श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चौथा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चौथा त्रैमुर्ति (श्रीदत्तात्रेय) अवतार कथा !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
"त्रैमुर्ति श्रीदत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा." असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम, मी तुला अत्रिऋषी कोण होते ते सांगतो."
सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते.त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रम्हा.त्यालाच ब्रम्हांड म्हणतात. मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले. ब्रम्हाने तेथे चौदा भुवने निर्माण केली. दहा दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षीपैकी अत्रींची पत्नी अनुसूया. हे श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्यरूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल कि काय अशी सर्व देवांना भिती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव ब्रम्हा-विष्णू-महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री-अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, "महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसूया असामान्य पतिव्रता आहे.ती काया-वाचा-मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विन्मुख करीत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंदमंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड, शीतल होतो. वारासुद्धा भीतीने मंदमंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते.ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवाचाकरी करत राहावे लागेल." देवांचे गाऱ्हाणे ऐकताच ब्रम्हा-विष्णू-महेश भयंकर रागावले आणि म्हणाले,"चला, आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू. नाहीतर यमलोकाला पाठवू." असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रम्हा-विष्णू-महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला. मग ते तिघेजण अत्रिऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रिऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसूया आश्रमात एकटीच होती. ते अनुसुयेला हाक मारून म्हणाले, "माई, आम्ही ब्राम्हण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आंदन चालू असते. अतिथी-अभ्यांगतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे, म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लौकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो."
तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसुयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले. बसावयास दिले. त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षतपुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली,"आपण स्नान करून या. तोपर्यंत पाने वाढते." तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, "आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लौकर भोजन दे." "ठीक आहे." असे म्हणून अनुसूयेने त्यांना बसावयास पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, "माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छाभोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे . तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे, म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ. नाहीतर आम्ही परत जातो.
त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती.तिनी ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील ?
आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होइल.विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारुण नेइल." असा विचार करून अनुसूया त्या भिक्षुंना 'तथास्तु' असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले.पतीची मनात पूजा केली.मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा बिक्शुन्काच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य ! त्याचक्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली.मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गीते गाऊ लागली. ती बालेने भुकेने व्याकूळ होउन रडत होती. त्यांना आता अन्नाची नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याचवेळी अनुसुयेला वात्सल्याने पान्हा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रम्हा-विष्णू-महेश हे त्रिदेव अनुसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रिऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसूयेने त्यानं सगळी हकीकत सांगितली. हि तीन बाळे म्हणजे ब्रम्हा-विष्णू-महेश हे त्रिमुर्ती आहेत हे अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रम्हा-विष्णू-महेश अत्रॆन्पुधे प्रकट झाले 'वर माग' असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसुयेला म्हणाले, "त्रिमुर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे." तेव्हा अनुसूया हात जोडून म्हणाली, "नाथ, हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या." अत्री म्हणाले, "हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात, तर पुत्ररूपाने येथेच राहा." तेव्हा 'तथास्तु' म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले.
मग ब्रम्हदेव 'चंद्र' झाला. श्रीविष्णू 'दत्त' झाला आणि महेश 'दुर्वास' झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, "आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा 'दत्त' येथेच राहील.तोच त्रिमुर्ती आहे असे समज." अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास ताप करण्यासाठी निघून गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रम्हदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि-अनुसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमुर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रिअनुसुयेला देवांनी तो दिला म्हणून 'दत्त'. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरुपरम्परेचे मुळं पीठ आहे. अशाप्रकारे सिद्ध्योग्यांनी नामधारकाला दत्त्जान्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रावण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्धयोग्यांना म्हणाला, "श्रीगुरुदत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा" सिद्ध्योग्यांनी तथास्तु म्हटले.
(दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीष पौर्णिमेला झाला. या दिवशी दत्तजयंती असते.)
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'त्रैमुर्ति (श्रीदत्तात्रेय) अवतार कथा' नावाचा अध्याय चौथा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment