श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेहतिसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेहतिसावा रुद्राक्ष माहात्म्य - सुधर्म- तारक आख्यान !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्धयोग्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, "तुम्ही यापूर्वी जी कथा सांगितली त्यातील ती ब्राम्हण सुवासिनी श्रीगुरुंच्याबरोबर गाणगापुरातील मठात आली मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा." नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, "ऐक. श्रीगुरु मठात आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती सुवासिनी श्रीगुरुंच्या दर्शनाला आली. श्रीगुरुंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली, "माझ्या पतीला मृत्यू आला त्यावेळी एका ब्रम्हचाऱ्याने येउन मला परोपरीने उपदेश केला. मग मला चार रुद्राक्ष दिले व ते प्रेताला बांधून प्रेतदहन करावे असे सांगितले. त्याचप्रमाणे रूद्रसूक्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असेही सांगितले. अंतकाळी श्रीनृसिंहसरस्वतींचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रम्हचारी एकाकी निघून गेला." त्या सुवासिनीने असे सांगितले असता श्रीगुरू हसून म्हणाले, "तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते. रुद्राक्षाचे माहात्म्य फार मोठे आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो. त्याला कोणतेही पाप लागत नाही. रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे. त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही. जो मनुष्य एक हजार रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो. अशा माणसाला सर्व देव वंदन करतात. एक हजार रुद्राक्ष मिळू शकले नाहीत, तर एकशेआठ रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी. त्या माळेत नवरत्ने गुंफावीत.
रुद्राक्ष हे सर्वपापनाशक आहेत. ते हातांवर, दंडावर, मस्तकावर धारण करावेत. रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे. एकमुखी, पंचमुखी, एकादश-मुखी, चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष खरे, अस्सल मिळाले तर उत्तमच. तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत. त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते. या रुद्राक्षांचे माहात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे. ती सांगतो, ऐक. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे. त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे. त्या राजाचा प्रधानसुद्धा अत्यंत चतुर, पंडित व विवेकी होता. भद्रसेन राजाला एक मुलगा होता. त्याचे नाव सुधर्म. प्रधानाच्या मुलाचे नाव होते, तारक. हे दोघेही मुलगे जन्मतःच मोठे शिवभक्त होते. अगदी लहानपणापासून ते वैराग्यशील होते. पांच वर्षांचे असतानाच त्यांना वैराग्य आले. त्यांना सुवर्णादींचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत. ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत. सर्वांगाला भस्म लावीत. ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत. त्यांना सर्वप्रकारचे शिक्षण मिळाले होते. तरीसुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते. यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी होती.
एके दिवशी पराशरऋषी भद्रसेन राजाकडे आले. राजाने व प्रधानाने तयंचे उत्तमप्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली. त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले मग राजाने त्या दोन मुलांच्या पत्रिका पराशरांना दिल्या. राजा हात जोडून म्हणाला, 'मुनिवर्य, आमच्या या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाहीत. हे अगदी विरक्त झाले आहेत. रुद्रक्षांवर व भस्मावर यांचे फार मोठे प्रेम आहे, हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात. अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार याची आम्हाला मोठी चिंता वाटते." पराशरांनी त्या दोन मुलांच्याकडे निरखून पाहिले. ते सुर्यचंद्रासारखे तेजस्वी दिसत होते. पराशरांनी क्षणभर विचार केला व राजाला म्हणाले, "राजा, या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्यदृष्टीने दिसत आहे. हे दोघे असे विरक्त का झाले आहेत, हे शिवभक्त का झाले व यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ते मी सांगतो. लक्षपूर्वक ऐक.
पूर्वी नंदीग्रामात एक गणिका राहत होती. तिचे रूपलावण्य अप्सरेसारखे होते. तिचे वैभव एखाद्या राजा -महाराजाला लाजवेल असे होते. असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत. ती वेश्या असली तरी थोर पतिव्रता होती. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने सेवा करीत असे. तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुक्कुट, मर्कट (कोंबडा व माकड) पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यांत रुद्राक्ष बांधले होते. ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवीत असे. त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. ती शिवपुराण श्रवण करू लागली की ते कुक्कुट व मर्कटही लक्षपूर्वक ऐकत असत. ती आपल्या हातांनी त्या दोघांना भस्म लावीत असे.
एकदा काय झाले, एक शिववरती असा मोठा श्रीमंत, मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला. त्या व्यापाऱ्याच्या हातात पृथ्वीमोलाचे एक रत्नखचित शिवलिंग होते. त्याचे तेज सूर्यतेजाहून अधिक होते. ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला. मग त्या शिवव्रती व्यापाऱ्याने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले. तो तिला म्हणाला, "तीन दिवस- तीन रात्री तू माझी धर्मपत्नी म्हणून राहावे. त्या काळात दुसऱ्या कोणाचीही सेवा करायची नाही. हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे." त्या गणिकेने सर्व काही मान्य केले. तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास प्रारंभ केला. तो शिवव्रती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष शंकर होते. त्या गणिकेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लीला केली. त्यांच्याच आज्ञेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली. वर वाहू लागला. बघता बघता आग सर्वत्र पसरली. 'ऊठ, ऊठ लौकर. नाट्यशाळेला आग लागली आहे !' असे महणून त्या शिवव्रती व्यापाऱ्याने त्या गणिकेला जागे केले. ती गणिका घाबरून उठली. अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या. तशाही स्थितीत तिने धावत जाऊन कुक्कुट-मर्कटांना सोडविण्याचा प्रयत्न केला; पण तेही त्या आगीत जळून गेले. मंडपाचा मधला खांबही जळला. त्याला बांधलेले शिवलिंगही फुटून नष्ट झाले. थोड्यावेळाने अग्नी शांत झाला. त्या शिवव्रती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले, "माझे दिव्य लिंग कुठे आहे ?" त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली. ती छाती बडवून रडू लागली. ते लिंग जळून गेले होते.
तो व्यापारी शोक करीत म्हणाला, "माझे शिवलिंग नष्ट झाले. आता मी शिवलिंगासाठी माझे प्राण देतो." असे म्हणून त्याने अग्नी पेटविला आणि ' ॐ नमः शिवाय' असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली. त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला तीन दिवसांसाठी आपला पती मानले होते. दुसऱ्या दिवशीच त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता म्हणून पतिव्रता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राम्हणांना दान केली. आपली अश्वशाळा, गजशाळा, प्रासाद या सर्वांचे दान केले. मग तिने स्नान करून भस्म लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले. अंतःकरणात शिवध्यान केले व ॐ नमः शिवाय असे म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली. त्याचक्षणी अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. कर्पूरगौर, त्रिशूलधारी, नीलकंठ, गजचर्मधारी, पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी त्या गणिकेला वरचेवर झेलले. ते स्मितहास्य करीत तिला म्हणाले, "मीच व्यापाऱ्याचे रूप धारण करून माझ्यावरील निश्चल भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग." त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाली, "प्रभो, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा. या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे. मला नित्य आपल्या सन्निध वास्तव्य करावयास मिळावे. मला माझ्या सर्व दासदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा." भगवान शंकर तथास्तु म्हणाले. त्याचक्षणी तेथे आलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकास गेले.
ही कथा सांगून पराशरमुनी भद्र्सेनाला म्हणाले, "राजा, आता तुमच्या दोन मुलांविषयी सांगतो. हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत ? हे सतत शिवभजनात दंग का असतात ? हे सर्वांगाला भस्म का लावतात ब रुद्राक्ष का धारण करतात ? असा तुझा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ऐक.हे दोन्ही कुमार पूर्वजन्मी त्या गणिकेचे कुक्कुट- मर्कट होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले होते. त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकावयास मिळत असे. त्या पूर्वपुण्याईने ते कुक्कुट-मर्कट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत. हे पुढे उत्तमप्रकारे राज्य करतील व शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील. सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. हे दोघे कुक्कुट-मर्कट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते, ती विरक्ती अंशात्मकरूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाली आहे, म्हणूनच ऐश्वर्यात असूनही यांना रुद्राक्ष आवडतात. या दोघांचे पूर्वपुण्य अगाध आहे. पराशरांच्या या उत्तराने भद्र्सेनाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला.
त्यांनी पराशरांच्या पायावर लोटांगण घातले. मग भद्र्सेनाने पराशारांना एक गहन प्रश्न विचारला, त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले ते सिद्धमुनी नामधारकास पुढील कथेत सांगणार आहेत.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'रुद्राक्ष माहात्म्य - सुधर्म- तारक आख्यान' नावाचा अध्याय तेहतिसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment