!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पाचवा !!
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पाचवा श्रीदत्तात्रेयांचा श्रीपादश्रीवल्लभ अवतार कथा !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
सिद्धयोगी नामधारकाला श्रीदत्तात्रेयांची अवतार कथा सांगू लागले. आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्यलोकात अनेक अवतार धारण केले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "अरे नामधारका, लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णूंनी अंबरीषासाठी अवतार घेतला, त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्रीदत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कल्की असे श्रीविष्णूचे दहा अवतार आहेत. संतसज्जनांचे रक्षण व दृष्ट्दुर्जनांचे निर्दोलन याच हेतूंनी परमेश्वर नानारूपांनी अवतार घेतो. द्वापरयुग संपल्यावर कलियुग सुरु झाले. जगात अधर्म आणि अनाचार वाढला. ब्राम्हण आचारभ्रष्ट, विचारभ्रष्ट झाले. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली. त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यरुपात अवतार घेतो.
पीठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राम्हण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी-अभ्यान्गताची ती मनोभावे सेवा करीत असे.दोघेही सत्वगुणी होते.ती श्रीविष्णूची आराधना-उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राम्हण अद्याप यावयाचे होते. दारी आलेला अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करुं त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथीवेषातील श्रीदत्तात्रेयांनी तीन शिरे, सहा हात अशा स्वरुपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिमे श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला.प्रसन्न झालेले श्रीदत्तात्रेय तिला म्हणाले,
"माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मन पावसी । पावसी त्वरित म्हणतसे ।।
"माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग." श्रीदत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्त्प्रभूंना म्हणाली, "भगवंता, आपण मला 'जननी' म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा.मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून दोन पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य, परमज्ञानी, देवस्वरूप असा पुत्र व्हवा."
सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीदत्त्प्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, "माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तुम्ही जो सांगेल तसे करा. नाहीतर, तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य-दुःख दूर नाहीसे करेल." असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरुपी श्रीदत्तात्रेय अदुष्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला.
काही कामासाठी बाहेर गेलेला आपळराजा घरी परतला. सुमतीने त्याला सगळी हकीगत सांगितली. मध्यानकाळी कोणी अतिथी आल्यास त्यला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्रीदत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्रीदत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीगत ऐकून आपळराजा अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, "तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले. कारण आज आपल्याकडे श्रीदत्तरुपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल.
पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर एका शुभदिवशी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) सुमती प्रसूत झाली. तिअल एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. आपळराजाने खुप दानधर्म केला. विद्वान ब्राम्हणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. 'हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरु होईल.' असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्य्नात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव 'श्रीपाद' असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा व सुमती यांने समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते.
यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला. मग आपाळराजाने त्याचे यथाशास्त्र मौजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रांत पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला. श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी आणेल लोक पीठापुरास येऊ लागले.
श्रीपाद सोळा वर्षांचे झाले. माता-पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरु केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले, त्यावेळी ते म्हणाले, "मी विवाह करणार नाही.मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे.मी तापसी ब्रम्हचारी, योगश्री हीच आमची पत्नी होय.माझे नावच श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे." हे ऐकून आई-वडिलांना खूप वाईट वाटले. परंतु 'तुला ज्ञानी पुत्र होईल.तो सांगेल तसे वागा.' हे श्रीदत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही. असा विचार करून आई-वडील त्यांना म्हणाले, "बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. पण आम्ही तुला अडवीत नाही." आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, "तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल." मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पहिले . आणि त्याचक्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. 'आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो.' असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला.
"तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्वप्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल . तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आई-वडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल." मग ते आई-वडिलांना म्हणाले, "या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तरदिशेला जात आहे. अनेक साधुनानांना मी दीक्षा देणार आहे."
सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले एकेकी गुप्त झाले. ते एका गुप्तपणे काशीक्षेत्री गेले. तेथून बदरिकाश्रमात गेले. तेथे श्रीनारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासठी भूलोकी अवतार घेतला आहे. " असे सांगून गोकर्णक्षेत्रात आले.
श्रोते हो ! सिद्ध्योग्यांनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्ध्योग्यांना काय विचारले व सिद्ध्योग्यांनी काय सांगितले ती कथा पुढील अध्यायात ऐका.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीदत्तात्रेयांचा श्रीपादश्रीवल्लभ अवतार कथा' नावाचा अध्याय पाचवा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment