श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तिसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तिसावा विधवेचा शोक - ब्रम्हचाऱ्याचा उपदेश !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्ध्योग्यांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करून म्हणाला, "स्वामी, सिद्धमुनी, तुमचा जयजयकार असो. तुम्हीच संसारसागर तारक आहात. तुम्हीच अज्ञानरुपी अंधार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे आहात. तुमच्या कृपारुपी नौकेने मला तारूण नेले आहे. तुम्ही मला खरा मार्ग दाखविलात, त्यामुळे मला परमार्थाची प्राप्ती झाली. तुम्ही मला श्रीगुरूचरित्ररुपी अमृतरस भरपूर पाजलात. तरीसुद्धा माझी पूर्ण तृप्ती झालेली नाही. तुम्ही माझ्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल मी जन्मोजन्मी उतराई होऊ शकणार नाही. अहो सिद्धमुनी, तुम्ही मला निजस्वरूप दाखविले आहे. श्रीगुरूनृसिंहसरस्वतींनी एका पतिताकडून चारी वेद वदविलेत. त्रिविक्रमभारतीला ज्ञानोपदेश केला हे सर्व तुम्ही मला सविस्तर सांगितले आहे. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्ध्योग्यांना अतिशय आनंद झाला. नामधारकाला प्रेमाने छातीशी धरून म्हणाले, "बा शिष्या, खरोखर तू धन्य आहेस. तुझ्य्वर गुरुची पूर्ण कृपा आहे. तू संसारसागर तारूण गेला आहेस. श्रीगुरुंच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. खरोखर श्रीगुरुमहिमा अत्यंत गहन आहे. मी एकेक महिमा सांगत बसलो तर कथा खूप मोठी होईल. तरीसुद्धा तुला सारांशरूपाने सांगतो."
श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली. अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन श्रीगुरुंना भेटावयास येत असत. श्रीगुरुंच्या दर्शनाने त्यांच्या अडचणी दूर होत असत. दरिद्री लोक श्रीमंत होत. वंध्य स्त्रीला पुत्रलाभ होत असे. श्रीगुरुंच्या दर्शनाने कुष्ठरोगाने ग्रासलेल्याचा देह सुंदर होत असे. अंधाला दृष्टी लाभत असे. बहिऱ्याला चांगले ऐकू येत असे. असाध्य रोगाने ग्रासलेल्या उत्तम आरोग्य लाभत असे. अनेक आर्त दुःखी-कष्टी, पीडित लोकांच्या कामना श्रीगुरुंच्या केवळ दर्शनाने पूर्ण होत असत. त्या काळी माहूरगडावर गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राम्हण राहत होता.तो आणि त्याची पत्नी दोघेही श्रीदत्तात्रेयाची उपासना करीत असत. त्या दोघांचे दुर्दैव असे की, त्यांना झालेला मुलगा जगात नसे. काही दिवसांनी त्यांना श्रीदत्तात्रेयांच्या कृपेने एक पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव 'दत्त' असे ठेवले. एकुलता एक पुत्र म्हणून त्याचे खूप लाड व कौतुक होत असे. पाचव्या वर्षी त्यांनी दत्ताची मुंज केली. बाराव्या वर्षी त्याचा विवाह केला. त्याची पत्नी दिसावयास अतिशय सुंदर होती. ती आपल्या सासूसासऱ्यांची मोठ्या प्रेमाने सेवा करीत असे. ती मोठी पतिव्रता होती. सुस्वभावी होती. दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत असत. विवाहानंतर तीन वर्षांनीच दत्ताला असाध्य असा क्षयरो झाला. अनेक औषोधोपचार केले, नवससायास केले; पण कशाचा काही उपयोग होत नव्हता. रोग बळावत चालला होता. त्याच्या पत्नीने व आई-वडिलांनी श्रीदत्तात्रेयाचा धावा केला. श्रीदत्तगुरूंच्या कृपेने हा पुत्र झाला होता. असे असतानाही हा अल्पायुषी ठरावा याचे त्यांना अतिशय वाईट वाटत होते. शेवटी वैद्य म्हणाले, "आता याला केवळ परमेश्वरच वाचवू शकेल. आपल्या हातात काही नाही." वैद्याचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून आई-वडील शोक करीत श्रीदत्तगुरूंचा धावा करू लागले, "हे जगन्नाथा. दत्तात्रेया, आम्ही आराधना केली त्यामुळे प्रसन्न होऊन तू आम्हाला हा पुत्र दिलास. आमच्या वंशातला हा एकुलता एक पुत्र ! हा जगला-वाचला नाही तर आम्ही प्राणत्याग करू." आई-वडिलांची ही अवस्था पाहून दत्तला अतिशय वाईट वाटले. तो त्यांना म्हणाला, "खरे तर मी तुमची सेवा करावयास हवी; पण आज दुर्दैवाने तुम्ह्लाच माझी सेवा करावी लागत आहे. पण आपण काय करणार ? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काही चालेनाहेच खरे!" तो आपल्या पत्नीला म्हणाला,"आता माझे काही खरे नाही ! तू माझ्यासाठी खूप कष्ट सोसलेस गतजन्मी तू माझी ऋणी असावीस.तू ऋण या जन्मी माझी सेवा अक्रुन तू फेडते आहेस. तुझी इच्छा नसेल तर तू येथे राहू नको. तू तुझ्या आई-वडिलांकडे जा. तेथे तरी तुला सुख लागेल. माझ्याशी विवाह करून ती दैवहीन झालीस. आता तुझे सौभाग्याही राहणार नाही, म्हणून तू माहेरी जा." हे त्याचे शब्द ऐकताच ती शोक करू लागली. ती म्हणाली, "तुम्ही असे का म्हणता ? तुमच्याशिवाय जिवंत राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन." मग ती शोक करीत असलेल्या सासू-सासऱ्यांचे संतवाण करीत म्हणाली, "तुम्ही कसलीही काळजी करू नका. धीर सोडू नका. माझे पती नक्की वाचतील. गाणगापुरास स्वामी नृसिंहसरस्वती आहेत. ते त्रैमूर्तीचा अवतार आहेत. त्यांचं केवळ दर्शनाने माझे पती बरे होतील. अशी माझी श्रद्धा आहे. मी यानान घेऊन तिकडे जाते." सासू-सासऱ्यांनी होय-नाही करीत शेवटी नाईलाजाने परवानगी दिली. मग ती पतिव्रता सासू-सासऱ्यांच्या पाया पडून आपल्या आजारी पतीला एका डोलीत बसवून मोठ्या प्रयासाने गाणगापुरास आली. ती एका धर्मशाळेत उतरली. तिने श्रीगुरूंची चौकशी केली तेव्हा श्रीगुरू संगमावर गेले आहेत असे लोकांनी सांगितले.
तिने श्रीगुरुंना भेटण्यासाठी संगमावर जाण्याचे ठरविले. तिने डोलीत पहिले तो काय ? तिचा पती गतीप्रण झालेला होता. ते पाहताच तिला ब्रम्हांड आठवले. तिच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला. पतीचा गतप्राण झालेला देह पाहून तिने हंबरडा फोडला. ती आक्रोश करू लागली. जमिनीवर गडबडा लोळू लागली. जीव देण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा जवळपासच्या लोकांनी तिला कसेबसे सावरून धरले. लोक तिचे सांत्वन करू लागले पण तिचा शोक काही थांबेना, "अरे देवा, हे काय झाले ? मी मोठ्या आशेने येथे आले, पण माझी पूर्ण निराशा झाली.
एखाद्या वाटसरू सावलीसाठी वृक्षाखाली यावा आणि तो वृक्षच त्याच्यावर कोसळावा. वाघाच्या भीतीने गाय पळत सुटावी पण वाटेत एखाद्या यवनाने तिला ठार मारावे, त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. मी खरोखर मोठी पापी आहे, अपराधी आहे. मीच माझ्या पतीचा घात केला. माझे सासूसासरे नको नको म्हणत असतानासुद्धा मी माझ्या पतीला येथे घेऊन आले ! आता त्यांना मी काय सांगू ? " असे बोलून ती शोक करीत असता काही स्त्रिया तिचे सांत्वन करीत म्हणाल्या, "तू विनाकारण का बरे शोक करतेस ? जे होणार ते कधीही चुकत नाही. ललाटी जे नशीब लिहिले आहे ते पुसून टाकता येत नाही." तरीही तिचा शोक थांबेना. मी लहानपणी हरितालिकेची पूजा केली होती. विवाहानंतर सौभाग्यासाठी मंगलागौरीचीही पूजा केली. सौभाग्याच्या आशेने देवीभवानीला मी साकडे घातले. अनेक व्रते, उपवास केले पतीला बरे वाटावे म्हणून ज्यांनी जे जे सांगितले ते सगळे केले. मग माझे सगळे पुण्य कोठे गेले ? मी शिवगौरीचीही पूजा केली ती व्यर्थच गेली ! आता मी माझ्या पतीशिवाय जिवंत कशी राहणार ? पतीच्या प्रेताला आलिंगन देऊन ती म्हणाली, "तुम्ही माझे प्राणेश्वर होता. आता तुमच्याशिवाय मी कशाला जगू ? तुमच्या विरहाने तुमचे आई-वडील प्राणत्याग करतील. या तीन हत्यांना मलाच जबाबदार धरून लोक माझी निंदा करतील." असा ती शोक करीत होती. तिची अवस्था पाहून लोकांनाही रडू आले.
त्याचवेळी तेथे एक तेजस्वी, तपस्वी ब्रम्हचारी आला. त्याने सर्वांगाला भस्म लावले होते. तो जटाधारी होता. त्याच्या गळ्यात रुद्राक्षमाळा होत्या. हातात त्रिशूल होते. तो त्या शोकाकुल स्त्रीची विचारपूस करीत म्हणाला, "तू विनाकारण का बरे शोक करीत आहेस ? कपाळी जे लिहिले गेले असेल तसेच घडते. जे प्रारब्धात असते ते भोगावेच लागते. तू अशी आठ दिवस शोक करीत बसलीस तरी तुझ्या पतीच्या प्रेतात प्राण येणार नाहीत. या जगात मृत्यू कोणाला चुकला आहे ? तू ज्याला पती म्हणतेस तो पूर्वी कोठे होता ? तुझा जन्म कोठे झाला ? पूर्वी तुझे आई-वडील कोण होते ? समुद्रात योगायोगाने दोन लाकडे एकत्र येतात, पण पाण्याच्या एकाच लाटेने ती एकमेकांपासून दूर जातात. ती पुन्हा कधीही एकत्र येत नाहीत. तशीच सर्व नातीगोती असतात. एखाद्या वृक्षावर काही पक्षी विश्रांतीसाठी येउन बसतात व पुन्हा चारी दिशांना उडून जातात. हा संसार असाच आहे. येथे कोणीही कायमचा टिकत नाही. हा संसार क्षणभंगूर आहे. मृत्यूपुढे कोणाचे काहीही चालत नाही. नातीगोती, आप्तस्वकीय सर्व काही क्षणिक आहे. मृत्यू कोणालाही टळत नाही. कुणाला तो बालपणी, तरुणपणी येतो तर कुणाला तो वृद्धापकाळी येतो; पण तो येतोच येतो. दुसरे असे की हा देह पंचभौतिक आहे. या देहातून प्राण गेले की त्या देहाला दुर्गंधी सुटते. केवळ रक्तमांस, अस्थी इत्यादींनी बनलेल्या या देहाचा मोह कशासाठी धरायचा ?" त्या ब्रम्हचाऱ्याने असा परोपरीने उपदेश केला असता त्या स्त्रीचे समाधान झाले. तिला सत्यज्ञान झाले. ते त्या ब्रम्हचाऱ्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाली, "स्वामी, माझा उद्धार करा. तुम्हीच माझे मायबाप आहात. आता मी काय करावे ? मी काय केले असता हा संसारसागर तारूण जाईन ? तुम्ही सांगाल ते मी करीन." त्या स्त्रीने अशी विनंती केल असता त्या ब्रम्ह्चाऱ्यास आनंद झाला, मग त्याने पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीने काय करावे, काय करू नये. परमार्थचिंतन व्रतस्थ कसे राहावे हे सर्व सविस्तर सांगण्यास सुरुवात केली.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'विधवेचा शोक - ब्रम्हचाऱ्याचा उपदेश' नावाचा अध्याय तिसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment