श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेविसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेविसावा श्रीगुरूंचे गाणगापुरात आगमन -ब्रम्हराक्षसाचा उद्धार !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरुंच्या कृपाशीर्वादाने त्या ब्राम्हणाच्या घरातील वांझ म्हैस दुभती झाली आणि त्या दरिद्री ब्राम्हणाचे दारिद्र्य कायमचे गेले ही वाट सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राम्हणाकडे आले व नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्याची वांझ म्हैस भाड्याने मागू लागले, तेव्हा तो ब्राम्हण म्हणाला, "माझी म्हैस दुभती आहे. दोन दोन घागरी दूध देते. सी म्हैस मी माती वाहण्यासाठी मी देणार नाही." ब्राम्हणाने असे सांगितले असता ते लोक आश्चर्याने अवाक झाले. ब्राम्हणाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसेना, ते म्हणाले, "कालपर्यंत वांझ असलेली म्हैस आज अचानक दुभती कशी झाली ? तेव्हा त्या ब्राम्हणाने तय लोकांना गोठ्यात नेउन त्यांच्या देखत त्या म्हशीने दोन घागरी दूध काढून सर्वांना दाखविले. त्यामुळे लोकांची खात्री पटली. ते आले तसे परत गेले. ही बातमी गावभर झाली, ही बातमी गावाच्या राजाला समजताच तो त्या ब्राम्हणाच्या घरी गेला. त्या ब्राम्हणाने सगळी हकीगत सांगताच त्या राजालाही श्रीगुरूनृसिंह-सरस्वतींच्या भेटीची ओढ लागली.
मग तो आपल्या परिवारासह समारंभपूर्वक संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनाला गेला. श्रीगुरुंच्या चरणांना मोठ्या भक्तिभावाने वंदन करून तो म्हणाला, "स्वामी, आज आपल्या दर्शनाने मी खरोखर धन्य झालो. आपण साक्षात त्रैमूर्ती अवतर आहात. आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना आपले माहात्म्य कसे कळणार ? आपणच या जगाचे उद्धारकर्ते आहात. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर अवतार घेतला आहे. आपण मनुष्यवेषधारी परमेश्वर आहात. मी अज्ञानी नरजीव आहे. आपण माझा उद्धार करा.
त्या राजाने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते त्याला म्हणाले, "आम्ही अरण्यवासी संन्यासी. आमच्याकडे तुझे काय काम आहे ? तू आपल्या परिवारासह येथे कशासाठी आला आहेस ? तुला काय हवे आहे ? " त्यावर तो राजा हात जोडून म्हणाला, "आपण भक्तजनांचा उधार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात. भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार आहे. आपण असे वनवासात का राहता ? आपण येउन राहिलात तर सर्व लोकांवर मोठे उपकार होतील. गाणगापुर हे महास्थान आहे. आपण ते पावन करावे. आपल्यासाठी तेथे मठ बांधून देतो. तेथे राहून आम्हा सर्वांचा उद्धार करावा." राजाने अशी विनंती केली असता, 'भक्तजनांच्या उद्धारासाठी आंता प्रकट होण्याची वेळ आली आहे' असा विचार करून श्रीगुरुंनी गाणगापुरात येण्याचे मान्य केले. श्रीगुरुंनी मान्यता देताच राजाला आनंद झाला. त्याने श्रीगुरुंच्यासाठी पालखी सजविली. मग त्या वाद्यांच्या गजरात व जयघोषात श्रीगुरुंना गाणगापुरास नेले. गावाच्या वेशीवर लोकांनी त्यांचे मोठे स्वागत केले व त्यांना गावात नेले.
त्या गावाच्या पश्चिमेला एक भला मोठा उंच पिंपळवृक्ष होता. त्या वृक्षाजवळ एक घर होते. पण ते पूर्ण ओसाड होते. त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर ब्रम्हराक्षस होता. तो माणसांना ठार मारून खात असे. सव लोकांना त्याची भीती वाटत असे, त्यामुळे त्या घरात कोणीही राहत नसे. श्रीगुरूंची पालखी त्या घराजवळ येताच तो ब्रम्हराक्षस पिम्पळावरून खाली आला व श्रीगुरुंच्या पाया पडून हात जोडून म्हणाला, "स्वामी, माझा उद्धार करा ! मी घोर अंधारात बुडालो आहे. आज आपले दर्शन होताच माझी पूर्वजन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली आहेत. आपण प्राणिमात्रांवर दया करणारे आहात ,म्हणून माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे." श्रीगुरुंनी त्याची आर्तता ओळखली. त्यांनी मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याचक्षणी त्याला मनुष्यरूप प्राप्त झाले. त्याने श्रीगुरुंच्या चरणांवर लोळण घेतली. श्रीगुरु त्याला म्हणाले, "तू ताबडतोब संगमावर जा व तेथे स्नान कर. तू मुक्त होशील. तुला पुनर्जन्म मिळणार नाही." श्रीगुरुंनी असे सांगताच तो ब्रम्हराक्षस भीमा-अमरजा संगमावर गेला. तेथे स्नान करताच तो मुक्त झाला. हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले, "अहो, आपल्या गाणगापुरात आलेले स्वामी साक्षात त्रैमूर्ती ब्रम्हा-विष्णू-महेश आहेत. आपले भाग्य थोर म्हणूनच त्यांचे चरणदर्शन लाभले.
राजाने गाणगापुरात श्रीगुरुंसाठी सुंदर मठ बांधून दिला. श्रीगुरू त्या मठात राहू लागले. राजा दररोज मोठ्या भक्तिभावाने यथासांग पुजाअर्चा करीत असे. श्रीगुरु नित्यनेमाने रोज अनुष्ठानासाठी संगमावर जात असत व मध्यान्हकाळी मठात परत येत असत. कधी कधी तो राजा श्रीगुरुंना पालखीत बसवून राजेशाही थाटात संगमावर नेत असे व परत आणत असे. वास्तविक श्रीगुरुंना असल्या थाटामाटाची, ऐश्वर्याची काहीच आवश्यकता नव्हतील पण तो राजा मोठा श्रद्धाळू, भाविक होता. श्रीगुरूंचा भक्त होता. परमेश्वर भक्ताधीन असतो, म्हणूनच श्रीगुरू राजाला समाधान वाटावे त्याच्या इच्छेला मन देत असत. श्रीगुरू मठात आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होऊ लागली. त्यावेळी 'कुमसी' नावाच्या गावात त्रिविक्रमभारती नावाचा एक वैदिक तपस्वी ब्राम्हण राहात होता. तो तीन वेद जाणणारा होता. तो श्रीगुरू नृसिंहाचा परमभक्त होता व तो नित्य नृसिंहाची मानसपूजा करीत असे. श्रीगुरू नृसिंहसरस्वतींची कीर्ती त्याच्या कानावर आली. तो स्वतःशीच म्हणाला, "हा गाणगापुरात आलेला संन्यासी मोठा दांभिक वाटतो. हा स्वतःला संन्यासी म्हणवितो आणि राजाच्या पालाखीतून मिरवितो. याला काय म्हणावे ? खऱ्या संन्याशाला या डामडौलाची, पालखीची काय गरज ?" हा त्रिविक्रमभारती आपली निंदा करतो हे श्रीगुरुंनी अंतर्ज्ञानाने ओळखले. मग त्यांनी त्याला भेटण्याचे ठरविले.
ही हकीगत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, यानंतर एक अपूर्व कथा घडली ती मी तुला सविस्तर सांगतो. ती तू एकाग्रचित्ताने ऐक."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरूंचे गाणगापुरात आगमन -ब्रम्हराक्षसाचा उद्धार' नावाचा अध्याय तेविसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment