बरं मला या त्रासावर काही उपाय ? या वर एकच उपाय ,ठेविले अनंते तैसेची राहा...



*********************************************

हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ।।

'ठेविले अनंते तैसेची राहावे । चित्ती असो द्यावे समाधान' ।।

वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।।

तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवापायी ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात की या संसारावरची माया किंवा या जगावरचे प्रेम मनुष्याने देवाला अर्पण करावे किंबहुना आपले प्रेम ह्या संसारावर न जडता ते देवावर कसे जडेल हे पाहावे किंवा ते त्याच्या चरणी कसे रुजू होईल हे पाहावे किंबहुना तसे ते करण्याचा येथे प्रत्येकाने संकल्पच करावा. आणि एवढेच नव्हे तर या संसारात अनंताने, म्हणजेच श्रीहरीने जसे आपल्याला ठेवले आहे तसेच राहावे, त्याविषयी म्हणजेच आपल्या परिस्थितीविषयी खेद न बाळगता चित्तात त्याविषयी समाधान असू द्यावे.

कारण ते म्हणतात हे असे वर्तन ठेवणे किंवा असे आचरण असू देणे हीदेखील देवाची केलेली भक्ती असून हीच थोर भक्ती देवाला अतिशय प्रियदेखील असते.

ते म्हणतात परंतु तसे न करता संसारात लाभलेल्या दुःखाचे, संकटाचे जर का वाईट वाटून घेतले किंवा त्याविषयी उद्वेग व्यक्त केला तर तशाने काहीही लाभ होत नाही, उलट त्याद्वारे पदरात केवळ दुःखच पडते, मन अधिकच कष्टी होते कारण संचिताचे फळ भोगण्यावाचून येथे दुसरा पर्यायच नाही.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की त्यापेक्षा सर्वांनी आपला सर्व भार त्याच्यावर टाकून किंबहुना सर्व संसारच देवापायी वाहून ह्या संसारात अतिशय निश्चिंत मनाने राहावे.

अभंग २०९८

Comments