श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकेचाळीसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकेचाळीसावा सायंदेवाची गुरुसेवा - काशीयात्रा - त्वष्टाख्यान !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्धमुनींना साष्टांग नमस्कार करून हात जोडून म्हणाला, "महाराज, तुम्ही खरोखर संसारसागरतारक आहात. आतापर्यंत श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगितले आहे . त्यामुळे मी धन्य झालो. माझ्या ठिकाणी सत्यज्ञानाचा उदय झाला. मला तुम्ही गुरुस्मरणी अमृत पाजलेत. माझी तुमच्या चरणी एक विनंती आहे. तुम्ही श्रीगुरुंच्या सान्निध्यात होता, त्यावेळी तेथे आणखी कोण कोण शिष्य होते ? आमच्या पूर्वजांपैकी कोणी तेथे श्रीगुरुंच्या सेवेत होते का ?" नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, "सांगतो. सविस्तर सांगतो, ऐक. तुमचे पूर्वज सायंदेव म्हणून जे होते ते वासरगावात राहत होते. ते श्रीगुरुंचे माहात्म्य ऐकून गाणगापुरास आले. गाणगापूर पाहताच त्यांना अतिशय आनंद झाला.ते लोटांगण घालीत मठात आले. त्यांनी श्रीगुरुंच्या चरणांना वंदन करून त्यांचे उत्तमोत्तम शब्दांत स्तवन केले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ते श्रीगुरुंना म्हणाले, "स्वामी, तुम्ही साक्षात ब्रम्हा-विष्णू-महेशस्वरूप त्रैमूर्ती अवतार आहात. तुम्ही परमात्मा आहात. भक्तवत्सल आहात. तुम्ही शरणागताचे रक्षक आहात. सर्व तीर्थे तुमच्या चरणांशी आहेत. तुमचे माहात्म्य मी काय वर्णन करणार ? तुम्ही वंध्या स्त्रीला कन्या पुत्र दिलेत. वाळलेले लाकूड पल्लवित केलेत. वांझ म्हैस दुभती केलीत. तुम्ही विष्णूस्वरूप आहात. त्रिविक्रमभारतीला तुम्ही विश्वरूप दाखविले. पतिताकरवी वेद म्हणाविलेत असा तुमचा महिमा आहे. तुम्ही भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्रैमूर्ती अवतार घेतला आहे. तुमचा महिमा अगाध आहे."
सायंदेवानी असे स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्रीगुरू त्यांच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले," आता तू संगमावर जा. तेथे स्नान कर व अश्वथाची पूजा करून मठात परत ये. आज तू आमच्याबरोबर भोजन करावयाचे आहे." श्रीगुरुंनी अशी आज्ञा करताच सायंदेव संगमावर जाऊन, स्नान करून व अश्वत्थाची पूजा करून मठात परत आला. त्याने श्रीगुरूंची यथासांग पूजा केली. श्रीगुरुंच्यासमवेत बसले असता त्यांनी सायंदेवाला विचारले, "तुझे नाव, गाव कोणते ? तुझी बायकामुले कोठे असतात ? तुझ्या घरी सर्व ठीक आहे न ?"
त्यावर तो म्हणाला, "माझे नाव सायंदेव. उत्तरकांची नावाच्या गावात मी माझ्या बायकामुलांसह राहतो. माझे सगळे लोक संसारी आहेत. मला मात्र आपल्या येथे राहून आपली सेवा करण्याची इच्छा आहे." श्रीगुरू म्हणाले, "अरे, तू येथे कशाला राहतोस ? आमची सेवा करणे वाटते इतके सोपे नाही. आम्ही कधी गावात तर कधी अरण्यात राहतो. तुला कष्ट सोसणार नाहीत." त्यावर सायंदेव म्हणाला, "स्वामी, कितीही कष्ट पडोत, मला त्याची पर्वा नाही. गुरूची सेवा करण्यात कष्ट कसले ? मी सर्व काही सहन करीन."
सायंदेवाचा निर्धार पाहून श्रीगुरु म्हणाले, "ठीक आहे. तुला जमेल तशी सेवा कर." सायंदेवाचा आनंद झाला. तो श्रीगुरूंची सेवा करीत मठात राहू लागला. असेच तीन महिने लोटले. एके दिवशी श्रीगुरुंनी त्याच्या धैर्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. एके दिवशी श्रीगुरू संगमाकडे निघाले. जाताना त्यांनी फक्त सायंदेवाला बरोबर घेतले. संध्याकाळ झाली. श्रीगुरू अश्वत्थ वृक्षाजवळ सायंदेवाला बोलत बसले. रात्र झाली. श्रीगुरुंनी अघटीत लीला केली. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळू लागला. झाडे उन्मळून पडली. सगळीकडे पाण्याचे पाट वाहू लागले. हवेत एकदम गारवा आला. सायंदेवाने श्रीगुरुंच्या अंगावर पांघरूण घातले, तरी थंडी कमी होईना, म्हणून श्रीगुरू सायंदेवाला म्हणाले, "तू लवकर मठात जा व शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये, मात्र येताना उजवीकडे किंवा डावीकडे जराही पाहू नकोस."
श्रीगुरुंनी सांगितल्याप्रमाणे सायंदेव विस्तव आणण्यासाठी गावाकडे निघाला. मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळीकडे अंधार होता. रस्ता नित दिसत नव्हता. मधूनमधून विजा चमकत होत्या. त्या प्रकाशात सायंदेव गावाकडे जात होता. तो गाणगापुराच्या वेशीपाशी गेला व द्वापाराला हाक मारून म्हणाला, "श्रीगुरुंसाठी विस्तव हवा आहे, तो दे." द्वारपालाने पेटते निखारे एका पात्रात घालून दिले. ते निखारे घेऊन सायंदेव परत निघाला. त्याने मनात विचार केला. श्रीगुरुंनी मला सांगितले होते, डावी-उजवीकडे पाहू नको." पण असे का सांगितले. त्याला समजेना. तो विजांच्या प्रकाशात परत निघाला. त्याने केवळ जिज्ञासा म्हणून डावी-उजवीकडे पाहतो तर काय ? त्याच्याबरोबर दोन प्रचंड नाग अर्धे उभे राहून, फणा वर करून चालले होते. नागांना पाहताच तो अतिशय घाबरला व संगमाकडे धावत सुटला. त्याच्याबरोबर ते नागही येत होते. श्रीगुरुंचे स्मरण करीत तो संगमाजवळ आला. सहस्त्र दिव्यांच्या प्रकाशात श्रीगुरू अश्वत्थवृक्षाखाली बसले असून, त्यांच्या भोवती अनेक ब्राम्हण वेदपठण करीत बसले आहेत असे त्याला लांबून दिसले. तो जवळ गेला तो श्रीगुरू एकटेच बसले आहेत असे त्याला दिसले. हा काय चमत्कार आहे ? त्याला काहीच समजेना. ते दोन नाग श्रीगुरुंना वंदन करून एकाएकी नाहीसे झाले.
अत्यंत घाबरलेल्या सायंदेवाला पाहून श्रीगुरुंनी त्याला विचारले, "अरे सायंदेवा, तू इतका घाबरलेला का दिसतोस ? तुझ्या रक्षणासाठी तर मी ते दोन नाग पाठविले होते. आमची सेवा करणे किती कठीण आहे हे आता तुला समजले ना ? अरे, सेवाधर्म मोठा गहन आहे. दृढभक्तीने सेवा करशील तर कळिकाळाचेही भय तुला वाटणार नाही."
सायंदेव श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाला, "मला दृढभक्ती कशी करावी, ती कशी असते ते सांगा, म्हणजे माझेही मन तुमच्या चरणी स्थिर राहील." श्रीगुरू म्हणाले, "दृढभक्ती कशी असते याविषयी मी तुला उद्या प्रातःकाली एक कथा सांगेन. आता रात्र झाली आहे. आपण मठात परत जाऊया." मग श्रीगुरू सायंदेवासह मठात परत आले. सायंदेवाची परीक्षा झाली होतीच. दुसऱ्या दिवशी प्रातःकाली श्रीगुरुंनी गुरुभक्तीविषयी कथा सांगण्यास सुरुवात केली. मठातील इतर शिष्यही ती कथा ऐकण्यासाठी श्रीगुरुंच्या समोर आले.
श्रीगुरू म्हणाले," एकदा काय झाले, कैलास पर्वतावर शिवपार्वती एकांतात बोलत बसले होते. त्यावेळी पार्वतीने शंकरांना विचारले, "नाथ, गुरुभक्ती कशी असते ते मला सविस्तर सांगा." पार्वतीने असे विचारले असता, शिवशंकर म्हणाले, "एका गुरुभक्तीने सर्वकाही साध्य होते ,शिव तोच गुरु समजावा. अनेक व्रते, अनुष्ठाने करून सुद्धा जी गोष्ट साध्य होत नाही ती गुरुभक्तीने त्वरित साध्य होते. तपानुष्ठान, यज्ञयाग, दानधर्म यात अनेक संकटे येतात. गुरुभक्तीचे तसे नाही. गुरुभक्तीने सर्वकाही लवकर साध्य होते. मात्र गुरुभक्ती निष्ठापूर्वक, दृढतेने करावयास हवी. हे पार्वती, याविषयी मी तुला एक कथा सांगतो.
त्वष्टा हा ब्रम्हदेवाचाच अवतार. त्याला एक अत्यंत सुंदर, बुद्धिमान, कार्यकुशल असा पुत्र झाला. त्वष्ट्याने यथासमय त्याचे मौजिबंधन करून त्याला विद्याध्ययनासाठी गुरूगृही पाठविले. ती गुरूगृही राहून आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत असे. एके दिबाशी मोठा पाऊस सुरु झाला. गुरूंची पर्णशाला गळू लागली. त्यावेळी गुरु त्या शिष्याला म्हणाले, "ही आमची जीर्ण झालेली पर्णशाला दरवर्षी पावसाळ्यात गळते, म्हणून तू आमच्यासाठी एक भक्कम कधीही न गळणारे घर तयार कर." त्याचवेळी गुरुपत्नी त्या शिष्याला म्हणाली, "माझ्यासाठी एक चांगली कंचुकी आण. ती विणलेली नसावी किंवा शिवलेली नसावी." गुरुपुत्र म्हणाला, "माझ्यासाठी पादुका आण. त्या घालून पाण्यावरून चालता यावे. त्या पादुका मला वाटेल तिथे घेऊन जातील. त्या पादुकांना चिखल लागू नये. अशा पादुका माझ्यासाठी लवकर आण." गुरुकन्या म्हणाली, "माझ्यासाठीसुद्धा काहीतर आण ना ! मला दोन कर्णभूषणे आण. त्याचप्रमाणे मला खेळण्यासाठी हस्तिदंती घरकूल आण. ते कधीही तुटणार नाही, जीर्ण होणार नाही असे असावे. ते एका खांबावर उभे असावे. मी जेथे असेन तेथे ते आपोआप यावे. त्या घरात पाट वगैरे सर्व काही असावे. त्यात ठेवण्यासाठी भांडीकुंडी असावीत. ते सदैव नवे दिसावे. याशिवाय मला स्वयंपाक करण्यास शिकव. स्वयंपाकाची भांडी कधी काळी होऊ नयेत."
त्या शिष्याने त्या सर्व वस्तू आणण्याचे कबूल केले. मग सर्वांचा निरोप घेऊन तो निघाला व एका मोठ्या अरण्यात शिरला, आता तो मोठ्या काळजीत पडला. तो विचार करू लागला, "मी एक साधा ब्रम्हचारी ! मला साधी पत्रावळ लावता येत नाही. मग मी या सर्व गोष्टी कशा काय करणार ? आता मला कोण मदत करेल ? ही सांगितलेली सर्व कामे मी लवकर केली नाहीत तर गुरु माझ्यावर रागावतील. मला शाप देतील. मी हे न जमणारे काम का बरे स्वीकारले ? आता प्राणत्याग करणे हाच एक उपाय." असा विचार करीत असताना तो वनातून जात असताना एक अचानक अवधूत त्याला भेटला. तो बालब्रम्हचाऱ्याला म्हणाला, "अरे, तू कोठे चालला आहेस ? तू कसल्यातरी काळजीत दिसतो आहेस. तुझी काय चिंता आहे, मला सांग. दुःख करू नकोस." तो अवधून असे बोलला असता तो बालब्रम्हचारी त्यांच्या पाया पडून म्हणाला, "स्वामी, मला वाचवा ! वाचवा ! मी चिंतासागरात बुडालो आहे. माझे पूर्वपुण्य थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात. तुम्ही साक्षात परमेश्वरच आहात. माझ्यावर गुरुकृपा आहे म्हणूनच या निर्मनुष्य अरण्यात तुम्ही भेटलात. तुमच्या दर्शनाने माझे मन शांत झाले आहे. तुम्ही भक्तवत्सल आहात." असे बोलून त्या बालब्रम्हचाऱ्याने अवधूताच्या चरणांना मिठी मारली. अवधूताने त्याला आलिंगन देऊन त्याची सगळी विचारपूस केली व "तुला कसली चिंता आहे ?" असे विचारले. त्या बालब्रम्हचाऱ्याने आपली सगळी हकीगत सांगितली. आपल्या गुरूंनी, गुरूपत्नीने व त्यांच्या मुलांनी कोणकोणती कामे सांगितली आहेत ते सांगितले. आपण सध्या बालब्रम्हचारी असून न जमणारे कठीण काम स्वीकारले. ते मी कसे करणार ? केले नाही तर गुरु रागावतील, मला शापसुद्धा देतील. यामुळे मला मोठी चिंता लागून राहिली आहे. आता मी काय करू ? मला मार्ग सुचवा." अशी त्याने विनंती केली असता अवधूत म्हणाले, "तू आता काशीक्षेत्री जा. त्यामुळे तुझे काम होईल. काशी महाक्षेत्र असून तेथे सर्व कार्ये सिद्धीला जातात. तेथे जाऊन तू काशीविश्वनाथाची आराधना कर. तेथेच ब्रम्हदेवाला सृष्टीचे व विष्णूला विश्वपालनाचे ज्ञान प्राप्त झाले. तेथेच सर्व साधकांची साधना सफल होते. तू तेथे जा म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. त्या क्षेत्राला 'आनंदकानन' असे म्हणतात. तेथील पुण्याची गणनाच करता येत नाही. त्या काशीक्षेत्रात फिरताना प्रत्येक पावलागणिक अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य होते, यावर विश्वास ठेव. कसलीही चिंता करू नकोस.
अवधूताने असे विचारले असता तो ब्रम्हचारी म्हणाला, "मी येथे अरण्यात आहे. मला काशी कोठे आहे वगैरे काहीच माहित नाही. ते आनंदकानन पृथ्वीवर आहे की स्वर्गात आहे ? ते पाताळलोकात आहे की आणखी कोठे मला माहीत नाही. मला तेथे कोण नेणार ? तुम्ही मला न्याल का ? पण तुम्हाला खूप कामे असणार, त्यामुळे मला तेथे न्या मी कसे म्हणू ? " अवधूत म्हणाला, "चिंता करू नकोस. मी तुला घेऊन जातो. तुझ्या निमित्ताने मलाही काशीविश्वनाथाचे दर्शन घडेल. काशीयात्रा नाही तर जीवन व्यर्थ ठरते." असे बोलून त्या अवधूताने योगबलाने एका क्षणात त्या ब्रम्हचाऱ्यास काशीक्षेत्री नेले. तेथे गेल्यावर अवधूताने ब्रम्हचाऱ्यास काशीक्षेत्री नेले. तेथे गेल्यावर अवधूताने ब्रम्हचाऱ्याला तेथे असलेल्या शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते सगळे नीट समजावून सांगितले. सर्वप्रथम मणिकर्णिकेत स्नान करून, विनायकाचे दर्शन घेऊन कंबळेश्वराची पूजा करावी. मग विश्वनाथाचे दर्शन घेऊन जाऊन मणिकर्णिकेत स्नान करावे. मणिकर्णिकेश्वराची पूजा करावी. त्यानंतर कंबळेश्वर, वासुकीश्वर, पर्वतेश्वर, गंगाकेशव, ललितादेवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, शूळटंकेश्वर, वाराहेश्वर, ब्रम्हेश्वर, अगस्त्येश्वर, कश्यपेश्वर, हरिकेशवनेश्वर, वैद्यनाथ, ध्रुवेश्वर, गोकर्णेश्वर, हाटकेश्वर, अस्थिक्षेप, तटाकतीर, कीकसेश्वर, भारतभूतेश्वर, चित्रगुप्तेश्वर, पाशुपतेश्वर, पितामहेश्वर, कल्लेश्वर, चंद्रेश्वर, विश्वेश्वर, अग्नीश्वर, नागेश्वर, हरिश्चचंद्रेश्वर, चिंतामणीविनायक, सोमनाथ-विनायक, वसिष्ठ, वामदेव, त्रिसंध्येश्वर, विशालाक्ष, धर्मेश्वर, विश्वबाहू, आशाविनायक, वृद्धादित्य, चतुवक्त्रेश्वर, ब्रम्हेश्वर, मनःप्रकामेश्वर, ईशानेश्वर, चंडीश्वर, भवानीशंकर, धुंडिराज, राजराजेश्वर, लागूलेश्वर, नकुलेश्वर, परान्नेश्वर, परद्रव्येश्वर, पाणिग्रहणेश्वर, गंगेश्वर, मोरेश्वर, ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर, निष्कलंकेश्वर, मार्कंडेयेश्वर, असुरेश्वर, तारकेश्वर, महाकालेश्वर, महेश्वर, मोक्षेश्वर, वीरभद्रेश्वर, अविमुक्तेश्वर, पंचविनायक, आनंदभैरव अशी अंतर्गृहाची यात्रा करून मुक्तीमंडपात यावे व तेथे पुढील मंत्र म्हणावा -
अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता !
न्युतातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः !!
असा मंत्र जपून विश्वनाथाला नमस्कार करावा. मग तेथून दक्षिणमानस यात्रेला सुरुवात करावी. मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची पूजा करावी व यात्रेचा संकल्प सोडावा. मग मोदादी पंचविनायकाची भक्तिंभावाने पूजा करावी व मग पुढील लिंगाचे दर्शन घ्यावे -धुंडिराज, भवानीशंकर, दंडपाणि, विशालाक्ष यांची पूजा करावी. त्यानंतर धर्मकूपात स्नान करून श्राद्धादी कार्ये करावीत. त्यानंतर धर्मेश्वर, गंगाकेशव, ललितादेवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, वाराहेश्वर, दशाश्वमेतीर्थ, प्रयागतीर्थ येथे स्नान करून श्राद्धविधी करावा. त्यानंतर दशाश्वमेधेश्वर, प्रयागेश्वर, शीतलेश्वर, बंदीदेवी, सर्वेश्वर, धुंडिराज, तिळभांडेश्वर, रेवाकुंड, मानसकुंड, मानसेश्वर, केदारकुंड, केदारेश्वर, गौरीकुंड, वृद्धकेदारेश्वर, हनुमंतेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर, स्वप्नेश्वर, संगमेश्वर, लोलार्ककूप, गतिप्रदिपेश्वर, अर्कविनायक, पाराशरेश्वर, सन्निहत्यकुंड, कुरुक्षेत्रकुंड, विशाखेश्वरकुंड, अमृतकुंड, दुर्गाविनायक, दुर्गादेवी पूजन, चौसष्टयोगिनी, कुक्कुटद्विज, गोबाई, रेणुका, शंखोद्वार, कामाक्षीकुंड, कामाक्षीदेवी, अयोध्याकुंड, सीतारामदर्शन, लवांकुश, लक्ष्मी, सूर्य, सांबादित्य, वैद्यनाथ, गोदावरी, अगस्त्य, शुक्र, ज्ञानवापी अशा कुंडात स्नान करून देवांची पूजा करावी. ज्ञानेश्वर, दंडपाणि, आनंदभैरव, विश्वनाथ यांची पूजा करावी.
अवधूताने त्या बालब्रम्हचाऱ्याला काशीमाहात्म्य सांगून, उत्तरमानस यात्रा कशी करावी हे सांगून काशीतील अनेक तीर्थांचा क्रमही सांगितला. संपूर्ण यात्रा त्याच्याकडून करवून घेतली. काशीतील अनेक कुंडांची, लिंगांची, देवदेवतांची नवे व त्यांचे माहात्म्य सांगितले. ही सर्व यात्रा तू यथाविधी कर म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील." असा आशीर्वाद देऊन तो अवधूत गुप्त झाला. अतिशय आनंदित झालेल्या ब्रम्हचाऱ्याने यथाविधी संपूर्ण यात्रा पूर्ण केली. त्यावेळी प्रसन्न झालेले भगवान शंकर प्रकट झाले व 'तुला हवा असेल तो वर माग' असे म्हणाले. आपल्या गुरूंनी, गुरूपत्नीने व गुरुकन्या-पुत्राने जे जे मागितले होते ते सर्व ब्रम्हचाऱ्याने शंकरांना सांगितले. संतुष्ट झालेले शंकर त्याला म्हणाले, "तुझे गुरुभक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तू विश्वकर्मा होशील. तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. तुला सृष्टीरचनेचे सामर्थ्य प्राप्त होईल." असा वर देऊन भगवान शंकर गुप्त झाले.
या वरप्राप्तीने आनंदित झालेल्या त्या ब्रम्हचाऱ्याने आपल्या नावाचे विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले. मग त्याने भगवान शंकरांनी दिलेल्या सामर्थ्याने आपले गुरु, गुरुपत्नी, गुरुकन्यापुत्र यांनी जे जे मागितले होते ते ते सर्व निर्माण करून सर्व वस्तूंसह तो गुरूगृही परत आला. त्याने आपल्या गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. गुरु, गुरुपत्नी व गुरुकन्यापुत्र यांनी ज्या ज्या वस्तू मागितल्या होत्या त्या त्या वस्तू त्यांना दिल्या. त्याची गुरुभक्ती पाहून गुरूंनी त्याला अनेक आशीर्वाद दिले. गुरु त्याला म्हणाले, "तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तुझ्या घरी अष्टेश्वर्स अष्टैश्वर्ये नांदतील. त्रैमूर्ती तुला वश होतील. आचंद्रसूर्य तुझे नाव चिरंजीव राहील. तू चौदा विद्या, चौसष्ट कला यांचा ज्ञात होशील. अष्टसिद्धी, नवनिधी तुझ्या अधीन होतील. तुला सृष्टीची रचना करताना कोणतीही अडचण येणार नाही." असा गुरूंनी त्याला वर दिला. ही कथा सांगून भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, "पार्वती, गुरुभक्ती ही अशी असते. एका गुरुभक्तीनेच मनुष्य भवसागर तरुण जाऊ शकतो. ज्याच्या ठिकाणी दृढभक्ती असते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, म्हणूनच गुरूच त्रैमूर्ती आहे असे मानावे.
श्रीगुरू नृसिंहसरस्वती सायंदेवाला व इतर शिष्यांना विश्वकर्माख्यान व गुरुभक्तीमहिमा सांगत होते तोपर्यंत सकाळ झाली. सायंदेव श्रीगुरुंच्या चरणांना वंदन करून म्हणाला, "स्वामी, तुम्ही मला काशीयात्रेविषयी सांगत होतात त्याचवेळी मी तुमच्याबरोबर काशीक्षेत्रातच फिरत होतो, असे मला जाणवत होते. त्यावेळी मी ते स्वप्न पाहत होतो की सत्य ? मला माहित नाही." असे बोलून त्याने तिथल्या तिथे 'आदौ ब्रम्ह त्वमेव जगतां०.. ' हे तयंत प्रासादिक संस्कृत स्तोत्र रचून श्रीगुरुंना ऐकविले आणि म्हणाला, "स्वामी, आपणच त्रैमूर्तीचा अवतार आहात. केवळ भक्तजनांच्या उद्धारासाठी आपण पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. मला तुम्ही चारी पुरुषार्थ प्राप्त करून दिलेत. आपणच विश्वनाथ असून आपल्या चरणांशी काशी आहे. त्यावर प्रसन्न झालेले श्रीगुरू म्हणाले, "तूच आमचा श्रेष्ठ भक्त आहेस, म्हणूनच तुला मी काशी दाखविली. तुझ्या एकवीस पिढ्यांना या यात्रेचे फळ मिळेल. आता तू तुझ्या बायकामुलांसह येथे राहून आमची सेवा कर, पण काही झाले तरी यवनाची सेवा करू नकोस. जर केलीस तर तुझा नाश होईल." सायंदेवाला अतिशय समाधान वाटले. इतर शिष्यांनीसुद्धा 'कंडेनिंदु भक्तजन०.. ' इत्यादी कन्नड स्तोत्रे तयार करून म्हटली. ती ऐकून श्रीगुरू अतिशय प्रसन्न झाले.
मग सायंदेव आपल्या गावी गेला व आपल्या बायकामुलांना घेऊन मठात आला. सर्वांनी श्रीगुरुंच्या चरणांना वंदन केले, मग सर्व शिष्यांना आपल्याभोवती बसवून श्रीगुरुंनी त्यांना उपदेश केला. श्रीगुरू सायंदेवाला म्हणाले, "तुझ्या या ज्येष्ठपुत्र नागनाथाला पूर्णायुष्य प्राप्त होईल. त्याची वंशवृद्धी होईल. तो माझा परमभक्त होईल. तुला आणखी एक पत्नी असेल. तिला चार पुत्र होतील. त्यांना सर्वप्रकारची सुखे प्राप्त होतील. तुझ्या ज्येष्ठ पुत्राची सर्वत्र मोठी कीर्ती होईल.
आता तुंम्ही सर्वांनी संगमावर जाऊन स्नान करून यावे." मग सार्वजन संगमावर जाऊन विधिवत स्नान करून व अश्वत्थाची पूजा करून मठात आले. मग श्रीगुरू म्हणाले, "आज अनंत चतुर्दशी आहे. सर्वजण आज श्रीदेवअनंताची पूजा करतात." त्यावर सायंदेव म्हणाला, "स्वामी, तुमची चरणसेवा हेच आमच्यासाठी अनंतव्रत आहे. तथापि, या व्रताचे माहात्म्य काय आहे ? या व्रताचा विधी कसा असतो ? या व्रताचे फळ काय ? आणि पूर्वी हे व्रत कोणी केले ? हे सगळे आम्हाला सविस्तर सांगा." सायंदेवाने असे विचारले असता श्रीगुरुंनी 'अनंतव्रत' सांगण्याचे मान्य केले.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'सायंदेवाची गुरुसेवा - काशीयात्रा - त्वष्टाख्यान' नावाचा अध्याय एकेचाळीसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment