Whatsapp new updates




whatsapp new updates :-
 

आमच्या नव्या अपडेटचा स्वीकार करण्यासाठी मुदत वाढवण्याविषयी माहिती

आमच्या अलीकडील अपडेटविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि या अपडेटविषयी लोकांच्या मनात खूप संभ्रम आहे असे आमच्या लक्षात आले आहे. यामुळे खूप गैरसमज पसरलेले आहेत आणि हे चित्र चिंताजनक आहे. त्यामुळेच, आम्ही आमची तत्त्वे आणि काही तथ्ये लोकांना पुन्हा एकदा समजवून देऊ इच्छितो.


WhatsApp एका सरळसाध्या संकल्पनेवर आधारलेले आहे: तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि प्रियजनांसोबत जे काही शेअर करता, ते फक्त तुम्ही आणि तुम्ही ज्यांच्यासोबत शेअर करता आहात ती व्यक्ती यांच्यातच खाजगी राहते. याचाच अर्थ आम्ही तुमची वैयक्तिक संभाषणे नेहमी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करतो. ही वैयक्तिक संभाषणे कोणीही, अगदी WhatsApp किंवा Facebook देखील वाचू शकत नाही. त्यामुळेच, कोण कोणाला मेसेज किंवा कॉल करते आहे याचे लॉग्स आम्ही ठेवत नाही. तुम्ही तुमचे लोकेशन शेअर केले असेल तर आम्ही तेदेखील पाहू शकत नाही. आम्ही तुमचे संपर्क Facebook सोबत शेअर करत नाही.


अलीकडील अपडेटमुळे यातल्या कशातही काहीही बदल होणार नाही. उलट या अपडेटमध्ये WhatsApp वरील एखाद्या बिझनेसला मेसेज करायचा असल्यास लोकांना वापरावे लागतील असे नवीन पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. तुम्ही हे पर्याय वापरल्यास आम्ही कशाप्रकारे डेटा गोळा करू शकतो अथवा वापरू शकतो याबद्दलही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आज जरी प्रत्येक व्यक्ती WhatsApp वरील बिझनेसवर शॉपिंग करत नसली तरी, भविष्यात बरेच लोक हे पर्याय वापरण्याचा विचार करू शकतील, आणि त्यामुळेच या सर्व्हिसेसविषयी लोकांना माहीत असणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते. या अपडेटमुळे Facebook सह डेटा शेअर करण्याची आमची क्षमता वाढत नाही.


या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही अपडेटमधील अटी वाचून मान्य करण्यासाठी लोकांना दिलेली मुदत वाढवत आहोत. ८ फेब्रुवारीला कोणाचेही खाते सस्पेंड होणार नाही किंवा डिलीट केले जाणार नाही. 'WhatsApp वरील गोपनीयता आणि सुरक्षा' याविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्हाला अजून बरेच काम करायचे आहे. बिझनेसशी होणाऱ्या संभाषणांशी निगडीत नवे पर्याय १५ मे ला उपलब्ध होतील, तोपर्यंत लोकांना या अपडेटबद्दल विचार करण्याचा वेळ देण्याचे आम्ही ठरवले आहे.


WhatsApp ने जगभरातील लोकांच्या संभाषणांना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देऊ केली आणि ही सुरक्षा आम्ही आज, उद्या, केव्हाही काढून घेणार नाही. ती कायम ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या अपडेटबद्दल स्पष्टीकरण मागण्यासाठी आमच्याशी संपर्क साधणाऱ्या, लोकांना तथ्ये समजावून सांगण्यात आणि त्यांचे गैरसमज दूर करण्यात मदत करणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार. WhatsApp ला खाजगी आणि वैयक्तिक संभाषणांचे सर्वोत्तम माध्यम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करू.


१५ जानेवारी २०२१

WhatsApp च्या गोपनीयता धोरणाविषयी तुम्हाला असलेल्या प्रश्नांची उत्तरे

आम्ही नुकतेच आमचे गोपनीयता धोरण अपडेट केले आणि आम्हाला त्याबद्दल स्पष्टीकरण मागणारे अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. या धोरणाविषयी इतके तर्कवितर्क सुरू आहेत की, तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देणे आम्हाला आवश्यक वाटले. लोकांना एकमेकांशी खाजगीरीत्या बोलता यावे यादृष्टीनेच WhatsApp चे निर्माण करण्यात आहे आणि हे खाजगीपण जपण्यासाठी आम्ही पराकोटीचे प्रयत्न केले आहेत.


सर्वप्रथम आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, गोपनीयता धोरणातील या अपडेटमुळे तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि प्रियजनांसोबत होणाऱ्या मेसेजेसच्या आदानप्रदानाच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होणार नाही. हे बदल WhatsApp वरील बिझनेसशी निगडीत वैकल्पिक फीचर्सच्या बाबतीतले आहेत आणि तुम्ही ही फीचर्स वापरण्याचा पर्याय निवडल्यास आम्ही कोणता डेटा गोळा करतो आणि वापरतो हे या अपडेटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्या बिझनेस फीचर्सविषयी आणि WhatsApp च्या गोपनीयता धोरणातील अपडेटविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.




WHATSAPP वर शेअर करा

तुमच्या वैयक्तिक मेसेजेसची गोपनीयता आणि सुरक्षा

आम्ही तुमचे वैयक्तिक मेसेजेस वाचू शकत नाही किंवा तुमचे कॉल्स ऐकू शकत नाही आणि हे Facebook ला देखील लागू आहे: तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना, प्रियजनांना किंवा सहकाऱ्यांना पाठवता ते मेसेजेस किंवा त्यांना केलेले कॉल्स WhatsApp किंवा Facebook वाचू अथवा ऐकू शकत नाही. तुम्ही दुसऱ्यांसोबत जे काही शेअर करता ते फक्त तुम्ही आणि ती दुसरी व्यक्ती यांच्यातच खाजगी राहते. तुमचे मेसेजेस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असल्याने हे शक्य होते. आम्ही ही सुरक्षा कधीही काढून घेणार नाही. तुमच्या मेसेजेसची गोपनीयता जपण्यासाठी आणि मेसेजेसची सुरक्षा ठळक करण्यासाठी आम्ही प्रत्येक चॅटला तसे लेबलही देतो. WhatsApp च्या सुरक्षेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.


प्रत्येक व्यक्ती कोणाला मेसेज किंवा कॉल करते आहे, याचे लॉग्स आम्ही ठेवत नाही: सर्वसाधारणपणे तुमचा मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा मोबाइल ऑपरेटर ही माहिती साठवून ठेवतात, पण दोन अब्ज लोकांची माहिती रेकॉर्ड्सच्या स्वरुपात ठेवणे हे गोपनीयता आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही किती घातक आहे हे आम्ही जाणतो आणि म्हणूनच आम्ही ते करत नाही.


आम्ही किंवा Facebook तुम्ही शेअर केलेले लोकेशन पाहू शकत नाही: तुम्ही WhatsApp वर एखाद्यासोबत तुमचे लोकेशन शेअर करता, तेव्हा ते लोकेशन एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असते. याचाच अर्थ, तुम्ही आणि तुम्ही ते लोकेशन ज्यांच्यासोबत शेअर केले आहे ती व्यक्ती, यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही ते लोकेशन पाहू शकत नाही.


आम्ही Facebook सोबत तुमचे संपर्क शेअर करत नाही: तुम्ही आम्हाला तुमच्या संपर्कांचा ॲक्सेस देता तेव्हा आम्ही तुमच्या ॲड्रेस बुकमधील संपर्क तुमचे मेसेजिंग अधिक वेगवान आणि विश्वासार्ह व्हावे यासाठी वापरतो. आम्ही तुमचे संपर्क Facebook वरील किंवा Facebook ने देऊ केलेल्या इतर कोणत्याही ॲपसोबत शेअर करत नाही.


ग्रुप्स खाजगीच राहतील: तुमची एखाद्या ग्रुपशी असलेली संलग्नता फक्त तुमचे मेसेजेस पोहोचवण्यासाठी आणि आमच्या मेसेजिंग सेवेचे स्पॅम व गैरवापर यांपासून संरक्षण करण्यासाठी वापरली जाते. Facebook वर तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी हा डेटा शेअर केला जात नाही. पुन्हा एकदा, तुमचे वैयक्तिक चॅट हे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असते, त्यामुळे त्यात काय आहे हे आम्हीदेखील पाहू शकत नाही.


तुम्ही मेसेजेस नाहीसे होण्यासाठी सेटिंग करू शकता: अधिक सुरक्षेसाठी तुम्ही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' फीचर सुरू करून मेसेजेस कालांतराने नाहीसे होतील अशा पद्धतीने सेट करू शकता. याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी मदत केंद्रामधील हा लेख पहा.


तुम्ही तुमचा डेटा डाउनलोड करू शकता: आमच्याकडे तुमच्या खात्याविषयी कोणती माहिती आहे हे जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही ॲपमधूनच तुमची माहिती डाउनलोड करून पाहू शकता. याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी मदत केंद्रामधील हा लेख पहा.


बिझनेससोबत होणारे मेसेजिंग आणि त्यासंदर्भात आम्ही Facebook सोबत कसे काम करतो आहोत

दर दिवशी जगभरातील करोडो लोक WhatsApp वरील छोट्या-मोठ्या बिझनेसेसशी संपर्क साधतात व त्यांच्याशी संभाषण करतात. तुम्ही WhatsApp वरील बिझनेसेससोबत संभाषण करण्याचा पर्याय निवडलात तर आम्ही ते मेसेजिंग सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न करतो. जेव्हा ही फीचर्स वापरणाऱ्या कोणत्याही व्यवसायाशी WhatsApp मधून तुम्ही संभाषण करत असता तेव्हा ते खाते बिझनेस खाते आहे हे आम्ही स्पष्टपणे सूचित करू.


Facebook होस्टिंग सर्व्हिसेस: तुमच्या कुटुंबीयांना किंवा प्रियजनांना मेसेज करणे आणि एखाद्या बिझनेसला मेसेज करणे, यात फरक आहे. WhatsApp वर असणारे काही बिझनेस इतके मोठे आहेत की त्यांना त्यांची संभाषणे व्यवस्थापित करण्यासाठी होस्टिंग सर्व्हिसेसची मदत घ्यावी लागते. म्हणूनच आम्ही अशा बिझनेसेसना त्यांच्या ग्राहकांसोबतचे चॅट व्यवस्थापित करण्यात, ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आणि खरेदीची पावती यासारखी उपयुक्त माहिती पाठवण्यात मदत व्हावी यासाठी Facebook च्या सुरक्षित होस्टिंग सर्व्हिसेस वापरण्याचा पर्याय दिला आहे. तुम्ही बिझनेससोबत फोनने, ईमेलने किंवा WhatsApp द्वारे संपर्क साधलात, तर त्या बिझनेसला तुमचे मेसेजेस वाचता येतात आणि ती माहिती त्यांच्या मार्केटिंगसाठी वापरता येते. यात Facebook वरील जाहिरातींचा समावेश असू शकतो. तुम्ही Facebook वरील होस्टिंग सर्व्हिसेसचा वापर करणाऱ्या बिझनेससोबतच संभाषण करत आहात हे तुम्हाला स्पष्ट कळावे यासाठी अशी संभाषणे स्पष्ट पद्धतीने लेबल केली जातात.


एखाद्या बिझनेसची माहिती मिळणे: तुम्हाला Facebook वर एखादी रोचक जाहिरात दिसल्यास आणि तुम्हाला त्या बिझनेसशी संपर्क साधायचा असल्यास तुम्ही त्या जाहिरातीवर असलेल्या बटणावर क्लिक करून WhatsApp द्वारे त्या बिझनेसला मेसेज करू शकता. तुम्ही तुमच्या फोनवर WhatsApp इंस्टॉल केलेले असेल, तर तुम्हाला त्या बिझनेसला मेसेज करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तुम्ही जाहिरातींच्या माध्यमातून कोणत्या बिझनेसेसशी संपर्क साधता या माहितीचा वापर Facebook तुम्हाला Facebook वर दिसणाऱ्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी करू शकते.


WhatsApp वरील 'पेमेंट्स': WhatsApp चे UPI वर आधारित 'पेमेंट्स' या फीचरचे गोपनीयता धोरण संपूर्णपणे वेगळे आहे. तुम्ही ते येथे पाहू शकता. या अपडेटचा या गोपनीयता धोरणावर परिणाम होणार नाही.

Comments