श्री गुरुचरित्र कथासार अध्याय छत्तिसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय छत्तिसावा परान्नदो
ष - धर्माचरण !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्ध्योग्यांच्या पाया पडून भक्तिभावाने हात जोडून म्हणाला, "स्वामी, तुमचा जयजयकार असो. या संसारसागरातून सर्वांना सुखरूप तारूण नेण्यास तुम्हीच समर्थ आहात. तुम्ही अविद्यारूप अंधार नाहीसा करणारे प्रत्यक्ष सूर्य आहात. मी आजपर्यंत अज्ञानरुपी अंधारात झोपलो होतो; पण कृपासागर अशा तुम्ही मला जागे केलेत. अज्ञानरुपी अंधार नाहीसा करणारे तुम्ही भास्कर आहात. तुम्ही मला गुरु म्हणून लाभल्याने मी हा भवसागर तारून गेलो आहे. पुढे काय झाले, ते श्रीगुरुचरित्र मला भरीत असे. त्याची पत्नी याच्या अगदी उलट होती. ती सदैव उद्विग्न असे. पतीशी नेहमी भांडण करीत असे. अन्नाची मोठी लोभी होती. त्याकाळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्त्रभोजन घालीत असत. गावातले असंख्य ब्राम्हण तेथे भोजनासाठी जात असत व त्या ब्राम्हणाच्या घरी जाऊन सहस्त्रभोजनाचे रसभरीत वर्णन करीत. ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे, "माझे नशिबाच खोटे ! मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही. या दरिद्री ब्राम्ह्णाशी लग्न करून मी मोठीच चूक केली. केवळ याच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही. माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच मला से दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहेत. गावातल्या इतर बायका किती भाग्यवान ! त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येते. माझा पती कधीही परान्न घेत नाही. त्यामुळे मलाही भोजनाला जात येत नाही. माझे नशीबच फुटके, दुसरे काय ? परमेश्वरा, मी काय करू ? " असे ती नेहमी दुःख करीत असे.
असेच एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राम्हणभोजनाचा बेत आखला होता. त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. ते पाहून ती ब्राम्हण ती स्त्री आपल्या पतीला म्हणाली, "आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राम्हणाने पितृश्राद्धानिमित्त सुग्रास भोजन देण्याचे ठरविले आहे. आपणही त्या भोजनाला जाऊ या. निदान एक दिवस तरी चांगले गोडधोड खायला मिळेल. तिथे वस्त्रे, दक्षिणाही मिळणार आहे. मला तिथे जाण्याची फार इच्छा आहे. तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्या." त्यावर तो ब्राम्हण म्हणाला, "परान्न न घेण्याचे माझे व्रत आहे. त्यामुळे मी मुळीच येणार नाही. तुला जायचे असेल तर खुशाल जा." त्याने अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेली. तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला, "तुम्ही एकट्या कशा आलात ? मी दांपत्यभोजन घालीत आहे. तुमचा पती कोठे आहे ? भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या." हे ऐकताच तिच्यापुढे मोतःच प्रश्न उभा राहिला. येथे भोजनाचे निमंत्रण आहे हे दांपत्याला. पती तर परान्न घेत नाही. तो येणार नाही. तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही. आता काय करावे ? मग ती श्रीगुरू नृसिंहसरस्वतींकडे गेली. त्यांच्या पाया पडून ती म्हणाली, "स्वामी, गावात दांपत्यभोजनाचा कार्यक्रम आहे. माझा पती परान्न घेत नाही, म्हणून तो येत नाही. आपणच त्याला समजाविले तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल." तिचे हे बोलणे ऐकून श्रीगुरुंना हसू आले. मग ते तिच्या पतीला म्हणाले, "अरे, तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे, म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा. तू तिची इच्छा पूर्ण कर. कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये." श्रीगुरुंनी असे सांगितले असता तो ब्राम्हण हात जोडून म्हणाला, "स्वामी, परान्न न घेण्याचा माझा नेम आहे, परंतु तुमची आज्ञा मला शिरसावन्द्य आहे. जो आपल्या गुरूची आज्ञा मानीत नाही त्याला भयंकर अशा रौरव नरकात जावे लागते, म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईन."
मग श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते दांपत्य भोजनासाठी गेले. आज आपणास सुग्रास भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राम्हण स्त्रीला मोठा आनंद झाला. ती दोघे पानांवर बसली.वाढण सुरु झाले. भोजनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या ब्राम्हण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले. आपल्या पानातील अन्न डुकरे आणि कुत्रे खात आहे. ते दुष्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली. भोजन करीत असलेल्या इतर ब्राम्हणांना व आपल्या पतीला आपण काय पहिले ते सांगितले. मग ती आपल्या पतीसह घरी परत आली. ती पतीला म्हणाली, "तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्टे केलेले अन्न खाल्लेत असे मला दिसले. मला याबद्दल क्षमा करा. तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला, माझेच चुकले." हे ऐकून त्या ब्राम्हणाला अतिशय राग आला. तो दुःखाने म्हणाला, "माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो. माझा नेम तर मोडलाच. शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न खावे लागले."
त्यानंतर तो ब्राम्हण पत्नीसह श्रीगुरुंच्याकडे आला. दोघांनी श्रीगुरुंना भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरू हसत हसत त्या ब्राम्हणपत्नीला म्हणाले, "काय ? परान्नाचे सुख कसे वाटले ? परान्न घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नवे ठेवीत होतीस. आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना ? " श्रीगुरू असे म्हणाले असता ती स्त्री श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाली, "स्वामी, मला क्षमा करा. मी खरोखर अज्ञानी आहे. माझ्या हव्यासापायी माझ्या पतीचा व्रतभंग झाला. मी त्यांना हट्टाने परान्नासाठी नेले. मी मोतःच अपराध केला आहे. मला क्षमा करा."
मग तो ब्राम्हण श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाला, " या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला. ही माझी पत्नी नाही. वैरिणी आहे. हिच्यामुळे माझ्या हातून नेम मोडण्याचे पाप घडले आहे. आता मी काय करू ? " त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले, "चिंता करू नकोस. तू तुझ्या पत्नीची परान्नाची वासना पुरविली आहेस. आता तिचे मन तृप्त झाले आहे. आता तिचे मन तृप्त झाले आहे. आता ती पुन्हा कधीही परान्नाची इच्छा करणार नाही. शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास तो आमच्या आज्ञेने. त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही. आता मी तुला आणखी एक सांगतो. जर एखाद्या ब्राम्हणाला श्राद्धकर्माच्यावेळी योग्य ब्राम्हण मिळाला नाही, त्याचे ब्राम्हणाअभावी कार्य अडून राहिले, तर तू त्याच्याकडे भोजनाला जावेस. त्यामुळे तुझ्या हातातून धर्मकार्य घडेल; पण अशा वेळी तू गेला नाहीस तर त्याचा शाप तुला लागेल." श्रीगुरुंनी असे सांगितले असता त्या ब्राम्हणाने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे, कोणाकडे भोजनास जाऊ नये असे विचारले असता श्रीगुरू म्हणाले, "कोणाकडे भोजनाला जावे ते प्रथम सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राम्हण, आपले मामा, सासरे, सख्खे भाऊ, सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही. एखादा ब्राम्हण ब्राम्हणविना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे. त्यावेळी गायत्रीमंत्र जप करावा म्हणजे कोणताही दोष लागत नाही. आता अन्न वर्ज्य करण्याची घरे सांगतो. त्याचे सविस्तर विवेचन स्मृतीचंद्रिकेत केले आहे. ते खूप मोठे आहे. ते मी तुला सारांशरूपाने सांगतो, ऐक. आपल्या आई-वडिलांकडून आपली सेवा करून घेणारा, धनलोभी, आपल्या बायकामुलांचे हाल करणारा, गर्विष्ठ, चित्रकार, मल्ल असलेला ब्राम्हण, वीणावादक, समाजाने बहिष्कृत केलेला, याचकवृत्तीचा, स्वतः स्वतःची स्तुती करणारा, परनिंदा करणारा, क्रोधी, पत्नीने टाकलेला, तामसी वृत्तीचा, कंजुष, दुराचारी, ढोंगी, व्यभिचारी, निपुत्रिक, विधवा स्त्री, स्त्रीच्या अधीन असलेला पुरुष, ब्राम्हण असून सोनारकाम करणारा, अति यज्ञ करणारा, लोहार, शिंपी, धोबी, दारू तयार करणारा, आपल्या जाराबरोबर राहणारी बाहेरख्याली स्त्री, चोर, कपटी, पतिताकडून धन घेणारा, सौदागर, देवभक्ती न करणारा, जुगारी, स्नान न करता भोजन करणारा, संध्यावंदन न करणारा, कधीही दान-धर्म न करणारा, आपल्या पितरांचे श्राद्धकर्म न करणारा, दांभिकपणे जप करणारा, पैसे घेऊन जप करणारा, दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखविणारा, व्याजाने पैसे देणारा, विश्वासघातकी, कुलपरंपरा मोडणारा, हिंसक-खुनी, आशाळभूत, परान्न घेणारा, पंचमहायज्ञ न करणारा, घरच्या अन्नाची निंदा करणारा व परान्नाची प्रशंसा अन्नाची निंदा करणारा, परगृही राहणारा अशा लोकांच्याकडे कधीही भोजनास जाऊ नये. अशा ठिकाणी भोजनास जाऊ नये. अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या त्या यजमानाचे दोष आपल्याला लागतात, म्हणून अशा यजमानाच्या घरी भोजन घेऊ नये. त्या ऐवजी भूमिदान, सुवर्णदान, गज-अश्व-रत्न दान केल्यास दोष लागत नाही. परान्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे परस्त्रीगमन केल्यास नरकवास भोगावा लागतो. अमवास्येला परान्न घेतल्यास मासपुण्य जाते. आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये.त्याचप्रमाणे सूर्य-चंद्रग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये. सुवेर किंवा सुतक असलेल्याच्या घरी भोजन करू नये. ब्राम्हणांनी जर आपला आचारधर्म पाळला, तर त्याला कधीही दैन्य - दारिद्र्य भोगावे लागत नाही. सर्व देव-देवता त्याच्या अंकित होतात. त्याला महासिद्धी प्राप्त होतात. आजकाल ब्राम्हण उन्मत्त झाले आहेत, म्हणून त्यांना दैन्य, दारिद्र्य भोगावे लागत आहे."
श्रीगुरुंनी असे सांगितले असता त्या ब्राम्हणाने 'मला आचारधर्म सांगा' अशी विनंती केली असता श्रीगुरू म्हणाले, "पूर्वी नैमिषारण्यात सर्व ऋषीमुनी यांनी पराशरांना हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी पराशरांनी सर्वांना आचारधर्म विस्तारपूर्वक सागितला होता. तोच मी तुला थोडक्यात सांगतो. प्रत्येकाने पहाटे लवकर उठावे. गुरुस्मरण करावे. ब्रम्हा-विष्णू-महेश यांचे ध्यान करावे. सूर्यादी नवग्रहांचे स्मरण करावे. सनकादिकांचे स्मरण करावे. 'प्रातःस्मरामि' ने प्रारंभ होणारे प्रातःस्मरणीय श्लोक म्हणावेत. हे सर्व अगोदर शौचमुखमार्जन करून, हातपाय धुवून, स्वस्थ बसून करावे. स्नानापूर्वी व नंतर आचमन करावे. त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी, भोजानंतर, जांभई किंवा शिंक आल्यावर, लघुशंका व शौच केल्यावर, वात सरला असता, वाईट दृश्य दिसले असता आचमन करावे. आचमनासाठी पाणी मिळाले नाही तर डोळे व कान यांना स्पर्श करावा. ब्राम्हणाच्या उजव्या कानाजवळ सूक्ष्मरुपात अग्नी-वायू-अपोदेवता, चंद्र, सूर्य, वेद व वरूण या सात देवता असतात.
डोक्यावर उपरणे बांधून व जानवे उजव्या कानात अडकवून नैऋत्य दिशेस शौचास बसावे. खाली मान घालून बसावे.दिवसा उत्तरेकडे व रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसावे. मौन पाळावे. इकडे-तिकडे पाहू नये. उभ्याने लघुशंका करू नये. शौचास पाणी नाही मिळाले तर मातीने स्वच्छता करावी; पण हे केवळ अपवाद म्हणून. नुसत्या मातीवर किंवा हिरव्या गवतावर बसू नये. मातीने हात स्वछ करावेत. यानंतर स्नानविधी सांगितला आहे. स्नान केव्हा करावे, स्नानासाठी कोणते पाणी योग्य, कोणते अयोग्य तेही सांगितले आहे. स्नानानंतर कोणती वस्त्रे परिधान करावीत, भस्म व चंदन कसे लावावे ते सांगून संध्यावंदन, गायत्रीमंत्र, त्यातील चोवीस अक्षरे, त्यांच्या देवता, गायत्री ध्यान, गायत्री जप, जपासाठी योग्य वेळ, आसन, जप करताना कसे बसावे, ॐकाराचा दैवी अर्थ इत्यादी सर्व तपशीलाने सांगितले. पंचमहायज्ञ, वैश्वदेव का करावेत, कसे करावेत, तर्पणाचे प्रकार कोणते इत्यादी दैनंदिन कर्मकांड सविस्तर सांगितले.
अन्नदानाचे महत्व, अतिथीचे स्वागत कसे करावे, अतिथीसेवेने कोणते पुण्य मिळते, अतिथीची उपेक्षा केल्याने कोणता दोष लागतो, हे सांगून भोजनपत्रे कशी असावीत, कोणत्या दिशेने तोंड करून भोजनास बसावे, भोजनापूर्वी आचमन, चित्राहुती, प्राणाहुती कशा द्याव्यातम भोजन कसेम किती वेळात करावे, कोणाबरोबर भोजन करावे, भोजन कोठे करावे, कोठे करू नये, अन्न उष्टे केव्हा होते, रात्री भोजनाच्या वेळी दिवा प्रज्वलित का ठेवावा, भोजानंतर पाणी कसे प्यावे, कसे पिऊ नये, कोणते पाणी घ्यावे, भोजन संपल्यावर हात कसे धुवावेत, चुल किती भराव्यात, कोणत्यावेळी, कोणत्या तिथीला काय खावे, काय खाऊ नये, भोजनानंतर तांबूल का खावा ? कोणी खावा इत्यादी बारीकसारीक गोष्टींविषयी सूचना केल्या असून झोपण्याचा विधीही सविस्तर सांगितला. स्त्रीसंग केव्हा करावा, केव्हा करू नये इत्यादी संपूर्ण कर्मकांड शास्त्राच्या आधारे सांगितले. एकूणच आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले. नैमिषारण्यात पराशरांनी सर्व ऋषीमुनींना जो आचारधर्म सांगितला तो श्रीगुरुंनी त्या ब्राम्हणाला नीट समजावून सांगितला. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, "या आचारधर्माचे निष्ठापूर्वक पालन केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तो पूर्ण सुखी होतो."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'परान्नदोष - धर्माचरण' नावाचा अध्याय छत्तिसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment