श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पंधरावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पंधरावा श्रीगुरुंचे वैजनाथक्षेत्री निरुपण !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "बा रे शिष्या, नामधारका, तुझी गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे. खरोखर, तू धन्य आहेस. तू मला विचारलेस - श्रीगुरूनृसिंहसरस्वती वैजनाथक्षेत्री गुप्तपणे का राहिले ? त्याचे कारण ऐक.

श्रीगुरू वैजनाथक्षत्री आले असता त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अनेक लबाड, स्वार्थी लोक आपल्या इच्छा, वासना पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. या कलियुगात अनेक लोक केवळ आपल्या वासनापूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात. त्यांना आपल्या गुरुपासून ज्ञान नको असते. त्यांना आपल्या वासना पूर्ण करावयाच्या असतात. पूर्वी परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय करून ब्राम्हणांना दिली. पण त्या ब्राम्हणांच्या कामना काही कमी झाल्या नाहीत. अनेक गोष्टी मागण्यासाठी ते येत. त्याच्या मागण्याला काही अंतच नव्हता, म्हणून तर ते गुप्त झाले.

विश्वव्यापक परमेश्वर काहीही देऊ शकतो; पण वरदानांतही पात्रापात्रतेचा विचार करावाच लागतो. स्वार्थी, लबाड लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून श्रीगुरु गुप्तपणे राहू लागले. नामधारका, त्यावेळी श्रीगुरू आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले, "तुम्ही आता भारतभर तीर्थयात्रा करीत फिरा. सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर "श्री शैल' पर्वतावर या."

श्रीगुरुंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्यांना अतिशय दुःख झाले. ते श्रीगुरुंच्या चरणांना वंदन करून म्हणाले, "स्वामी, आम्हाला सर्व तीर्थाची प्राप्ती होते. तुमचे चरण सोडून आम्ही कुठे जाणार ? 'श्रीगुरूचरणांची सर्व तीर्थे असतात' असे सर्व वेदशास्त्रे सांगतात. जवळ असलेल्या कल्पवृक्षाचा त्याग करून रानावनात कशासाठी जावे ? " त्यावर श्रीगुरू म्हणाले, " तुम्ही सर्व संन्यासी आहात. जो संन्यासी आहे त्याने एकाच जागी पाच दिवसांपेक्षा अधिककाळ राहू नये. म्हणून तुम्ही सर्वत्र

भ्रमण करा. तुमचे मन स्थिर होईल. मग एकाच जागी राहावे. या तीर्थाटनात तुम्हाला अधिक ज्ञान मिळावे अशी आमची इच्छा आहे. बहुधान्य संवत्सरात आम्ही श्रीशैल्यक्षेत्री असू. तेथेच आपली भेट होईल." श्रीगुरुंनी असे सांगितले असता सर्व शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, "तुमचे वाक्य आम्हाला परीसासमान आहे.जो आपल्या गुरुची आज्ञा मानीत नाही तो भयंकर अशा रौरव नरकात जातो. गुरुंची आज्ञा पाळणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे. म्हणून आम्ही आता तीर्थयात्रा करू. आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जावे ते कृपा करून सांगा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ." शिष्यांनी असे विचारले असता श्रीगुरू प्रसन्न झाले.

ते म्हणाले, "तुम्ही सर्वप्रथम काशीक्षेत्री जा. काशी हे या भूमंडलातील तीर्थराज आहे." असे सांगून त्यांनी गंगा, यमुना, सरस्वती, वरुणा, कुशावर्ती, कृष्णा, वेणी, वितस्ता, शरावती, मरुद्व्रुद्धा असिवनी, मधुमती, सुरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्त्रवक्त्रा, पूर्णा, बहुधा, वरुणा, वैरोचनी, सन्निहिता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कृतमाला, पंचगंगा, मलप्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाकयात्रा कराव्यात म्हणजे सर्व तीर्थाचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल. या नद्यांमध्ये स्नान करून जवळपासची सर्व गांवे व परिसर पाहावेत. प्रत्येक ठिकाणी क्रुच्छव्रत करावे.

श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ, रामेश्वर, श्रीरंग, पुष्कर, बदरी, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, गोकर्ण, कोटीतीर्थ, जगन्नाथपुरी, भीमेश्वर, अयोध्या, मथुरा, द्वारका, कुशातर्पण, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापुंर, नृसिंहतीर्थ, कोल्हापूर, भिल्लवडी, अमरापूर, युगालय, शूर्पालय, पीठापूर, शेषाद्री, वृषभाद्री, श्रीशैल इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य सांगून त्यांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली.

श्रीगुरुंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य ती आज्ञा मान्य करून तीर्थयात्रेला गेले. श्रीगुरू वैजनाथक्षेत्री गुप्तपणे राहिले. सरस्वती गंगाधर सांगतात. आता पुढील कथा श्रवण करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. श्रीगुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे. त्याचे श्रवण-पठण केले असता चारी पुरुषार्थ प्राप्त होतात.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरुंचे वैजनाथक्षेत्री निरुपण ' नावाचा अध्याय पंधरावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments