अक्षय्यतृतीया माहिती

🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
           *अक्षय्यतृतीया माहिती*..
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷


 



उद्या  दि.२६ एप्रिलला अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्यतृतीया हा साडेतीन  मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो.वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्यतृतीया असे म्हणतात.ग्रामीण भागात या सणाला आखिती असेही म्हणतात.अक्षय्यतृतीया जर बुधवारी व रोहिणी नक्षत्रावर आली तर तिचे विशेष महत्त्व मानले जाते.याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात .श्रीविष्णूंच्या १० अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाला. याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याचदिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली‌.अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम - मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदामाला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली.अक्षय्यतृतीयेलाच  अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे.एका अक्षय्यतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते, तर एका अक्षय्यतृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरणप्रसंगी द्रौपदीला अक्षयवस्त्र पुरवले होते .श्रीबद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात.अक्षय्यतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे.या दिवशी केलेल्या जप,तप,दान पुण्याचा
क्षय होत नाही‌.त्यामुळे या दिवशी आपण  नामस्मरण, भजन ,पूजन, अर्चन ही उपासना  जितकी करू तितकी थोडीच आहे. यादिवशी पंचांगशुद्धी,दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही . 
         अक्षय्यतृतीयेचा हा पुण्यप्रद दिवस श्रीविष्णूपूजनाचा ,श्रीविष्णू नामस्मरणाचा आणि श्रीविष्णू कृपेचा दिवस आहे .यादिवशी श्री विष्णूंच्या व्यंकटेश म्हणजे बालाजी स्वरूपाचे श्रीलक्ष्मीसह पूजन करावे. *विष्णुसहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत.* अक्षय्यतृतीयेला पूर्वजांचे स्मरण,व त्यानिमित्त तर्पण, हवन,दान करावे असे म्हटले आहे .प.पू. श्रीवासुदेवानंद टेंब्ये स्वामींनी सांगून ठेवले आहे - *विष्णुसहस्रनाम पठणाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि यासाठी अक्षय्यतृतीयेइतका योग्य दिवस अन्य कोणता असेल*?विष्णुसहस्रनाम येत नसेल तर ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा.
        अक्षय्यतृतीयेच्या दिवशी एका चौरंगावर रेशमी वस्त्र अंथरून त्यावर मधोमध कलश ठेवावा  व गंधाने स्वस्तिक रेखून नारळ ठेवावा. कलशाच्या मागे श्रीलक्ष्मीव्यंकटेशाची प्रतिमा ठेवावी.कलशासमोर बाळकृष्ण व श्रीयंत्र ठेवावे.विड्याच्या दोन पानांवर गणपतीची सुपारी ठेवावी. चौरंगाभोवती रांगोळी
रेखावी .समई,उदबत्ती, धूप,नीरांजन लावून ठेवावे. गणपती,घंटा,दीप, शंख,कलश व पृथ्वीपूजन करावे. बाळकृष्णाला पुरुषसूक्त आणि विष्णुसूक्ताने अभिषेक करून चंदनउटी लावावी आणि तुलसीअर्चन करावे. श्रीयंत्राला श्रीसूक्ताने  अभिषेक करून त्या दोहोंची गंध, सुगंधी फुले,धूप- दीपाने पूजा करावी.  श्रीलक्ष्मीव्यंकटेश  प्रतिमेचे पूजन करावे. त्यानंतर विष्णुसहस्रनामाचे १ किंवा ५ किंवा १२ किंवा १०८ पाठ करावेत.कैरीचे पन्हे, कैरी घालून केलेली वाटली डाळ, बेसनाचे लाडू असा नैवैद्य दाखवावा. पितृसूक्तांचे हवन, पितरांना तिलतर्पण आणि पूर्वजांना मुक्ती देणारे दान करावे. मातीचा माठ, तांदूळ, पोहे, दूध ,दही, कलिंगड, टरबूज ,टोमॅटो, गूळ ,चंदनगंध, छत्री ,पंखा, चप्पल यापैकी कोणतेही दान करावे.त्याशिवाय सत्पात्री भोजन, एखाद्या गरजू कन्येच्या विवाहासाठी मदत किंवा एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी मदत करावी,पक्ष्यांना  पिण्यासाठी पाणी ठेवावे. या दिवशी खरेदी करताना सुवर्णखरेदी तर अवश्य करावी, त्यामुळे आपले सुवर्णभांडार अक्षय्य राहते.शिवाय चांदी, मोती ,रेशमी वस्त्र ,श्रीयंत्र आणि धार्मिक वस्तू यांची खरेदी करावी.फ्रीज,कुलर, एसी ,फॅन ,पाण्याची मोटर इत्यादी थंडावा देणाऱ्या आणि पाण्याशी संबंधित वस्तूंची खरेदी करावी.
          अक्षय्यतृतीयेच्या दिवशी ज्यांचा विवाह होतो त्या वधू-वरांना अक्षय सुखाची आणि सौभाग्याची प्राप्ती होते आणि ज्या बटूंचा उपनयन संस्कार होतो त्या बटुंना अक्षय ज्ञानप्राप्ती होते.
       अशा याअक्षय्यतृतीयेच्या  मंगलमय दिनी आपण केलेले जप, तप,  दान,ध्यान तसेच आपले ऐश्र्वर्य, मांगल्य, ज्ञान,मन:शांती, आरोग्य
श्रीभगवंताच्या कृपेने अक्षय्य राहो, वृद्धिंगत होवो अशी मनःपूर्वक प्रार्थना ! 
               

Comments