श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बत्तिसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बत्तिसावा पतिव्रतेचा आचारधर्म !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आलेल्या देवांना बृहस्पतींनी पतिव्रतेचा आचारधर्म कसा असावा हे सविस्तर सांगितले. पतिनिधनानंतर वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीने कसे वागावे ? काय करावे, काय करू नये. म्हणजेच विधवेचा आचारधर्म सविस्तर समजावून दिला. बृहस्पती म्हणाले, पतिनिधनानंतर पतिव्रता स्त्रीने सती जावे हे खरे; परंतु स्त्री गर्भवती असेल किंवा तान्हे मूल असेल तर तिने सहगमन करून नये. त्या स्त्रीला स्तनपान करणारे लहान मूल असताना जर तिने सहगमन केले तर ते महापाप ठरते. पती घरापासून दूर, बाहेरगावी निधन पावला असेल, तर सहगमन करण्याची गरज नाही. वैधव्य आलेल्या स्त्रीने विधवेच्या आचारधर्माचे यथाविधी पालन केले तर तिला सहगमन केल्याचेच पुण्य मिळते.
वैधव्य आलेल्या स्त्रीने केशवपन करावे. नित्य स्नान करावे. एकभुक्त असावे. एक धान्याचे अन्न खावे. तिने तीन दिवसांनी, पाच दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा महिन्यात तरी एक उपोषण करावे. किंवा चांद्रायण व्रत करावे. वृद्धापकाळी एकभुक्त असावे किंवा फलाहार, शाकाहार घ्यावा किंवा केवळ जीव तगविण्यासाठी दूध प्यावे. विधवेने पलंगावर झोपू नये. मंगलस्नान करू नये. अंगाला तेल लावू नये. सुगंधीद्रव्ये, फुले, विडा या गोष्टी वर्ज्य कराव्यात. पुत्र नसेल तर विधवेने पितरांच्यासाठी विधीपूर्वक तर्पण करावे. भगवान विष्णूची नित्यपूजा करावी. गुरु असतील तर त्यांचं संमतीने तीर्थयात्रा, उपवास, व्रते करावीत. आपण सुवासिनी असताना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या तय त्या वस्तूंचे सत्पात्री ब्राम्हणाला दान द्यावे. विष्णूचे स्मरण करीत माघस्नान करावे. वैशाखात जलकुंभदान करावे. कार्तिकात दीपदान, माघ महिन्यात तीळ व तूप यांचे दान करावे. वैशाखात पाणपोई घालावी. शंकराची पूजा करावी. त्यामुळे अनंत पुण्य लाभते. ब्राम्हणांच्या घरी पाणीपुरवठा करावा. अतिथीला अन्न द्यावे.अतिथीला पाय धुण्यासाठी पाणी द्यावे. त्याला छत्र, पादत्राणे द्यावीत. कार्तिकात सातूचे अन्न खावे. कास्यपात्रात भोजन करू नये. पत्रावळीवर जेवावे. कार्तिक महिन्यात वांगी, उडीद, मसूर, मीठ, तेल, मध व द्विदलधान्ये वर्ज्य करावीत. कार्तिकात घेतलेल्या व्रताचे उद्यापन करावे व ज्या गोष्टी वर्ज्य केल्या असतील त्यांचे ब्राम्हणाला दान द्यावे. कास्यपात्रातून तुपाचे दान द्यावे. भूमिशयन केले असल्यास पलंगाचे दान द्यावे.माघ महिन्यात ब्राम्हणाला तिळाचे लाडू द्यावेत. थंडीपासून निवारण होण्यासाठी सर्पण, वस्त्रे, घोंगडे यांचे दान करावे. भगवान शंकराची व विष्णूची यथाविधी पूजा करावी. शंकराला रुद्राभिषेक करावा. पुत्र असेल तर त्याचं आज्ञेत रहावे. 'आत्मा वै पुत्र नाम' म्हणजे पतीच पुत्ररूपाने जन्मास येतो हे श्रुतिवचन लक्षात ठेवावे. विधवेने कधीही चोळी घालू नये. पांढरे वस्त्र परिधान करावे. ही पुण्यकृते दिवंगत पतीला नरकापासून वाचवितात.
बृहस्पतीने अगस्त्यांच्या आश्रमात सर्व देवांना जो आचारधर्म सांगितला तो त्या ब्रम्हचारी तपस्व्याने त्या ब्राम्हणस्त्रीला सांगितला. मग तो तिला म्हणाला, "मी तुला दोन मार्ग सांगितले आहेत. सहगमन करणे किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करणे. तुला जो पसंत असेल त्या मार्गाने जा. दोन्ही मार्ग परलोकाची प्राप्ती करून देणारे आहेत. तुझ्याठिकाणी धैर्य असेल तर सहगमन कर किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करीत राहा. दोन्हींचे पुण्य सारखेच आहे.
ब्रम्ह्चाऱ्याने असे सांगितले असता ती ब्राम्हण स्त्री हात जोडून म्हणाली, "यतिमहाराज, मी खूप लांबून येथे आले आहे. माझ्याबरोबर माझ्या नात्यागोत्यातील कोणीही नाही. असे असताना तुम्ही माझे सांत्वन केलेत. मला सदुपदेश केलात. तुम्ही खरोखर माझे बंधू, वडील आहात. तुम्हीं मला दोन मार्ग दाखविलेत; पण विधवा म्हणून जगणे मला झेपणार नाही. मी तरुण आहे. कारण नसताना लोक माझी वाटेल तशी निंदा करतील. मला नको ती दूषणे देतील. मला वैधव्याने जगणे नकोसे होईल. त्यापेक्षा पतीबरोबर जाणेच योग्य ठरेल. मी सती जाण्यास तयार आहे."
त्यावर तो ब्रम्हचारी म्हणाला, "तुझी इच्छा असेल तसे कर. तू मोठ्या आशेने श्रीगुरुंचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून आली आहेस. तुझी इच्छा पूर्ण झाली नाही याचे वाईट वाटते; पण प्रारब्ध कुणाल चुकले आहे ? जे विधिलिखित आहे ते टळत नाही. तुला सहगमन करण्याची इच्छा आहे. ते ठीक आहे. पण तत्पूर्वी एक कर. देवादिकांनाही आपले विधिलिखित टाळता येत नाही, पण गुरुकृपेने ते विधिलिखित बदलू शकते, म्हणून तू सहगमन करण्यापूर्वी संगमावर जाऊन श्रीगुरुंचे दर्शन घे." त्या स्त्रीने मान्य केले.
त्या ब्रम्ह्चाऱ्याने तिच्या कपाळी भस्म लावले, तिला चार रुद्राक्ष दिले व सांगितले, "दोन रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांध. एकेक रुद्राक्ष त्याच्या दोन्ही कानांना बांध. श्रीगुरुंचे पाय धुताना ब्राम्हण रूद्सूक्त म्हणतात. ते चरणतीर्थ घेऊन स्वतःच्या व पतीच्या देहावर शिंपड. सुवासिनींना सौभाग्यवान दे. ब्राम्हणांना दक्षिणा दे. मग श्रीगुरूंची आज्ञा घेऊन सहगमन कर." असे सांगून ब्राम्हण अचानक दिसेनासा झाला. मग त्या ब्राम्हण स्त्रीने काही ब्राम्हणांना बोलावून आपल्या पतीच्या प्रेतावर योग्य ते संस्कार करविले. तिने स्नान करून सौभाग्यलंकार व वस्त्रे परिधान केली. कपाळी हळदकुंकू लावले. मग लोकांनी प्रेत नदीच्या काठावर नेले. मग ती स्त्री हातात अग्नी घेऊन प्रेताजवळ गेली. त्यावेळी ती केवळ सोळा वर्षांची होती. तिचं दर्शनासाठी गावातील अनेक स्त्रिया तेथे आल्या. त्या स्त्रीचा सती जाण्याचा दृढनिश्चय पाहून सर्व स्त्रिया तिची प्रशंसा करू लागल्या.
या पतिव्रतेने आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला. सर्व स्त्रियांना अशीच सद्बुद्धि होवो." असे त्या म्हणत होत्या. मग त्या स्त्रीने तिथे असलेल्या स्त्रियांना सौभाग्यवायने दिली. सर्वाच्न्ह्या पाया पडून म्हणाली, "मी आता माहेरी जात आहे. मला प्रेमाने निरोप द्या. माझ्या सासू-सासऱ्यांनी काही विचारले तर हा येथील प्रकार सांगू नका. त्यांना हे समजले तर ते दुःखाने प्राणत्याग करतील. आम्ही भीमातीरावर श्रीगुरुंच्याजवळ आनंदात आहोत असेच त्यांना सांगा. येथे श्रीगुरुंचाय दर्शनाने माझ्या पतीची प्रकृती खूप सुधारली आहे असे माझ्या सासू-सासऱ्यांना व आई-वडिलांना सांगा." मग तिने आपल्या पतीच्या कानावर व गळ्यात दोन रुद्राक्ष बांधले. श्रीगुरुंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ती संगमावर गेली. तेथे अश्वत्थवृक्षाखाली श्रीगुरू बसले होते. तिने त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरुंनी तिला आशीर्वाद दिला 'अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव'. श्रीगुरुंनी दिलेला आशीर्वाद लोकांना मोठा चमत्कारिक वाटला. ते हसून म्हणाले, "स्वामी, तुम्ही हा कसला आशीर्वाद दिलात ? अहो ! ह्या स्त्रीचा पती मरण पावला आहे व आता ती सती जाण्यास निघाली आहे. सती जाण्यापूर्वी तुमचे दर्शन घ्यावे म्हणून ही आपल्या चरणांशी आली आहे."
त्या लोकांनी असे सांगितले असता श्रीगुरू म्हणाले, "हे कसे शक्य आहे ? मी दिलेला आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही. यात कसलीही शंका बाळगू नका. ते प्रेत येथे आणा." आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी धावत जाऊन प्रेत आणले व श्रीगुरुंच्या समोर ठेवले. श्रीगुरू म्हणाले, "ते प्रेत सोडा. त्याचे कपडेही काढून टाका." लोकांनी तसे केले असता श्रीगुरुंनी अभिमंत्रित केलेले तीर्थ शिंपडले. श्रीगुरुंनी त्या प्रेताकडे अमृतदृष्टीने पाहताच तो मृत ब्राम्हण झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसला. त्याने इकडे-तिकडे पहिले. आपण नग्न आहोत. आपल्याभोवती अनेक लोक जमले आहेत व आपली पत्नी आपल्याकडे अवाक् होऊन पाहत आहे. हे सगळे पाहून आपण हे काय पाहतो आहोत हेच त्याला समजेना. त्याने झटकन अंगावर वस्त्र घेतले व पत्नीला विचारले, "हा सगळा प्रकार काय आहे ? मी कोठे आहे ? हे सगळे लोक कशासाठी जमले आहेत ?" तो ब्राम्हण असे विचारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने पहिल्या - पासूनची सगळी हकीगत त्याला सांगितली. मग ती दोघे श्रीगुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागली. "अहो, श्रीगुरू तुमचा जयजयकार असो. आम्ही केवळ पापी म्हणूनच आपणास विसरलो. तुम्ही ब्रम्हा-विष्णू-महेशस्वरूप आहात. कृपासागरा, आमचे रक्षण करा. तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठीच मनुष्यवेषात पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. सर्व भूतमात्री चराचरांत तुम्हीच आहात. आता आमचे रक्षण करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आता आम्हाला जन्म-मरण नको. तुम्हीं ज्याच्यावर कृपा होते त्याचे चारी पुरुषार्थ सिद्धीला जातात." त्या ब्राम्हण पतिपत्नींनी असे स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्रीगुरू त्यांना म्हणाले, "आता कसलीही चिंता करू नका. तुमचे सर्व दोष आहेत. तुम्ही अष्टपुत्र पुर्नायुषी व्हाल.तुम्हाला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. शेवटी तुम्ही जीवनमुक्त व्हाल.
तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल." याच वेळी तेथे असंख्य स्त्री-पुरुष जमले.ते आनंदाने श्रीगुरूंचा जयजयकार करू लागले. त्यांना वंदन करू लागले. त्यावेळी तेथे असलेला, हीनबुद्धीचा ब्राम्हण श्रीगुरुंना म्हणाला, "सर्व वेदशास्त्रे, पुराने सांगतात की, विधिलिखित कधीही टाळता येत नाही. मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू येतो. मग हा ब्राम्हण त्याच्या प्रारब्धानुसार मरण पावला असता पुन्हा जिवंत कसा झाला ?" त्यावर श्रीगुरू म्हणाले, "मी सांगतो, ते नीट ऐक. या ब्राम्हणाला पुढचा जन्म जो येणार आहे त्यातील काही वर्षे आयुष्य या ब्राम्हणाला या जन्मी मिळावीत अशी विनंती मी ब्रम्हदेवाला केली व या ब्राम्हणासाठी तीस वर्षे मागून घेतली." श्रीगुरुंचे हे शब्द ऐकताच सर्व लोक अक्षरशः अवाक् झाले. प्रत्यक्ष विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य केवळ श्रीगुरुंच्या ठायी आहे, हे पाहून सर्व लोक श्रीगुरूंना वारंवार वंदन करू लागले. त्यांचा जयजयकार करू लागले. मग सर्वजण श्रीगुरुंना वंदन करून आपापल्या घरी गेले. या प्रसंगाने श्रीगुरूंची कीर्ती दाही दिशांना पसरली. मग त्या ब्राम्हण पतिपत्नींनी संगमात स्नान करून श्रीगुरूंची यथासंग पूजा केली. मोठा दानधर्म केला. श्रीगुरूंची मनोभावे आरती केली.
ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, यानंतर एक मोठी अद्बूत कथा घडली, ती मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'पतिव्रतेचा आचारधर्म ' नावाचा अध्याय बत्तिसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment