श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चव्वेचाळीसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चव्वेचाळीसावा नंदी ब्राम्हणाचा कुष्ठरोग घालविला !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, "तुमचे भाग्य अतिथोर. कारण तुम्ही श्रीगुरुचरित्र प्रत्यक्ष पाहिले आहे. तुम्हाला परब्रम्हाचे दर्शन घडले आहे. आज, तुमच्या कृपेने श्रीगुरुचरित्रामृत प्राशन करावयास मिळाले आहे. माझे दैन्य, दुःख नाहीसे झाले. सर्व काही लाधले. मागे तुम्ही सांगितले होते, की श्रीगुरूनृसिंहसरस्वती संगमावर राहिले. मग पुढे काय झाले ते मला सांगा," सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "ऐक. सर्वकाही सविस्तर सांगतो.एकदा एक मोठी विचित्र घटना घडली. नंदी नावाचा एक ब्राम्हण होता. त्याच्या सर्वांगाला श्वेतकुष्ठ झाले होते. ते नाहीसे व्हावे म्हणून तो तुळजापुरला गेला. तेथे त्याने तीन वर्षे तुळजाभवानीची आराधना केली. अनेक व्रतोपवास केले. तेथे त्याला असा आदेश मिळाला ,की त्याने चंदला परमेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन तिची आराधना करावी. तेही त्याने केले. सात महिने पुरश्चरणादी व्रते केली. एके दिवशी रात्री देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला, 'तू गाणगापुरात जा. तेथे मनुष्यवेषधारी त्रैमूर्तींचे अवतार श्रीगुरू नृसिंहसरस्वती आहेत. तेथे तुझा रोग नाहीसा होईल." त्यावर नंदी म्हणाला, "हे आधीच सांगितले असते तर इतका त्रास तरी सोसावा लागला नसता. प्रथम मी तुळजाभवानीची आराधना केली. नंतर तुझ्याकडे येण्याचा आदेश मिळाला. मग आता मला मनुष्याकडे का पाठ्वितेस? तू स्वतःला जगदंबा म्हणवितेस, मग तुला रोग का बरे करता येत नाही ?
तुझे दैवातपण कळले मला ! आता मी कोठेही जाणार नाही. माझा रोग बरा होईपर्यंत मी येथेच पुरश्चरण करीत बसणार ! दुर्दैव माझे ! दुसरे काय ? 'तू मनुष्याकडे जा !' असे तू कसे म्हणू शकतेस ? मी सात महिने विनाकारण कष्ट सोसले. आता मी मरो किंवा जगो. मी कोठेही जाणार नाही." असे बोलून तो अगदी हट्टालाच पेटला. पुन्हा एके दिवशी देवीने त्याला तसाच दृष्टांत दिला. देवीच्या पुजाऱ्यांनाही देवीने दृष्टांत देऊन सांगितले. "तुम्ही त्या नंदी ब्राम्हणाला मंदिरात राहू देऊ नका. त्याला घालवून द्या." देवीच्या आदेशानुसार त्या पुजाऱ्यांनी नंदी ब्राम्हणाला देवीचा आदेश सांगितला व मंदिरात राहण्यास मनाई केली. मग तो नंदी ब्राम्हण नाईलाजाने मंदिरातून बाहेर पडत चालत-चालत गाणगापुरास आला.
तो मठात आला व श्रीगुरुंविषयी चौकशी करू लागला. मठातील शिष्य म्हणाले, "श्रीगुरू आता संगमावर आहेत. काल शिवरात्रीचा उपवास होता. आता पारण्यासाठी येथे येतील. तू येथे उभा राहू नकोस. जरा बाजूला उभा राहा." थोड्या वेळाने श्रीगुरू मठात आले, तेव्हा शिष्यांनी त्यांना सांगितले, "सर्वांगाला कुष्ट झालेला एक ब्राम्हण आला आहे. त्याला आपले दर्शन घ्यावयाचे आहे." श्रीगुरू म्हणाले, "आम्हाला माहित आहे. मनात संशय धरून तो आला आहे. त्याला मठात आणा." शिष्यांनी धावत जाऊन त्या नंदी ब्राम्हणाला मठात आणले. श्रीगुरुंना पाहताच त्याने जमिनीवर लोटांगण घातले व हात जोडून उभा राहिला. श्रीगुरू त्याला म्हणाले, "तू मनात संशय धरून आला आहेस ! जे कार्य देवी करू शकत नाही ते कार्य मनुष्य काय करणार ! असा संशय धरून तू आला आहेस." हे शब्द ऐकताच तो ब्राम्हण आश्चर्यचकित झाला. श्रीगुरू अंतर्ज्ञानी आहेत. त्यांनी आपल्या मनातले ओळखले हे लक्षात येताच त्या नंदीब्राम्हणाला पश्चाताप झाला. त्याने श्रीगुरुपुढे लोटांगण घातले व शोक करीत म्हणाला, "स्वामी, मला क्षमा करा. मी अज्ञानी आहे. मी आपले स्वरूप नाही. मी आपणास शरण आलो आहे. मला या पापकर्माच्या भोगातून सोडवा. मला आज भाग्याने आपले दर्शन घडले आहे. आपल्या दर्शनाने मी पावन झालो आहे. आपण भक्तांचे आधार आहात. आपण शरणागतवत्सल आहात. आज आपल्या रूपाने परब्रम्हाचे चरणदर्शन झाले आहे. आपण कृपासागर आहात. भक्तजनांची कामधेनू आहात. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण मनुष्यवेषाने अवतीर्ण झाला आहात. प्रभू रामचंद्राच्या केवळ चरणस्पर्शाने अहिल्येला दिव्य देह प्राप्त झाला. त्याप्रमाणे आज मी आपल्या दर्शनाने पावन झालो आहे.
स्वामी, विवाहानंतर माझ्या सर्वांगाला कुष्ठरोग झाला. माझ्या पत्नीने माझा स्पर्शही टाळला. ती मला सोडून माहेरी गेली. माझ्या आई-वडिलांनी मला घराबाहेर काढले. मी तुळजाभवानीला शरण गेलो, अनेक उपवास केले, खूप कष्ट सोसले; पण काहीही उपयोग झाला नाही. देवीने मला चंदला परमेश्वरीकडे जाण्याची आज्ञा केली; पण तिच्याकडे जाऊनही माझे काम झाले नाही. देवीने मला आपल्याकडे जाण्याचा आदेश दिला, मला त्या मंदिरातून घालवून देण्यात आले. मी आपणास शरण आलो आहे. आता मला तारा किंवा मारा. असे रोगग्रस्त शरीर घेऊन जगण्याचा मला कंटाळा आला आहे.
त्या नंदी ब्राम्हणाच्या या बोलण्याने श्रीगुरुंना त्याची दया आली. त्यांनी सोमनाथ नावाच्या ब्राम्हणाला बोलावून सांगितले, "याला संगमावर ने.याच्याकडून संकल्प म्हणवून घे. याला षटकुल तीर्थात स्नान घाल. अश्वत्थवृक्षाला प्रदक्षिणा घालावयास लाव. याची पहिली वस्त्रे काढून टाक व दुसरी वस्त्रे दे. मग याला भोजनासाठी इकडे घेऊन ये."
श्रीगुरूंनी अशी आज्ञा करताच सोमनाथ त्या नंदीला घेऊन गेला. तो नंदी ब्राम्हण संगमात स्नान करून बाहेर येताच त्याच्या शरीराचा वर्ण पार बदलून गेला. त्याने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच त्याचे कोड नाहीसे झाले. त्याचे शरीर अत्यंत सुंदर. तेजस्वी दिसू लागले. त्याची जुने वस्त्रे दूर टाकली व त्याला नवीन वस्त्रे देण्यात आली. त्याची जुनी वस्त्रे जेथे टाकली गेली ती जमीन क्षारयुक्त झाली. मग सोमनाथ नंदीला घेऊन मठात आला. नंदीने श्रीगुरुंच्या चरणी लोटांगण घातले. त्यावेळी त्याचा सुवर्णदेह पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यावेळी त्या नंदी ब्राम्हणाच्या असे लक्षात आले की, सर्वांगाचे कोड नाहीसे झाले असले तरी मांडीच्या आतील भागात एक लहानसा पांढरा डाग राहिला आहे. तो डाग पाहून घाबरला. त्याने तो डाग श्रीगुरुंना दाखविला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, "तू प्रथम मनात संशय बाळगला होतास त्यामुळे थोडे कोड शिल्लक राहिले आहे. आता तू आमच्यावर कवित्व कर म्हणजे तो डागही नाहीसा होईल." श्रीगुरुंनी असे सांगताच नंदी म्हणाला, "पण मला लिहिता-वाचता काहीच येत नाही. मग मी आपल्याविषयी कवित्व कसे करणार ?"
श्रीगुरू म्हणाले, "तोंड उघडून जीभ बाहेर काढ." त्याने तसे करताच श्रीगुरुंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्याच्या जिभेवर ठेवली. त्याच ठिकाणी ज्ञान प्रकट झाले. तो श्रीगुरुंचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, "स्वामी, मी केवळ अज्ञानी. आपली सेवा करण्यास कधी सवडच झाली नाही. मायापाशांनी वेढलेला मी संसारसागरात बुडालो. आपले स्मरण कधी झाले नाही. मी अनेक योनींत जन्म घेत घेत मनुष्ययोनीत जन्मास आलो; पण आयुष्यभर मी केवळ वाईट कर्मेच केली. नाना व्यसने केली. व्यभिचार केला.
पुढे वार्धक्य आले. नाना रोग जडले; पण माझ्या कडून सेवा घडली नाही. स्वामी, आपण साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. आपणच या विश्वाचे तारक आहात, मनुष्य-वेषधारी आपण प्रत्यक्ष नारायण आहात. आता माझे रक्षण करा. माझा उद्धार करा." अशा शब्दांत त्या नंदीने ब्राम्हणाने श्रीगुरूंची स्तुती केली. त्याचे ते स्तवन ऐकून लोक आनंदाने माना डोलवू लागले. त्याने केलेल्या श्रीगुरुंच्या स्तवनाने त्याच्या शरीरावर राहिलेला कुष्ठरोगाचा डागही नाहीसा झाला. त्यामुळे त्याला अपार आनंद झाला. तो श्रीगुरुंच्या सेवेत रंगून गेला. त्याच्या स्तवनाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी त्याला कवीश्वर ही पदवी दिली. मग तो नंदी ब्राम्हण श्रीगुरूंची सेवा करत मठातच राहिला. ही कथा ऐकल्यानंतर नामधारकाने सिद्धांना विचारले, 'नरहरी' नावाचा दुसरा एक कवी होता. तो स्वामीचा शिष्य कसा झाला ती कथा मला सांगा."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'नंदी ब्राम्हणाचा कुष्ठरोग घालविला ' नावाचा अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment