श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सातवा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सातवा गोकर्ण महिमा !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक सिद्धांना म्हणाला, "मला गोकर्णमाहात्म्य सविस्तर सांगा. पूर्वी तेथे कुणाला वर मिळाला ? अनेक तीर्थे असताना श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्णक्षेत्री का गेले ? या गोकर्णमहाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली ? त्याविषयी एखादी पुराणकथा असेल तर ते मला सांगा. ज्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थमाहात्म्य ऐकण्याची इच्छा होते." नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले," या विषयी मी तुला एक प्राचीन कथाच सांगतो. एकाग्रचित्ताने ऐक."

पूर्वी इक्ष्वाकुवान्शात मित्रसह नावाचा एक राजा होता. तो राजा सकलशास्त्रपारंगत, अत्यंत बलाढ्य, महाज्ञानी होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला होता. त्या अरण्यात वाघ-सिंहादी अनेक प्राणी होते. राजा तेथे शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला. त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला. त्या बाणांच्या आघातांनी तो दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचा भाऊ जवळच होता. आपल्या भावाची अवस्था बघून तो रडू लागला. त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला, "तू जर माझा सख्खा भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा सूड घे." असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले. त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला. त्याने राज्यावर सूड घेण्याचा निश्चय केला. त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रसह राज्याचा राजवाड्यात प्रवेश केला. तेथील अधिकाऱ्यांशी गोड गोड बोलून व त्यांना आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचार्याचे काम मिळवले व सूड घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला.त्याला लौकरच तशी संधी मिळाली.

एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या त्या आचाऱ्याचे रूप घातलेल्या दैत्याकडे होते. त्याला हि मोठीच सुवर्णसंधी होती. त्याने श्राद्धाच्या अन्नात गुप्तपणे नरमांस मिसळले. वसिष्ठादी सर्व ऋषीमुनी भोजनाला बसले. पत्री वाढण्यात आली. तय मायावी दैत्याने वसिष्ठांच्या पानात नरमांस मिसळलेले आन वाढले. वासिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते. वाढलेल्या अन्नात नरमांस आहे हे त्यांनी ओळखले; ते ताडकन पानावरून उठले व राजाला म्हणाले, "राजा, तुझा धिक्कार असो ! कपटी, दृष्ट अशा तू श्राद्धाच्या दिवशी ब्राम्हणांना नरमांस खाऊ घालतोस ? या तुझ्या पापकर्माबद्दल 'तू बारा वर्षे ब्रम्हराक्षस होशील' असा मी तुला शाप देतो."

ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला. कारण त्याला यातले काहीच माहित नव्हते. आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला. मग तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वसिष्ठांना म्हणाला, "ऋषीवर्य, तुमच्या पानात नरमांस वाढले गेले याची मला माहिती नव्हती. हे कपटकारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार. नीट चौकशी न करता मला शाप दिलात, या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो."

असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले, तेव्हा त्याच्या पत्नीने-मदयंतीने त्याला रोखले. ती म्हणाली, "नाथ, तुम्ही हे काय करीत आहात ? स्वतःला आवरा. गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे पाप करून नका. आता जे घडेल ते घडेल.आता तयंचे पाय धरून उ:शाप मागा. यातच तुमचे भले आहे." मदयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला. पण हातातील शापोदक कुठे टाकायचे ? ते जमिनीवर टाकले तर नापीक झाली असती, म्हणून त्याने ते शापोदक आपल्या पायांवर टाकले. त्यामुळे राजाचे नाव 'कल्माषपाद' असे झाले. मदयंती वसिष्ठांच्या पाया पडून म्हणाली, "ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा. तयाल उ:शाप द्या." यामुळे शांत झालेले वसिष्ठ राजाला म्हणाले, "राजा, हा शाप तू बारा वर्षे भोगशील. त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील." असा उ:शाप देऊन वसिष्ठ निघून गेले.

वसिष्ठांच्या शापाने मित्रसह राजा ब्रम्हराक्षस होऊन वनात फिरू लागला. तो पशुपक्ष्यांची, मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला.त्याची भूक कधीच संपत नसे.एके दिवशी भुकेने कासावीस झालेला तो वनात भटकत असता त्याला एक ब्राम्हण जोडपे दिसले. त्याने त्या दोघांपैकी ब्राम्हणाला पकडले. त्याला आता राक्षस ठार मारून खाणार हे पाहूनत्याची पत्नी शोक करीत त्या ब्रम्हराक्षसाला विनवणी करीत म्हणाली, "कृपा करून माझ्या पतीला सोड. त्याला मारून मला विधवा करू नकोस. अरे, तू राक्षस नाहीस. शापित आहेस. अरे, तू अयोध्येचा राजा आहेस. माझ्या पतीला जीवदान दे." असे तिने अनेकवार विनविले.पण त्या राक्षसाने त्या ब्राम्हणाला तर मारून खाऊन टाकले. राक्षसाचे ते कृत्य बघून ती ब्राम्हण स्त्री भयंकर संतापली. ती सती गेली. जाताना तिने ब्रम्हराक्षसाला शाप दिला, "दुरात्म्या, तू माझ्या पतीला ठार मारून अनाथ केलेस. या अपराधाबद्दल मी तुला शाप देते. तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल."

होता होता बारा वर्षे संपली. वसिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मुल स्वरूप प्राप्त झाले. तो आपल्या घरी गेला. सर्वांना आनंद झाला. परंतु त्या ब्राम्हणपत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदी बैचेन झाला. तो मोठ्या काळजीत पडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. मदयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले, तेव्हा राजाने सगळी हकीगत तिला सांगितली. ती ऐकून राणीला मोठाच धक्का बसला. आता आपल्याला पतिसुख मिळणार नाही, आपला वंश वाढणार नाही, अशा विचारांनी ती अतिशय दुःखी झाली.

राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. पुरोहितांनी त्यानं तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, यज्ञयाग केले, दानधर्म केला, अन्नदान केले, पण पापक्षालन होईना, ब्रम्हहत्या राजाची पाठ सोडीना. त्यामुळे राजा अधिकाधिक बैचेन व अस्वस्थ होऊ लागला. राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत गेला. तेथे त्याला गौतमऋषी भेटले. राजाने त्यांच्या पाया पडून स्वतःचा परीचय सांगितला व ब्रम्हहत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली. मग तो गौतमांना म्हणाला, "मुनिवर्य, हे सगळे असे आहे. आता मला मनः शांती मिळवून द्या. आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले. तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईन असा मला विश्वास वाटतो. माझ्यावर कृपा करा. या ब्रम्हहत्येच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग मला दाखवा. राजाने अशी विनंती केली असती गौतमऋषी त्याला समजावीत म्हणाले, "राजा, घाबरू नकोस. कसलीही चिंता करू नकोस. भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात. मृत्युंजय शंकर तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ते महापातकांचा नाश करते. तेथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्णक्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश करतात. तेथे भगवान महादेव महाबळ नावाने राहतात. सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत त्याप्रमाणे गोकर्णक्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापनिष्कृती होत नाही. हजारो ब्रम्हहत्या केलेला मनुष्यही गोकर्णक्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्रात जपतपादी केल्याने लक्षपतित फळ मिळते. या क्षेत्राचे माहात्म्य इतके थोर आहे की, कार्यसिद्धीसाठी ब्रम्हदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळविले त्याची गणेशाने या क्षेत्री स्थापना केली आहे. सनकादी महात्मे व साध्यादी मुनिगण तेथे बसून भगवान शिवाची आराधना करतात. समस्त पातकांचा नाश करणारे महात्मेसुद्धा येथे सदाशिवाची उपासना करतात.

या ब्रम्हांडात गोकर्णापासून दुसरे क्षेत्र नाही. राजा, या तीर्थात सर्व देशांचे स्थान आहे. भगवान विष्णू, ब्रम्हदेव, कार्तिकेय व गणेश यांचे वास्तव्य आहे. या गोकर्णक्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. आता तेथील पाषाणलिंगाची खूण सांगतो. सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाषाणाचे असते. त्रेतायुगात ते तांबूस, द्वापारयुगात ते पीतवर्ण आणि कलियुगात ते कृष्णवर्णाचे असते, गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे.

परमपवित्र असे हे गोकर्णक्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. ते ब्रम्हइत्यादी सर्व पापांचे भस्म करते. तेथे शुभ दिवशी अर्चना करणारे वरती रुद्ररूप होतात. जो कोणी गोकर्णक्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो ब्रम्हपदाला जातो. रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमवास्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होमहवन अनंत फळ देणारे होते. शिवरात्रीला शिवलिंग व बिल्वपत्र यांचा सुयोग दुर्लभ आहे. अशारितीने गोकर्णक्षेत्र हे श्रेष्ठ माहात्म्य असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे.अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास, जागरण, भगवान सदशिवाजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा सोपानच होय.

अशाप्रकारे गौतऋषींनी मित्रसह राजाला गोकर्णतीर्थक्षेत्राचे माहात्म्य सांगितले असता त्याने विचारले, "ऋषीवर्य, आपण हे जे गोकर्णमाहात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का? आपणास जर किंवा आपण प्रत्यक्ष काही पहिले असेल तर, त्याविषयी एखादी कथा असेल तर कृपा करून मला सांगा."

राजाने असे विचारले असता गौतमऋषी म्हणाले, "राजा, ऐक. या गोकर्णक्षेत्री शिवरात्रीला महोत्सव असतो.चारी वर्णातील अनेक लोक येथे येतात व भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतकृत्य होतात. एकदा शिवरात्रीच्या दिवशी मीसुद्धा गोकर्णक्षेत्री गेलो होतो. दुपारची वेळ होती. आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी पूर्वजन्मी अनेक पापे केलेली आणि म्हणून अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणासन्न अशी चांडाळ स्त्री आम्ही पहिली. ती वृद्ध, अंध व महारोगाने ग्रासलेली होती.तिच्या सर्वांगाला क्षते पडली होती. त्यांत कृमी पडलेले होते. जखमांतून रक्त व पू वाहत होता. सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते. त्यातच तिला क्षय झाला होता. शरीरावर धड वस्त्र नव्हते.ती विधवा होती. तिने केशवपन केले होते. तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. तहानभुकेने ती कासावीस झालेली होती. तिला धड चालताही येत नव्हते.क्षणाक्षणाला जमिनीवर पडत होती. अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येउन पडली. थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला.

त्याचवेळी आम्हाला एक प्रसंग दिसला. अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून चार शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी, बलवान होते. त्यांच्या हातात शस्त्रे होती. सर्वांगाला भस्म लावलेले होते. तयंची शरीरकांती चंद्रासारखी होती. अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले," आपण येथे कशासाठी आला आहात?" ते म्हणाले, "आम्ही या चांडाळणीस नेण्यासाठी आलो आहोत." ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले.आम्ही त्यानं विचारले, "अहो, या महापापी चांडाळणीला शिवलोकाला कसे काय नेता ? कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतात का ?" या चांडाळणीने जन्मापासून अनेक पापकर्मे केली आहेत. हिने कधी कोणाला दया-माया दाखविली नाही. हिने आयुष्यात कधीही जपताप केलेले नाही. कधीही शिवस्मरण-पूजन केले नाही. अशा हिला शिवलोकाला कसे काय नेता ?" आम्ही असे विचारले असता शिवदूत म्हणाले, " गौतमा, या चांडाळणीची पूर्वकथा सांगतो ऐक. शिवदूत म्हणाले, "हि चांडाळीन पूर्वजन्मी ब्राम्हनकन्या होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती दिसावयास अत्यंत सुंदर होती, तिचे लग्नाचे वय झाले पण तिला योग्य असा पतीच मिळेना.त्यामुळे तिच्या आई-वडिलांना मोठी काळजी वाटू लागली.शेवटी ब्राम्हणाशी तिचा विवाह झाला. काही दिवस ठीक चालले; पण तिचा पती एकाएकी आजारी पडला आणि त्यातच त्याला मरण आले.

अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आई-वडिलांनी घरी परत आणले.ती दिसावयास सुंदर होती. तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता.तिला वैधव्य आले होते, त्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार ? ती तिला स्वस्थ बसू देईना. परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले.ती लपून छापून जारकर्म करू लागली.मग व्हायचे तेच झाले.तिचा व्यभिचार लोकांना समजला. लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले. मग आई-वडिलांनीही तिचा त्याग केला.तिला घराबाहेर काढले. आता तिला सगळे रान मोकळे झाले. ती सगळी लाजलज्जा सडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली.त्याच गावात एक तरुण श्रीमंत शुद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला. ती त्यच्या घरी राहू लागली. अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळिम फासला.कामवासनेने स्त्रीचा अधःपात होतो. हीन माणसाची सेवा केल्याने ब्राम्हणाचा नाश होतो. ब्राम्हणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषयवासनेने संन्यासी अधोगतीला जातो असे म्हणतात ते अगदी खरे आहे. सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला. आता ती बेधडक मद्यमांस सेवन करू लागली.

एकदा मद्यपान करून धून झालेल्या तिने बकरा समजून वासरूच कापले. त्या वासराचे मुंडके दुसर्या दिवसासाठी म्हणून शिंक्यात ठेवले. मग त्या वासराचे मांस काढून ते शिजवून खाऊ घातले. स्वतः ही खाल्ले. संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली तिथे वासरू नव्हते. त्या ऐवजी मेंढा होता. तिने घरात जाऊन पहिले तो शिंकाळ्यात वासराचे मुंडके दिसले. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती कपाळ बडवून रडू लागली. मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके व हाडे, कातडी पुरून टाकली व 'वाघाने वासरू पळवून नेले' असे सगळ्यांना असंगत रडण्याचे नाटक करू लागली. तिने आपल्या पतीलाही हीच थाप मारली.

काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले व तिचे अतोनात हाल केले. नंतर ती चांडाळ जातीस जन्मास आली. ती जन्मापासून अंध होती. दुःखी झालेल्या तिच्या आई-वडिलांनी काही दिवस कसा-बसा सांभाळ केला. तिला शिळेउष्टे अन्न खाऊ घालीत.काही दिवसांनी तिला महारोग झाला. आई-वडिलांचा आधार तुटला. नातेवाईकांनी तिला पार झिडकारले. आता ती भिक मागत फिरू लागली. अन्न नाही, वस्त्र नाही अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले. ती म्हातारी झाली.

तिला अनेक रोग जडले. अनेक दुःखे भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते, पण ते येत नव्हते. पुढे माघ महिना आला. माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्णक्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री-पुरुष शिवनामाचा घोष करीत त्या गावाच्या गर्जना करीत जात होते. लोक नाचत होते. गात होते. शिवनामाची गर्जना करीत जात होते. ती चांडाळीणही इतर बिकार्यांबरोबर रडत, ओरडत जात होती. भेटेल त्याला भीक मागत होती. तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता.अंगावर वस्त्र नव्हते. सर्वांगाला महारोग झाला होता.

सगळे शरीर दुर्गंधीने भरलेले होते. सर्वांच्या पुढे हात करून 'धर्म करा, धर्म करा' असे दीनपणे म्हणत होती; पण कुणालाही तिची दया येत नव्हती. जन्मजन्मांतरी तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते. त्यामुळे जिवंतपणी अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीण गोकर्णक्षेत्री गेली. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या चांडाळीणला कोणीही काहीही देत नव्हते, त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला. एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बिल्वपत्र टाकले. ती खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच तिने ते बिल्वपत्र रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडाले व नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले.

कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम-घोषाचे श्रवण व अजाणतेपणे एका बिल्वपत्राने झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांडाळीणीची शतजन्मांची पातके जाळून भस्म झाली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठविले आहे." असे शिवदूतांनी त्या चांडाळीणीची वर अमृतसिंचन केले. त्यामुळे तिला दिव्यदेह प्राप्त झाला. मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकाला घेऊन गेले. त्या चांडाळीणीची कथा सांगून गौतमऋषी मित्रसह राजाला म्हणाले, "राजा, तू सुद्धा गोकर्णक्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो. तेथे सर्वकाळी स्नान करून शिवाची पूजा कर. शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर. असे केले असता तू सर्व पापांतून मुक्त होशील व शिवलोकी जाशील." गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्णक्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रम्हहत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला. इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, असे हे गोकर्णक्षेत्र पुण्यवान स्थान आहे, म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'गोकर्ण महिमा'नावाचा अध्याय सातवा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु||

Comments