श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बारावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बारावा काशीक्षेत्री संन्यास-गुरुशिष्यपरंपरा !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नरहरीला त्याच्या अंबामातेने सन्यास न घेण्याविषयी अनेकवार विनविले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.नरहरी तिला समजावीत म्हणाला, "माते, तू मला थांबण्याचा आग्रह करीत आहेस. पण शरीर हे क्षणभंगुर आहे.संपत्ती अशाश्वत आहे. मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही. म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्मसंग्रह करावा. माणसाचे केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही.मनुष्याचे क्षणाक्षणाला कमी होत असते.वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे. कधी गळून पडेल सांगता येणार नाही. समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही त्याप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही, म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा. मूर्ख लोकांना हे समजत नाही. ते आयुष्यभर बायकामुले,घरदार, संपत्ती यातच गुंतून पडतात.ज्याला यम प्रिय आहे त्याने खुशाल संसारात, नाहीतर आळसात आयुष्य घालवावे ; पण ज्याला आत्मज्ञान हवे असेल. मोक्ष, मुक्ती मिळवायची असेल त्याने विलंब न लावता धर्मसाधना करावी.मी तेच करणार आहे, म्हणून तू मला अडवू नकोस." नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आई-वडिलांना व तेथे असलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले. आपला मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचे केवढे तत्वज्ञान सांगतो आहे हे पाहून आई-वडिलांना धन्यता वाटली.
अंबा नरहरीला म्हणाली, "बाळा, तू आमचे कुलदैवत आहेस. मला चार पुत्र होतील असे तू वाचन दिले होतेस. पण म्हणालास यावर माझा नाही, त्याला मी काय करू ? माझी तुला विनंती आहे. मला एक पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ रहावेस. मग मी तुला जाण्यास परवानगी देईन.माझा शब्द मोडशील तर मी प्राणत्याग करीन." त्यावर नरहरी हसून म्हणाला," माते माझे बोलणे सत्य मान. तुला एकच काय दोन पुत्र होईपर्यंत मी तुमच्याजवळ राहीन. तुला दोन पुत्र झाले कि मी नाही. मी मी एक वर्षभर तुमच्याजवळ राहीन."
मग नरहरी एक वर्ष आई-वडिलांच्या जवळ राहिला. सात वर्षांचा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला.सात वर्षांचा हा मुलगा चार वेद शिकवितो हे पाहून लोक थक्क झाले. मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले.स्वतःला षटशास्त्री म्हणविणारे लोकही नरहरीकडे येऊ लागले.त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्वदूर पसरली.ते पाहून आई-वडिलांना मोठी धन्यता वाटू लागली. काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली.नवमास पूर्ण होताच तिला जुळे पुत्र झाले. नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला.
सद्गुरूचे वचन खोटे कसे ठरेल ? पुत्रप्राप्तीने आई-वडिलांना अतिशय आनंद झाला. एक वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला,"माते, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे.तुझे हे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. दोन पुत्र व एक कन्या होईल. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही.तुम्ही सर्वजन सुखात राहाल.तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर उत्तम सेवा करतील.तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन. तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे. त्याची भावभक्तीने प्रदोषपूजा केली आहे. सुखसमृद्धी, यश, कीर्ती, इहलोकी सौख्य व परलोकी मोक्षमुक्ती.कुळात सत्पुरुषाचा जन्म हे शिवभक्तीचेच फळ आहे. हे सर्वकाही तुम्हाला प्राप्त होईल. आता मी तीस वर्षांनी येउन भेटेन. आता मला जाण्याची परवानगी द्या."
सर्वजण नरहरीच्या पाया पडले. सर्वांच्या मनात त्याचाबद्दल अपार श्रद्धा होती. प्रेम होते. कौतुक होते. आदर होता. सार्वजन त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले.नरहरी काशीला निघाला.माधव व अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले.तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपादश्रीवल्लभ व श्रीदत्तात्रेयरुपात दर्शन दिले. त्या दोघांना धन्य धन्य वाटले.त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला. नरहरी बदरीकाश्रमाकडे निघाला, पण त्या अगोदर तो काशीला गेला.तेथे त्याने कशीविश्वेश्वराने दर्शन घेतले. तेथे त्याने अत्यंत खडतर तपश्चर्या केली.नरहरीची तपश्चर्या, योगसाधना, त्यांची सन्यासवृत्ती इत्यादी पाहून त्या काशीक्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठे नवल वाटले. अनेक लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तेथे कृष्णसरस्वती नावाचे एक वयोवृद्ध-ज्ञानवृद्ध तपस्वी होते. ते नरहरीची लक्षणे पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले, "हा नरहरी बाल असला तरी हा महातपस्वी आहे. हा परमज्ञानी असून जगद्वंद्य, सत्पुरुष आहे. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. याने सन्यास घेतला तर या कलियुगात लोप पावलेल्या संन्यासधर्माचे पुनरुज्जीवन होईल. हा लोककल्याण करणारा आहे. याच्या दर्शनाने पतित लोक पवन होतील. याने इतरांना संन्यासदीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल. यासाठी याने अगोदर स्वतः संन्यास घ्यावयास हवा." असे कृष्णसरस्वतींनी सांगितले असता सर्व संन्यासी, तपस्वी नरहरीला भेटून म्हणाले, "या कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध मानले जाते. हे अत्यंत अयोग्य आहे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यासधर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तेच कार्य आता तुम्हाला करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही ही संन्यासदीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा." नरहरीने ही विनंती मान्य करून कृष्णसरस्वतींच्या विधिवत संन्यासदीक्षा घेतली. ते नृसिंहसरस्वती झाले."
सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाने त्यांना विचारले, "नरहरी म्हणजे साक्षात त्रैमूर्तीदत्तात्रेयांचे अवतार.ते गुरुंचेही गुरु जगद्गुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला ?" त्यावर सिद्धयोगी म्हणाले,"पूर्वी, भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामांनी वसिष्ठांना गुरु केले. त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केले. यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली.गुरु-शिष्य परंपरा अबाधित ठेवली.हेच कार्य नरहरीने केले." नामधारकाने विचारले, "हे कृष्णसरस्वती कोण ? त्यांची गुरुपरंपरा मला सांगा."
नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "त्यांचा मूळ गुरु भगवान शंकर .त्याने विष्णूला उपदेश केला.विष्णूंचा शिष्य ब्रम्हदेव. त्यांचा शिष्य वासिष्ठ या क्रमाने शक्ती-पराशर-व्यास-शुक्राचार्य-गौडपादाचार्य-आचार्य गोविंद-शंकराचार्य-विश्वरुपाचार्य-ज्ञानबोधगिरी-सिंहगिरी-ईश्वरतीर्थ-नृसिंहतीर्थ-विद्यातीर्थ-शिवतीर्थ-भारतीतीर्थ-विद्यारण्य-विद्यातीर्थ-मलियानंद-देवतार्थ सरस्वती-सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरुपरम्परा आहे.कृष्णसरस्वती हे यादवेंद्राचे शिष्य.नरहरीने कृष्णसरस्वतींपासून संन्यासदीक्षा घेतली. त्यांना नृसिंहसरस्वती असे नाव देण्यात आले.
नृसिंहसरस्वतींनी काशीक्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यासदीक्षा दिली व ज्ञानदानाचे मोठे कार्य केले. मग ते बदरीकाश्रमाकडे गेले. त्यांना अनेक शिष्य मिळाले. मार्गात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. संगमाचे दर्शन घेऊन ते प्रयागक्षेत्री गेले. प्रयागक्षेत्री असताना त्यांना 'माधव' नावाचा ब्राम्हण भेटला.त्याला ब्रम्ह्ज्ञानाचा उपदेश करून संन्यासदीक्षा दिली व त्याला 'माधव सरस्वती' असे नाव दिले. सरस्वती गंगाधर श्रीगुरुचरित्र सांगत आहेत. याचे श्रवण केले असता चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'काशीक्षेत्री संन्यास-गुरुशिष्यपरंपरा' नावाचा अध्याय बारावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment