श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सव्विसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सव्विसावा गर्विष्ठ ब्राम्हणांचा जयपत्राविषयी हट्ट !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
"वेद अनादी अनंत आहेत ब्रम्हदेवालाही त्यांचे पूर्ण ज्ञान नाही. म्हणून तुम्ही वृथा अभिमान बाळगू नका. गर्व करू नका." असे श्रीगुरुंनी त्या गर्विष्ठ ब्राम्हणांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 'आम्ही तीन वेद जाणतो' असे ते गर्वाने पुनःपुनः बोलत होते. तेव्हा त्यांचा गर्वपरिहार करण्यासाठी श्रीगुरू त्या ब्राम्हणांना म्हणाले, "नसत्या भ्रमात राहू नका. वेद अनंत आहेत. प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांनी वेदांचे विभाजन केले ;पण त्यांनाही वेदांचे पूर्ण ज्ञान नव्हते. त्या व्यासांचे पैल, वैशंपायन, जैमिनी व सुमंतु असे चार मुख्य शिष्य होते आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत." असे ते म्हणाले असता 'हे केवळ अशक्य आहे ' कल्पपर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचेही अध्ययन पूर्ण होऊ शकणार नाही.
एकदा भारद्वाज ऋषी ब्रम्हदेवाकडे गेले आणि म्हणाले, "मला ब्रह्मचर्याश्रमात सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे. मला तसा वर द्या." तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले, "वेद अनंत आहेत. संपूर्ण वेद कसे शिकता येईल ? मलाही वेदांचा थांगपत्ता लागलेला नाही. वेद किती आहेत याची तुला कल्पना नाही, म्हणून तू असे बोलतो आहेस. आता मी तुला वेद किती आहेत तेच दाखवितो." असे सांगून त्यांनी भारद्वाजांना अतिउंच असे तीन पर्वत दाखविले व हे तीन पर्वत म्हणजेच तीन वेद आहेत." असे सांगितले. त्या पर्वतप्राय तीन वेदराशी पाहून घाबरलेले भारद्वाज म्हणाले, "मी इतके वेद कसे काय शिकणार ? केवळ अशक्य आहे ?" असे बोलून ते ब्रम्हदेवांना शरण गेले. मग ब्रम्हदेवांनी त्यांना अध्ययनासाठी तीन मुठी भरून वेद दिले. भारद्वाजांनी त्या तीन वेदातील काही मंत्र वेगळे काढून चौथा वेद तयार केला." असे सांगून व्यास आपल्या चौघा शिष्यांना म्हणाले, "मी आता तुम्हाला एकेक वेद देणार आहे. एकेका वेदाचाही अभ्यास करण्यास खूप प्रयास पडतात. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यातील थोडेफार सांगेन." त्यावर ते शिष्य व्यासांना म्हणाले, "आम्हाला एकेक वेद त्याच्या आदि-अंतासह सांगा. त्यातील जे शक्य आहे ते आम्ही शिकू." असे बोलून त्या चार शिष्यांनी व्यासांच्या चरणांना वंदन केले. मग संतुष्ट झालेल्या व्यासांनी आपल्या चार शिष्यांना वेदसंहिता दिल्या. त्यांनी प्रथम 'पैल' नावाच्या शिष्याला जवळ बोलावून त्याला ऋग्वेद दिला. वैंशपायनाला 'यजुर्वेद' सांगितला. जैमिनीला 'सामवेद' दिला व सुमंतूला 'अथर्व' वेद संहिता दिली.
अशाप्रकारे वेदव्यासांनी त्यांच्या पैलादी चार वेदसंहिता दिल्या. त्याचप्रमाणे प्रत्येक वेदाचे ध्यान, स्वरूप, वर्ण, गोत्र, देवता, छंद, उपवेद व शाखा या सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या. व्यासांनी चार वेदांची केलेली ही सविस्तर चर्चा श्रीगुरुंच्या मुखातून ऐकून ते गर्विष्ठ ब्राम्हण अवाक झाले. मग श्रीगुरू म्हणाले, "पूर्वी या भरतखंडात पुण्यवान लोक खुपजण होते. सर्वजण वर्णाश्रम-धर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत असत; पण आत्ता या कलियुगात ब्राम्हणांनी अगदी ताळतंत्र सोडला आहे. ते कर्मभ्रष्ट झाले आहेत. स्वधर्म, सदाचार यापासून दूर गेले आहेत. वेदबाह्य आचरण करू लागले आहेत. वेदाध्ययन मागे पडले आहे, त्यामुळे वेदांचे सामर्थ्य लोप पावले आहे. आजकाल ब्राम्हण मलेच्छांपुढे वेदपठण करतात. यामुळे ब्राम्हणवर्गाचे सत्व नाहीसे झाले आहे. ते मंदबुद्धीचे झाले आहेत. पूर्वी ब्राम्हणवर्गाला फार महत्व होते. वेदसामर्थ्याने त्यांना देवत्व प्राप्त झाले होते, म्हणूनच त्यांना 'भूदेव' म्हटले जा असे. राजेमहाराजे ब्राम्हणांच्या चरणांची पूजा करीत असत. त्यानं कोणी सर्वस्वाची दक्षिणा दे केली तरी ते तिचा स्वीकार करीत नसत. वेद्विद्याच्या सामर्थ्यामुळे ब्राम्हणांना ब्रम्हा-विष्णू-महेश वश होत असत. इंद्रादी देवांनाही ब्राम्हणांची भीती वाटत असे. विद्वान ब्राम्हणांचे वचन कामधेनुसमान होते. ते ब्राम्हण कल्पवृक्ष होते. त्यांच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य होते की, मनात आले तर ते पर्वतांना तृणाकार करू शकत असत व तृणाला पर्वताकार करू शकत. स्वतः भगवान विष्णू ब्राम्हणांना आपले दैवत मानून त्यांची पूजा करीत असे. म्हणूनच भागवत पुराणात भगवान म्हणतात,
"सर्व जग देवाच्या अधीन आहे, देव मंत्राच्या अधीन, मंत्र ब्राम्हणांच्या अधीन म्हणून ब्राम्हण हे माझे दैवत आहे." पूर्वी ब्राम्हणवर्गाला असे महत्व होते; पण आता ब्राम्हण वेदमार्ग सोडून भलत्याच मार्गाने जात आहेत. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले. ते हीन जातीची सेवा करू लागले आहेत. पैसे घेऊन वेद शिकवितात. वेद्विद्येची त्यांनी विक्री सुरु केली आहे. जे हीनजातीपुढे वेद म्हणतात त्या मूर्खाचे तोंडसुद्धा पाहू नये. ते मृत्युनंतर ब्रम्हराक्षसच होणार. हे ब्राह्मणांनो, अशा आहेत चार वेदांच्या शाखा. असे आहेत त्यांचे भेद. असा आहे वेदविस्तार ! वेद अनंत आहेत आणि तुम्ही म्हणता, आम्ही सर्व जाणतो ! हे सर्व तुम्हाला माहित होते का ? नाही न ? मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा कशासाठी करता ? ब्राम्हणांचा क्षोभ ओढवून का घेता ? तुम्ही स्वतःच स्वतःची स्तुती का करता. जयपत्रे कशाला दाखविता ? त्रिविक्रमभारतीला जयपत्र कशाला मागता ? आला आहात तसे निघून जा. व्यर्थ गर्व करू नका नाहीतर प्राणाला मुकाल." श्रीगुरुंनी त्या अहंकारी ब्राम्हणांना इअतके सांगितले तरी पालथ्या घड्यावर पाणी ! ते काही ऐकावयास तयार नव्हते. त्यांचे एकाच पालुपद, " आम्हाला वेदाविषयी वादविवाद करावयाचा आहे. चर्चा करायची आहे आम्ही जर वादविवाद केला नाही, तर आम्ही हरलो असे लोक राजाला सांगतील. मग आमची प्रतिष्ठा काय राहणार ?"
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "त्या उन्मत्त ब्राम्हणांना आपले हिताहित समजत नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वनाशाला निमंत्रण दिले असे मला वाटते.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'गर्विष्ठ ब्राम्हणांचा जयपत्राविषयी हट्ट' नावाचा अध्याय सव्विसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment