श्री गजानन महाराजांना आवडणारे* *पदार्थ व त्या संबंधीच्या घटना:-*
----------------------------------------------------------
*श्री गजानन महाराजांना आवडणारे*
*पदार्थ व त्या संबंधीच्या घटना:-*
-------------------------------------------------------
*१) बेसन भाकर:-*
शेगांवला श्री. म.ना. मोहळकर हे हेडमास्तर होते ते व त्यांचे बंधु अनंतराव, काकु रमाबाई व लहान पुतण्या दत्तात्रेय हे महाराजांच्या दर्शनाला मठात जात असत. एकदा महाराज रमाबाईला म्हणाले, मायबाई उद्या चून (बेसन) भाकर घेऊन येजो. तिला वाटले एवढ्या मोठ्या संताला हे काय जेवू घालायचे. तिने पुरणपोळी करुन दुसरे दिवशी महाराजांकडे मठात आणली. महाराजांनी तेच ताट तिला फेकून मारले व चून भाकर चून भाकर सारखे म्हणाले. तिने सोबत असलेल्या लहानग्या दत्तात्रेय यास घरी जावुन चून भाकर कांदा घेवुन येण्यास सांगितले. त्याने घरी जाऊन चून, भाकर, कांदा आणला. तो महाराजांना दिला. महाराजांनी मोठ्या आनंदाने तो खाल्ला. या संबंधीची गजानन विजय ग्रंथात अ. क. १६ मध्ये असलेली डॉ. भाऊ कवर यांची घटना आपल्या सर्वास ठाऊक आहेच.
*२) अंबाडीची भाजी आणि भाकर:-*
एकदा मंगरूळपीर तालुक्यातील कुपटे गावच्या देशमुखाने महाराजांना कोंडोलीहून आपल्या घरी वाड्यात आणले. या देशमुखाच्या वाड्या शेजारी देशमुखांकडे काम करणारे दिवाणजी, महाजन राहात. महाराज आपल्याकडे आले म्हणून देशमुखांनी महाराजांकरिता पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तयार केला. आता जेवणाचे पान वाढणार तेवढ्यात सायंकाळी ६ वाजता महाराज एकटेच वाड्याच्या बाहेर पडले आणि भटकत भटकत दिवाणजी महाजन यांच्या घरी आले आणि अंबाडीची भाजी आणि भाकर जेवायला मागु लागले .दिवाणजी यांचेकडे दुपारची अंबाडीची भाजी व भाकर होती ती महाराजांनी खाल्ली आणि ते निघून गेले . शेगावला महाराज कोणत्या बाईच्या शिदोरीत अंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकर आहे हे अंतर्ज्ञानाने जाणून घेत व भास्कराकरवी ते पदार्थ मागून घेत.
*३) पेढे:-*
गजानन महाराज श्रीमंताची पंचपक्वान्ने दूर सारीत पण सुदाम्याचे पोहे खात. महाराजांना पेढ्याचा नैवेद्य खूप येई त्यातील एखादा पेढा महाराज खात आणि बाकीचे सर्व पेढे लहान मुलांना वाटून देत.
*४) मिरचीचे वरण:-*
मुंडगावच्या बायजाबाई महाराजांना मिरचीचे वरण आणि ज्वारीची भाकर खावू घाली.
*५) चहा:-*
महाराज सकाळी चहा पित, चहा पिण्यासाठी महाराजांना एका भक्तांनी चांदीचा लोटा दिला होता. त्या लोट्यातून महाराज चहा पित. महाराजांची जेव्हा प्रकृती बिघडली त्यावेळी डॉ. भाऊ कंवर महाराजांवर उपचार करीत. ज्यावेळी महाराज डॉ. भाऊ कंवरांनी दिलेल्या औषधीच्या गोळ्या खात नसे. त्यावेळी डॉ. कंवर श्रींच्या चहात त्यांच्या न कळत औषधी टाकीत पण अंतर्ज्ञानी श्रींना ते माहीत होत व ते चहा न पिता खाली टाकून देत.
*६) खिचडी:-*
मुंडगांवचे पुंडलिक भोकरे हे पायी प्रवास करावयाचे त्यांचा भक्तीभाव पाहून महाराजांनी त्यांची प्लेगची गाठ दूर केली होती. हेच पुंडलिक भोकरे मुंडगांवला असतांना आईला म्हणाले, आई आज मला खिचडी खाविशी वाटते. आई म्हणाली उद्या धुंधुरमास आहे उद्या करिन. पुंडलिक रागाने घरून निघाला आणि शेगांवला आला. बायजा मठातच होती तिने पुंडलिकास विचारले. कवा निघाला जेवला का नाय. पुंडलिक जरा रागातच होता. त्याने उत्तर देण्याचे अगोदर महाराज बायजाबाईस म्हणाले, बायजे मघाची माझी राहिलेली खिचडी या पुंडलिकास दे, ती त्याच्यासाठीच ठेवली आहे. ती अजून गरम आहे. सकाळी केलेली खिचडी तरी ती गरमच होती. ती पुंडलिकाने खाल्ली आणि म्हणाला, कशी महाराजांनी माझी इच्छा अंतर्ज्ञानाने जाणली. वरील प्रसंगावरून हे लक्षात येते की महाराज खिचडी खात आणि त्यांच्या करिता बायजाबाई आणि साळुबाई स्वयंपाक करीत असे.
-------------------------------------------------
गण गण गणात बोते
------------------------------------------------
Comments
Post a Comment