!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकविसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकविसावा मृत बालक सजीव केला !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, त्या ब्रम्हचाऱ्याने त्या मेलेल्या मुलाच्या आईची विचारपूस केली व तिचे सांत्वन करीत म्हणाले, "हे बाई, तू विनाकारण शोक का करीत आहेस ? मला सांग, या जगात कोणी चिरंजीव झाला का ? जो जन्मास आला त्याला मृत्यू अटल आहे. हा संसार म्हणजे पाण्यावरील बुडबुडा आहे. हा देह पृथ्वी-आप-तेज-वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. ही पंचमहाभूते विलग झाली की या देहाचा नाश होतो. त्या पंचमहाभूतांचे गुण मायापाशांनी माणसाच्या ठिकाणी भ्रम निर्माण करतात. त्यामुळे पुत्र-मित्र, पत्नी इत्यादीविषयी आसक्ती निर्माण करतात. ते गुण तीन आहेत. ते म्हणजे सत्व, रज व तमोगुण, सत्वगुणाने देव, रजोगुणामुळे मनुष्य व तमोगुणामुळे दैत्य निर्माण होतात. या गुणांनुसार कर्मे घडत असतात.कर्म चांगले, वाईट जसे असेल त्यानुसार त्याचे फळ मिळते. गुणांनुसार इंद्रियांच्या भोगाची वासना प्रबळ ठरते व सुख-दुःख भोग उधे येतात. पूर्वकर्मानुसार प्राणी जन्मास येतात व देहप्रारब्ध भोगतात. कल्पवर्षे आयुष्य असणाऱ्या देवऋषींनाही अंत असतो. मग मनुष्याची काय कथा ? देहावस्था सतत बदलत असते. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य व शेवटी मृत्यू गे सर्व अटळ असते. मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो. हे जन्म-मरणाचे चक्र सतत चालू असते. जे ज्ञानी असतात ते जन्म-मृत्यूचे दुःख मानीत नाहीत. जन्मास येणाऱ्या प्रत्येकाची ललाटरेषा ब्रम्हदेवाने लिहून ठेवलेली असते. प्रत्येकाचे जे पूर्वार्जित असते त्यानुसार प्रत्येकाला तशी गत प्राप्त होते, म्हणून कोणी बालपणी मरतो तर कोणी म्हातारपणी. स्वप्नात दिसलेले धन जसे खरे मानता येत नाही, त्याप्रमाणे देहादिकांची खात्री करता येत नाही. आजपर्यंत तू कोणकोणत्या योनीत जन्म घेतला हे तुला सांगता येईल का ? तू मनुष्ययोनीत जन्म घेतला होतास असे मानले तर त्या प्रत्येक जन्मात तू कोणाची आई होतीस ? कोणाची पत्नी होतीस ? तुझे आई-वडील कोण होते ? हे तुला सांगता येईल का ? नाही ना ? मग आता या पुत्राचा वियोग झाला म्हणून विनाकारण शोक का करतेस ? हा देह पंचभौतिक आहे. हा देह चर्म-मांस-हाडे-मुत्र यांचा नश्वर गठ्ठा आहे. कसला पुत्र आणि कसला मृत्यू ? तू विनाकारण शोक करीत आहेस. आता हे मुलाचे प्रेत अग्निसंस्कारासाठी देऊन मोकळी हो."
ब्रम्हचाऱ्याने असे परोपरीने समजाविले असता ती ब्राम्हण स्त्री म्हणाली, "स्वामी, तुम्ही जो मला उपदेश केलात तो मला पटतो; पण तरीही माझ्या मनाचे पूर्ण समाधान होत नाही. प्रारब्ध हेच जर अटळ असेल, तर परमेश्वराची भक्ती कशासाठी करावयाची ? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने नाही झाले असे कधी घडते का ? मी भाग्यहीन, दुर्दैवी म्हणून श्रीगुरुंना शरण गेले. त्यांनी मला अभय दिले. मी त्यावर विश्वास ठेवला. ताप आला तर मनुष्य वैद्याकडे जाऊन औषध घेतो. श्रीनृसिंह-सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार आहेत. त्यांने मला वर दिला तो असत्य कसा ठरेल ? मी त्यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवला. असे असतानाही मला पुत्रवियोगाचे दुःख का भोगावे लागत आहे ? श्रीगुरुंचे वचन खोटे ठरले ! आता मी कोणावर विश्वास ठेवू ? त्यापेक्षा मारणे बरे ! आता मी प्राणत्याग करते ." त्या ब्राम्हण स्त्रीचा प्राणत्यागाचा अटळ निश्चय पाहून ब्रम्हचारी तिला म्हणाला, "आता तुझा निश्चय ठाम असेल तर मी तुला सांगतो तसे कर." तू श्रीगुरुंच्या वचनावर विश्वास ठेवलास, तुला पूर्णायुषी पुत्र झाला; पण त्याला मृत्यू आला. म्हणून तू श्रीगुरुंच्याकडे जा आणि तेथे तुला वर मिळाला त्या कृष्णा-पंचगंगा तीरावरील औदुंबराखाली मुलाचे प्रेत ठेव व तेथे प्राणत्याग कर."
ब्रम्हचाऱ्याने असे सांगितले असता ते त्या ब्राम्हण स्त्रीला पटले. मग ती मुलाचे प्रेत पोटाशी बांधून औदुंबरा जवळ गेली. तिने पुत्राचे प्रेत गुरुपादुकांजवळ ठेवले. इच पतीही तिच्याबरोबर होता. ती स्त्री गुरुपादुकांवर डोके आपटून आक्रोश करू लागली. लोकांनी पुत्राचे प्रेत अंत्य संस्कारासाठी मागितले पण रात्र झाली तरी ती प्रेत देण्यास तयार होईना, "आता या निर्जन जागी रात्री थांबणे योग्य नाही. प्रेताला दुर्गंधी सुटली की ही बाई प्रेत आपल्याकडे देण्यास तयार होईल. आता आपण घरी जाऊ व उद्या सकाळी येऊ." असे म्हणून सर्व लोक आपापल्या घरी गेले. इकडे आक्रोश करणाऱ्या त्या स्त्रीला तिसऱ्या प्रहरी ग्लानी आली व त्याच स्थितीत तिला झोप लागली. झोपेत असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला एक जटाधारी योगी दिसले.त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. व्याघ्रचर्म परिधान केले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षमाळा होत्या. हातात त्रिशूळ होते. असे ते योगी औदुंबराजवळ आले व त्या शोकाकुल स्त्रीला म्हणाले, "तू आम्हाला दोष देऊन विनाकारण शोक का बरे करीत आहेस ? तुझ्या मुलाला काय झाले आहे ? मी आताच त्याच्यावर उपाय करतो. " असे बोलून त्यांनी त्या मुलाच्या सर्वांगाला भस्म लावले. मुलाचे तोंड उघडून त्यात प्राणवायूचा संचार केला. 'आता तुझा पुत्र जिवंत होईल' असे आश्वासन दिले. हे स्वप्न पाहून तिला अचानक जाग आली. ध्यानी, मनी ते स्वप्नी असे मनाशी म्हणत ती आश्चर्यचकित झाली. मुलाच्या प्रेताकडे पाहून ती पुन्हा रडू लागली. आपले दैवच खोटे, तेथे देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे? श्रीगुरुंना तरी दोष का बरे द्यायचा ? असा विचार करीत तिने मुलाच्या प्रेताकडे पहिले. ते मूल हालचाल करीत आहे असे तिला दिसले. तिने प्रेताला हात लावला. तो ते गरम लागले. त्या प्रेतात जीव आला आणि तो मुलगा उठून आपल्या आईला बिलगला. त्या बाईला ही भुताटकी तर नाही ना? असे क्षणभर वाटले; पण यासे काही नव्हते.
तो मुलगा खरोखरच जिवंत झाला होता. त्या बाईने अत्यानंदाने त्या मुलाला छातीशी घटत धरले. तिला एकाएकीप्रेम प्रेमपान्हा फुटला. ती मुलाला स्तनपान देऊ लागली. तिने आल्या पतीला जागे केले. आपला मुलगा जिवंत झालेला पाहून त्याला अतिशय आनंद झाला. ही सर्व श्रीनृसिंहसरस्वतींची अगाध लीला याची त्याला खात्री पटली. मग त्या पतीपत्नींनी स्नान करून औदुंबरास प्रदक्षिणा घातल्या. श्रीगुरुंचे अनेकपरींनी स्तवन करून क्षमायाचना केली. श्रीगुरुंच्या पादुकांची यथासांग पूजा करून भक्तिभावाने श्रीगुरुंचे स्तवन केले. त्याचवेळी गावातील ब्राम्हण मुलाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तेथे आला. मुलगा जिवंत झालेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. सर्वांनी श्रीगुरूंचा जयजयकार केला. मग त्या ब्राम्हण पतीपत्नींनी तेथे ब्राम्हणभोजन घालून मोठा आनंदोत्सव केला.
ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले, "नामधारका, औदुंबरक्षेत्र महिमा कसा आहे, याची एक कथा मी तुला सांगितली. अशा अनेक कथा आहेत. औदुंबरतळी श्रीगुरुंचे कायमचे वास्तव्य असते. तेथे जाऊन श्रीगुरूंची सेवा केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. श्रीगुरूंची चरणपूजा केली असता वन्ध्य स्त्रीला पुत्रसंतान लाभते. दरिद्री माणसाला लक्ष्मीप्राप्ती होते. रोगी माणसाला आरोग्य लाभते. कधीही अपमृत्यू येत नाही. श्रीगुरूंची भावभक्तीने पूजा केली असता सर्व मनोकामना पूर्ण होतात. जो कुष्ठरोगी असेल त्याने श्रीगुरूचरणांची पूजा केली असता शरीर सुवर्ण होते याविषयी संदेह बाळगू नये.
श्रीगुरूचरणपादुकांची पूजा केली असता हृदयविकार, गंडमाळा, अपस्मार इत्यादी दोष नाहीसे होतात. मंदमती, बहिरा, मुका, पंगू, रक्तपितीग्रस्त यांनी औदुंबराची सेवा केली असता सर्व दोष जातात. चतुर्विधपुरुषार्थाची प्राप्ती होते. श्रीगुरुंचे वास्तव्य असलेला औदुंबर म्हणजे या कलियुगातील कल्पवृक्षच होय. नामधारका, श्रीगुरुनृसिंह सरस्वतींचा महिमा किती सांगावा ? सरस्वती गंगाधर म्हणतात, श्रीगुरुचरित्र म्हणजे प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे भक्तिपूर्वक श्रवण-पठण केले असता सव इच्छा पूर्ण होतात."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'मृत बालक सजीव केला' नावाचा अध्याय एकविसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment