श्री गुरुचरित्र कथासार अध्याय विसावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय विसावा ब्राम्हण स्त्रीची पिशाच बाधा दूर केली !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, "महाराज, श्रीगुरू नृसिंह-सरस्वती योगीनींना आशीर्वाद देऊन गाणगापुरास गेले तरी ते गुप्तरूपाने औदुंबरक्षेत्री राहिले. असे तुम्ही सांगितले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव कधी कोणाला आला का ? श्रीगुरू गाणगापुरास गेल्यानंतर पुढे काय झाले ? ते सविस्तर सांगा. मला ते ऐकण्याची फार इच्छा आहे." नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनींना फार आनंद झाला ते म्हणाले, "नामधारका, औदुंबराचे माहात्म्य किती सांगावे ! आजपर्यंत अनेक चमत्कार झाले आहेत. ते सगळे सांगणे शक्य नाही; पण त्यातील एक मोठा अद्भुत चमत्कार सांगतो, तो लक्षपूर्वक ऐक.

शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक ब्राम्हण होता. त्याची पत्नी शांत, सरळ स्वभावाची होती. कशास काही त्यांना कमी नव्हते. परंतु त्यांना एक मोठे दुःख होते. त्यांना झालेला मुलगा जगात नसे. एक पिशाच त्यांना झालेल्या मुलाला मारून टाकत असे. त्यांना पाच पुत्र झाले पण त्यातील कोणीही जगला नाही. त्यामुळे ती ब्राम्हण स्त्री अतिशय दुःखी होती. मुले जगावीत म्हणून त्या दोघांनी अनेक नावासायास, व्रते, उपवास केले, अनेक देवदेवतांची आराधना उपासना केली; पण कशाचा काही म्हणून उपयोग झाला नाही. त्यामुळे ती पत्नी अतिशय निराश, उदास, दुःखी असत. आता यावर काय उपाय करावा ? प्रत्येक वेळी मुलगा जन्मास आला असता मारतो याचे कारण काय ? आणि यावर उपाय काय ? असे गंगाधराच्या पत्नीने त्याचा गावातील एका ब्राम्हणाला विचारले असता त्या ब्राम्हणाने त्यावर बराच विचार केला. त्याने अंतर्ज्ञानाने सर्व काही ओळखले. मग तो तिला म्हणाला, "तुझे पूर्वजन्मातील कर्माच या दुर्भाग्याला कारणीभूत आहे. पूर्वजन्मी तू शौनक गोत्रातील एका ब्राम्हणाकडून ऋण घेतले होतेस, त्याचे कर्ज तू फेडले नाहीस. त्याने तुझ्याकडे अनेक वेळा मागणी केली पण तू त्याच्या धनाचा अपहर केलास. त्याला फसविलेस. तो द्रव्यलोभी होता. शेवटी त्याने पैशासाठी प्राण सोडले. त्याच्या मृत्यूला तूच कारणीभूत झालीस. त्यामुळे तुला दुहेरी पातक लागले. त्या ब्राम्हणाच्या मृत्युनंतर त्याची उत्तरक्रियाही केलेली नाही. त्यामुळे तो पिशाच झाला आहे. तो तुझा गर्भपात करतो आणि मुलाचा जन्म झाला तर तो त्याला मारून टाकतो." यातून सुटण्याचा एकाच मार्ग आहे. त्या ब्राम्हणाची तू उत्तरक्रिया कर म्हणजे त्याला सद्गती प्राप्त होईल. श्राद्धकर्माच्या निमित्ताने त्याच्या शौनक गोत्रातील ब्राम्हणास शंभर रुपये दान कर . म्हणजे त्या ब्राम्हणाच्या द्रव्याचा अपहार केल्याचा दोष जाईल. अगोदर तू कृष्णातीरी जाऊन एक महिना उपवास व्रत कर . तेथे कृष्णा-पंचगंगा संगमावर अनेक तीर्थे आहेत. तेथे औदुंबर वृक्ष आहे. तेथे तू औदुंबराची आराधना कर. तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला सात वेळा पाणी घाल. श्रीगुरुंच्या चरणांवर अभिषेक करून यथासांग पूजा कर. असे एक महिनाभर कर. तेथे श्रीगुरू-नृसिंहसरस्वतींचे वास्तव्य आहे. मी सांगितले तसे केलेस की श्रीनृसिंहसरस्वतींच्या कृपेने तू पापमुक्त होशील. तुला शतायुषी पुत्र होतील. ब्राम्हणाला शंभर रुपये द्यावयाचे ते नंतर. ही सर्व कर्मे त्या ब्राम्हणाच्या प्रीत्यर्थ करावयाची आहेत. यामुळेच तुझे सर्व दोष जातील. तुझ्याजवळ धन नसेल तर तू चिंता करू नकोस. तू मनोभावे श्रीगुरूंची सेवा कर. ते कनवाळू आहेत. ते मात्र पापमुक्त करतील."

हे ऐकून त्या ब्राम्हण स्त्रीचे समाधान झाले. मग ती औदुंबरक्षेत्री आली. तेथे तिने संगमात स्नान करून श्रीगुरुचरणांची पूजा केली. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. याप्रमाणे तीन दिवस सर्वकाही यथासांग केले. तिसऱ्या दिवशी ती झोपेत असताना तो आत्महत्या केलेला ब्राम्हण आला व तिला दरडावून म्हणाला, "तू माझे शंभर रुपये दे नाहीतर तुला ठार मरीन. इतकेच काय मी तुंच वंश वाढून देणार नाही. तुझे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. तुला पुत्र होणार नाही. झालाच तर तो जगणार नाही." असे म्हणून तो पिशाच ब्राम्हण तिला मारण्यासाठी धावला. भयभीत झालेली ती स्त्री औदुंबराआड लपली. तेथे तिला श्रीगुरू दिसले. ती त्यांच्यामागे लपून बसली. श्रीगुरुंनी तिला अभय दिले. मग त्यांनी त्या पिशाच ब्राम्हणाला दरडावून विचारले, "काय रे, तू या स्त्रीला कशासाठी मारतो आहेस ?" त्यावर पिशाच ब्राम्हण म्हणाला, "स्वामी, या गतजन्मी माझ्या धनाचा अपहार केला. त्या दुःखाने मी प्राणत्याग केले. स्वामी, आपण कनवाळू आहात, कृपाळू आहात. तुमचे सर्वांवर प्रेम आहे. तुम्ही या स्त्रीची बाजू घेऊन पक्षपात करू नये." त्यावर श्रीगुरू संतापून म्हणाले, "तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर मी तुला शिक्षा करीन. मी सांगतो तसे वाग. यातच तुझे कल्याण आहे. ती जे काही देईल ते मुकाट्याने स्वीकार. तुला ताबडतोब चालू लाग.माझ्या भक्ताचे रक्षण कसे करायचे ते मी पाहीन. मी माझ्या भक्ताची वंशवृद्धी करीन.आता जर पुन्हा परत आलास तर मी तुला कडक शिक्षा करेन."

श्रीगुरुंनी असे ठणकावून सांगितले असता वरमलेला तो पिशाच ब्राम्हण श्रीगुरुंना वंदन करून म्हणाला, "स्वामी, माझे भाग्य थोर म्हणून तुमचे दर्शन घडले. आता माझा उद्धार करा. तम्ही आज्ञा करेल तसे मी वागेन." त्यावर श्रीगुरु म्हणाले, "या ब्राम्हण स्त्रीने तुझे उत्तरकार्य केल्यावर दहाव्या दिवशी तुला सद्गती प्राप्त होईल." त्या ब्राम्हण पिशाचाने ते मान्य केले. मग श्रीगुरु त्या ब्राम्हण स्त्रीला म्हणाले, "तुझ्याजवळ जे काही थोडे फार धन असेल ते त्या ब्राम्हणाच्या नावाने खर्च कर. अष्टतीर्थांत स्नान करून औदुंबराला जलाभिषेक कर. असे केलेस की तुझे ब्रम्हहत्या पाप नाहीसे होईल. तुला दीर्घायुषी कन्या-पुत्र होतील."

हे सगळे त्या स्त्रीने स्वप्नात पहिले. ऐकले. तिला एकाएकी जाग आली. तिने डोळे उघडून इकडे तिकडे पहिले, पण कोणीच दिसत नव्हते. स्वप्नात पाहिलेली गुरुमूर्ती तिच्या मनात ठसली होती. स्वप्नात श्रीगुरुंनी सांगितलेले सर्वकाही तिने केले. ती ब्रम्ह-हत्या-पातकातून मुक्त झाली व त्या पिशाचालाही मुक्ती मिळाली. एके दिवशी श्रीगुरुंनी तिला स्वप्नात दर्शन दिले. दोन नारळ तिच्या ओटीत घालून तिला म्हणाले, "आता तू व्रताचे उद्यापन कर. तुला शतायुषी आणि ज्ञानी पुत्र होतील. तुमची वंशवृद्धी होईल. आता कसलीही चिंता करू नको."

श्रीगुरुंनी असे सांगितले असता त्या ब्राम्हण दाम्पत्याला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीगुरुंच्या आज्ञेनुसार व्रताचे उद्यापन केले. ती ब्राम्हण स्त्री शापमुक्त झाली. काही दिवसांनी त्या स्त्रीला श्रीगुरुंच्या आशीर्वादाने दोन पुत्र झाले. मोठ्या पुत्राचे मौन्जिबंधन केले व धाकट्या पुत्राचे तिसऱ्या वर्षी चूडाकर्म विधी करण्याचे निश्चित केले; परंतु चूडाकर्मविधीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री तो मुलगा अचानक आजारी पडला आणि मरण पावला. आई-वडिलांना अतिशय दुःख झाले. मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ब्राम्हण स्त्री मोठ्यामोठ्यांदा रडू लागली. नात्यागोत्यातील लोक जमले. सर्वांनी परोपरीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. लोक म्हणाले, "जे विधिलिखित असते ते टळत नाही. देवांनाही मरण टळत नाही तेथे आपल्यासारख्या माणसांची काय कथा ? काळ हा मोठा बलवान आहे ! " लोकांनी तिला खूप समजविण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला ते पटत नव्हते. ती म्हणाली, "असे कसे होईल ? औदुंबरक्षेत्री वास्तव्य करणारे श्रीनृसिंहसरस्वती श्रीदत्तात्रेयाचे अवतार आहेत. 'तुला दीर्घायुषी पुत्र होतील' असा त्यांनी आशीर्वाद दिला आहे. तरीही असे कसे घडले ? श्रीगुरुंच्या वचनाला कमीपणा येत असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा ? आता मी काय मला मरण आले तर बरे होईल 'आंत मी प्राणत्याग करीन' असे म्हणून ती श्रीगुरुंना दोष देऊ लागली ती म्हणाली - "स्वामी महाराज, तुमचे वचन खोटे कसे ठरले ? तुमचे वचन म्हणजे ब्रम्हवाक्य ! त्याला आज तडा गेला. तुम्ही ध्रुवाला, बिभीषणाला वर दिलात हे तरी कसे मानायचे ? तुम्ही माझी उपेक्षा केलीत. वाघाला घाबरलेली गाय एखाद्याच्या आश्रयाला जावी आणि घात करावा तसेच हे घडले आहे.

रंजले गांजलेले अनेक मोठ्या आशेने औदुंबरक्षेत्री येतात. तुमची सेवा करतात. आता त्यांनी विश्वास कसा ठेवायचा ? आंत तुमची उपासना कोण आणि कशासाठी करील ?" असे बोलून ती अतिशय शोक करू लागली . प्रेताला कवटाळून ती रात्रभर रडत होती. अंत्यविधीसाठी पुत्राचे प्रेत देत नव्हती. 'आता मलाही जाळा' असे म्हणू लागली. लोक नाईलाजाने घरी परत गेले. याचवेळी तेथे एक बाल्ब्राम्हचारी आला. त्याने त्या स्त्रीला शांत करण्याचा प्रयत्न केला.

इतकी कथा सांगून सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, तो बालब्रह्मचारी म्हणजे मनुष्यवेष धरण केलेले श्रीगुरूनृसिंहसरस्वती होते. त्यांनी त्या स्त्रीला शांत करण्यासाठी जो उपदेश केल मी तो तुला आता सांगतो." ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, "हे श्रीगुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण-पठण करणारा मनुष्य शतायुषी होईल. या ग्रंथाचे परमश्रद्धेने श्रवण करणाऱ्याला कोणतीही शारीरिक व्याधी होणार नाही. झाली असल्यास ती तत्काळ नाहीशी होईल हे माझे शब्द माना."

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'ब्राम्हण स्त्रीची पिशाच बाधा दूर केली' नावाचा अध्याय विसावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments