श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चोवीसावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चोविसावा त्रिविक्रमभारतीचा उद्धार !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक सिद्ध्मुनींना म्हणाला, "त्रिविक्रमभारती श्रीगुरू नृसिंहसरस्वतींची 'दांभिक संन्यासी' अशी निंदा करीत होता. हे अंतर्ज्ञानानी श्रीगुरुंना समजले .त्यानंतर काय झाले ते मला विस्तारपूर्वक सांगा." सिद्धमुनी म्हणाले, "नामधारका, ती मोठी अद्भुत कथा आहे. ती ऐक. कुमसी गावचा त्रिविक्रमभारती श्रीगुरुंची दांभिक, ढोंगी संन्यासी अशा शब्दांत सतत निंदा करीत असे. सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्रीगुरुंना हे समजले. तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्रीगुरुंना ठरविले. ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितली, तेव्हा राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजविली. हत्ती, घोडे, पायदळ शृंगारिले. श्रीगुरू पालखीत बसले. मग वाद्यांच्या गजरात श्रीगुरूंची स्वारी त्रिविक्रमभारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली.

त्याचवेळी कुमसी गावात त्रिविक्रमभारती त्याचे उपास्य दैवत नृसिंहाची मानसपूजा करीत होता. परंत्य त्या दिवशी नृसिंहाची मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे येईना. त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला; पण नृसिंहाची मूर्ती काही प्रकट होईना. आज असे का होत आहे. हे त्याला समजेना. तो निराश झाला. 'माझी आजपर्यंतची सगळी साधना व्यर्थ गेली' अशा विचाराने तो अगदी निराश, उदास झाला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले, तो नदीवरून श्रीगुरूंची पालखी येत असलेली दिसली. त्या पालखीत त्याला त्याचे उपास्य दैवत जे नृसिंह त्यांचीच मूर्ती दिसली. त्या पालाखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्रीगुरुंसारखेच दंडधारी संन्यासी दिसत होते. ते सगळे दृश्य पाहून त्रिविक्रमभारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सगळा अहंकार गळून पडला. आपण पाहतो आहोत ते सत्य की भास ? त्याला काहीच समजेना. तो धावतच त्या पालखीजवळ गेला. पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला, आपल्या उपास्य दैवतेला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला "महाराज, आपण मला नृसिंहरुपात दर्शन दिलेत. मी खरोखर धन्य झालो.' आपण ब्रम्हा-विष्णू-महेशरूप आहात. अविद्यमायेने मी आपणास ओळखू शकलो नाही. आपले स्वरूप केवळ अचिंत्य आहे. चर्मचक्षुंनी ते ओळखता येणार नाही. आपणच खरोखर नृसिंह आहात. आता मला निजरुपात दर्शन देण्याची कृपा करा." त्रिविक्रमभारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरू प्रसन्न झाले. त्यांनी आपली योगमाया आवरून निजरूप दाखविले. त्यावेळी श्रीगुरू त्याला म्हणाले, "तू आमची निंदा करतोस, म्हणूनच आम्ही तुला भेटावयाला आलो. तू मानसपूजेत नृसिंहमूर्तीची पूजा करतोस. त्या नृसिंहाचे तुला दर्शन झाले ना ? जे नृसिंह तेच आम्ही आहोत. आता आम्ही दांभिक आहोत का हे तूच ठरव."

श्रीगुरू असे म्हणाले असता त्रिविक्रमभारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला. श्रीनृसिंहसरस्वती व आपले उपास्यदैवत नृसिंह एकच आहेत. श्रीगुरू हे चराचर व्यापक परमात्मा-परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली. मग तो श्रीगुरुंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, "स्वामी, मला क्षमा करा. अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही. आपण परमात्मा-परमेश्व आहात. आपण ज्याच्यावर कृपा कराल तो कळिकाळालाही जिंकेल. आपण भवसागरतारक त्रैमूर्ती अवतार आहात. आज आपले चरणदर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण भक्तवत्सल , कृपामूर्ती आहात. आता माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. माझा स्वीकार करा. त्रिविक्रमभारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरु त्यावर प्रसन्न झाले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, "मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही." असा वर देऊन श्रीगुरू गाणगापुरास परत गेले.

ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, श्रीगुरूमाहात्म्य हे असे आहे. त्रैमूर्ती अवतार असलेले श्रीगुरू आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्यरूपाने राहिले होते. त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सप्तजन्मपर्यंत नरकवास भोगतील. गुरु हाच ब्रम्हा, गुरु हाच विष्णू, व गुरु हाच महेश्वर आहे. तो परब्रम्हस्वरूप आहे. असे वेद्पुराणेही सांगतात, म्हणून श्रीगुरू त्रैमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे. श्रीगुरुचरित्र कामधेनू आहे. या कलियुगातील ती अमृताची पाणपोई आहे. ज्ञानी जन ज्याचे सेवन करतात. सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात, "हे श्रीगुरुचरित्र जे भक्तिभावाने श्रवण-पठण करतील त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल."

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील'त्रिविक्रमभारतीचा उद्धार' नावाचा अध्याय चोविसावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments