श्री गुरुचरित्र कथासार अध्याय आठवा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय आठवा ब्राम्हण स्त्रीला वरदान - शनिप्रदोषव्रतमाहात्म्य !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्धांना म्हणाला, "आपण मला गोकर्णमाहात्म्य सांगितले. श्रीगुरू श्रीपाद तेथे किती दिवस राहिले ? त्यानंतर काय झाले ते ऐकण्याची मला फार इच्छा आहे. त्याविषयी मला सविस्तर सांगा. श्रीगुरुचरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे." नामधारकाने अशी विनंती केली असता आनंदित झालेले सिद्ध म्हणाले, आता तू लक्षपूर्वक ऐक. श्रीगुरू श्रीपादयती गोकर्णक्षेत्री तीन वर्षे गुप्तपणे राहिले. त्यांनंतर ते श्रीशैल पर्वतावर गेले. लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी तेथे ते चार महिने राहिले. त्यानंतर ते कृष्णा-गोदा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुरवपुरास गेले. कुरवपुर हे महाक्षेत्र आहे. त्याचे माहात्म्य फारच मोठे आहे.जे लोक तेथे राहून उपासना करतात त्यांना सर्वप्रकारची सुखे प्राप्त होतात. त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात. श्रीपादयती तेथे राहत असताना असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले.तेथे श्रीपादांनी अनेक लीला करून असंख्य लोकांची संकटे दूर केली. तय सर्वच लीला सांगू लागलो तर कथाविस्तार फार होईल. पण तय्तील काही महत्वाच्या लीला सांगतो. एकाग्रचित्ताने ऐक.
त्या कुरवपूर क्षेत्रात वेदशास्त्रसंपन्न असा एक ब्राम्हण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव 'अंबिका'. ही स्त्री अत्यंत सात्विक, धर्मपरायण होती; परंतु तिच्या संसारात एक मोठे दुःख होते. तिला पुत्र होत असत पण ते जगात नसत. तिने अनेक तीर्थयात्रा केल्या, व्रतवैकल्ये केली; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे अनेक वर्षाच्या उपासनेने तिला एक पुत्र झाला, परंतु दुर्दैवाने तो मंदबुद्धीचा झाला. त्यला कशातही गती नव्हती. त्याची मुंज करण्यात आली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्या ब्राम्हणाने त्या मुलाला अनेकप्रकारे शिकविण्याचा प्रयत्न केला, त्याला शिक्षा केली पण त्याला काहीच विद्या जमत नव्हती.वडिलांना मोठी चिंता वाटू लागली. त्याने अनेक नवसायास केले पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.
वडील त्याला शिक्षा करू लागले की आईला फार वाटत असे. ती त्यांना म्हणे, "तुम्ही त्याला विनाकारण मारू नका, तो मंदबुद्धीचा आहे, त्याला तो काय करणार ? आपले हे पूर्वकर्म आहे, दुसरे काय ? निदान आपला पुत्र जिवंत आहे, यातच समाधान माना." वडील त्याला शिक्षा करू लागले कि आईला फार वाटत असे. ती त्यांना म्हणे,"तुम्ही त्यला विनाकारण मारू नका, तो मंदबुद्धीचा आहे, त्याला तो काय करणार ? आपले हे पूर्वकर्म आहे, दुसरे काय? निदान आपला पुत्र जिवंत आहे, यातच समाधान माना.
काही दिवसांनी तो ब्राम्हण मरण पावला.त्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली. पोट भरण्याची भ्रांती निर्माण झाली. भीक मागून जगण्याची वेळ झाली. मुलगा मोठा झाला, लग्नाचे वय झाले; पण त्याला मुलगी कोण देणार ? लोक त्याची . निंदा करीत म्हणू लागले,"तुझा पिता मोठा विद्वान, वेदांती आणि त्याच्या पोटी जन्मास आलेला तू परशुराम तुझा जन्म फुकट गेला. भीक मागताना लाज कशी वाटत नाही ? त्यापेक्षा गंगेत जीव का देत नाहीस ? ही जननिंदा ऐकून त्या मातापुत्रांना अत्यंत दुःख होत असते. तो मुलगा आईला म्हणाला, "मला ही जननिंदा सहन होत नाही. त्यापेक्षा जीव दिलेला बरा." त्याच्या आईलाही जीवन नकोसे झाले. मग ती आपल्या मुलाला बरोबर घेऊन खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या काठावर गेली. त्या दोघांनी गंगेच्या पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी श्रीपादयती तेथे स्नान करीत होते.त्यांना पाहून त्या दोघांनी पाण्यातच त्यांना वंदन केले. त्या मुलाची आई म्हणाली, "या गंगेत प्राणत्याग करावा, अशी आमची इच्छा आहे. आत्महत्या करणे महापाप असल्याने आम्हाला सद्गती मिळावी असा आपण आशीर्वाद द्यावा." "तुम्ही आत्महत्या का करीत आहात ? " असे श्रीपादांनी विचारले असता तिने सर्व हकीगत सांगितली. शेवटी म्हणाली, "यतिवरा, आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा त्रैलोक्यपूजनीय पुत्र मला प्राप्त व्हावा." तेव्हा श्रीपाद यतींनी शिवाची आराधना करण्याचा उपदेश केला. ते म्हणाले, "पूर्वी एकदा एका गौळणीने शिवव्रताचे आचरण केले, त्यामुळे त्यांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार झाला." असे सांगून त्यांनी तिला शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले. मग त्यांनी उज्जयिनी नगरातील एक प्राचीन कथा सांगितली.
श्रीपाद यती म्हणाले, "ही कथा आहे उज्जयिनी नगरातील, एकदा त्या नगरात एक मोठी अद्भुत कथा घडली. त्या नगरात चंद्रसेन नावाचा एक धर्मशील राजा होता. मणिभद्र नावाचा त्याचा मित्र होता. तो भगवान शंकराची उपासना करीत असे.त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला एक अद्भुत, तेजस्वी मणी दिला. त्या मण्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे. इतकेच नव्हे, तर पाषाणाचेही सोने होत असे. तो मणी म्हणजे चिंतामणीच होता. जे चिंतावे ते त्या मण्याच्या प्रभावाने प्राप्त होत असे. असा तो मणी मणिभद्र गळ्यात धारण करीत असे. इंद्रसेन आणि मणिभद्र मित्र असल्यामुळे इंद्रसेनही तो मणी गळ्यात धारण करीत असे. तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा असे अनेकांना वाटत असे. अनेक राजांनी तो मणी विकत मागितला; पण इंद्रसेनाने त्याला साफ नकार दिला. त्याने तो मणी अगदी गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवला होता. इंद्रसेन तो मणी बऱ्याबोलाने देत नाही हे पाहून इतर राजेलोकांनी युद्ध करून तो मणी हिरावून घेण्याची धमकी दिली; पण इंद्रसेनाने त्या धमकीला जुमानले नाही. मग इतर राजांनी सैन्यासह उज्जायिनीवर स्वारी केली व नगरला वेढा घातला. त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती.संध्याकाळी तो निश्चिंत मानाने भगवान शंकराची पूजा करण्यास बसला. मोठ्या थाटात त्याची पूजा चालू होती.
राजा इंद्रसेन महाबळेश्वर शिवलिंगाची अगदी शांत चित्ताने पूजा करीत होता. त्याचवेळी काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन मंदिरात चाललेली ती पूजा पाहून आपणही अशीच पूजा करू या. असे म्हणून गवळ्यांच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवलिंग, मंदिर, खांब, पाने, फुले, बिल्वपत्रे इत्यादी सगळे काही दगडांचेच कल्पून लुटूपुटुची शिवपूजा सुरु केली.काही वेळाने गवळणी परत गेल्या.थोड्यावेळाने त्या परत आल्या व आपापल्या मुलांना भोजनासाठी म्हणून घरी घेऊन गेल्या.परंतु एक मुलगा मात्र पूजा टाकून गेला नाही. तो पूजा करण्यात गढून गेला होता.डोळे मिटून शिवध्यान करीत होता. त्याची आई परत आली. ती आपल्या मुलाला रागारागाने घराकडे ओढत नेउ लागली; पण तो मुलगा पूजा टाकून जाण्यास तयार होईना. तेव्हा त्या मुलाच्या आईने रागाने ती पूजा मोडून टाकली.त्यामुळे तो मुलगा रडू लागला. गडबड लोळू लागला. तेथील दगडावर डोके आपटून प्राण देण्याचा त्याने निश्चय केला. अत्यंत शोकाकुल होऊन बेशुद्ध पडला.त्या मुलाची भोळीभाबडी भक्ती पाहून प्रसन्न झालेले शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी रत्नखचित शिवलिंग निर्माण केले. मग त्या मुलाला प्रेमाने जागे करून वर मागण्यास सांगितले.
मुलाने डोळे उघडून समोर पहिले तो प्रत्यक्ष भगवान शंकर स्मितहास्य करीत उभे होते. भोवती भव्य रत्नखचित शिवमंदिर सूर्यतेजाप्रमाणे चमकत होते. ते पाहून आश्चर्यचकित झालेला तो मुलगा शिवचरणांवर मस्तक ठेवून हात जोडून म्हणाला, "भगवंत, माझ्या आईवर रागावू नका. तिने आपली प्रदोषपूजा मोडून टाकली.तिला क्षमा करा." त्या मुलाने अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर अधिकच प्रसन्न झाले आणि म्हणाले, "बाळा, तू चिंता करू नकोस. मी तुझ्या आईवर मुळीच रागावणार नाही. तिच्या पोटी भगवान विष्णू अवतार घेईल व तुझ्या आईला लालनपालन करण्याचे भाग्य लाभेल. तुमच्या वंशाची भरभराट होईल. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल." असे सांगून भगवान शंकर त्या लिंगात गुप्त झाले. मात्र ते रत्नखचित मंदिर जसेच्या तसे राहिले.
त्या मंदिराचा कोटीसूर्यासम दिव्य प्रकाश नगराबाहेर पसरला होता. ज्या राजांनी नगरला वेढा घातला होता ते दिव्य्प्रकाश पाहून चकित झाले. त्यांच्या मनातील राग, द्वेषभावना नाहीशा झाल्या. ते शिवदर्शनासाठी नगरात आले. इंद्रसेन राजा मोठा पुण्यवंत आहे. त्याला विरोध करणे योग्य नाही असा विचार करून ते इंद्रसेनाला भेटावयास गेले. इंद्रसेनाने तय सर्वांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले.मग राजा इंद्रसेनाने सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या प्रेमाने स्वागत केले. मग राजा इंद्रसेन सर्वांना बरोबर घेऊन ते रत्नखचित शिवमंदिर पाहण्यासाठी गेला. त्याचेवेळी त्या गवळ्याचे घरही रत्नखचित झाले होते. ते पाहून सर्वांना आश्चर्य झाले. राजाने त्या गवळ्याच्या मुलाची चौकशी केली असता त्याने सगळी हकीगत सांगितली.ती ऐकून आनंदित झालेल्या सर्वांनी त्या मुलाला अनेक भेटवस्तू दिल्या. मग सर्व राजे स्वस्थळी निघून गेले. प्रदोषकाळी केलेल्या शिवपुजनेचे हे फळ आहे हे राजाला समजले. त्याला अतिशय आनंद झाला. तो मुलगा आपल्या घरी गेला. तो आईला म्हणाला, " आई, तुझ्या पोटी नारायणाचा अवतार होणार आहे असे भगवान शंकरांनी वरदान दिले आहे. प्रदोषकाळी तू शिवपूजा पाहिलीस त्यामुळे शंकरांनी तुला क्षमा करून हा वर दिला आहे."
ही कथा सांगून श्रीपाद त्या ब्राम्हण स्त्रीला म्हणाले,"तू सुद्धा प्रदोषपूजा कर. तुला माझ्यासारखा पुत्र होईल. तू कसलीही चिंता करू नकोस. मनात शंकाही बाळगू नकोस." असे बोलून श्रीपादांनी त्या स्त्रीला अनेक आशीर्वाद दिले. मग त्यांनी त्या स्त्रीच्या मतीमंद मुलाला जवळ बोलावून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला.त्याचक्षणी त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रकट झाले. तो मुलगा आता अत्यंत तेजस्वी दिसू लागला. त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला. ती श्रीपादांना म्हणाली,"आज मला रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला. पुढील जन्मी मला तुमच्यासारखा पुत्र होईल असा वर मला दिला आहात त्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही." त्या स्त्रीने श्रीपादांना प्रत्यक्ष शंकर मानून नित्य प्रदोषकाळी त्याची पूजा करण्याचे व्रत घेतले. तिच्या प्रदोषकाळी त्यांची पूजा करण्याचे व्रत घेतले.तिच्या पुत्राचाही पुढे विवाह झाला.त्यालाही पुत्रपौत्रादी सर्व काही प्राप्त झाले. नामधारकाला ही कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले,"श्रीगुरू असे कृपावंत, दयावंत आहेत.ते आपल्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करतात."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'ब्राम्हण स्त्रीला वरदान - शनिप्रदोषव्रतमाहात्म्य' नावाचा अध्याय आठवा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment