गाईस दुग्धवती केलें.
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*🌺🙏।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🌺*
*श्री गुरूलीलामृत कथासार*
*🌺गाईस दुग्धवती केलें.🌺*
*पूर्णब्रह्म स्वरूप श्रीस्वामी समर्थ शके अठराशे सत्तावन्न साली, वर्षाऋतूत श्रावणमासी, प्रसिद्ध क्षेत्र मंगळवेढे ग्रामांत प्रवेश करून प्रथम दामाजी पंतांचें समाधीपाशी येऊन बसले. श्रीविठ्ठलाचा साक्षात्कार पावलेले सत्पुरुष म्हणून दामाजीपंतांची ख्याती आहे. तसेच एक परोपकारी सद्ग्रहस्थ म्हणून त्यांची ख्याती आहे. आणखीं काही पुण्यवान साधुसंत या नगरींत होऊन गेले. त्यात कृष्णभट कापशीकर नांवाचें एक विद्वान वैदिक ब्राह्मण होते. ते नित्य देवदर्शनांसाठी बाहेर जात असत. त्यांना अकस्मात श्री स्वामी समर्थ दिसलें. जवळ जाऊन त्यांनीं स्वामींना नमन केले. कोण, कोठून आले, वसतिस्थान कोणते आणि पुढें कोठे जाणार आहात ? याची चौकशी केली. त्यांचें पूर्वसुकृत चांगले, म्हणून त्यांना दिव्यकांती असलेली मनोहर, सुंदर, दिव्यशरीराकृती लाभलेली, प्रसन्नवदन भगवन् मूर्तीचें दर्शन झाले. दर्शन होतांच त्यांचें मन शांत झाले. समाधान वाटलें. त्यांनीं यतिश्वरांस प्रार्थना केली, "आता रात्रीचां समय झालेला आहे, तरी आपण आमच्या सदनीं चलावें." वास्तविक ओळख नसतांना सुध्दा या वैदिक ब्राम्हणांची श्रध्दा लक्षात घेऊन यतिराज त्यांच्या सदनीं गेले. त्यावेळी रात्रीचा एक प्रहर होऊन गेलेला होता. त्यावेळी यतिश्वरांसाठी कांहीं फलाहार सिध्द करावा अशी ब्राम्हणांनें पत्नीस सूचना केली. तेव्हा त्यांच्या पत्नी गीताबाई म्हणाल्या, "आपण अभागी दरिद्री, घरांत तांदळाचा एक कणही नांहीं, तेंव्हां या समयीं काय व्यवस्था करावी ?" त्यांचे हे संभाषण ऐकून स्वामी समर्थ म्हणाले, "आम्हांस दुधाची दशमी प्रिय आहे. यावेळी इतर कांहीं खटपट नको. असेल तेचि सिध्द करा." हे ऐकून गीताबाई दुधाचें भांडे घेऊन गौळीवाड्याकडें गेल्या. त्यांच्या दुर्दैवानें कोठेही दूध उपलब्ध झालें नाहीं. त्यांच्या मनाला खेद झाला. त्यांनां वाटले, कसले प्रारब्ध ओढवले. समर्थ आतां उपाशी राहातील. त्याचें आतां काय करावें. त्यांनीं घरांत येऊन विनम्रतेनें यतिरायास ही परिस्थिती कथन केली. "आमच्या हातून यापूर्वी ईश्वर सेवा घडली नांहीं म्हणून अशी परिस्थिती आली असावी. अशा जगण्यापेक्षा मरण आलेले काय वाईट ?" असें गीताबाई म्हणाल्या. त्यांच्या या बोलण्यावर समर्थ हसले व म्हणाले, "तुमच्या घरीं गाय असतांनां, तुम्ही इकडे तिकडे कशासाठी हिंडता. घरींच दूध उपलब्ध असतांना तुम्ही वृथा जसे कस्तुरीमृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी सुगंध भरलां असतांना, तो भलतीकडे शोध घेत फिरत असतो. शरीरांत आत्मदेव असतांना माणसें दुसरीकडेच व्यर्थ भ्रमण करीत असतात, किंवा घरात कामधेनू असतांना ताक मागण्यासाठी दुसरीकडे जातात. तुम्हीही त्याचप्रमाणे करीत आहात. घरांत गाय असूनही तुम्ही तिचें दूध काढत नांहीं." यावर गीताबाई म्हणाल्या, "या गाईचे दूध आटलें आहें. त्याला चारवर्षे होऊन गेली आहेत. तिचे वासरू असें दुधाशिवाय वाढले आहे. ती केव्हा दूध देईल हे कांहीच सांगतां येत नाही. आता आपल्या कृपादृष्टीनेच कांहीं उपयोग झाला तर होईल." त्यावर स्वामीराज प्रसन्न वदनांनें म्हणाले कीं, "आतां सत्वर उठून गाईचे दुग्ध दोहन करा. कोणताही संशय मनांत ठेवू नका." समर्थांची अशी आज्ञा ऐकून तें पती पत्नी सत्वर उठून एक स्वच्छ भांडे घेऊन आले. त्यांनीं गाईचें दोहन करावयास सुरूवात केली आणि काय आश्चर्य ? गाईला स्तनस्पर्शानें पान्हा फुटला, आणि भांड्यात झरझरा दुधाच्या धारा पडावयास सुरूवात झाली. एक नाहीं, दोन नाहीं, तीन पात्रें भरून दूध प्राप्त झालें. तरी पण दुधाच्या धारा चालुच होत्या. ब्राह्मण दूध काढून थकला. शरीर घामाघूम झालें. जेव्हा गुरूकृपादृष्टी वळतें, तेव्हां सौख्याची वृष्टी होते, याची ब्राम्हणास मनोमन जाणीव झाली. ब्राह्मण पत्नीनें दुधाची दशमी करून स्वामीरायांस संतोषविलें. ही बातमी दुसरें दिवशी सर्व ग्रामांत पसरली. हे नवल वर्तलेले ऐकून लोकांच्या झुंडीच्या झुंडी यतिश्वरांचें दर्शन घेण्यासाठी कृष्णभटाचे वाड्यात आल्या. दुधाची भरलेली पात्रें पाहून सर्वांनीं आश्चर्य व्यक्त केलें. अशाप्रकारे कृष्णभटावर कृपा करून श्री यतिश्वर तें घर सोडून निघून गेले. पुढील काळात कृष्णभटांचे चिरंजीव गोविंदभट समर्थकृपेनें सुखी संसार करत राहिले.*
Comments
Post a Comment