श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठरावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठरावा अमरपूर माहात्म्य - ब्राम्हणाचे दारिद्र्य गेले !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक सिद्धमुनींचा जयजयकार करीत म्हणाला, "अहो गुरु, तुम्ही खरोखर संसारसागर तारक आहात. श्रीगुरुचरित्रामृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत. परंतु तुमच्या मुखातून श्रीगुरुचरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरी ते अधिकाधिक ऐकण्याची मला इच्छा आहे, म्हणून मला आणखी सांगा." नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धमुनींना आनंद झाला. ते म्हणाले, "नामधारका, तुझी श्रीगुरूचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे. आज तुझ्यामुळे मला संपूर्ण श्रीगुरुचरित्र आठवते आहे. मी तुला भिलवडी स्थान माहात्म्य सांगितले आहे. आता पुढचे चरित्र एकाग्रचित्ताने ऐक. भिल्लवडीक्षेत्री काहीकाळ वास्तव्य केल्यानंतर श्रीगुरू नृसिंहसरस्वती कृष्णानदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा-वरूणा संगमावर आले. त्या स्थानाला दक्षिण-काशी असे म्हणतात. तेथून पुढे ते कृष्णापंचगंगा संगमावर आले. तेथे भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी बारा वर्षे वास्तव्य केले. ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे माहात्म्य काशी-प्रयागसमान आहे.

शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या प्रख्यात पाच नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे. या संगमात स्नान केले असता महातापातकांचा नाश होतो. या क्षेत्राचे माहात्म्य कुरूक्षेत्रापेक्षा अधिक आहे. तेथे स्नान केल्याने सहप्रकाराच्या महापातकांचा नाश होतो. प्रयागात माघस्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते. येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष असून तेथे चौसष्ट योगिनी नित्य स्नान करतात. येथील संगमात अगणित तीर्थे आहेत. त्यात शुक्लतीर्थ, काम्यतीर्थ, वरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत. या तीर्थात स्नान केले असता ब्रम्हइत्यादी सर्व पातकांचा नाश होतो. अगणित पुण्याची प्राप्ती होते. याच कृष्ण-पंचगंगा संगमावर श्रीगुरूनृसिंहसरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले. त्यानंतर तयंचे माहात्म्य सगळीकडे प्रकट झाले. त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. याच कृष्णा-पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे एक गाव आहे. श्रीगुरूनृसिंहसरस्वती दररोज दुपारी जात असत.अमरपुरात एक विद्याभ्यासी दरीद्री ब्राम्हण राहत होता. त्याची पत्नी अत्यंत सुशील, धर्मपरायण, श्रेष्ठ पतिव्रता होती. हा ब्राम्हण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे. जे काही मिळेल तय्त तो आनंदाने राहत असे. आहे त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथीची पूजा करीत असे. त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत पाठवीत नसे. कोरडे भिक्षान्न, अतिथीसेवा व ईश्वराचे भजन-पूजन यांत तो ब्राम्हण आपल्या पत्नीसह सुखात होता.

एकदा काय झाले, श्रीगुरुनृसिंहसरस्वती त्या ब्राम्हणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्या ब्राम्हणाने श्रीगुरुंना घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले. परमेश्वर भावभक्तीचा भुकेलेला असतो. त्याला भावभक्तीने पत्रं, पुष्पं, फलं, तोयं यातले काहीही अर्पण केले असत ते तो आनंदाने स्वीकारतो. त्या ब्राम्हणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीने श्रीगुरू प्रसन्न झाले व 'तुझे दारिद्र्य गेले' असा त्यांनी त्या ब्राम्हणाला आशीर्वाद दिला. संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ब्राम्हणाच्या दारातील घेवड्याचा टाकला.

श्रीगुरुंनी घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राम्हणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली. ती म्हणाली, "अहो काय, आमचे दुर्दैव ! त्या यातील आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्न तोडले ?" असे म्हणून ती श्रीगुरुंना दोष देऊ लागली. त्या ज्ञानी ब्राम्हणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही. तो तिला रागावून म्हणाला, "तू श्रीगुरुंना वाईट बोलू नकोस. सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच घडत असते. त्या परमेश्वराने अगोदर अन्नपाण्याचे व्यवस्था केली व मग चौऱ्याऐंशीलक्ष सृष्टी निर्माण केली. आपण पूर्वजन्मी काही पाप-पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावेच लागते. जे पेरावे तेच उगवते. त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही. त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव." श्रीगुरुंनी घेवड्याचा वेल उपटून टाकला होता. आता सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राम्हणाने कुडाळ घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य ! त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राम्हणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला. ही तर त्या श्रीगुरूंची कृपा ! श्रीगुरू आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला. ते सामान्य मनुष्य नाहीत. यतिवेष धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत. त्यांनी आमचे दैन्य-दारिद्र्य नाहीसे केले." असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंचा जयजयकर केला.

मग तो ब्राम्हण आपल्या पत्नीसह संगमावर गेला. दोघांनी श्रीगुरुंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठय भक्तिभावाने पूजा केली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्रीगुरुंना सांगितला. श्रीगुरू त्यांना म्हणाले, "जे घडले ते कुणालाही सांगू नका. जर कुठे बोलला तर आलेली लक्ष्मी निघून जाईल.तुम्हाला सर्व सुखे लाभतील. तुमच्या वंशात लक्ष्मी कायम राहील. तुमचे इहपर कल्याण होईल." श्रीगुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राम्हण पती- पत्नीला अतिशय आनंद झाला.

ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरूनृसिंह-सरस्वतींचे माहात्म्य असे आहे म्हणून त्यांना शरण जावे. त्यांची भक्तिभावाने पूजा करावी. त्यामुळे आपले इहपरलोकी कल्याण होईल."

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'अमरपूर माहात्म्य - ब्राम्हणाचे दारिद्र्य गेले' नावाचा अध्याय अठरावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments