श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणिसावा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणिसावा औदुंबर माहात्म्य - नावाड्याची त्रिस्थळी यात्रा-योगिनी कथा !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिध्दमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, "अहो गुरु, तुमचा जयजयकार असो. तुम्ही संसारसागरतारक आहात. मी आजपर्यंत अज्ञानरुपी अंधारात झोपलो होतो; परंतु तुम्ही श्रीगुरुचरित्रकथामृत पाजून जागे केलेत. आत मला पुढील कथा सांगा." नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्ध्मुनींना आनंद झाला. ते म्हणाले, "कृष्णा-पंचगंगा संगमावरील अमरेश्वराच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरूनृसिंहसरस्वती वास्तव्य करीत होते." त्यावर नामधारकाने विचारले, "स्वामी, अनेक पवित्र वृक्ष असताना श्रीगुरु नृसिंहसरस्वती औदुंबर वृक्षाखालीच वास्तव्य का करीत होते ? औदुंबर वृक्षावर त्यांचे इतके प्रेम का होते ?" नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला व प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्य्पूचे पोट आपल्या नखाग्रांनी फाडून त्याला ठार मारले त्यावेळी त्या दैत्याच्या पोटातील भयंकर असे कालकूट विष त्यांच्या नखांना, बोटांना लागले, त्यामुळे त्यांच्या नखांची आग होऊ लागली. त्यावेळी नृसिंहाच्या नखांची आग शांत करण्यासाठी लक्ष्मीदेवी औदुंबराची फळे घेऊन आली. नृसिंहानी त्या फळात आपली नखे रोवली असता त्यांच्या नखांची आग नाहीशी झाली. त्यावेळी प्रसन्न झालेल्या लक्ष्मी आणि नृसिंह यांनी औदुंबराला वर दिला, "हे औदुंबर, तुला सदैव खूप फळे येतील.
तू कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील. जे लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतील. तुझ्या केवळ दर्शनाने विषबाधा नाहीशी होईल. मनुष्य पापमुक्त होईल. तुझी सेवा करणाऱ्या निपुत्रिक स्त्रीला त्वरित पुत्रप्राप्ती होईल. जे दरिद्री असतील ते श्रीमंत होतील. जे लोक तुझ्या छायेत बसून जप-तप-अनुष्ठान करतील त्यांना अनंत पुण्याची प्राप्ती होईल. ते ज्ञानी होतील. त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. तुझ्या छायेतील पाण्यात जे स्नान करतील त्यांना गंगास्नानाचे पुण्य प्राप्त होईल. तुझी सेवा करणाऱ्याला कोणताही शारीरिक, मानसिक व्याधी होणार नाही. ब्रम्हइत्यादी महापातके नष्ट होतील. कलियुगात तू 'कल्पवृक्ष' म्हणून ओळखला जाशील. आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायमचे वास्तव्य करू." असा हा औदुंबर वृक्ष कलियुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो. अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नृसिंह औदुंबरापाशी शांत झाले. औदुंबराचे हे माहात्म्य श्रीदत्तात्रेयस्वरूप श्रीनृसिंहसरस्वती यांना माहित होते, म्हणून त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता.
अमरेश्वराच्या जवळ चौसष्ट योगिनी वास्तव्य करीत होत्या. त्या योगिनी दररोज मध्यान्हकाळी श्रीगुरुंच्याकडे येत असत. तेथे त्यांची पूजा-अर्चा करून त्यांना आपल्या स्थानी नेत असत. तेथे त्यांची पूजा करून त्यांना उत्तम भोजन देत असत. त्यानंतर श्रीगुरू पुन्हा औदुंबरापाशी परत येत असत. एकदा एका ब्राम्हणाला शंका आली. "हे यती येथे अरण्यात राहतात. यांना भूक लागत नसेल का ? हे भिक्षेसाठी गावात फिरताना दिसत नाहीत. मग हे खातात काय ? यांना भोजन कोण देत असेल ? " त्याने नृसिंहसरस्वतींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यावेळी त्याला श्रीनृसिंहसरस्वतींचे रूप इतके भयंकर दिसले की तो भयभीत होऊन पळून गेला. जे श्रीगुरुंचा अंत पाहतात ते नरकात जातात, म्हणून श्रीगुरूंची कधीही परीक्षा पाहू नये; परंतु नदीवर नौका चालविणाऱ्या एका साध्या-भोळ्या नावाड्याचे भाग्य थोर ! त्याला असे दिसले की, मध्यान्हकाळी नदीतून चौसष्ट योगिनी आल्या. त्यांनी श्रीगुरुंची पूजा केली. मग त्या श्रीगुरुंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याचक्षणी नदी दुभंगली. सर्वजणी श्रीगुरुंसह आत गेल्या व काही वेळाने श्रीगुरुंना घेऊन बाहेर आल्या. मग श्रीगुरू एकटेच स्वस्थानी गेले. ते दृश्य पाहून तय नावाड्याला मोठे नवल वाटले. दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच योगिनी आल्या व श्रीगुरुंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या.त्याचक्षणी नदीप्रवाह दुभंगला. वाट निर्माण झाली. योगिनी श्रीगुरुंच्यासह आत शिरल्या. त्याचक्षणी तो नावाडीही त्यांच्या मागोमाग आत शिरला. दुभंगलेला नदीप्रवाह पूर्ववत झाला. आत गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. तेथे त्याला इंद्राच्या अमरावतीसमान वैभव संपन्न नगर दिसले. त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती.
श्रीगुरू तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. त्यांनी श्रीगुरुंना एका मंदिरात नेउन उच्चासनावर बसविले व त्यांची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम भोजन दिले. भोजन झाल्यावर श्रीगुरू बाहेर आले.
त्याचवेळी श्रीगुरुंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या नावाड्याला विचारले, "तू येथे कशासाठी आलास ? " तेव्हा तो नावाडी हात जोडून म्हणाला, "स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. संसारमायेत अडकले त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही. या संसारसागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रिमुर्ती श्रीदत्तात्रेय आहात. ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यांचे इह-पर कल्याण होते." त्या नावाड्याचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, "तुझे दैन्यदारिद्र्य गेले. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण होईल; परंतु येथे जे काही पाहिलेस ते कुणालाही सांगू नकोस. जर वाच्यता केलीस तर तुझे मोठे नुकसान होईल." असे सांगून ते नावाड्यासह औदुंबरापाशी आले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाडी आपल्या शेतात गेला. तेथे त्याला गुप्तधन सापडले. त्या धनामुळे त्याचे दुःखदारिद्र्य नाहीसे झाले. त्याची बायकामुले सुखी झाली. त्याला श्रीगुरुंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्तीही झाली. त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला.
असेच काही दिवस गेले. माघ महिन्यातील पौर्णिमा आली. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे श्रीगुरूंची सेवा करीत होता. तो श्रीगुरूंना सहज म्हणाला, "स्वामी, माघ महिन्यात प्रयागस्नान अत्यंत पुण्यकारक समजले जाते. काशीचेही माहात्म्य फार मोठे आहे. असे मी ऐकतो, पण मी हलक्या जातीचा. मी तिकडे कसा जाणार ? मला कोण नेणार ?" त्याचे हे बोलणे ऐकून श्रीगुरुंना त्याची दया आली. ते म्हणाले, "चिंता करू नकोस. अरे, कृष्णा-पंचगंगा संगमस्थान काशीप्रयागासमान आहे. अमरेश्वराचे वास्तव्य आलेले हे स्थानाच प्रत्यक्ष काशीक्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गया असे म्हणतात. ज्यांना उत्तरेतील काशी, प्रयाग, गया ही त्रिस्थळी यात्रा करता येत नाही, त्यांनी या त्रिस्थळेची यात्रा करावी म्हणजे तेच पुण्य प्राप्त होते, पण तुला उत्तरेतील ती क्षेत्रे पहावयाची असतील, तर चल माझ्याबरोबर, मी तुला ती दाखवितो."
श्रीगुरुनृसिंहसरस्वती व्याघ्रचर्मावर बसले होते त्यांनी त्या नावाड्याला आपल्या मागे बसण्यास सांगितले व म्हणाले, 'मला नीट धरून ठेव' तो नावाडी व्यवस्थित बसला असता श्रीगुरुंनी आपल्या दिव्य योगशक्तीने त्याला एका क्षणात प्रयागक्षेत्री नेले. तेथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन पुढच्याच क्षणी गयेला स्नान व दर्शन करून क्षणार्धात मुळ मुक्कामी परत आले. त्या नावाड्याचे केवढे भाग्य ! श्रीगुरुंच्या कृपेने एका दिवसात त्याला त्रिस्थळी यात्रेचे पुण्य प्राप्त झाले.
या घटनेने श्रीगुरूंची कीर्ती सर्वत्र पसरली. मग त्यांनी औदुंबरक्षेत्र सोडून अन्यत्र जाण्याचे ठरविले. योगीनींना हे समजताच त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांनी श्रीगुरुंना इथेच राहण्याचा आग्रह केला, तेव्हा दयाघन श्रीगुरू त्यांना समजावीत म्हणाले, "मी या औदुंबरक्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहीन. स्थूल रूपाने मी अन्यत्र जाणार आहे. मी औदुंबरात अन्नपूर्णेला ठेवून जातो. तुम्ही येथेच राहा. हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल. जे लोक येथे येउन औदुंबराची, आमच्या पादुकांची व तुमची पूजा करतील. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.येथे अन्नपूर्णा आहे, तिची नित्य पूजा केली असत चारी पुरुषार्थ पूर्ण होतील. येथे पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ व सिद्ध वरदतीर्थ आहे, त्या तीर्थात सात वेळा स्नान केले असता ब्रम्हहत्यादी महापातके नष्ट होतील. साठ वर्षाच्या वांझ स्त्रीलासुद्धा शतायुषी पुत्रप्राप्ती होईल. चंद्र-सूर्य ग्रहणाच्या दिवशी, मकर संक्रातीला, व्यातीपादादी पर्वणी असताना येथे स्नान केले असता गंगेच्या तीरावर ब्राम्हणाला एक हजार गाई दान केल्याचे पुण्य लाभेल. येथे भक्तिभावाने एक सत्पात्री ब्राम्हणाला भोजन दिल्यास कोटी ब्राम्हणांना भोजन दिल्याचे पुण्य प्राप्त होईल. येथील औदुंबर वृक्षाखाली पवित्र मनाने जप केल्यास त्याचे कोटीपट पुण्य लाभेल. येथे एकादश रुद्रजप केला असता अतिरुद्र केल्याचे फळ प्राप्त होईल. एक लक्ष प्रदक्षिणा घातल्यास कुष्ठरोग नाहीसा होऊन देवासमान शरीरकांती प्राप्त होईल." अशारीतीने चौसष्ट योगीनींना औदुंबरक्षेत्राचे माहात्म्य सांगून श्रीगुरू भीमातीरी वसलेल्या गंगापूरस गेले. सिद्धमुनी नामधारकास म्हणाले, "गुरुमाहात्म्य हे असे आहे." सरस्वती गंगाधर म्हणतात, कामधेनूसमान असलेले हे श्रीगुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करील त्याला चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. त्याच्या घरी लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहील. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'औदुंबर माहात्म्य - नावाड्याची त्रिस्थळी यात्रा-योगिनी कथा 'नावाचा अध्याय एकोणिसावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment