श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अकरावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अकरावा श्रीगुरू नरहरीच - बालचरित्र लीलावर्णन !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

"श्रीगुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा." असे नामधारक म्हणाला असता सिद्ध म्हणाले,"श्रीपाद अवतारात मतीमंद ब्राम्हण गुरुकृपेने विद्वान झाला ही कथा मी तुला पूर्वी (आठव्या अध्यायात) सांगितली. श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शानिप्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती कारंजा गावात (लाड कारंजा) वाजसनीय शाखेच्या एका ब्राम्हणाची कन्या म्हणून जन्मास आली. तिच्या आई-वडिलांनी तिचे चांगल्याप्रकारे पालनपोषण केले. तिचे नाव अंबाभवानी असे ठेवण्यात आले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त 'माधव' नावाच्या ब्राम्हणाशी तिचा विवाह झाला. आंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करीत असत. ते दोघेही नित्यनेमाने प्रदोषसमयी शिवपूजन करीत असत. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेषप्रकारे यथासांग शिवपूजा करीत असत. आपल्याला श्रीदत्तात्रेयांसारखा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती.

काही दिवसांनी अंबाभवानीला पुत्र झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. अत्यंत तेजस्वी होता.तो जन्माला येताच ॐ काराचा उच्चार करू लागला. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. विद्वान ज्योतिषांनी त्याचे नाव जातक वर्तविले. ज्योतिषी म्हणाले," हा अवतारी पुरुष आहे.सर्वांचा गुरु होईल. याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल.अष्टसिद्धी नवनिधींचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय, पूजनीय होईल. याच्या क वळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील.याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल.हा इच्छा पूर्ण करील.मात्र हा विवाह करणार नाही. हा संन्यासी होईल. तुम्ही दोघे मोठे भाग्यवान, पुण्यवान आहात, म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला. याचा नीट सांभाळ करा. याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका."

ब्राम्हण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला.ज्योतिषाने वर्तविलेले ऐकून आंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्रालंकार दिले. माधव ब्राम्हणाचा नवजात पुत्र ॐ कार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली.गावातील असंख्य स्त्री-पुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले.आपल्या या पुत्राला आल्यागेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती.दृष्ट काढीत असे. त्याच्या गळ्यात गंडादोरा बांधत असे. अहो, केवळ लोकोद्धारासाठी ज्या परत्म्याने अवतार धारण केला, त्याला दृष्ट लागणार ? पण आईची .ती काळजी घेणारच. मुलगा दहा दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटात बारसे करण्यात आले.

"शालग्रामदेव' असे त्याचे जन्मनाव व 'नरहरी' असे पाळण्यातले नाव ठेवण्यात आले. नरहरी दिसामाजी वाढू लागला. पण तो ॐ काराशिवाय काहीच बोलत नसे.आई -वडिलांनी त्याला बोलावयास शिकविण्याचे खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे कि काय अशी त्यांना भीती वाटू लागली. नरहरी सात वर्षांचा झाला. आठव्या वर्षी यांची मुंज करावयास हवी. पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची ? याला गायत्रीमंत्र कसा शिकवावयाचा ? भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला. या विचाराने दुःखी झालेली अंबाभवानी रडू लागली. आपल्या लागली. नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने केली. त्याने घरातली एक लोखंडी पहार हाती घेतली.त्याचक्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला. त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या.

तो चमत्कार पाहून नरहरीच्या आई-वडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, "बाळा, महात्मा आहेस. तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस; पण तू बोलत का नाहीस ? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तू आमची इच्छा पूर्ण कर." नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मेखला यांच्या खुणा करून 'तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन' असे खुणेने सुचविले. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांना अतिशय आनंद झाला.त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरविले. मग एका शुभमुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन, दक्षिणा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले,"माधवाने इतका खर्च कशासाठी केला ? मुलाची मोठ्या थाटात मुंज केली ;पण तो गायत्रीमंत्र कसा शिकणार ? या मुक्याला संध्या कोण शिकविणार ? आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार ? दुसरे टवाळखोर म्हणाले, " काही का असेना , या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले. दक्षिणा मिळाली हा मुलगा शिको नाहीतर न शिको ." नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्री-मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य ! नरहरीने गायत्री-मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री मानतच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिले भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणून लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणून लागला.सात वर्षांचा मुलगा सगळे वेद अस्खलित म्हणतो आहे हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणून लागले."अहो, हा मुलगा प्रत्यक्ष श्रीगुरू दत्तात्रेयांचाच अवतार दिसतो ! " सगळे लोक नरहरीचा जयजयकार करू लागले. त्याच्या चरणांना वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्यरूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली.

आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाच्या डोही डुबू लागले. मग नरहरी आपल्या आई-वडिलांच्या पाया पडून म्हणाला, "मी आता तीर्थयात्रेला जातो. मी सन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या." मग तो आईला म्हणाला, " माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन." नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, "माझी शिवपूजा फळास आली म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार ? " असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, " माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल. पण तुम्ही शोक करू नका.तुम्हाला चार पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील.माझे बोलणे खोटे ठरणार नाही." असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्याचक्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. तिला हेही कळले कि, आपला नरहरी म्हणजेच श्रीपादश्रीवल्लभ. नरहरी तिला म्हणाला, " माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे. हे गुप्त ठेव. मी संन्यासी आहे. संसारापासून अलिप्त आहे.आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे. मला निरोप दे." नरहरीने इतके सांगितले तरीसुद्धा अंबा त्याला म्हणाली."नरहरी, आत तू गेलास कि मला कधीही दिसणार नाहीस. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू ? इतक्या लहानपणी सन्यास घेण्याची काय आवश्यकता ? धर्म- शास्त्रानुसार मनुष्याने चारी आश्रम क्रमाक्रमाने आचरावे. ब्राम्हचर्याश्रम वेदपठण करावे, मग गृहस्थाश्रम स्वीकारावा.सर्व इंदिये तृप्त करावीत. यज्ञादी कर्मे करावीत. मग तपाचरणास जाऊन शेवटी सन्यास घ्यावा."

सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नरहरीने मातेला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे. ते ऐक."

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरू नरहरीच - बालचरित्र लीलावर्णन' नावाचा अध्याय अकरावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments