श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सत्ताविसावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सत्ताविसावा गर्विष्ठ ब्राम्हणांना शिक्षा !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून त्यांचे स्तवन केले आणि विचारले, "श्रीगुरुंनी त्या ब्राम्हणांना चारही वेदांचा विस्तार समजावून सांगितला ,मग झाले ते मला सविस्तर सांगा." नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले "नामधारका, श्रीगुरूंची महती किती सांगावी ? त्यांनी त्या मूर्ख ब्राम्हणांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला, त्यांचे हिताहित कशात आहे हेही सांगितले, पण काहीही उपयोग झाला नाही. 'वादविवाद करा नाहीतर जयपत्र द्या' हाच ठेका त्यांनी धरला. त्या ब्राम्हणांचा हा दुराग्रह पाहून श्रीगुरू संतापले. ते म्हणाले, "ठीक आहे. जशी तुमची इच्छा ! दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे त्यांनी स्वतःचे घेण्याचे ठरविले, त्याला कोण काय करणार ? याचवेळी श्रीगुरुंना दूर अंतरावर एक वाटसरू दिसला. श्रीगुरू आपल्या शिष्याला म्हणाले, "त्या वाटसरूला बोलावून आमच्याकडे आण." त्या शिष्याने त्या वाटसरूला बोलावून आणले. श्रीगुरुंनी त्याची नीट चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, "महाराज, मी हीन जातीचा मातंग आहे, म्हणून गावाच्या बाहेर राहतो. माझे पूर्वपुण्य मोठे आहे म्हणूनच मला आज तुमचे दर्शन घडले." असे म्हणून त्याने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला.

श्रीगुरुंनी एक शिष्याला आपला दंड दिला व जमिनीवर समांतर रेषा काढण्यास सांगितले. त्या शिष्याने जमिनीवर सात रेषा काढल्यावर श्रीगुरू त्या मातंगाला म्हणाले, "आता तू एकेक रेषा ओलांडून पुढे ये. मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच पुढची रेषा ओलांडायची आहे." श्रीगुरुंनी सांगताक्षणीच तो मनुष्य पहिली रेषा ओलांडून पुढे आला. त्याचक्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली. श्रीगुरुंनी त्याला विचारले, "तू कोण आहेस ? तुझी जात कोणती ?" तो म्हणाला, "मी भिल्ल जातीचा आहे. माझे नाव 'वनराखा'. दुसरी रेषा ओलांडताच त्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. तो त्या जन्मातील अनेक गोष्टी सांगू लागला. ते पाहून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडताच त्या मनुष्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. तो म्हणाला, "माझे नाव 'गंगासुत'. मी गंगेच्या काठी राहत होतो." चौथी रेषा ओलांडताच तो म्हणाला, "माझे नाव 'सोमदत्त' मी वैश्य आहे." सहावी रेषा ओलांडताच तो म्हणाला, "मी क्षत्रिय असून माझे नाव 'गोवर्धन'." सातवी रेषा ओलांडताच तो म्हणाला, "माझे नाव अध्यापक. मी ब्राम्हण असून मी वेद्शास्त्र व्याकरणात पारंगत आहे."

त्या मातंगाने असे सांगताच श्रीगुरुंना अतिशय आनंद झाला. ते त्या मातंगाला म्हणाले, "तू स्वतःला वेद्शात्रपारंगत ब्राम्हण म्हणवितोस, तर आता एक काम कर. येथे हे दोन ब्राम्हण आले आहेत, त्यांच्याशी वेदांवर वादविवाद कर." असे बोलून श्रीगुरुंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्या मातंगाच्या सर्व शरीराला लावली. विभूतीचा स्पर्श होताच त्या मातंगाच्या ठिकाणी पूर्णज्ञानाचा उदय झाला. मानस सरोवरात बुडी मारताच कावळ्याचा राजहंस होतो, त्याप्रमाणे श्रीगुरुंच्या हृदयस्पर्शाने तो मातंग परमज्ञानी झाला. तो खड्या आवाजात सुस्वरात वेदमंत्र म्हणू लागला. हा सगळा चमत्कार त्रैमूर्ती श्रीनृसिंहसरस्वतींच्या दैवी सामर्थ्याचा ! अज्ञानी लोक त्यांना सामान्य मनुष्य समजताच त्यांचा अधःपात होतो. त्या मातंगाचे ते सुस्वर वेदपठण ऐकताच वादविवादासाठी आलेले ते दोन गर्विष्ठ ब्राम्हण भयचकित झाले. त्यांना एक शब्दही बोलता येईना. त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला. सर्वांगाला घाम फुटला. त्यांनी स्वतःची निंदा करीत श्रीगुरुंच्या चरणांवर लोळण घेतली. ते श्रीगुरुंना म्हणाले, "आम्ही अज्ञानी, मूर्ख आहोत. आम्हाला वाचवा. आम्ही गुरुद्रोही, ब्राम्हणद्रोही आहोत. तुमचे स्वरूप आम्ही ओळखले नाही. तुम्ही साक्षात शिवशंकर आहात. तुम्ही कृपाळू आहात. आमच्यावर दया करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आमचा उद्धार करा."

त्या ब्राम्हणांनी अशी विनवणी केल असता श्रीगुरू म्हणाले, "तुमच्या अपराधांना क्षमा नाही. तुम्ही मदांध होऊन त्रिविक्रमभारतीला त्रास दिलात. त्यांचा अपमान केलात. अनेक ब्राम्हणांचा तुम्ही धिःकार केलात. विद्येच्या गर्वाने उन्मत्त होऊन तुम्ही करू नयेत अशा अनेक वाईट गोष्टी केल्यात. आता भोगा आपल्या पापांची फळे. तुम्ही ब्रम्हराक्षस व्हाल." ही शापवाणी ऐकताच ते ब्राम्हण शोकाकुल झाले. ते उःशाप मागू लागले. त्यावर कृपामुर्ती श्रीगुरू म्हणाले,"तुम्ही बारा वर्षे ब्रम्हराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. पुढे तुम्हाला एक ब्राम्हण भेटेल. तेव्हा तुम्ही 'शुक्ल-नारायण' असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल, तेव्हाच तुमचा उद्धार होईल. आता तुम्ही नदीवर जा.

श्रीगुरुंनी असे सांगताच ते ब्राम्हण गावाबाहेर गेले.नदीच्या तीरावर जाताच त्यांची हृदयक्रिया बंद पडली व त्यांना मृत्यू आला.कृतकर्माचे फळ ज्याने त्यानेच भोगावे लागते. त्या आत्मघातकी ब्राम्हणांना गुरुशापाने मृत्यू आला व ते ब्रम्हराक्षस झाले.

'ते ब्राम्हण निघून गेल्यावर त्या मातंगाचे काय झाले ?' असे नामधारकाने विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, "श्रीगुरुंनी ज्या मातंगाला सात रेषा ओलांडावयास लावल्या व त्याला त्याच्या मागील अनेक जन्मांचा अनुभव दिला तो श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाला, "पूर्वजन्मी मी ब्राम्हण होतो. मग माझी अशी अधोगती का झाली ? मी कोणते पाप केले होते ते मला सांगा." त्या मातंगाने अशी विनंती केली असता श्रीगुरु त्याला त्याचा पूर्ववृत्तांत सांगू लागले."

ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, श्रीगुरुचारित्रातील पुढील कथा जे श्रवण करतील जे महापातकी असले तरी ब्रम्हज्ञानी होतील. ही श्रीगुरुचरित्रकथा अत्यंत पुण्यदायक असून ती श्रवण केली असता चारी पुरुषार्थ प्राप्त होतात.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'अध्याय सत्ताविसावा' नावाचा अध्याय सत्ताविसावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments