श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणचाळीसावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणचाळीसावा अश्वत्थ माहात्म्य - साठ वर्षाच्या वंध्येस संतानप्राप्ती !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, " श्रीगुरुंच्या कृपेने एका साठ वर्षांच्या वांझ स्त्रीला पुत्र झाला, ती अद्भुत कथा ऐक. ती कथा अशी, सोमनाथ नावाचा एक शौनकगोत्री ब्राम्हण होता. त्याच्या पत्नीचे नाव गंगा. पतिपरायण असलेली ती स्त्री वेद्शास्त्रानुसार आचरण करीत असे. ती साठ वर्षांची झाली तरी तिला मुलबाळ नव्हते. गाणगापुरात तिला सर्वजण 'वांझोटी' म्हणून हिणवत. ती नित्यनेमाने श्रीगुरुंच्या दर्शनाला येत असे व नीरांजनाने त्यांची आरती करीत असे. तिचा हा नेम कितीही दिवस चालू होता. तिच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी तिला विचारले, "तू नित्यनेमाने माझी नीरांजनाने आरती करतेस. तुझी काय इच्छा आहे ? तुझी जी काही कामना असेल ती सांग. नारायणाच्या, शंकराच्या मनात आले तर ते तुझी इच्छा नक्की करतील."

श्रीगुरू असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया पडून म्हणाली, "स्वामी, 'अपुत्रस्य गतिर्नास्ति'. निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्त नाही. निपुत्रिक स्त्रीचे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात. जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे. पुत्रजन्माचे मागच्या बेचाळीस पिढ्या उद्धरून जातात. पुत्राविना घर अरण्यासमान. मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकुरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात; पण माझ्या नशिबात ते नाही. ज्यांना पुत्रपौत्र असतात, त्यांना परलोक प्राप्ती होते; पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्याने त्याला मुक्ती मिळत नाही. आता हा जन्म पुरे झाला. तो फुकट गेला. आता माझा पुढचा जन्म तरी सफल होईल, पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा वर मला द्या." त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले, "पुढचा जन्म कोणी पाहिला आहे ? पुढच्या जन्मी तुला या जन्मातले काही आठवेल का ? तेव्हा पुढच्या जन्माचे सोडून दे. तुला याच जन्मी सुलक्षणी कन्या-पुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव."

त्यावर ती स्त्री म्हणाली, "स्वामी, हे काय सांगता ? मला आता साठ वर्षे झाली. आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रतवैकल्ये केली, नवससायास केले, पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या, सगळे काही मी विश्वासाने केले; पण कशाचा काही उपयोग झाला नाही. आजही मी अश्वत्थाला (पिंपळाला) मूर्खपणाने प्रदक्षिणा घालीत आहे. या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वत्थसेवा फळाला यावी. आता मी साठ वर्षाची झाले, माझा विटाळही गेला, असे असतानाही याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. तुमच्या शब्दांवर मी अविश्वास कसा दाखवू ?"

श्रीगुरू म्हणाले, "अश्वत्थसेवा महापुण्यकारक आहे. ती कधीही व्यर्थ जात नाही. तू अश्वत्थाची निंदा करू नकोस. आमच्यासह अश्वत्थाचीही तू सेवा कर. तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल. आता आम्ही सांगतो तसे कर. तू नित्यनेमाने भीमा-अमरजा संगमावर जा. तेथे अश्वत्थवृक्ष आहे. आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तेथे जात असतो. तेथे तू आमच्यासह अश्वत्थाची सेवा कर. तेथे अश्वत्थरूपाने प्रत्यक्ष नारायणाचे वास्तव्य आहे." 'मला अश्वत्थाचे माहात्म्य सांगा' अशी त्या स्त्रीने विनंती केली असता श्रीगुरू म्हणाले, अश्वत्थाची निंदा कधीही करू नये. त्याचे माहात्म्य फार मोठे आहे. अश्वत्थाच्या ठिकाणी सर्व देवांचे वास्तव्य असते. एका अश्वत्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याचे फळ मिळते. ब्रम्हांड पुराणात प्रत्यक्ष ब्रम्ह्देवांनी नारदमुनींना अश्वत्थाचे माहात्म्य सांगितले आहे. एकदा त्रैलोक्यसंचारी नारदमुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले. नारदमुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांना अर्घ्यपाद्य देऊन त्याचे उत्तम स्वागत केले. "मुनिवर्य, आम्हाला अश्वत्थाचे माहात्म्य सांगा' अशी सर्व ऋषींना विनंती केली असता नारदमुनी म्हणाले 'प्रत्यक्ष ब्रम्हदेवांनी मला अश्वत्थ माहात्म्य सांगितले आहे, तेच मी तुम्हाला सांगतो. अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय. तो विष्णुस्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रम्हदेव, बुंध्यामध्ये विष्णू व शेंड्यावर रुद्राचे वास्तव्य असते. तय्च्या फांद्यांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रम्हदेव व पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव्य करतात. त्याच्या सर्व शाखा-फांद्यांवर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळ्यांत गो, ब्राम्हण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य आहे. ॐकारस्वरूप अश्वत्थाचे 'अ' हे मूळ, 'उ' म्हणजे बुंधा आणि 'म' म्हणजे फळे-फुले होत. त्रेमुर्तींचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर एकादशरुद्र व अष्टवसू असे सर्व देव आहेत, म्हणूनच अश्वत्थाला 'कल्पवृक्ष' म्हणतात. एका अश्वत्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवांची सेवा घडते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अश्वत्थाचे माहात्म्य अगाध शब्दातीत आहे."

मग नारदमुनींनी अश्वत्थाची सेवा कशी करायची ते समजावून सांगितले.नारदमुनी म्हणाले, "अश्वत्थसेवा व्रताला गुरु, शुक्र व चंद्रबळ असणाऱ्या चैत्र, आषाढ व पौष महिन्यात या व्रताला प्रारंभ करावा. गुरु-शुक्राचा अस्त असताना व चंद्रबळ नसताना या व्रताला प्रारंभ करू नये. याशिवाय इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपासपूर्वक, शुचिर्भूतपणे या व्रताला सुरुवात करावी.रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रातीच्या दिवशी, संध्याकाळी, रिक्त तिथीस, तिसऱ्या प्रहरी, पर्वणीकाळी, व्यतिपात योग असताना वैधुति इत्यादी अशुभ दिवशी अश्वत्थाला स्पर्श करू नये. करणाऱ्याने सदैव शुचिर्भूत असावे. द्यूतकर्म असत्यभाषण करू नये. परनिंदा, वितंडवाद टाळावा, प्रातःकाळी सचैल सचैल स्नान करावे. श्वेतवस्त्र परिधान करावे. अश्वत्थाखालची जमीन गोमयाने सारवावी. त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात. त्या रांगोळ्यात कमळादी शुभाकृती काढाव्यात. शुद्ध जाळणे जलाने भरलेले दोन कलश त्या रांगोळ्यावर स्थापन करावेत. त्या दोन्ही कलशांत गंगा व यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा. त्या कलशांची गंधाक्षतपुष्पांनी करावी. पुन्याहवाचन करून आपल्या इष्ट कामनेचा उच्चार करावा. मगकलशाने कलशाने पाणी आणून अश्वत्थाला सात वेळा स्नान घालावे. मग पुन्हा स्नान करून अश्वत्थाची पुरुषसूक्त मंत्रांनी षोडशोपचारे यथासांग पूजा करावी. त्यावेळी लक्ष्मीसहित अष्टभुजा नारायणाचे ध्यान करावे. सर्व देवदेवांना आवाहन करावे. मग अश्वत्थ नारायणाला वस्त्राने किंवा सुटणे वेढे घालावेत. मग पुरुषसूक्त म्हणत मंदगतीने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्टकामना पूर्ण होतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा. या प्रदक्षिणांचे फळ काय सांगावे ? प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. ब्रम्हहत्यदि महापातकांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात.जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नाहीशा होतात. संसारभव राहत नाही. ग्रहपीडा होत नाही. ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्रसंतान प्राप्त होते. शनिवारी अश्वत्थवृक्षाखाली मृत्युंजय जप केला असता अपमृत्यू टळतो. पूर्ण आयुष्य प्राप्त होते. अश्वत्थवृक्षाखाली बसून शनिअष्टकस्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा होत नाही. साडेसातीचा त्रास होत नाही. अश्वत्थवृक्षाखाली मंत्रपाठ केल्यास वेदपठणाचे पुण्य मिळते. जो अश्वत्थाची स्थापना करतो त्याची बेचाळीस कुळे उद्धारून स्वर्गाला जातात. अश्वत्थवृक्ष तोडणे महापाप आहे. असे कृत्य करणारा मनुष्य आपल्या पितारांसह नरकात जातो.

अश्वत्थवृक्षाखाली होमहवन केले असता महायज्ञाचे पुण्य प्राप्त होते. अश्वत्थाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्याच्या दशांश हवन करावे. हवनाच्या दशांश ब्राम्हणभोजन घालावे. हे सर्व केल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे. सोन्याचा अश्वत्थवृक्ष विधीपूर्वक ब्राम्हणाला द्यावा. सवत्सश्वेतधेनूचे ब्राम्हणाला दान द्यावे. अश्वत्थाखाली तिळाची रास करून वस्त्राने ती झाकावी व ती ब्राम्हणाला दान द्यावी." असे हे अश्वत्थाचे माहात्म्य नारदांनी ऋषींना सांगितले. तेच श्रीगुरुंनी गंगाबाईला सांगितले, मग श्रीगुरू तिला म्हणाले, "अश्वत्थाचे माहात्म्य असे आहे. ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होईल."

अशाप्रकारे श्रीगुरुंनी गंगाबाईला अश्वत्थम्म्हात्म्य सांगितले. मग तिला ते म्हणाले, "आता तू संगमावर जा व अश्वत्थसेवा कर. तुला कन्या-पुत्र प्राप्त होतील." त्यावर गंगाबाई म्हणाली, "स्वामी, मी साठ वर्षांची वंध्या आहे. मला मूल होणार नाही; परंतु तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तुमच्या सांगण्यानुसार मी अश्वत्थसेवा करीन, ती केवळ तुमच्यावर माझी श्रद्धा आहे म्हणून !" मग गंगाबाई श्रीगुरुंना वंदन करून भीमा-अमरजा संगमावर गेली. तेथे षट्कुल तीर्थात स्नान करून ती यथाविधी अश्वत्थसेवा करू लागली. तिने अश्वत्थसेवा सुरु केली. त्याच्या तिसऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राम्हण आला. तो तिला म्हणाला, "तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असे समज. आता तू एक कर. तू गाणगापुरास जा. तेथे श्रीगुरू आहेत, त्यांना तू सात प्रदक्षिणा घालून नमस्कार कर. मग ते तुला जे देतील ते भक्षण कर. आता उशीर करू नकोस. लवकर जा." गंगाबाई स्वप्नातून जागी झाली. तिला सगळे स्वप्न आठवले. चौथ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती गाणगापुरात श्रीगुरुंच्याकडे आली. तिने श्रीगुरुंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला, श्रीगुरुंनी प्रसन्न हास्य करून तिच्या ओटी दोन फळे घातली व तिला ते म्हणाले, "ही फळे तू आनंदाने खा. तुझे काम झाले असे समज. आता तू भोजन करून जा. तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहेत. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल.प्रथम व्रताचे यथासांग उद्यापन कर व मग ती फळे खा."

श्रीगुरुंनी सांगितल्याप्रमाणे गंगाबाईने व्रताचे उद्यापन केले, दानधर्म केला आणि काय आश्चर्य ! त्याच साठ वर्षांची ती वंध्या गंगाबाई ऋतूमाती झाली. पुढे तीन दिवस श्वेतवस्त्र परिधान करून, मौनव्रत स्वीकारून एकांतात राहिली. चौथ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्रीगुरुंच्या दर्शनाला गेली. तिने श्रीगुरूंची यथासांग पूजा केली, तेव्हा श्रीगुरुंनी तिला 'पुत्रवती भव' असा आशीर्वाद दिला. पाचव्या दिवशी पतीसंग करून गर्भवती झाली. हि बातमी गावात सर्वांना समजताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. केस पिकलेली, साठ वर्षांची वंध्या गर्भवती झाली ही केवळ भक्तवरद त्रैमूर्ती नृसिंहसरस्वतींची कृपा ! त्यांची मनोभावे सेवा केली असता अशक्य काय ? याची सर्वांना खात्री पटली. सोमनाथालाही खूप आनंद झाला. त्याने तिच्या गर्भारपणातील सर्व विधी यथासांग पूर्ण केले. यथाकाली ती प्रसूत झाली. तिला कन्यारत्न झाले. सोमनाथाने खूप दानधर्म केला. दहा दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन श्रीगुरुंच्या दर्शनाला आली. त्यांनी आपल्या कन्येला श्रीगुरुंच्या पायावर घातले, तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी आशीर्वाद दिला. "ही तुमची कन्या शतायुषी होईल. हिला परमज्ञानी पती मिळेल. हिला सर्वप्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतील. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल. हिला पुत्रपौत्र प्राप्त होतील" श्रीगुरुंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली, "स्वामी, तुमच्या कृपाशीर्वादाने मला कन्या झाली. आता मला पुत्र व्हावा अशी इच्छा आहे." श्रीगुरू म्हणाले, "तुला कसला पुत्र हवा आहे ? परमज्ञानी असा हवा असेल तर तो अल्पायुषी -तीस वर्षे जगेल. तुला दीर्घायुषी पुत्र हवा असले तर तो मूर्ख असेल." गंगाबाई म्हणाली, "स्वामी, मला मोठ्या योग्यतेचा,ज्ञानी पुत्र हवा आहे. त्याला पाच पुत्र व्हावेत." श्रीगुरुंनी 'तथास्तु' म्हणून तिला तसा वर दिला. गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला. ती मोठ्या समाधानाने गहरी परत गेली. पुढे यथावकाश सर्वकाही तसेच घडले. गंगाबाईला ज्ञानी पुत्र झाला. कन्येचेही भविष्य खरे ठरले, तिच्या पतीने मोठमोठे यज्ञ केले म्हणून त्याचे 'दीक्षित' असे नाव सर्वत्र झाले. श्रीगुरू कृपा अशी आहे. जेथे श्रद्धा आहे तेथे फळ आहे, म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, "लोक हो ! श्रीगुरूंची मनोभावे सेवा करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील."

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'अश्वत्थ माहात्म्य - साठ वर्षाच्या वंध्येस संतानप्राप्ती ' नावाचा अध्याय एकोणचाळीसावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments