श्री गजानन महाराजांची स्तोत्रे

 २१ दुर्वांकुर


श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र –

शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें तयांच्या हरतील विघ्न ।

म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१॥

येऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती ।

उच्छिष्ट पात्राप्रती सेवियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२॥

उन्हा तहानेची नसे त्यास खंत । दावियलें सत्य असेचि संत ।

पाहूनी त्या चकित बंकटलाल झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥३॥

घेऊनी गेला आपुल्या गृहासी । मनोभावे तो करी पूजनासी ।

कृपाप्रसादे बहु लाभ झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥४॥

मरणोन्मुखीं तो असे जानराव । तयांच्या मुळे लाभला त्यास जीव ।

पदतीर्थ घेता पूनर्जन्म झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥५॥

पहा शुष्कवापी भरली जलाने । चिलिम पेटविली तये अग्निविणें ।

चिंचवणें नाशिले करीं अमृताला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥६॥

ब्रह्म गिरीला असे गर्व मोठा । करि तो प्रचारा अर्थ लावूनि खोटा ।

क्षणार्धा त्याचा परिहार केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥७॥

बागेतली जाती खाण्यास कणसं । धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश ।

योगबळे काढिलें कंटकाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥८॥

भक्ताप्रती प्रिती असे अपार । धावुनी जाती तया देती धीर ।

पुंडलिकाचा ज्वर तो निमाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥९॥

बुडताच नौका नर्मदेच्या जलांत । धावा करिती तुमचाचि भक्त ।

स्त्री वेष घेऊनी तिने धीर दिला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१०॥

संसार त्यागियला बायजाने । गजानना सन्निध वाही जिणे ।

सदा स्मरे ती गुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥११॥

पितांबरा करी भरी उदकांत तुंबा । पाणि नसे भरविण्यास नाल्यास तुंबा ।

गुरुकृपेने तो तुंबा बुडाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१२॥

हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा । पितांबराची घेत गुरु परीक्षा ।

गुरुकृपा लाभली पितांबराला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१३॥

चिलीम पाजावी म्हणून श्रीसी । इच्छा मनी जाहली भिक्षुकासी ।

हेतू तयाचा अंतरी जाणियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१४॥

बाळकृष्न घरी त्या बालापुरासी । समर्थरुपे दिले दर्शनासी ।

सज्जनगडाहूनी धावुनी आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१५॥

नैवेद्य पक्वान्न बहु आणियेले । कांदा भाकरीसी तुम्ही प्रिय केले ।

कंवरासी पाहुनी आनंद झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१६॥

गाडी तुम्ही थांबविली दयाळा । गार्डप्रति दावियेली हो लिला ।

शरणांगती घेऊनी तोही आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१७॥

जाति धर्म नाही तुम्ही पाळियेला । फकिरा सवे हो तुम्ही जेवियेला ।

दावूनी ऐसे जना बोध केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१८॥

अग्रवालास सांगे म्हणे राममूर्ति । अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती ।

सांगता क्षणीं तो पहा मानिएला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१९॥

करंजपुरीचा असे विप्र एक । उदरी तयाच्या असे हो की दु:ख ।

दु:खातुनी तो पहा मुक्त झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२०॥

दुर्वांकुरा वाहुनी एकवीस । नमस्काररुपी श्रीगजाननास ।

सख्यादास वाही श्रीगुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२१॥


।। श्री गजानन महाराजांची आरती ।।

जय जय सतचितस्वरूपा स्वामी गणराया l

अवतरलासी भूवर जड़ -मूढ ताराया ll

जयदेव जयदेव ll धृ.ll


निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी l

तें तूं तत्त्व खरोखर नि:संशय अससी l

लीलामात्रे धरिले मानवदेहासी ll १ ll


होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा l

करुनि ‘गणि गण गणात बोते’ या भजना l

धाता नरहरि गुरुवार तूची सुखसदना l

जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ll २ ll


लीला अनंत केल्या बंकटसदनास l

पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस l

क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस l

केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ll ३ ll


व्याधी धारून केले कैकां संपन्न l

करवियले भक्तालागी विट्ठलदर्शन l

भवसिंधु हां तरण्या नौका तव चरण l

स्वामी दासगणूचे मान्य करा वचन ll ४ ll


।। श्री गजानन महाराज बावन्नी ।।

जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।।

निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।।

सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ।।३।।

माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।।

उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट ।।५।।

बंकटलालावरी तुझी । कृपा जाहली ती साची ।।६।।

गोसाव्याच्या नवसासाठी । गांजा घेसी लावुनी ओठी ।।७।।

तव पदतीथें वाचविला । जानराव तो भक्त भला ।।८।।

जानकीरामा चिंचवणे । नासवुनी स्वरूपी आणणे ।।९।।

मुकिन चंदुचे कानवले । खाऊनि कृतार्थ त्या केले ।।१०।।

विहिरीमाजी जलविहिना । केले देवा जलभरणा ।।११।।

मधमाश्यांचे डंख तुवा । सहन सुखे केले देवा ।।१२।।

त्यांचे काटे योगबले । काढुनि सहजी दाखविले ।।१३।।

कुस्ती हरिशी खेळोनी । शक्ती दर्शन घडवोनी ।।१४।।

वेद म्हणुनी दाखविला । चकित द्रविड ब्राम्हण झाला ।।१५।।

जळत्या पर्यकावरती । ब्रम्हगिरीला ये प्रचिती ।।१६।।

टाकळीकर हरिदासाचा । अश्व शांत केला साचा ।।१७।।

बाळकृष्ण बाळापूरचा । समर्थ भक्तचि जो होता ।।१८।।

रामदासरूपे त्याला । दर्शन देवुनि तोषविला ।।१९।।

सुकलालाची गोमाता । व्दाड बहू होती ताता ।।२०।।

कृपा तुझी होतांच क्षणी । शांत जाहली ती जननी ।।२१।।

घुडे लक्ष्मण शेगांवी । येता व्याधी तूं निरवी ।।२२।।

दांभिकता परि ती त्याची । तू न चालवूनि घे साची ।।२३।।

भास्कर पाटील तव भक्त । उध्दरिलासी तू त्वरीत ।।२४।।

आज्ञा तव शिरसा वंद्य । काकहि मानति तुज वंद्य ।।२५।।

विहिरीमाजी रक्षियला । देवां तु गणु जव-याला ।।२६।।

पितांबराकरवी लीला । वठला आंबा पल्लविला ।।२७।।

सुबुध्दी देशी जोश्याला । माफ करी तो दंडाला ।।२८।।

सवड्द येथील गंगाभारती । थुकुंनी वारिली रक्तपिती ।।२९।।

पुंडलिकांचे गंडांतर । निष्ठा जाणुनि केले दुर ।।३०।।

ओंकारेश्र्वरी फुटली नौका । तारी नर्मदा क्षणात एका ।।३१।।

माधवनाथा समवेत । केले भोजन अुच्छिष्ट ।।३२।।

लोकमान्य त्या टिळकांना । प्रसाद तूंची पाठविला ।।३३।।

कवर सुताची कांदा भाकर । भक्षिलीस त्वा प्रेमाखातर ।।३४।।

नग्न बैसुनी गाडीत । लिला दाविली विपरीत ।।३५।।

बायदे चित्ती तव भक्ती । पुंडलिकावर विरक्त प्रीती ।।३६।।

बापुना मनी विठ्ठल भक्ती । स्वये होशि तू विठ्ठल मूर्ती ।।३७।।

कवठ्याचा त्या वारक-याला । मरीपासूनी वाचविला ।।३८।।

वासुदेव यति तुज भेटे । प्रेमाची ती खुण पटे ।।३९।।

उध्दट झाला हवालदार । भस्मिभूत झाले घरदार ।।४०।।

देहांताच्या नंतरही । कितीजणा अनुभव येई ।।४१।।

पडत्या मजुरा झेलियले । बघती जन आश्र्चर्य भले ।।४२।।

अंगावरती खांब पडे । स्ञी वांचे आश्र्चर्य घडे ।।४३।।

गजाननाच्या अध्दत लीला । अनुभव येती आज मितीला ।।४४।।

शरण जाऊनी गजानना । दु:ख तयाते करि कथाना ।।४५।।

कृपा करि तो भक्तांसी । धावुनी येते वेगेसी ।।४६।।

गजाननाची बावन्नी । नित्य असावी ध्यानीमनी ।।४७।।

बावन्न गुरूवारी नेमे । करा पाठ बहू भक्तीने ।।४८।।

विघ्ने सारी पळती दूर । सर्वसुखाचा येई पुर ।।४९।।

चिंता साया दुर करी । संकटातूनी पार करी ।।५०।।

सदाचार रत सद् भक्ता । फळ लाभे बघता बघता ।।५१।।

सुरेश बोले जय बोला । गजाननाची जय बोला ।।५२।।


।। श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत) ।।


गजानना गुणागरा परम मंगला पावना ।

अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।

नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा ।

करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।


निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी ।

तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ।

विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा ।

करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।


अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन ।

समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।।

म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।

करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।


क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला ।

क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।

क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा ।

करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।


अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे।

तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ।

कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा ।

करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।


समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी ।

तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ।

हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ।

करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।


सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां ।

जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ।

अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा ।

करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।


अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो ।

पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।

तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा ।

करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।


।। श्री गजानन महाराज स्तोत्र ।।

हे सर्वाद्या सर्वशक्ती | हे जगदोद्वारा जगत्पति |

साहय व्हावें सत्वरगति | या लेकराकारणें ||१||

जे जे काही ब्रम्हांडात | तें तें तुझें रुप सत्य |

तुक्यापुढें नाहीं खचित | कोणाचीही प्रतिष्ठा ||२||

तूं निरंजन निराकार | तूंच अवधूत दिगंबर |

साकाररुप सर्वेश्र्वर | विश्र्वनाथ तूंच की ||३||

जे जे काही म्हणावें | तें तें तुझे रुप बरवें |

दासगणूस आतां पावे | हीच आहे याचना ||४||

तूंच काशी विश्र्वेश्वर | सोमनाथ बद्रीकेदार |

महंकाल तेवि ओंकार | तूंच की रे त्र्यंबकेश्र्वरा ||५||

भीमाशंकरा मल्लिकार्जुन | नागनाथ पार्वतीरमण |

श्रीघृणेश्वर म्हणून | वेरुळगांवी तूंच की ||६||

तूंच परळी वैजनाथ | निधीतटाला तूंच स्थित |

रामेश्वर पार्वतीकांत | सर्व संकट निवारता ||७||

हे कृपार्णवा नारायणा| महाविष्णो आनंदधना |

हे शेषशायी परिपूर्णा | नरहरि वामना रघुपते ||८||

तूं वृंदावनीं श्रीहरी | तूं पांडुरंग पंढरपुरीं |

व्यंकटेश तूं गिरीवरीं | पुरीमाजीं जगन्नाथे ||९||

द्वारेसी नंदनंदन | नाम देती तुजकारण |

जैसे भक्तांचें इच्छील मन | तैसे तुज ठरविती ||१०||

आता हे चंद्रभागातटविहारा | या गजाननस्तोत्रा साहय करा |

हेंच मागें पसरुनि पदा | तुज विठठले दासगणू ||११||

गजानन जे स्वरुप कांही | तें तुक्याविण वेगळे नाही |

दत्त भैरव मार्तड तेही | रुपें तुझीच अधोक्षजा ||१२||

या सर्व स्वरुपांकारण | आदरे मी करी वंदन |

माझे त्रिताप करा हरण | हेंच आहे मागणे ||१३||

हें महालक्ष्मी कुलदेवते | कृपाकटाक्षें लेकरातें |

पाही दासगणूतें | हीच तुजला प्रार्थना ||१४||

आतां श्रीशंकराचार्य गुरुवर | तेवी नाथ मच्छिंदर |

निवृत्तीदास ज्ञानेश्वर | समर्थ सज्जनगडीचे ||१५||

हे तुकारामा महासंता | तुजलागी दंडवता |

करितों होई मला त्राता | नाहीं ऐसे म्हणूं नका ||१६||

हे शिडी।कर बाबासाई | लेकरांसाठी धांव घेई |

वामनशास्त्री माझे आई | माझी उपेक्षा करुं नका ||१७||

हे शेगांवीच्या गजानना | महासंत्ता आनंदघना |

तुला येऊं दे काहीं करुणा | या अजाण दासगणुची ||१८||

तुम्हां सर्वा प्रार्थून | स्तोत्र करितो हे लेखन |

माक्या चित्तीं म्हणून | वास आपण करावा ||१९||

जे जे तुम्ही वदवाल कांही | तेंच लिहीन कागदीं पाहीं |

स्वतंत्रता मलजा नाही | मी पोषणा तुमचना असें ||२०||

माघमांसीं सप्तमीस | वद्यपक्षीं शेगांवात |

तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष | पंथाचिया माझारी ||२१||

उष्टया पत्रावळी शोधन | तुम्ही केल्या म्हणून |

मिळालें की नामभिमान | पिसा पिसा ऐसें तुम्हा ||२२||

उगी न वाढावी महती | म्हणून ऐसी केली कृती |

तुम्ही साच गुरुमूर्ती | लपून बसाया कारणे ||२३||

परि विचारवंत जे ज्ञानी | तें तुम्हालागी पाहुनी |

भ्रमा हातफळी देऊनी | पाय तुमचे वंदितात ||२४||

बंकटलाल दामोदर | हे दोघे चतुर नर |

भ्रमातें सारुन दूर | शरण आले तुम्हांला ||२५||

बंकटलालाचें सदनास | तुम्ही राहिला कांही दिवस |

तेथे जानराव देशमुखास | मरत असतां वांचविले ||२६||

केवळ पाजुनियां तिर्था | आपुल्या पदींचे समर्था |

तुजलागी दंडवता | असो आमुचा बरचेवर ||२७||

तुझीया लिलानिधीचा | नच लागे पार साचा |

टिटवींने सागाराचा अंत कसा घेववेल ? ||२८||

पितांबरा देऊनी भोपळा | नाल्यास तुम्ही पाठविला |

जल तें हो आणविण्यांला | तहान लागली म्हणून ||२९||

पितांबरासी बजाविलें | ओंजळीनें पाणी भले |

न पाहिजेतुंवा भरले | या माझिया भोपळयांत ||३०||

जलांत तुंबा बुडवावा | जलें पूर्ण भरुन घ्यावा |

आणि तोच मला आणून द्यावा | यांत अंतर करुं नको ||३१||

तुंबा बुडेल ऐंसे पाणी | नव्हते नाल्यालागुनी |

विश्र्वास ठेवलोनिया वचनीं | ऐसे केलें पितांबरे ||३२||

नाल्याचिया जलास | तुंबा तो लावितां सरसी |

आपोआप त्या ठायासी | भव्य खांच पडली की ||३३||

तुंबा त्यांत भरत आला | ऐशी तुझी अगाध लिला |

ती साच वर्णण्याला | शेषही थकेल वाटते ||३४||

सोमवारी प्रदोषांसी | बंकटलालच्या सदनरासी |

भाविकां आपण व्योमकेशी | दिसतसां महाराजा ||३५||

यात नवल ना तिळभर | कां की तूंच शंकर रमावर |

हे जेवढे चराचर | तेवढे तुम्हींच आहात की ||३६||

तुझे स्वरुप यथातथ्य | मानवासी नाहीं कळत |

म्हणून पडती भ्रमांत | मायावधहोऊनी ||३७||

प्रातः कालाचे वेळीं | संपली होती दिवासही |

जानकीराम देईना मुळीं | विस्तव तुमच्या चिलमिस ||३८||

जानकीराम सोनार बागेसरीचा वैश्र्वानर |

द्यावयासी कुरकुर | करुं लागला असे की ||३९||

तें अंतज्ञानी जाणून | कौतुक दाविले करुन |

चिलीम विस्तवांवाचून | पेटूनिया दाविली ||४०||

सोनार विस्तव देण्यांला | नाहीं ऐसे वदला|

म्हणूनिया येता झाला | राग भगवंताकारणें ||४१||

चिंचवणे ते सोनाराचें | नासलें अक्षय तृतीयेचें |

प्राणघातक किंडयांचे | झालें त्यांत साम्राज्य ||४२||

अवघे टकमका पाहती | नाका पदर लाविती |

एकमेकां सांगती | हें चिंचवणे खाऊ नका ||४३||

मग जानकीराम म्हणाला | साधूस वितव ना दिला |

त्याचा हा प्रत्यय आला | धन्य धन्य हा गजानन ||४४||

मग तात्काळ उठून वेगेंसी | आला बंकटलाल सदनासी |

हकीकत बंकटलालासी | सर्व केली निवेदन ||४५||


|| श्रींचे गादी समोर होणारी सायं. आरती ||


।। श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

(चाल आरती भुवनसुंदराची )


ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया ।।धृ।। आवरी जगन्मोहिनीला । दावी चिन्मय स्वरूपाला ।। देई सद्बुध्दी मजला । प्रेमे तव यश गाण्याला ।।।।चाल।। भक्तांकितां स्वामीराया, चरणी मी शरण ।। करूनी भय हरण, दावी सुख सदन ।। अमित मम दोष त्यागुनीयां । विनवितो दास तुला सदया ।। १ ।। जन-पदमुक्ति-पदान्याया । स्थली या अवतरला राया ।।चाल।। ही जड मुढ मनुज-काया । पदीं तव अर्पियली राया ।।चाल।। हे दिग्वसन योगीराया, नको मज जनन पुनरपि मरण, येत तुज शरण ।। पुरवी ही आस संतराया । प्रार्थना हीच असे पाया ।। २ ।। नेण्या अज्ञ-तमा विलया । अलासी ज्ञान रवी उदया ।। करी तु ज्ञानी जनाराया । निरसुनी मोह – पटल माया ।। चाल ।। गजानन संतराया असशी बळवंत । तसा धीमंत नको बघु अंत । विनवितो दास तुम्हा राया । नका त्या दूर करू सदया ।।३।।


|| आरती ||

आरती सद्गुरू नाथा । अवलीया समर्था । आरती ओवाळीतो । मनोभावे मी आता । आरती सद्गुरू नाथा ।।धृ।। दिधले निजभक्ता । भावे इच्छीत फल त्वा, पाजुनि ज्ञानामृता । उध्दरिले समर्था । आरती सद्गुरू नाथा ।।१।। कविजन गुण गाता । थकियले समर्था । अघटित ऐसी लिला । मति धजि ही न आता । आरती सद्गुरू नाथा ।।२।। विनंती भगवंता । तारी रामात्मज आता । आरती पूर्ण करितो । शरणागत बलवंता। आरती सद्गुरू नाथा ।।३।।


|| कापुरार्ती ||


जयजय कर्पूरगौरा । तारी जयजय कर्पूरगौरा ।।धृ।। भस्म हे चर्चित निल गलांबर झल्लालती रूंडमाळा ।। इंदु लल्लाटी शोभतसे कटी । गजचर्म व्याघ्रांबरा । शंभो जयजय कर्पूरगौरा ।।१ ।। श्वेतासनी महाराज विराजित । अंकी बसे सुंदरा । भक्त दयाघन वंदिती चरण । धन्य तु लीलावतारा । शंभो जयजय कर्पूरगौरा ।। २ ।। मतिमंद दीन झालो पदी लीन । पार करी संसारा । काशीसूतात्मज मागतसे तुज । द्या चरणी मज थारा ।। शंभो जयजय कर्पूरगौरा ।।३।। कर्पूरगौरं करूणावतारं । संसारसारं भुजगेंद्रहारं । सदा वसंतं हृदयारविंदे । भवं भवान्यासाहित नमामि ।। मंदारमाला कपाल काय । दिगंबराय दिगंबराय ।। नमः शिवाय नमः शिवाय ।। कर्पूर महादीप समर्पयामी ।।


|| मंत्रपुष्पांजली ||

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः।। ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।। ॐ स्वस्ति । साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्यान्ताया एकराळिति । तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्याऽवसन् गृहे ।। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।। तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।। ॐ पूर्ण ब्रह्माय धीमहि, तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।


|| श्लोक ||


पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला ।

बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ।।

न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती ।

कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ।।


|| श्लोक ||

(वृत्त-भुजंगप्रयात)

सदासर्वदा योग तुझा घडावा ।

तुझे कारणी देह माझा पडावा ।।

उपेक्षूं नको गुणवंता अनंता ।

रघुनायका मागणे हेचि आता ।।१।।

उपासनेला दृढ चालवावे ।

भूदेव-संतासि सदा नमावे ।

सत्कर्मयोगे वय घालवावे ।

सर्वामुखी मंगल बोलवावे ।।२।।


|| नमस्काराष्टक ||

योगी दिगंबर विरक्तविदेही संत ।

उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत ।।

शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे ।

वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।।

ओहोळ घाण जल वाहत विषयांचे ।

भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।।

तुंबी तुडुंब भरले किती स्तोत्र गावें ।

वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। २ ।।

संत्रस्त पंक्तिस करी बहु काकपंक्ती ।

गेली क्षणात उठुनी परसोत उक्ती ।।

आत्मैक्य हे गुरूवरा, प्रचितीस यावे ।

वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।३।।

पेटूनी मंचक धडाडत अग्निज्वाला ।

मध्ये सुशांत गुरुमूर्ति न स्पर्श झाला ।।

ते योग वैभव पुन्हा नयना दिसावे ।

वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।४।।

तारीयली सहजची तरि नर्मदेत ।

देवी सदिव्य प्रकटे नवलाव होत ।।

ज्याच्या कृपे भवजली तरुनीच जावे ।

वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।५।।

जे ब्रह्म ब्रह्मगिरीला कळले न साच ।

पांडित्य मात्र नुसते उरला तसाच ।।

त्या सांगती नित मुखे हरीनाम घ्यावे ।

वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।६।।

बाधे तृषा गुरुवरा जल ना मिळाले ।

खाचाड रूक्ष असतां झणि तोय आले ।।

प्रार्थू पदीं हृदय भक्ति जले वहावे ।

वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।७।।

स्वामी समर्थ जगती अवतार घेती ।

कष्टोनि धेनु व्दिज धर्मचि रक्षिताती ।।

घ्या धेनुदास पदरी जरी पापि ठावें ।

वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। ८ ।।


|| श्लोक ||

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ।

त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।

मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी ।

तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही ।

श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।


|| प्रदक्षिणा ||

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।

तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे ।।


|| क्षमापनम् ||

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम ।

तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर ।

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।

यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।

पुजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर ।।

श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।


|| मंत्रपुष्पांजली ||

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः।। ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।। ॐ स्वस्ति । साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्यान्ताया एकराळिति । तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्याऽवसन् गृहे ।। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।। तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।। ॐ पूर्ण ब्रह्माय धीमहि, तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।

Comments