताचे अवनीतलावरील वास्तव्यही आपत्कालीनच आहे. कार्यकारणभाव संपताच भगवंतांनी या रौद्रभीषण, उग्र अवताराची समाप्ती केली आहे. सर्वांच्या हितासाठी व भक्त रक्षणासाठी भगवान नृसिंह कैलास शिखरावरच राहू लागले, असा उल्लेख 'श्रीनृसिंह पुराणा' च्या ४४ व्या अध्यायात आलेला आहे.*
*भिन्न कथा : श्रीनृसिंह अवतार प्राकट्याविषयी तसेच, अवतार समाप्ती विषयी थोडा वेगळा कथाभागही आढळतो. थोडक्यात तो असा, श्रीविष्णुंनी नृसिंह रुप धारण करून व हाती खडग घेऊन हिरण्यकशिपूच्या राजवाड्यात प्रवेश केला. प्रथमतः हिरण्यकशिपूला खडग् युध्दात जेरीस आणून मग त्याने त्या बलाढ्य असुरराजाचा वध केला. हिरण्यकशिपूला ठार मारल्यानंतर क्रोधीत झालेल्या नृसिंहाचे ते अक्राळ विक्राळ रूप पाहण्याचे कुणासच धाडस होईना. प्रत्यक्ष लक्ष्मी सुध्दा पुढे व्हावयास घाबरू लागली. तशातच भावावेषातील संतप्त नृसिंह बेफाम होऊन सैरावैरा धावू लागला, तेव्हा भगवान शंकरांनी शरभाचे रूप धारण केले आणि गौतमीच्या दक्षिण तटी आलेल्या नृसिंहाचा वध करून त्या भिषण अवताराची सांगता केली.*
*प्राकट्य स्थान: श्रीविष्णू नृसिंह रूपात स्तंभातून जेथे प्रकटले ते स्थान कोणते याविषयी मतभेद आढळतात. पण सर्वसाधारणपणे नृसिंहांचे प्रकट होण्याचे मूल स्थान म्हणजे पूर्व पंजाबमधील मुलतान शहर होय, असे मानण्याकडे बहुतेक विद्वानांचा कल दिसतो. आज हे शहर व नृसिंहस्थान पाकिस्तान मध्ये गेलेले आहे.*
*मुलतान हे शहर हिरण्यकशिपूच्या राजधानीचे नगर होते. या मूलस्थान नगरातील राजप्रसादातल्या स्तंभातून नृसिंहावतार प्रकट झाला म्हणून मुलतान (म्हणजेच मूल स्थान) हे नगर नृसिंह अवताराचे आद्यस्थान मानले जाते. या क्षेत्राविषयी वामन पंडितांचा पुढील श्लोक पहा, "मूलस्थान प्रसिद्ध नाम नगरी जैसी अयोध्या पुरी । जेथे जन्म धरी नृसिंह बरवा प्रल्हाद राखे हरी।।*
*पाकिस्तानातील मुलतान शहरात भगवान नृसिंहाचे एक भव्य मंदिर असून त्यातील नृसिंह मूर्ती अत्यंत उग्र होती. तिचे प्रखर तेज सहन करणे सर्वसामान्य माणसाला शक्य होत नव्हते. म्हणून या मूर्तीच्या पाठीची पूजा करत. नृसिंह चतुर्दशीला येथे मोठा उत्सवही होत असे. आजमितीला पाकिस्तानात गेलेल्या या मंदिराची अवस्था काय आहे, हे सांगणे अवघड आहे.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
Comments
Post a Comment